पूर्वाषाढा नक्षत्र विचार


विषय : पूर्वाषाढा नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण पूर्वाषाढा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.

पूर्वाषाढा हे नक्षत्र चक्रातील २० वे क्रमांकाचे नक्षत्र असून या नक्षत्राला इंग्रजीमध्ये ‘आल्फा डेल्फिनी’ म्हणतात. या नक्षत्रामध्ये २ तारे असून नक्षत्राची आकृती हत्तीच्या दातासारखी किंवा काहींच्या मते शय्याकृती आहे. तारे ठळक व पांढऱ्या रंगाचे असून मध्यम तेजस्वी आहेत. आषाढ महिन्यात हे नक्षत्र रात्रभर आकाशात दिसते. या नक्षत्राचे ४ ही चरण धनु राशीत येत असल्याने ते चतुष्पादी आहे. नक्षत्राचा स्वामी शुक्र, दैवत उदक नावाची देवता व राशीस्वामी गुरु असल्याने या नक्षत्रात शुक्राची हौस व सौंदर्यदृष्टी, उदक या देवतेचा उदारपणा व गुरुचा न्यायीपणा व समतोलपणा या गुणांचा सुंदर संगम दिसून येतो. तसेच हे नक्षत्र अधोमुख, उग्र, क्रूर, अंधलोचनी, मनुष्यगणी आहे. हे नक्षत्र मनुष्यगणी असल्याने या नक्षत्रात फार प्रखर व वैशिष्ट्यपूर्ण फलादेश दिसून येत नाही. शुभ व रजो गुणधर्माचे मिश्रण दिसून येते, खावे-प्यावे, मजा करावी, फक्त आपला संसार व आपल्यापुरते बघावे. फारशी महत्त्वाकांक्षा नसणे हे गुण आढळतात. विद्या व बुद्धी, सुख साधारण, जरा अभिमानी, गर्विष्ठ, चैनी, आनंदी, रजोगुणी, स्वार्थ साधून समाजसेवा व कामापुरती देवाची भक्ती, टापटीप, व्यवस्थितपणा, धाडसीपणा साधारण.

पूर्वाषाढा नक्षत्र स्त्रियांपेक्षा पुरुषांना जास्त चांगले. कारण पुरुषांना लागणारा राकटपणा, कणखरपणा, काटकपणा, स्वतंत्रवृत्ती, अधिकारलालसा, स्वावलंबित्व हे गुण चांगले दिसून येतात. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या जातकांचा बांधा मध्यम उंच, थोडा आडवा, शरीर हाडापेराने मजबूत, थोडे पीळदार पण प्रमाणबद्ध असते. सांध्यातील हाडे जरा मोठी, रुंद व लांब असतात. मनगटे पीळदार असतात. कपाळ मोठे व डोके मोठे असते. गालफाडे वर असून कोणताही पदार्थ गालफडात साठवून चावून चावून खायची सवय असते. चेहरा दिसण्यात चारचौघासारखा व थोडा बुद्धीमान असतो. या जातकांना  व्यायामाची वगैरे फारशी आवड नसली तरी त्यांची अंगकाठी मूळचीच मजबूत असून शारीरिक ऊर्जा व प्रतिकारशक्ती उत्तम असते. स्वभावाने उदार व उदात्त असल्या तरी आपल्यापुरते पाहणारे, अभिमानी, वारंवार कायद्याच्या भाषेत बोलणारे, बऱ्याच वेळा कीस काढणारे व किरकिरे असतात. कमी कष्टात  आहे त्याच परिस्थितीत समाधान मानणाऱ्या असतात. खादाडपणा जास्त असून त्यांना सात्विक व चवदार अन्न लागते.

पूर्वाषाढा नक्षत्र स्त्रियांना फारसे अनुकूल नाही. हे शुक्राचे नक्षत्र असले तरी शुक्राचे सुडौल, बांधेसूद शरीर, कोमलपणा, नाजूकपणा, रेखीवपणा, सौंदर्य किंवा कला या गोष्टी दिसून न येता थोडेफार सुस्तपणा, ऐदीपणा, छानछोकीपणा असू शकतो. या स्त्रिया जवळजवळ पुरुषी बांध्याच्या व जरा राकट  दिसतात. हाडपेर जास्त मजबूत असते. चेहराही जरा पुरुषी वळणाचा असू शकतो. छाती विशाल, रुंद व खांदेपण रुंद असतात. बांधा मजबूत व सशक्त असतो. स्वच्छ व नीटनेटक्या पोशाखाची आवड असते. स्वतंत्र वृत्ती व अधिकारलालसा दिसून येते. उत्तम गृहिणी व संसाराला लागणारे गुण व्यवहारकुशलता व कर्तव्यदक्षता आढळते. कलाकौशल्य, कलाकुसर, संगीत, गायन, वादन, नृत्य अशा कलांसाठी साधारण.

पूर्वाषाढा नक्षत्राखाली येणारा वर्ग म्हणजे समाजामधील नोकरी किंवा व्यापारात असलेला, धार्मिक, पापभीरू असा मध्यमवर्ग. बँका, कंपन्या यात काम करणारा कारकुनी वर्ग, लहान प्रमाणात स्टेशनरी, पुस्तके विकणारे व्यापारी, छोटे छोटे अॅडव्होकेट, वकील किंवा इन्कमटॅक्स व सेल्सटॅक्सची प्रॅक्टिस करणारा वर्ग याखाली येतो. हे नक्षत्र फारसे अधिकार किंवा उच्चपदे अथवा श्रेष्ठत्व साठी साधारण.

पूर्वाषाढा नक्षत्र क्रूर व जरा अग्नितत्त्वाचे असल्याने या नक्षत्रावर होणारे आजार कमी, पण जरा दाहक स्वरूपाचे असतात. प्रकृती जरा उष्ण असते. उष्णतेच्या विकाराचा जास्त त्रास होतो. अंगाची लाहीलाही होणे, अंग खाजणे, कापणे, भाजणे, हाडे मोडणे, खरचटणे, धडपडणे, पाठीचे मणके घासणे, सरकणे, मणक्यात पाणी साचणे किंवा शुष्क होणे, मांड्यांना जखमा होणे, अपघात, मूळव्याध, कावीळ हे याचे मुख्य आजार होत.

पूर्वाषाढा नक्षत्री रवि शरीरप्रकृतीच्या दृष्टीने उत्तम, बांधा मजबूत, सशक्त व ताठ असतो. हाडपेर मजबूत असते. धन व अधिकारयोगाच्या दृष्टीनेही बरा पण बुद्धीच्या दृष्टीने सामान्य नीतिमान व सगुणी असतो.

पूर्वाषाढा नक्षत्री चंद्र हा रूप व संपत्तीच्या दृष्टीने चांगला असतो. चंद्र असता अनुकूल, आनंदी, संपत्तीमान, ऐश्वर्य भोगणारा, हौशी, विलासी व मित्रसंपन्न होतो. विद्या व बुद्धी मध्यम.

पूर्वाषाढा नक्षत्री  मंगळ साधारण. शरीरप्रकृती सशक्त व मजबूत असते. थोडी व्यायामाची आवड असते. मात्र तामसी, उतावळा व गर्विष्ठं असतो. यांत्रिक कलासंबंधी शिक्षण पूर्ण होते. शस्त्रक्रिया व अपघाताची भीती असते.

पूर्वाषाढा नक्षत्री बुध सामान्य असतो. बुद्धी बरी, व्यवहारी व काटकसरी असून विचारवंत असतो.

पूर्वाषाढा नक्षत्री गुरु विद्या व शरीरप्रकृतीच्या दृष्टीने चांगला पण धन किंवा ऐश्वर्याच्या दृष्टीने मध्यम. बुद्धी साधारण असते. कायदा, न्याय, अर्थशास्त्र, स्थापत्यशास्त्र यांना चांगला. अधिकारयोग व दर्जा मिळतो.

पूर्वाषाढा नक्षत्री शुक्र ख्यालीखुशालीपणा व रंगेलपणा देतो. पण कला किंवा ऐश्वर्याच्या दृष्टीने अनुकूल नसतो. पण विचारी, व्यापारी वर्गाला चांगला. तब्येत मात्र साधारण असते.

पूर्वाषाढा नक्षत्री शनि शरीरप्रकृती व व्यापाराच्या दृष्टीने उत्तम. बांधा पीळदार, मजबूत व कणखर असतो. लोखंडाचा व्यापार, कारखानदारी अथवा कठीण वस्तूंच्या व्यापाराला उत्तम. बरेच प्रश्न व कष्ट घेऊन हे जातक यशस्वी व्यापारी बनतात. तसेच गुणवान, खटपटी, मेहनती, धनसंचय करणारे असतात.

पूर्वाषाढा नक्षत्री राहू शरीरप्रकृती व आरोग्य बरे देतो. धनाच्या दृष्टीने मध्यम व जास्त चैनी व ख्याली-खुशालीत दंग असतो.

पूर्वाषाढा नक्षत्री केतू निरोगी पण ओबडधोबड शरीर दर्शवितो. धार्मिक, आध्यात्मिक, तत्त्वज्ञान व परमार्थिक विद्येच्या दृष्टीने बरा.

पूर्वाषाढा नक्षत्री हर्षल असता शरीरबांधा व प्रकृती बरी असते. पण बुद्धीमान असल्या तरी सरळ मार्गाने जाणाऱ्या नसून जरा लहरी, विक्षिप्त, चैनी, विलासी आणि अघोरी महत्वाकांक्षा असणाऱ्या असतात.

पूर्वाषाढा नक्षत्री नेपच्यून प्रमाणबद्ध सुंदर शरीर, संगीत, गायन, वादन, कला यांच्या दृष्टीने बरा. हे जातक जरा हौशी, रसिक, आनंदी, कलाप्रिय व दैविक विद्येची आवड असणाऱ्या असतात.

पूर्वाषाढा नक्षत्राच्या ३ रे चरणात जन्म झाला असता माता, पिता, भ्राता व स्वतःला अनिष्ट फळ मिळते म्हणून शांती करावयाची पद्धत आहे.

पूर्वाषाढा नक्षत्री जन्मणाऱ्या जातकांचे अक्षर मोठे पण पोकळ असते. अक्षर वेडेवाकडे पण ठळक असते. या नक्षत्रावर ३ किंवा ६ या अंकाचे वर्चस्व दिसून येते. गुरुचा पुष्कराज किंवा शुक्राचा हिरा लाभदायक ठरतो. हे नक्षत्र अंधलोचनी असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास पूर्वेला सापडू शकते.

मुहूर्तशास्त्रात हे नक्षत्र फारसे महत्त्वाचे नाही. हे नक्षत्र विहीर खणण्यास आरंभ करणे, पुरलेले द्रव्य काढणे, द्यूत खेळणे, गणितारंभ, मद्य काढण्यास आरंभ करणे, पुंसवन, अष्टप्राशन, मौजी, प्रयाण, शेतकामास आरंभ अशा कृत्यांना चांगले.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment