नवांश अभ्यासातील काही निरीक्षणे


विषय : नवाशांबाबत काही निरीक्षणे

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : स्वाभ्यास व NAVANSHA IN ASTROLOGY 

नमस्कार,

आज नवांशा बाबत अभ्यास उजळणी दरम्यान केलेली काही निरीक्षणे येथे मांडत आहे. निरीक्षणे तशी सामान्यच आहेत. पण ती नवोदित अभ्यासकास एक दिशा देऊ शकतील असे वाटल्याने हा खटाटोप.  

(१) नवांश म्हणजे एका राशीचा नववा भाग जो ३°-२० चा असतो, त्या भागालाच आपण चरण किंवा पद असे म्हणतो. म्हणजेच मेष ते मीन चरणांचे एक चक्र ३°-२० गुणिले १२ चरण = प्रत्येकी ४०° च्या अंतराने पूर्ण होईल व त्याची पुनरावृत्ती होईल. म्हणजेच संपूर्ण राशी चक्रात राशीचक्रात ३६०° भागिले ४०°= ९ वेळा पुनरावृत्ती होईल. म्हणजेच मेष ते मीन पर्यंतचे सर्व नवांश नऊ वेळा परत येतील.

(२) प्रत्येक ग्रहाला एका नवांशास म्हणजेच ३°-२० पार करण्यासाठी लागणारा सरासरी वेळ खालीलप्रमाणे आहे :

सुर्य : ३ दिवस ८ तास

चंद्र : ० दिवस ६.१/२ तास

मंगळ : ४ दिवस १०.१/२ तास

बुध : २ दिवस ५.१/२ तास

गुरु : १ महिना १० दिवस

शुक्र : २ दिवस १६ तास

शनि : ३ महिने १० दिवस

राहू-केतू : २ महिने २ दिवस

एका नवांशला पूर्वेला उगवायला लागणारा वेळ १३ मिनिटे २० सेकंद आहे.

(३) नवांश युती दोन प्रकारचे असतात :

i) एकाच नक्षत्र-चरणातील दोन ग्रह म्हणजेच एकाच राशीत एका नवांश मध्ये

ii) जन्म कुंडलीत एकमेकांपासून ४०°, ८०°, १२०°, १६०°, २००°, २४०°, २८०° आणि ३२०° अंतरावर असलेले दोन ग्रह एका नवांश मध्ये येतील, ज्यामुळे एका नवांश चार्टमध्ये युती होईल.

(४) लग्न नवांशापासून दृष्टी :

i) ६०° दृष्टी : हा लग्न नवांशापासून १९ वा नवांश असेल ( त्याच्या पासून ९१ वा नवांश लग्न नवांश असेल.) (सेक्सटाइल)

ii) ९०° दृष्टी : हा लग्न नवांशापासून २८ वा नवांश असेल ( त्याच्या पासून ८२ वा नवांश लग्न नवांश असेल.) (केंद्रीय)

iii) १२०° दृष्टी : हा लग्न नवांशापासून ३७ वा नवांश असेल ( त्याच्या पासून ७३ वा नवांश लग्न नवांश असेल.) (त्रिकोण)

iv) १५०° दृष्टी : हा लग्न नवांशापासून ४६ वा नवांश असेल ( त्याच्या पासून ६४ वा नवांश लग्न नवांश असेल.) (क़्वीन-कंक्स)

v) १८०° दृष्टी : हा लग्न नवांशापासून ५५ वा नवांश असेल ( त्याच्या पासून ५५ वा नवांश लग्न नवांश असेल.) (प्रतियोग)

(टीप : येथे आकड्यांची अदा पहा … १९-९१ वा नवांश, २८-८२, ३७-७३, ४६-६४, ५५-५५ वा नवांश.)

(५) त्रिकोण, तत्वे आणि नवांश :

मेष-सिंह-धनु या राशी धर्म त्रिकोण दर्शवतात.

वृषभ-कन्या-मकर या राशी अर्थ त्रिकोण दर्शवतात.

मिथुन-तूळ-कुंभ या राशी काम त्रिकोण दर्शवतात.

कर्क-वृश्चिक-मीन या राशी मोक्ष त्रिकोण दर्शवतात.

प्रत्येक नक्षत्राला चार पद-चरण (नवांश) असतात.

निट निरीक्षण केले तर, लक्षात येईल की  

१ ले पद म्हणजे १ ला नवांश म्हणजे धर्म त्रिकोण रास व अग्नितत्वाची रास येते.

२ रे पद म्हणजे २ रा नवांश म्हणजे अर्थ त्रिकोण रास व पृथ्वीतत्वाची रास येते.

३ रे पद म्हणजे ३ रा नवांश म्हणजे संसार त्रिकोण रास व वायूतत्वाची रास येते.

४ थे पद म्हणजे ४ था नवांश म्हणजे मोक्ष त्रिकोण रास व जलतत्वाची रास येते.

म्हणजेच

प्रत्येक नक्षत्रातील १ ले पद १ ला, ५ वा , ९ वा नवांश दर्शवते.

प्रत्येक नक्षत्रातील २ रे पद २ रा, ६ वा , १० वा नवांश दर्शवते.

प्रत्येक नक्षत्रातील ३ रे पद ३ रा, ७ वा , ११ वा नवांश दर्शवते.

प्रत्येक नक्षत्रातील ४ थे पद ४ था, ८ वा , १२ वा नवांश दर्शवते.

अशा प्रकारे वेगवेगळ्या विचारांनी आपण व वेगळे दृष्टीकोनातून मूळ ज्योतिष तत्वे अभ्यासली, तर जास्त सूक्ष्म फळे हाती येऊ शकतात, असे मला वाटते.

उदा.

एखाद्या जातकाचा लग्न नवांश कन्या आहे.

व चंद्र नवांश मकर आहे.

तर तुम्ही एखाद्याचा स्वभाव, मानसिकता, व्यक्तिमत्व ठरवताना तुम्हाला लक्षात येईल की, दोन्ही नवांश अर्थ त्रिकोणाचे व पृथ्वितत्वाचे प्रतिनिधित्व करतात. व शनी, बुध, मकर, कन्या, व मकर या उपलब्ध माहितीवरुन चटकन अंदाज बंधू शकता. 

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment