ज्येष्ठा नक्षत्र विचार


विषय : ज्येष्ठा नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण ज्येष्ठा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत. ज्येष्ठा हे नक्षत्र चक्रातील १८ वे क्रमांकाचे नक्षत्र असून ज्येष्ठा नक्षत्राची आकृती उघडलेल्या छत्रांच्या मधल्या दांड्यासारखी आहे किंवा आपण बोटामध्ये लाल खड्याची अंगठी घालावी त्या प्रमाणे दिसते. या नक्षत्रामध्ये ३ प्रखर व लालसर रंगाचे तारे असून त्यातला मधील तारा ठळक व लाल आहे. हा तारा महाराक्षसी वर्गातील असून त्याला स्तावर्णी खुजा तारा म्हणतात. त्याचा व्यास सूर्यव्यासाच्या २८५ पट आहे. इंग्रजीत या नक्षत्राला ‘अंटारिस’ असे म्हणतात.

पूर्वी आकाशात दोन नक्षत्रं होती. ज्येष्ठ नक्षत्राचे पूर्वीचं नाव ज्येष्ठा रोहिणी होते. या ज्येष्ठा नक्षत्राच्या बरोबर १८० अंतरावर एक तारका आहे, तिला कनिष्ठ रोहिणी म्हणतात. त्यामध्ये ज्येष्ठामधील रोहिणी हा शब्द व कनिष्ठमधील कनिष्ठ हा शब्द लोप पावला. ज्येष्ठा हे नक्षत्र चक्रामध्ये १८ वे नक्षत्र आहे. १८ या अंकाला फार महत्त्व आहे. कारण १८व्या वर्षी मुले सज्ञान होतात, वयात येतात. त्याला सज्ञान म्हणतात. म्हणजेच तो ज्येष्ठ होतो.  

ज्येष्ठा नक्षत्र मध्यलोचन संज्ञक तीर्यङ्मुख, दारूण व राक्षसगणी आहे. नक्षत्राचा स्वामी बुध. राशीस्वामी मंगळ व दैवत इंद्र आहे. त्यामुळे या नक्षत्रात इंद्राचा खलपणा, मंगळाचा हट्टीपणा व बुधाचे चातुर्य यांचा संगम झालेला दिसून येतो. तसेच या नक्षत्राचे ४ ही चरण वृश्चिक राशीत येत असल्याने ते चतुष्पादी नक्षत्र आहे व या चार चरणांवर अनुक्रमे गुरू व शनीची सत्ता आहे. हे नक्षत्र व वृश्चिक राशी एकाच ठिकाणी संपत असल्याने ते गंडांतर तारा योगातील नक्षत्र आहे.

ज्येष्ठा नक्षत्र राक्षसगणी व क्रूरकर्मी आहे. या नक्षत्रात अशुभ गुणधर्म जास्त दिसून येतात. या नक्षत्रावरचे जातक हट्टी, खुनशी, सूड वृत्ती, रागीट, कपटी, द्वेषी, कोत्या मनाचा, निष्ठुर, नीतिभ्रष्ट, खोडकर, स्त्री लंपट, थोड्या विश्वासघातकी, द्वेषी व भांडखोर असू शकतो. पण हे ही तेवढेच खरे, या नक्षत्रात जास्त अशुभ गुण असले तरी माणसाला उच्च पदाला नेणारे, श्रेष्ठ पदाला नेणारे, अधिकार योग देणारे व वैभवाला नेणारे आहे. म्हणून उच्चपद मिळवण्यासाठी हे जातक महत्त्वाकांक्षी स्वभावाचे,  शूर, धाडसी, पराक्रमी, अत्यंत निश्चयी व कर्तृत्ववान, धडपड्या स्वभावाचे असतात. श्रम व कष्ट  घेण्याची तयारी असते. मात्र बुद्धी खल व स्वार्थी असते. दुर्योधनाचे ज्येष्ठ नक्षत्र होते असे म्हणतात.

या नक्षत्रावर जन्मणाऱ्या जातकांचा बांधा मध्यम, उंच, आडवा, मजबूत व सशक्त असतो. अवयव रुंद व जरा तोकडे असतात. कमरेचा खालचा भाग तोकडा व वर उंच असतो. कपाळ भव्य, चेहरा त्रिकोणी, नाक जरा नकटे व ठसठशीत असते. काटकपणा व चिवटपणा चांगला असतो. शारीरिक उर्जा व रोग प्रतिकार शक्ती उत्तम असते. पुरुषांना हे नक्षत्र उत्तम आहे. कारण धाडस, शौर्य, पराक्रम, स्वावलंबित्व, अधिकारलालसा, कर्तबगारी हे पुरुषांना लागणारे गुणधर्म चांगल्या प्रकारे आढळून येतात. बुद्धीही तीष्ण, धारदार व उत्तम असते. मात्र जरा खलपणा आढळून येतो. हे नक्षत्र बिघडल्यास फारच अशुभ असते. गुन्हेगारीकडे पटकन कल वळतो. बिघडले असता व्यसनी, मारामाऱ्या करणारे, बळ व अधिकाराचा दुरुपयोग करून लोकांना छळणारे, परस्त्रीची अभिलाषा धरणारे, जुगारी, सट्टा, रेस यांचा नाद असणारे, मत्सरी व सूड घेणारे निपजतात.

ज्येष्ठा नक्षत्र स्त्रियांना साधारण आहे. कारण सौंदर्य, रूप, कला, माया, प्रेम, दया या गुणांचा अभाव दिसून येतो. शरीरप्रकृती बरी असते. बांधा आडवा, मजबूत, सशक्त व जरा भारदस्तच दिसतो. चेहरा त्रिकोणी, जरा रागीट असून डोळे जरा भेदक व खुनशी दिसतात. शारीरिक काम व श्रमाच्या दृष्टीने मात्र हे नक्षत्र चांगले असते. स्वभाव जरा हट्टी, रागीट, जहांबाज, कुढ्या व द्वेषी असतो. कोणत्याही साध्या कारणाने रुसणे, फुगणे चालू असते. वेळप्रसंगी त्राटिकेचा अवतार धारण करतात. तसे नक्षत्र अनुकूल असता, त्या पुरुषाप्रमाणेच कर्तृत्ववान, पराक्रमी आढळतात. ज्येष्ठा नक्षत्र बिघडलेले असता कुटील कारस्थानी, कपटी व गुन्हेगारीकडे वळणाऱ्याही असतात. चैनी, ख्यालीखुशाली व सिनेमा नाटकांच्या शौकीन असतात. या नक्षत्राच्या स्त्रियांना खास वैशिष्ट्यपूर्ण पोशाख, अलंकार किंवा फॅशनची आवड नसते. जर स्त्रीच्या कुंडलीत इयत कुयोगाने बिघडलेला शुक्र असेल, तर अशा स्त्रियांचा पुरुषवर्ग गैरफायदा घेणारा असू शकतो. अशा स्त्रियांना विवाह किंवा इतर शुभ समारंभात कैकयीप्रमाणे विघ्ने आणण्याची फार हौस असते. कला-कौशल्य किंवा धनाच्या दृष्टीने मात्र ते फारसे महत्त्वाचे नाही.

ज्येष्ठा नक्षत्राखाली येणारा वर्ग म्हणजे डॉक्टर्स, शस्त्रक्रिया करणारे, वैदू, पोलिस खात्यातील विशेषतः डिटेक्टिव्ह खात्यात काम करणारा वर्ग, हेरगिरी करणारे, इंजिनिअर्स, कारखानदार, शस्त्रास्त्र व दारूगोळा यांच्या कारखान्यात काम करणारे, औषधी कंपन्यात काम करणारे, केमिस्ट, हॉस्पिटलमध्ये विष अथवा लस यासंबंधी संशोधन करणारे, वकील, बॅरिस्टर्स, मिलिटरीमध्ये असणारे शिपाई, अधिकारी, कस्टम एक्साईज ऑफिसर्स, फिरते रिप्रेझेन्टेटेव्हज, मॅजिस्टिट, शेतात कसणारी कुळे, कारखान्यातील मुकादम, खेडेगावातील पोलिस पाटील, सरपंच, रानातील फॉरेस्टर्स, जॉबर्स, तसेच बिघडले असता चोर, दरोडेखोर, भानगडीचे धंदे करणारे, स्मगलिंग किंवा अड्ढे चालवणारे ई. या नक्षत्राचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे नक्षत्र जातक स्वतःच्या पराक्रमाने, हुशारीने व कर्तबगारीने अधिकारपदावर पोहोचतात.

ज्येष्ठा राक्षस गणी नक्षत्र असल्याने, या नक्षत्रावर होणारे आजार दाहक व कडक असतात. कापणे, भाजणे, धडपडणे, खरचटणे, शस्त्रांच्या जखमा, ऑपरेशन, अपघात, हाडांचा चुराडा होणे, अतिशय उष्णतेने डोळे जळजळणे, विषमज्वर, विषारी प्राण्यांचा दंश, गुप्तरोग, कावीळ, मूळव्याध, साथीजन्य रोग, किडनीचे विकार हे आजार जास्त आढळून येतात.

ज्येष्ठा नक्षत्री रवि शरीरप्रकृती व अधिकारयोगाच्या दृष्टीने उत्तम. बांधा मजबूत व सशक्त असतो. मात्र स्वभावाने हे जातक कुचकट, करड्या शिस्तीचे व जरासे खवचट असू शक तात. हाताखालील लोकांना त्रास देण्यात त्यांना मजा वाटते. ममत्व, शूर पराक्रमी असतात.

ज्येष्ठा नक्षत्री चंद्राल जरा प्रतिकूल. शरीरप्रकृती सशक्त असते. स्वभाव अतिशय हट्टी, कुढा, जळाऊ, मत्सरी व द्वेषी असतो. मन कमकुवत असते. नैराश्य जास्त दिसून येते.

ज्येष्ठा नक्षत्री मंगळाला हे नक्षत्र अनुकूल आहे. बांधा आडवा पण मजबूत सशक्त असतो. शरीरप्रकृती निरोगी, उत्तम असते. चेहरा रागीट व तेजस्वी असतो. स्वभाव मानी, तापट पण धीमा व मुत्सद्दी असतो. तो डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील अशा विद्येला चांगला. शस्त्रक्रिया उत्तम जमते. हे जातक थोडे कंजूष, कडक, अधिकारलालसा जास्त, लवकर अधिकारयोग, पोलिस व मिलिटरी खाते ई. साठी अनुकूलअसतो. मात्र मंगळ बिघडलेला असता तेवढाच दुर्वर्तनी व गुन्हेगारीवृत्तीचा निघतो.

ज्येष्ठा नक्षत्री बुध साधारणच. बुद्धी खल व बिघडणारी असते. शरीरप्रकृती अशक्त व रोगट असते व बुध बिघडलेला असता वेड लागण्याची भीती असते.

ज्येष्ठा नक्षत्री गुरु साधारण आहे. शरीरप्रकृती व बांधा बरा. इंजिनिअर व वकिलीला चांगला, तरी बुद्धी मध्यम असते. मात्र अधिकार व उच्चपद मिळते.

ज्येष्ठा नक्षत्री शुक्राला फारसे अनुकूल नाही. चैन, रंगेलपणा, व्यसने याकडे प्रवृत्ती असते. कामेच्छा तीव्र व भडकती असते. विरोधी प्रेमात भंग, वारंवार अबोला, हट्टी स्वभाव, खुनशीपणा आढळतो.

ज्येष्ठा नक्षत्री शनि असता शरीरप्रकृती उत्तम पण काबाडकष्ट करणारा, दरिद्री, संकटे भोगणारा, हाल- अपेष्टा भोगणारा, निर्दय, खुनशी, कपटी, पुष्कळ दिवस टिकणारे आजार असू शकतात. विद्या व बुद्धी कमी व त्यातून बिघडलेला असता चोर, दरोडेखोर व बंधनयोग होणारा असतो.

ज्येष्ठा नक्षत्री राहू असता बांधा उत्तम, शूर, धाडसी, पराक्रमी, कर्तृत्ववान, राक्षसी महत्त्वाकांक्षा असणारा, उलाढाली करणारी पण फसवा, स्वार्थी, कुटील व कारस्थानी निपजतो. हा मोक्याच्या ठिकाणी लष्करात अथवा पोलिस खात्यात अधिकारयोग देतो.

ज्येष्ठा नक्षत्री केतू असता शरीरप्रकृती बिघडलेला, रोगी, संकटे, हालअपेष्टा भोगणारा आढळतो.

ज्येष्ठा नक्षत्री हर्षल असता मजबूत बांधा, बुद्धीने हुशार, चाणाक्ष, संशोधक, हुशारीने, कर्तबगारीने उच्च पदाला जाणारा कल्पक निपजतो. मात्र शुक्राबरोबर असता लैंगिक विकृती तपासून घ्या. विषयवासना विकृत असते. विध्वंसक मार्गाकडे प्रवृत्ती असते व हर्षल मुत्सदेगिरी, धुरंधर राजकारणी, क्रांतिकारक यांना चांगला. नेपच्यून असता जरा निराशा, संघ, उदास मनाचा असतो.

ज्येष्ठा नक्षत्राला ‘ज्येष्ठघ्नी’ असे पण नाव आहे. या नक्षत्रावर जन्मलेल्या बालकाच्या ज्येष्ठ भ्रात्याचा मृत्यू होतो अशी समजूत आहे. म्हणून ज्येष्ठ नक्षत्रावर शांती करण्याची पद्धती आहे. ज्येष्ठ नक्षत्र नेहमी ज्येष्ठपणासाठी धडपडत असतो. म्हणून त्याच्यापेक्षा कोणी मोठा असल्यास त्याच्या नाशाशिवाय ज्येष्ठपद मिळत नाही. म्हणून ते अनिष्ट आहे. जर वर ज्येष्ठ व वधू पण ज्येष्ठ असल्यास ज्येष्ठ महिन्यात विवाह करू नये. त्रिजेष्ठा हा अशुभ योग होतो.

पारंपारिक ज्योतिष शास्त्रात ज्येष्ठ नक्षत्राच्या एकूण कालाचे १० समान विभाग करतात.

पहिल्या भागात जन्म असता मातेची आई मृत होते.

दुसऱ्यात मातेच्या पित्याचा मृत्यू,

तिसऱ्यात मातृत्वनाश,

चौथ्यात मातृनाश,

पाचव्यात स्वतःचा नाश,

सहाव्यात गोत्रजनाश,

सातव्यात माता व पित्याच्या कुलाचा नाश,

आठव्यात ज्येष्ठ बंधूंचा नाश,

नवव्यात सामन्याचा नाश

दहाव्यात सर्वांचा नाश

अशी अनिष्ट फळे दिली आहेत.

ज्येष्ठ नक्षत्रावर जन्मलेला पुत्र आपल्या ज्येष्ठ भावाचा नाश करतो व कन्या तिच्या ज्येष्ठ दिराचा नाश करते. ज्येष्ठाच्या पहिल्या तीन चरणांवर जन्मलेला मनुष्य श्रेष्ठ व पराक्रमी होतो पण चौथ्या चरणी जन्मला असता माता पिता व स्वतः चा नाश होतो.

टीप : या बरोबरच पत्रिकेतील इतर कुयोग का इंगित करत आहे हे पासाने गरजेचे असते.

ज्येष्ठा नक्षत्रावर जन्मणाऱ्या जातकाचेचे अक्षर ठळक, टपोरे व मोठे असते. वळण दिसून येत नाही. लिहिताना फार दाबून लिहितात. ९ या अंकाचे वर्चस्व दिसून येते. मंगळाचे पोवळे किंवा बुधाचा पाचू लाभदायक ठरतो. नक्षत्र मध्यलोचनी असल्याने बराच प्रयत्न केला तरच हरवलेली वस्तू पश्चिम दिशेला मिळू शकते. अन्यथा वस्तू गेलेली असते.

मुहूर्तशास्त्रात शुभकार्याला ज्येष्ठा नक्षत्र अगदी वर्ज्य आहे. तरी यावर जमीन नांगरणे, अग्निहोम, प्रयाण, गलबत पाण्यात लोटणे, मंत्रसाधन, पिशाच्च किंवा गारुडी विद्या शिकणे, पुरलेले द्रव्य काढणे, राज्याभिषेक, नृत्य शिकवण्यास आरंभ, चौल, वधू प्रवेश, हिंस्र पशूंना शिक्षा करणे व ऑपरेशन यांना बरेच चांगले.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment