
विषय : अनुराधा नक्षत्र विचार
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : नक्षत्र ज्योतिष
नमस्कार,
आज आपण अनुराधा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत. अनुराधा हे नक्षत्र चक्रातील १७ वे क्रमांकाचे नक्षत्र असून या नक्षत्राचा उगम विशाखा उर्फ राधेच्या पाठोपाठ होतो. म्हणून त्याला अनुराधा हे नाव प्राप्त झालेले दिसते. इंग्रजी नाव ‘डेल्टा स्वामी’ आहे.
अनुराधा या नक्षत्रामध्ये ४ ठळक तारे असून ते भाताच्या ढिगासारखे दिसतात. तर काही वेळा या नक्षत्रांची आकृती उघडलेल्या छत्र्यांच्या कापडासारखी दिसते. यातील तारे पांढरे असून ते बरेच चमकताना दिसतात. नक्षत्राचे ४ ही चरण वृश्चिक राशीत येत असल्याने नक्षत्र चतुष्पादी आहे. नक्षत्राचे दैवत मित्र नक्षत्रस्वामी शनि व राशी स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या नक्षत्रात मित्र जोडण्याची वृत्ती, शनीची चिकाटी, मंगळाचा विषयीपणा या गुणांचा संगम दिसून येतो. नक्षत्राच्या चार चरणांवर अनुक्रमे रवि, बुध, शुक्र व मंगळ यांची सत्ता दिसून येते. नक्षत्र मंदलोचनी व तीर्यमुख आहे.
अनुराधा नक्षत्र शुभ व देवगणी असल्याने यात शुभगुणधर्म जास्त दिसून येतात. या नक्षत्रावर जन्मणारे जातक हौशी, आनंदी, कला-कौशल्याची आवड, गायन, वादन व करमणुक शौकीन, खादाड व थोडे बाहेरख्याली असू शकतात. नृत्य, वाहनसौख्य, उंची वस्त्रे, अलंकार, अत्तरे यांचे शौकीन असतात. चित्रकला, रंगकाम, फुले या सौंदर्यवान गोष्टींची बरीच आवड असते. हे जातक प्रामाणिक, विश्वासू, निश्चयी, स्थिर बुद्धी व थोडे भावनाप्रधान व विकार वश असतात. मात्र मन थोडे चंचल व उदास असते.
अनुराधा नक्षत्र थोडे वैषयिक व कामातूर आहे. पुराणात तर हे नक्षत्र नायकिणीचे मानलेले आहे. या नक्षत्रात मंगळ – शुक्र युती असता कामेच्छा किंवा विषयवासना फार प्रबळ असते. ही युती गवळी, कलाविद्या शिकणारे, पैलवान व बाहेरख्यालीपणा दर्शवतो. तसेच या नक्षत्रामध्ये मोहत अडकण्याची शक्यता असते. मोहामध्ये गुरफटून हे जातक कुठेही भरकटत जातात.
अनुराधा नक्षत्रावर जन्मणाऱ्या पुरुष जातकाचा बांधा आडवा, पुष्ट, अवयव गोलाकार व फुगीर, चेहरा गोल, जरा मोहक व हसरा असतो. शारीरिक उर्जा व रोगप्रतिकारशक्ती साधारण असते. मात्र या नक्षत्रात पुरुषांना लागणारे शौर्य, धाडसीपणा, स्वावलंबित्व, पराक्रम, अधिकार, लालसा यांचा थोडा अभाव दिसून येतो. तसेच जातक चैनी, हौशी, रसिक, ख्याली खुशालीची आवड असणारे असू शकतात. बुद्धी व हुशारी मध्यम असते. नक्षत्र अधिकार योगापेक्षा कला, सौंदर्य व धनाच्या दृष्टीने जास्त अनुकूल आहे. हे नक्षत्र बिघडल्यास अशुभ गुणधर्मही लवकर येतात. दारू पिणे, धूम्रपान, बाहेरख्यालीपणा हे दुर्गुण दिसून येतात.
स्त्रियांना मात्र अनुराधा नक्षत्र सर्व दृष्टींनी अनुकूल आहे. स्त्रियांना हे नक्षत्र सौंदर्य, रूप, कला, धन, बुद्धी अशा सर्वच दृष्टीने चांगले. या नक्षत्रावरच्या स्त्रियांचा बांधा मध्यम, उंच, जास्त आडवा असतो. अवयव गोलाकार, फुगीर, उठावदार व पुष्ट असतात. चेहरा गोल व फुगीर असतो. कपाळ गोल व केशसंभार काळभोर असतो. डोळे काळेभोर व टपोरे असतात. भुवया धनुष्याकृती व कमनीय असतात. तसेच चेहऱ्यावर उच्च सौंदयपिक्षा मादकपणा व कामुकपणा जास्त दिसून येतो. अनुराधेचे सौंदर्य त्यांच्या मादक डोळ्यांमध्ये आहे. त्यांच्या सर्व भावना व विचार जणू डोळ्यांतूनच प्रगट होतात.
अनुराधा नक्षत्रावरच्या स्त्रिया भरतकाम, कशिदाकाम, रांगोळी, पेंटिंग, चित्रकला, नृत्य, संगीत, गायन, वादन यात अगदी निपुण असतात. टापटीप, नीटनेटकेपण व सौंदर्यदृष्टी चांगलीच दिसून येते. तसेच या स्त्रिया चतुर, बुद्धीवान, संसारी व कर्तव्यदक्ष असतात. व्यवहार चातुयपिक्षा प्रणय चतुरपणा चांगलाच दिसतो. अनुराधेची स्त्री बऱ्याचवेळा दाक्षिणात्य नटीसारखी दिसते.
या नक्षत्रावर होणारे आजार फारसे दाहक किंवा कडक नसतात. बऱ्याच वेळा यांना होणारे आजार व्यक्तीच्या वागण्यामुळे व व्यसनामुळेच होणारे असतात. हे नक्षत्र अतिशय कामासक्त असल्याने पापग्रहाने बिघडले असता गुप्तरोगांची फार भीती असते. तसेच लघवीचे विकार, सर्दी, खोकला, मुतखडा, किडनीचे विकार, घसा व गळ्याचे विकार, वाताधिक्य, मानसिक चिंता, नैराश्य, कावीळ, शौचास तक्रारी, स्त्रियांना पाळीचे विकार, गर्भाशयाचे विकार अथवा ब्रेस्ट कॅन्सर तसेच सर्वांना मधुमेह अशा रोगांची भीती असते. मुरणाऱ्या व जुनाट रोगांचीही भीती असते.
अनुराधा नक्षत्राखाली येणारा वर्ग म्हणजे कलाकार, चित्रकार, पेंटर, गायक, वादक, सुगंधी किंवा शोभेच्या वस्तू तयार करणारे कारागीर, डॉक्टर्स, आर्किटेक्ट, रसायनशास्त्रवेत्ते, औषधी किंवा केमिकल्स कारखाने अथवा उद्योगधंद्यातील वर्ग, फळे, फले, अत्तरे, सोने, चांदी, जवाहिरे, उंची वस्त्रे, चैनीच्या वस्तू, हिरे, माणके, दागिने व अलंकार यांचा व्यापार करणारे तसेच व्यसनाधीन वस्तू म्हणजे विडी, तंबाखू, मद्य अशा वस्तूंचे व्यापारी, कलावंतिणी, रिसेप्शनिस्ट, ब्यूटी पार्लर, केशभूषा, प्रसाधन असा व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, धनिक शेतकरी, बागवान, दूधदुभत्यांचे व्यापारी हा होय. तसेच नट-नटी, नाटक-सिनेमा यात काम करणारा वर्ग, नाटककार, सिनेमा, कथा, लेखकही होऊ शकतात.
अनुराधा नक्षत्री रवि शरीरप्रकृती व अधिकार योगाच्या दृष्टीने साधारण असतो. बांधा आडवा, पुष्ट, भारदस्त असून हे जातक थोडे करारी असळे तरी होशी, रसिक, कलाकौशल्याची आवड असणारे, शिस्तप्रिय असतात. डॉक्टर, कारखानदार, सोनार अशा व्यवसायाला बरा. धनाच्या दृष्टीने मध्यम.
अनुराधा नक्षत्री चंद्र असता शरीरप्रकृती, रूप व कला यांना चांगला. अंगाने भरलेला, पुष्ट, मांसल अवयव पण स्थूलदेही असतो. चेहरा कांतिमान, सुंदर व आकर्षक असतो. स्वभाव आनंदी, रसिक, हौशी, कलाकार, ख्यालीखुशालीत रमणारा, चैनी, विलासी, उपभोगी व थोडा सुस्त असतो. मनही जरा भावप्रधान व विकारवश असते.
अनुराधा नक्षत्री मंगळ बुद्धीमत्ता व शरीरप्रकृती उत्तम देतो. बांधा आडवा व गोल असला तरी मजबूत व सशक्त असतो. शारीरिक शक्ती, जीवन उर्जा बरी असते. डॉक्टर, आर्किटेक्ट, इंजिनिअरला उत्तम, शस्त्रक्रिया पारंगत असतो. यात बाहेरख्यालीपणा व विषयवासना व कामेच्छा असू शकते. तो बिघडलेला असता दुर्गुण जास्त दिसून येतात.
अनुराधा नक्षत्री बुध शरीर प्रकृती व आरोग्याच्या दृष्टीने मध्यम असतो. तसा धूर्त विचारी व वैद्यकीय किंवा औषधीक्रियेत बरा, पण बुद्धीच्या दृष्टीने साधारण, बिघडला असता चक्कर, भोवळ येणे व वेडसरपणा हे रोग होतात.
अनुराधा नक्षत्री गुरु असता जातक स्थूल आडवा बांधा, दीर्घदेही व भरलेल्या शरीराचा होतो. मेदाधिक्य जास्त असते. बुद्धीच्या दृष्टीने मध्यम. डॉक्टरकी, वकील व इंजिनिअरला बरा. या व्यक्ती जरा सुस्तल, ऐदी, विलासी, रंगेल, ख्यालीखुशाली व सुखवस्तूपणात रमणाऱ्या असतात. सात्त्विकपणा कमीच दिसतो. धन व अधिकार, प्रतिष्ठा यांच्या दृष्टीनेही बरा. बिघडलेला असता थोडा व्यसनाधीन व मद्यपान करणारा निपजतो.
अनुराधा नक्षत्री शुक्र शुभ असता सौंदर्य, कला व धन यांच्या दृष्टीने चांगला. बांधा मध्यम, उंच पण गोंडस, सुडौल बांध्याचा तरी चपळ व तरतरीत असतो. चेहरा सुंदर, मोहक असून चेहऱ्यावर मादकपणा व कामुकपणा जास्त दिसतो. या जातकांना नटण्याची व सौंदर्याची फार आवड असते. नृत्य, संगीत, गायनवादन, पेंटिंग, चित्रकला, भरतकाम, रांगोळी, कशिदा विणणे, अशा कलांना फारच चांगला. रसिक, हौशी, कलाप्रिय व आनंदी असतात. मात्र सुस्त किंवा आळशी, नूतन सुखासाठी धडपडणारे असतात. श्रम घेण्याची तयारी असते. प्रेमात यशस्वी होतात. भिन्नलिंगी मित्रमैत्रिणी परिवार फार असतो. मात्र मंगळाबरोबर शुक्र असता या व्यक्ती कामातूर, विषयासक्त, गुप्त प्रेमसंबंध ठेवणारे, बाहेरख्याली, व्यसनाधीन, मोहजालात गुरफटणाऱ्या, उथळया व रोगांनी पीडित असतात. आपले सुंदर व निरोगी शरीर ते व्यसनांनी खराब करून घेतात,
अनुराधा नक्षत्री शनि असता शरीरप्रकृतीच्या दृष्टीने खराब, बांधा बेढब, जरा सुटलेला असतो. चेहरा तसा देखणा पण प्रौढ व गंभीर वाटतो. आरोग्य साधारण, शारीरिक शक्ती, जीवनशक्ती व रोग प्रतिकारक शक्ती कमी असते. बुद्धीमत्ता मात्र उत्तम. हे स्व नक्षत्र असल्याने खोल व शोधक बुद्धी आढळते. तो वकील, मुत्सद्दी व इंजिनिअर यांना चांगला. मात्र खोचक, फाजील चिकित्सक, कटकट्या व संशयी असतो. त्यात शनि बिघडलेला असता स्त्रियांच्याविषयी वाईट विचार, त्यांना फसवणारा, कपटी, दांभिक, खर्चिक, उधळ्या व दुर्गुनी निपजतो.
अनुराधा नक्षत्री राहू शरीरप्रकृती व कलेच्या दृष्टीने बरा. बांधा मजबूत, आडवा व सशक्त असतो. तो पेंटिंग, ड्रॉईंग, फोटोग्राफी, आर्किटेक्ट अशा विषयांना चांगला. कर्तबगारी व हुशारी चांगली दिसते. मात्र जरा बिघडला असता सौंदर्यकला व बलाचा दुरुपयोग करणारा होतो. स्वतःच्या सुखासाठी व चैनीसाठी दुसऱ्यांचा नाश करणारा होतो. मुलीबाळींना मोह घालून फसवणे, कुमार्गाला लावणे, बलात्कार करणे, लुबाडणे, व्यसनाधीन तसेच अनैतिक धंदे चालवून द्रव्य मिळवण्याकडे प्रवृत्ती असते. तो रसायन व ड्रगच्या धंद्याला बरा.
अनुराधा नक्षत्री केतू मध्यम. चेहरा सुरेख असला तरी बांधा बेढबच असतो. वैद्यकी किंवा औषधी विधेला बरा. पण कलाकौशल्याला अनुकूल नाही. नेहमी असमाधानी आढळतो.
अनुराधा नक्षत्री हर्षल असता मजबूत बांधा, पुष्ट शरीर, देखणा व मोहक सौंदर्याचा असतो. मात्र प्रेम व भावनेच्या बाबतीत लहरी, अस्थिर व विक्षिप्त असतो. विचित्रपणा जास्त दिसतो. तो उत्तम कल्पक, संशोधक व इंजिनिअरला चांगला. बुद्धी फार खोल व संशोधक असते. मात्र फार प्रेमविव्हल, विलासी, मनसोक्त वर्तन, बाहेरख्याली, चैनी व स्वैरवृत्तीचा असतो. शुक्राबरोबर असता बरेच प्रेमसंबंध व प्रेमभंग आढळून विचित्रपणे विवाह होतो.
अनुराधा नक्षत्री नेपच्यून शरीरप्रकृती, सौंदर्य यादृष्टीने बरा. चेहरा सुंदर व भव्य असतो. तो कल्पनाशक्ती, प्रतिभाशक्ती, सौंदर्यदृष्टी, अंतःस्फूर्ती, लेखन, काव्य, गायन वादन, तंतुवाद्य व कला यांना फार अनुकूल असतो. प्रेमी असला तरी शुद्ध प्रेम आढळते. स्वभावही फार आनंदी, रसिक, हौशी व प्रेमी आढळतो
अनुराधा नक्षत्रावर जन्मणाऱ्या जातकांचे हस्ताक्षर गोल, वळणदार, ठळक व सुंदर असते. लिहिणे किंवा शब्द जरा वरखाली असतात. नक्षत्रावर ८ किंवा ९ अंकाचे वर्चस्व जास्त दिसून येते. मंगळाचे पोवळे किंवा शुक्राचा हिरा ही रत्ने लाभदायक होतात. नक्षत्र मंदलोचनी असल्याने वस्तू हरवल्यास ती थोड्या प्रयत्नांनी दक्षिणेला सापडू शकते.
अनुराधा नक्षत्राचे मुहूर्त शास्त्रामध्ये महत्त्व फार आहे, ते देवगणी असल्याने विवाह, बारसे, प्रयाण, नवीन वस्त्रअलंकार धारण करणे, कोणत्याही कला, गायन वादन शिकणे, सुगंधी फुलांचे वृक्ष लावणे, फळझाडे लावणे, औषधी वृक्ष लावणे, राज्याभिषेक, वधू प्रवेश, दत्तक घेणे, किंवा इतर मंगल कार्यास चांगले. मृदू व मैत्रगणी नक्षत्र असल्याने स्त्रियांशी प्रेमगोष्टी करणे, प्रेम जुळवणे यांनाही चांगले आहे.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)