कर्म सिद्धांत भाग ३


विषय : कर्म सिद्धांत (भाग ३)

संकलक व स्वैर अनुवाद : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : THEORY OF KARMA (श्री हीराभाई ठक्कर)

नमस्कार,

आज आपण आपल्या आयुष्याच्या रस्सीखेच मध्ये इतके रममाण झालो आहोत की, कशासाठी आपण मनुष्य जन्मास आलो, याचे साधे भान देखील आपल्याला उरलेले नाही. हे मी माझे परम भाग्यच समजतो की, श्री हीराभाई ठक्कर यांचे हे पुस्तक वाचनात आले आणि या विषयाकडे किमान लक्ष तरी गेले. त्यांना माझा साष्टांग दंडवत. आणि हे विचार सर्वाना पोहोचणे आवश्यक वाटले म्हणून हा प्रपंच.  पहिल्या भागात आपण कर्म सिद्धांत, क्रियमाण कर्म, संचित कर्म, प्रारब्ध कर्म याविषयी जाणून घेतले. भाग २ मध्ये कोणतेही कर्म फळ देऊनच शांत होतें, सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी या तीन प्रकारच्या जीवांची क्रियमाण करण्याची कल्पना, प्रारब्धांत असतें तेवढेच मिळतें, माणसाने पुरुषार्थ करावा की नाही, प्रारब्ध व पुरुषार्थ एकमेकाना पूरक, कर्म करण्यांचे स्वातंत्र्य फळ भोगण्यांत परतंत्र ई. विषयांचा आढावा घेतला. आज या विषयाचा पुढील टप्पा क्रमश: व थोडक्यात पाहणार आहोत.

कर्म भोगण्यासाठी देह धारणा आवश्यक – कर्मात बेरीज वजाबाकी नाही :

शुभकर्माचे फळ सुख, अशुभ कर्माचे फळ दुःख, पण ही दोन्ही भोगण्यासाठी, देह धारण करण्याशिवाय गत्यंतर नाही. कारण देह हे कर्म-फळ-भोग भोगण्याचे साधन आहे. या मुळे कोणीही जन्म-मरणाच्या चक्रांतून सुटूच शकत नाही. आणि जोपर्यंत जन्म-मरणाच्या चक्रात जीवात्मा अडकलेला आहे, तोपर्यंत त्याला मोक्षप्राप्ति नाही. देहच धारण करण्यापासून मुक्तता, या अवस्थेचे नाव ” मोक्ष”. जोपर्यंत शुभ व अशुभ कर्माचा साठा संचितात शिल्लक आहे, तोपाफ्र्यंत जन्म-मरण चक्र अव्याहतपणे चालूच राहाणार. देह धारण करावयास लागणे, हेंच खरे तर बंधन आहे. शुभ कर्माचे फळ स्वरूप सुख भोगण्यासाठी देह धारण करणे ही जणू सोन्याची बेडी, आणि अशुभ कर्माचे फळ स्वरूप दुःख भोगण्यासाठी देह धारण करणे ही जणू लोखंडाची बेडी. परंतु दोन्ही प्रकारची कर्मे भोगण्यासाठी देह हा धारण करावाच लागतो. म्हणजे कर्म शुभ असो वा अशुभ असो, जीवात्म्याला जन्म-मरण रूपी बेडयांत अडकवून ठेवते. बेडी  सोन्याची असो वा लोखंडाची, दोन्हीही बंधनकारकच. सत्पात्री दानाचें फळ सुख, पण ते ही उपभोगण्यासाठी देह धारण करावा लागतोच.

सुपात्र दानात् च भवेत् धनाढ्यो । धन प्रभावेन करोति पुण्यम् ॥

पुण्य प्रभावात् सुरलोकवासी । पुनर् धनाढ्यो पुनरेव भोगी ।।

सत्पात्री दान केल्याने माणूस धनवान होतो. धन प्रभावाने आणखी दान धर्म केला की त्याला पुण्य शरीर प्राप्त होते. त्यामुळे पुन्हा तो धनवान होतो आणि पुन्हा पुण्य करतो. अशा रीतीने शरीर धारणेचे चक्र सतत चालूच राहाते.

कुपात्र दानात् च भवेत् दरिद्रो ।

दारिद्र्य दोषेण करोति पापम् ।।

पाप प्रभावात् नरकं प्रयाति ।

पुनर् दरिद्रो पुनरेव पापी ।।

कुपात्री दान केल्याने दरिद्री होतो आणि परिणाम स्वरूप दारिद्रय दोषाने मग तो माणूस पापकर्मे करू लागतो, पाप प्रभाव वाढला की तो नरकात जातो. अशा रीतीने पाप क्षालनार्थ पुनः पुनः देह धारणेचे चक्र सतत चालू राहाते.

माणूस पाप करो वा पुण्य करो, दोन्ही बाबतीत संसारचक्र उलट वा सुलट दिशेने चालूच राहातें, त्यांत प्रत्येक जीव भरडून निघतो, त्याला मोक्ष (जन्म- मरणापासून सुटका मिळतच नाही, कारण प्रत्येक नवीन जन्मांत जीवात्मा नवनवीन क्रियमाण कर्मे करीतच राहातो, आणि सर्व कर्मे, तात्कालिक फल देऊन समाप्त न होता ती संचितरूपे जीवाच्या खात्यात जमेत राहातात, आणि त्यातील जीं फळे पक्व होऊन प्रारब्ध बनतात, ती भोगण्यासाठी जीवात्म्याला अनुरूप देह धारण करावा लागतो, आणि पुनः त्या जीवनदरम्यान पुढे अनेक जन्म ध्यावे लागतील अशी नवी कर्मे करतो. अनादि काळापासून हे दुष्ट चक्र चालत आलेले आहे व ते अनंत काळ चालू राहाणार.

महर्षि पतंजली सांगतात : सति मूले तव्दिपाकः जातिः आयुः भोगाः ।

जोवर कर्मरूपी मूळ आहे, तोवर शरीररूपी वृक्ष उगवणारच व त्याला, जात, आयुष्य व भोगरूपी फळे चिकटणारच.

कर्मात वजाबाकी नाही, केवळ बेरीज :

बरेच लोक असें समजतात की, पाप-पुण्याची वजाबाकी होऊ शकते. म्हणजे असे की, आपण समजा पांच मण पाप केले, व नंतर आठ मण पुण्य केलें, तर पुण्यातून पाच वजा जाता, तीन मण पुण्य  आपल्या खाती उपभोगण्यास जमा होईल व पापाचे फळ मला भोगावे लागणार नाही. सामान्य व्यवहारातील हे गणित कर्म-नियमात लागू होऊ शकत नाही. तेथे वजाबाकी नाही केवळ बेरीज होते. म्हणजे असे की तुम्ही ५ माप पाप केलेत, नंतर ८ माप पुण्य केलेत, तर तुम्हाला ५ अधिक ८ अशा एकूण १३ माप कर्म फळ भोगावेच लागेल. ५ माप पाप कर्माचे फळ जे दुःख भोगासाठी व ८ माप पुण्य कर्माचे फळ जे सुख भोगासाठी पाप पुण्याची बेरीज करून होणारे एकूण १३ माप कर्म फळ भोगण्यासाठी देह धारण करावा लागेल.

मात्र जसजशी फळे पक्व होतील, तसे फळ भोगावे लागत असल्याने एकाच देहांत सर्व पाप कर्म वा पुण्य कर्म फळ भोगावे लागतें असे नाही. तर पाप-पुण्याचे मिश्रण प्रत्येक देहात लाभते, म्हणूनच माणूस एकाच देहांत काही वेळा दुःखी तर काही वेळा सुखी आढळतो.

तर मग मोक्षप्राप्ति कधीं ?

प्रत्येक माणूस मोक्षाचा अधिकारी आहे, आणि ८४ लक्ष योनी फिरत, मानवी शरीर हे मोक्ष मिळण्यासाठींच प्राप्त झालेले आहे. मानव देह प्राप्त झाल्यानंतर मोक्ष न मिळविल्यास, पुन्हा विविध योनीत फिरणे क्रमप्राप्त होतें. केवळ मनुष्यच या जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटून, परब्रह्मात लीन होण्यास पात्र आहे, मात्र त्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत आणि असे करण्याचे सामर्थ्य व स्वातंत्र्य दोन्ही त्याच्यात आहे, कारण तो परात्पर परब्रह्माचाच अंश आहे.

परंतु जोंवर या जन्मातील सर्व प्रारब्ध भोगून तो संपवित नाही, आणि जन्मजन्मांतरांत त्याचे खाती जमा झालेला महाकाय ‘संचित’ साठा तो नष्ट करीत नाही, तोपर्यंत अनंतकाळ पर्यंत, त्याला परत परत  निरनिराळे देह धारण करणे क्रमप्राप्तच आहे.

जर त्याला मोक्ष प्राप्तीची तीव्र इच्छा असेल, तर त्याला ज्ञानाग्निद्वारें समस्त पूर्वकमांचा साठा भस्म करणे क्रम प्राप्त आहे.

“ज्ञानाग्निः सर्व कर्माणं भस्मसात् कुरुते.”

या जन्मीचे प्रारब्ध तर भोगून संपविलेच पाहिजे, पण या जन्मी करावी लागणारी क्रियमाण कर्मे अशा  खुबीने करावी लागतील, की जी या आयुष्य काळातच पक्व होऊन आपले फळ देऊन शांत होतील, आणि त्यांतील एकही त्याच्या संचितात जमा होऊन, त्यांच्या भोगासाठी त्याला नवा जन्म घ्यावा लागणार नाही. सर्व कर्मे अशी कुशलतापूर्व करणे याचेंच नाव ‘योग’.

“योगः कर्मसु कौशलम् ”.

पण कोणी कर्मच नाही केलें तर ?

क्रियमाण कर्म संचितात जमा होण्याचा धोका टाळण्यासाठी, काही लोक असा युक्तिवाद करतात की कर्म करणेच सोडून द्यावे, की ज्या योगे संचिताचे प्रारब्ध बनून त्याच्या भोगार्थ जन्म घेण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. म्हणजे आपोआप मोक्ष मिळेल-देह बंधनातून सुटका होईल.

हा युक्तिवाद करणे सोपे, पण आचरणात आणणे अशक्य कोटीतले आहे, कारण कोणीही क्षणभर ही कर्म करणे टाळू शकत नाही.

भगवान गीतेत अर्जुनाला स्पष्ट बजावतात :

न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठति अकर्मकृत। – गीता, अ. ३/५

शरीरयात्राऽपिच ते न प्रसिध्येत् अकर्मणः । – गीता, अ. ३/८

कोणीही मनुष्य, कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. कर्माविना त्याची शरीर यात्रा (जीवन) क्षणभरही चालू शकत नाही. खाणे, पिणे, उठणे, बसणे, झोपणे, चालणे, इतकेच काय श्वासोच्छ्वास करणे, या क्रिया हीं कर्मेच होत. निर्वाहासाठी नोकरी-धंधा करणे, शरीर स्वास्थ्यासाठी व्यायाम करणे,  शरीर धारणार्थ अन्न प्राशन करणे, या गोष्टी निरंतर कराव्याच लागतात. म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत, काही ना काही कर्म करावेच लागते. काही ना काही कर्म आपली इच्छा असो वा नसो, अव्याहतपणे चालूच राहते.

परंतु पूर्वी सांगितल्याप्रमाणे खाणे, पिणे, इत्यादी जीवनावश्यक क्रिया (कर्मे), तात्काळ फळ देऊन शांत होतात, संचितात जमा होत नाहीत. मनुष्याने अन्य क्रियमाण कर्मेही अशा कौशल्याने करावी की जी याच जन्मात फळ देऊन शांत होतील, संचित बनून पुढल्या जन्मांचे कारण बनणार नाहीत. ‘योगः कर्मसु कौशलम्’.

कोणती क्रियमाण कर्मे संचितात जमा होत नाहीत ?

(१) बाल्यावस्थेत केलेली कर्मे.

(२) अजाणतेपणी घडलेली कर्मे.

(३) मनुष्येतर योनीत केलेली कर्मे.

(४) कर्तृत्वाभिमान रहित कर्मे (ज्यांत ‘मी करतो’ हा अभिमान नाही).

(५) समष्टिच्या (सर्व लोकांच्या) हितार्थ निष्काम भावनेने केलेली कर्मे.

(६) निष्काम भावनेने फलेच्छा विरहित केलेली कर्मे.

(१) बाल्यावस्थेत आणि अभान अवस्थेत केलेली कर्मे :

बालपणी, अगर अभान अवस्थेत केलेली कर्मे, प्रीती द्वेष रहित असतात, त्यामुळे ती संचितात जमा होत नाहीत. एकाद्या बालकाने अग्नित हात घातला, तर भाजण्याचे तात्कालिक फल देऊन तें, शांत होईल, संचितात जमा होणार नाही. समजा, एखादे तीन-चार वर्षांचे मूल खाटल्यावर चढून उड्या मारित असेल, आणि तेथे असलेल्या दोन-तीन महिन्यांच्या धाकट्या भावंडाचे अंगावर त्याचा पाय पडला आणि अनावधानाने त्या बाळास गंभीर दुखापत झाली. तर त्या चार वर्षांचे मुलावर कोर्टात खटला भरता येत नाही. व ते कर्म अजाण अवस्थेत घडलेले असल्याने संचितात ही जमा होत नाही.

(२) अजाणतेपणी घडलेली कर्मे.

वेडेपणाचे झटक्यांत एखाद्या माणसाने शिवीगाळ वा मारहाण केली, व कोर्टात त्याचेवर खटला भरला गेला, तरी त्याचे ते कर्म अजाणतेपणे घडलेले असल्याने, कोर्टात त्याला सहसा शिक्षा होत नाही, (Intention is the gist of Crime) व ते संचितातही जमा होत नाही. कदाचित अशावेळी जमलेले लोक शिवीगाळ केल्याने, त्याला थोडीफार मारहाण करतील, व अशा तर्हेने त्याचे ते कर्म त्याला तात्कालिक फल देऊन शांत होईल, असे कर्म जाणीवपूर्वक केलेले नसल्याने संचितात ही जमा होत नाही.

(३) मनुष्येतर योनीत केलेली कर्मे.

मनुष्येतर योनीत केलेली कर्मे संचितात जमा होत नाहीत कारण, मनुष्य योनीशिवाय इतर योनी (पशु-पक्षी, इत्यादि व देवयोनी) या केवळ भोग योनि असतात. या योनी केवळ संचित कर्म प्रारब्धरूपे भोगून समाप्त करण्यासाठी जीवात्म्याला काही कारणाने प्राप्त झालेल्या असतात. त्या जन्माचे निर्धारित प्रारब्ध भोगून झाल्यावर, त्याचा त्या योनीतील देह सुटतो. या योनीत केलेली क्रियमाण कमें संचितात जमा होत नाहीत. घोडा, गाढव, कुत्रा, मांजर, साप, कीटक, पक्षी इत्यादि योनीत असलेले जीवात्मे, केवळ त्या त्या योनीत असलेल्या उपजत बुद्धिनुसार (instinct) वागत असतात. त्या योनीत प्रज्ञेचा (Intellect) भाग नसतो. वाघ-सिंह त्यांच्या त्या योनीतील उपजत बुद्धिनुसार अन्य प्राण्यांची हत्या करतात. विंचू नांगी मारतो, साप डंख मारतो, त्यांत त्यांचा केवल नैसर्गिक आवेग असतो, म्हणून त्यांची ही कर्मे संचितात जमा होत नाहीत. त्यांचे प्रारब्ध संपविण्यासाठी, त्यांची ती कर्मे घडत असतात, व तात्कालिक फळ देऊन समाप्त होतात. गाढवाने कोणाला लाथ मारली तर फार झाले तर त्याच्या पाठीत सोटा बसतो, कर्म फळ देऊन समाप्त होतें. सोटा न बसला तरी त्याचे ते कर्म केवळ नैसर्गिक आवेगाने पडलेले असल्याने, संचितात जमा होत नाही. साप किंवा कुत्रा कोणाला चावला, आणि परिणामतः असा माणूस दगावला, तरी त्या सापावर अगर कुत्र्यावर फिर्याद करता येत नाही कारण फौजदारी कायदा केवळ माणसांसाठी आहे, पशुपक्षांवर त्याचा अमल चालत नाही. गाई-म्हशी कोणाच्या शेतांत शिरून पिकाचे नुकसान करू लागल्या, तर शेताचा राखणदार त्याना मारपीट करून त्याना हाकलून देतो, अगर त्याना पकडून कोंडवाड्यांत त्यांची रवानगी होते, व त्यांचे ते कर्म त्याना  तात्कालिक फळ देऊन समाप्त होते. त्यांच्या या अतिक्रमणाबद्दल दंड होतो तो त्यांच्या मालकाला,  त्याच्या निष्काळजीपणाबद्दल, गाई-म्हशीना अतिक्रमण कायदा (Trespass Act) लागू नाही. याप्रमाणे मनुष्येतर तमाम योनी-पशु-पक्षी सरपटणारे प्राणी-जलचर प्राणी, यांची क्रियामाण कर्मे संचितात जमा होत नाहीत.

देवयोनी ही सुद्धा भोग-योनी समजली जाते. मनुष्याला त्याच्या पुण्यकर्मामुळे देवयोनी प्राप्त होते. पण ती केवळ भोगयोनी असल्याने, त्यात केलेली क्रियमाण कर्मे चांगली वा वाईट संचितात जमा होत नाहीत. जीवात्मे, त्यांच्या पुण्य कर्मानुसार, देवलोक, स्वर्गलोक, इत्यादि ठिकाणी जाऊन दिव्य भोग भोगू शकतात, व पुण्याचा साठा संपला की पुनः या मर्त्यलोकात लोटले जातात. अशा जीवात्म्यानी स्वर्ग लोकांत जरी पुण्यकारक क्रियमाण कर्मे केली, तरी त्यांचा पुण्य साठा वाढत नाही, व त्याना आपला तेथील मुक्काम वाढवता येत नाही.

गीतेत भगवंतानी स्पष्ट सांगितले आहे  :

ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोकम्

अश्नन्ति दिव्यान्-दिवि देवभोगान् ।। गीता, ९/२०

ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मत्र्त्यलोकं विशन्ति ॥ (गीता, ९/२१)

आपण थंड हवेच्या ठिकाणी मौजमजा करण्यास जातो, परंतु द्रव्यपुंजी संपली की, आपल्याला घरी परतावे लागते. अशा ठिकाणी अधिक राहावेसे वाटले, तरी त्या साठी अधिक पैसे मिळविण्याचे साधन नसते. या प्रमाणेच स्वगत पुण्य साठा असे पर्यंतच देवलोकी राहता येते व नंतर पुन्हा या भूतलावर परतावें लागते.

(४) कर्तृत्वाभिमान रहित कर्मे (ज्यांत ‘मी करतो’ हा अभिमान नाही). :

कर्तेपणाच्या अभिमानरहित केलेली कर्मे ‘अकर्म’ समजली जातात व संचितात जमा न होतां त्यांचे फळ भोगण्यासाठी परत देह धारण करावा लागत नाही आणि जन्म-मरणाच्या चक्रात अडकावे लागत नाही. एकाच्या न्यायाधिशाने खुनाच्या आरोपीला आरोप सिद्ध झाल्यावर फाशीची शिक्षा फर्मावली, तर तो एका माणसाची हत्या केल्याबद्दल जबाबदार धरला जात नाही, कारण त्याच्यात कर्तृत्वाची भावना नसते. शिक्षा देण्याचे काम, तो आपले कर्तव्य म्हणून करीत असतो. कायद्याच्या कक्षेत राहून, न्यायदानाचे काम, सरकारचा त्या कामासाठी नेमलेला एक अधिकारी म्हणून करीत असतो. ते कर्म त्याला बंधनकारक ठरत नाही त्याच्या संचितात ते जमा होत नाही.

म्हणूनच भगवंतानी गीतेत अर्जुनाला आश्वासनपूर्वक सांगितले की, या धर्मयुद्धांत तुझ्या हातून कितीही हत्या झाली, तरी ते कर्म कर्तृत्वाभिमान रहित असल्याने, धर्मयुद्धांत, धर्माची बाजू रक्षण करणारा एक योद्धा म्हणून, केवळ कर्तव्य भावनेने केले असल्यामुळे, तुला बंधनकारक ठरणार नाहीं. भगवान श्री कृष्ण सांगतात:

यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न विद्यते । हत्वापि स इमान् लोकान् न हन्ति न निवद्यते ।। गीता, १८/१७

अर्थ :

ज्याचे अंत:करण अहंकार युक्त नसतें, ज्याची बुद्धि फळासक्तिने मलिन झालेली नसते, त्याने या लोकाना ठार मारले तरी, तो मारणारा ठरत नाही, आणि त्या कर्माने बद्धही होत नाहीं.

हे तत्त्व जाणणारा आणि “मी करतो” असा अभिमान ज्याच्यात नाही असा जीव, धर्म- मर्यादेत राहून, न्याय नीतीच्या मार्गाने जी जी कर्मे, स्वतः चे कर्तव्य म्हणून करतो, ती ती त्याच्या हातून केवळ घडत असल्याने, त्याला बंधनकारक ठरत नाहीत, त्या कर्माना तो केवळ निमित्तमात्र असल्याने, जवाबदार ठरत नाही.

नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् । पश्यन् श्रुण्वन् स्पृशन् जिंछन् अश्नन् गच्छन् स्वपन श्वसन् ।। प्रलपन् विसृजन् गृण्हन् उन्मिषन् निमिषम् अपि । इन्दियाणि इन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ।। गीता, ५/८-९

वास्तविक माणसाच्या सर्व शारीरिक क्रिया, उदाहरणार्थ पाहाणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, खाणे-पिणे, चालणे, झोपणे, श्वासोच्छ्वास करणे, बोलणे, मल-मूत्र विसर्जन, ग्रहण करणे, डोळयांच्या पापण्या उघडणे मिटणे, आदि कर्मे इंद्रिये आपापल्या विषयांचे ठिकाणी प्रवृत्त झाल्याने घडत असतात. अज्ञानी मनुष्य त्या ‘मी करतो’ असा वृथाभिमान बाळगतो, ज्ञानी तसा अभिमान धरीत नाही.

बैलगाडी उन्हातून चालली असतां, सावलीसाठी त्या खालून चालणारा कुत्रा थोड्या वेळाने असा अभिमान करू लागतो कीं, गाडीचे ओझे मीच वाढून नेत आहे, वास्तविक बैल ती गाडी ओढत असतात.

अनेक लोक अशा तऱ्हेचा वृथाभिमान बाळगून, आयुष्यांत घडणाऱ्या सर्व घटना माझ्यामुळे घडल्या, मी घडवून आणल्या, असा वृथा कर्तृत्वाभिमान बाळगू लागतात. या मीपणाच्या अभिमानामुळे, त्यांची ती कर्मे त्याना बंधनकारक बनतात, व त्यांचे फळ भोगण्यासाठी त्याना पुनः पुनः देह बंधनात पडावे लागते.

भगवद्गीतेच्या १६ व्या अध्यायांत, स्वतःचे कर्तृत्वाच्या मिथ्या अभिमानाने फुगलेल्या लोकांचे वर्णन आसुरी संपत्तीचे लोक असे केलेले आहे. त्यांचे वर्णन करताना भगवान सांगतात की अशा लोकाना नेहमी वाटत असतें की, मी आज हे मिळविले. माझा हा मनोरथ मी पूर्ण करीन, आज मी इतके धन मिळविले, उद्या आणखी अधिक मिळवीन, आज मी या शत्रूचा नाश केला. उद्या आणखी शत्रूंचा निःपात करीन, मी स्वतः जणू कर्तृत्ववान असा ईश्वरच आहे, मी ऐश्वर्यवान आहे, मी सिद्ध-पुरूष आहे, मी फार बलवान आहे, मी फार सुखी आहे, मीच धनवान आहे, माझा जन्म मोठ्या उच्च कुळांत झाला आहे, माझ्यासमान श्रेष्ठ फक्त मीच आहे. मी मोठा दानधर्म करणारा आहे, मी मोठेमोठे यज्ञ करीन, मी मोठा मान-सन्मान प्राप्त करीन, ई. हजारो इच्छा आकांक्षा असे लोक रात्रंदिवस हृदयाशी बाळगून असतात.

अशा आसुरी वृत्तिच्या लोकांचे भवितव्य सांगताना भगवान म्हणतात, हे अनेक प्रकारचे भ्रम बाळगणारे, मोहरूपी जाळयांत पूर्णपणे गुरफटलेले लोक, विषय भोगात अत्यंत आसक्त असलेले, निश्चितपणे अतीव दुःखदायक अशा रौरव नरकात पडतात, त्याना दुसरी गति नाही.

असे लोक जी जी कर्मे करतात आणि ती बहुधा अशुभच असतात. ती ती कर्मे त्यांच्या संचितात जमा होऊन, त्यांची कटु फळे भोगण्यासाठी त्याना सतत जन्म-मरणाच्या रहाटगाडग्यांत फिरावे लागते.

(५) समष्टिच्या (सर्व लोकांच्या) हितार्थ निष्काम भावनेने केलेली कर्मे.

कित्येक कर्मे जन मानसाच्या दृष्टीने पाप कर्मे ठरत असली, तरी जर ती समष्टिच्या (जगाच्या) कल्याणासाठी केलेली असली, तर पाप कर्मे ठरत नाहीत व संचितात जमा होत नाहीत.

खोटे बोलणे हे पाप समजले जाते, तसेच कोणाला खोटे बोलण्यास भाग पाडणे वा प्रवृत्त करणे, हेही पाप समजले जाते. असे असूनही खुद्द भगवान श्रीकृष्णानी धर्मराजासारख्या, सत्यवक्ता अशी ख्याती असलेल्या राजाला खोटे बोलण्याची प्रेरणा देऊन “नरो वा कुंजरो वा” असे बोलण्यास भाग पाडून, द्रोण पुत्र अश्वत्थामा मेल्याचा आभास निर्माण केला. हें करण्यात श्रीकृष्णाचा कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. पांडव जिंकले, तर त्याला राज्याचा काही भाग, अथवा काही दलाली मिळणार नव्हती. पण युधिष्ठिर असे बोलला नसता, तर द्रोणाचार्य यांचे मरण असंभव होते. पण द्रोणाचार्यांचा मृत्यू ही समष्टिच्या कल्याणार्थ काळाची गरज होती. आततायी व अन्यायी अशा कौरवांचा नाश करण्यासाठी, लढल्या गेलेल्या धर्मयुद्धांत पांडवांचा जय होणे अत्यावश्यक होते.

 “अश्वत्थामा हतः नरो वा कुंजरो वा” हे अर्धसत्य बोलल्यामुळें युधिष्ठिराच्या, त्रिकाल सत्यवादी या कीर्तीला कलंक लागला, व त्याचे थोडे नुकसान झाले, ही गोष्ट खरी, परंतु व्यक्तिगत नुकसानापेक्षा समष्टिचे कल्याण अधिक महत्वाचे. श्रीकृष्ण जरी युधिष्ठिराला असत्य बोलण्यास लावणाऱ्या कृतीचा प्रणेता ठरला, तरी श्रीकृष्णाचे समष्टि-कल्याणार्थ केलेले ते पापकर्म, त्याच्या संचितात जमा झाले नाही, व त्याला त्याचे फळ भोगावयास लागले नाही.

लहानपणी कृष्णाने लोण्याची चोरी अनेकदां केली, गोपींच्या अनेक खोडया काढल्या, स्यमंतक मणी चोरल्याचा त्याच्यावर आळ आला मोठेपणी अनेकदा संदिग्ध बोलून दुटप्पी वर्तन केले, पण त्याची ही सर्व कर्मे लीलास्वरूपाची होती. मोठेपणी जेव्हा जेव्हा तो खोटे बोलला तेव्हां ते समष्टि कल्याणार्थ होते, त्याचा व्यक्तिगत स्वार्थ, कोणते ही कपट-कारस्थान करताना, नव्हता.

म्हणून गीतेत त्याने स्वतःच असे म्हटले आहे की

।।” जन्म कर्मच मे दिव्यम्” ।।

माझा जन्म व माझी सर्व कर्मे दिव्य आहेत. मला माझ्या व्यक्तिगत लाभासाठी काहीही करण्याची आवश्यकता नाही, कारण मी पूर्णकाम आहे.

गीतेच्या तिसऱ्या अध्यायांत भगवान श्रीकृष्ण सांगतात :

न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन । नानवाप्तमवासव्यं वर्त एव च कर्मणि ।। गीता, ३ / २२ यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः । मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ।। गीता, ३/२३

हे पार्था, या त्रैलोक्यांत मला स्वतःला काहीच करावयाचे असे उरलेले नाही. कारण मला मिळालेले नाही किंवा मिळावयाचे आहे, असे काहीच नाही. तरी पण मी कर्म करतच असतो. कारण जर मी असा कर्मात आळस सोडून न वागेन, तर सगळे लोक सर्वथा माझ्याच मार्गाला अनुसरतील व निष्क्रिय आळशी होतील.

भगवंतानी आपला जन्म व सर्व कर्मे दिव्य म्हटली याला मुख्यतः तीन कारणे आहेत :

१) इतर जीवात्म्यांप्रमाणे भगवंतांचा जन्म मातेच्या उदरातून झालेला नाही ते प्रगट झाले.

२) त्यांचा जन्म पूर्व जन्मातील संचित कर्मे प्रारब्धरूपाने भोगण्यासाठी नाही, कारण त्यांची पूर्वीची कोणतीही संचित कर्मेच नव्हती.

३) त्यांच्या अवतार काळांत, त्यानी जीं जीं कर्मे केली ती केवळ लीलास्वरूप आणि समष्टि (जग)  कल्याणार्थ केली. राग, आसक्ति, द्वेषाने प्रेरित होऊन, स्वतःच्या लाभासाठी ते कधीही वागलेले नाहीत. कर्तेपणाच्या अभिमान विरहित अशा वृत्तिने सर्व कर्मे त्यांचे हातून केवळ घडलेली आहेत. यामुळे भगवंतांचे एकही कर्म संचितात जमा होऊन, दुसऱ्या नवीन जन्माचा हेतु (कारण) बनू शकले नाही.

भगवंत म्हणतात मी आप्तकाम आहे, माझ्या इच्छेनुरूप जेव्हा ज्या देहाची जरूर पडेल, तो समष्टिच्या हिताकरतां धारण करू शकतो. संत तुलसीदासानी वर्णन केल्याप्रमाणे भगवंतांचा अवतार म्हणजे केवळ ‘निज इच्छा निर्मित तनू’ आहे.

जगांत झालेले सर्व महापुरूष रामकृष्ण परमहंस, स्वामी रामतीर्थ, विवेकानंद, महात्मा गांधी, येशु क्रिस्त, शंकराचार्य, भगवान बुद्ध, महावीर, महमद पैगंबर ई. या सर्वानी त्यांच्या जीवनकाळ दरम्यान जी जी कर्मे केली ती केवळ “सर्वलोक हिताय” केली. त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ कोणत्याही कर्मात नव्हता म्हणूनच त्याना मुक्त पुरुष मुक्त जीवात्मे समजले जाते.

आज येथेच थांबतो. या पुढील विवेचन आपण पुढील भागांत पाहू.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment