
विषय : विशाखा नक्षत्र विचार
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : नक्षत्र ज्योतिष
नमस्कार,
आज आपण विशाखा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत. विशाखा हे नक्षत्र चक्रातील १६ वे क्रमांकाचे नक्षत्र असून नक्षत्राचा आकार दाराला बांधलेल्या तोरणासारखा भासतो. विशाखालाच ‘राधा’ असेही म्हटले आहे. या नक्षत्रामध्ये एकूण ४ तारे असले तरी त्यातील २ च तारे जरा ठळक व एका रेषेत पण आडवे भासतात. नक्षत्रामधील २ तारे तोरणासारखे असून जरा हिरवट पांढऱ्या रंगाचे व बरेच तेजस्वी दिसतात. वैशाख महिन्यात हे नक्षत्र रात्रभर आकाशात दिसू शकते. काहींच्या मते याची आकृती पोवळ्यासारखी आहे. विशाखा नक्षत्राचे इंग्रजी ‘अल्फा लिब्रा’ आहे.
या नक्षत्राचे पहिले ३ चरण तूळ राशीत व ४ थे चरण वृश्चिक राशीत असल्याने हे चतुष्पाद आहे. हे नक्षत्र अधोमुख, मिश्र साधारण व अंधलोचनी आहे. नक्षत्राचा स्वामी गुरु, दैवत इंद्राग्नी व राशी स्वामी शुक्र व मंगळ असल्याने या नक्षत्रात गुरूची अप्रतिम विद्वत्ता, शुक्राचा व्यवस्थितपणा व मंगळाची खलबुद्धी यांचा सुंदर मिलाफ दिसून येतो. या नक्षत्राच्या ४ चरणावर अनुक्रमे मंगळ, शुक्र, बुध व चंद्र यांचे स्वामित्त्व दिसते.
विशाखा नक्षत्राला तराजूचा दांडा असेही म्हणतात. हे नक्षत्र राक्षसगणी व तामसी असल्याने जरा अशुभच आहे. तसेच हे आश्रित असून या नक्षत्रावर जन्मलेले जातक थोरा-मोठ्यांच्या सहाय्याने पुढे येतात. विशाखा नक्षत्र जातक विद्वान पण रजोगुणी, तामसी, हट्टी, थोडे चिडखोर, हौशी, रसिक पण उथळ्या व खर्चिक वृत्तीचे, थोडे भांडखोर, लोभी, गोड बोलणारे, स्त्रीलंपट, थोड्या अविचारी, उलट उत्तरे देणारे असू शकतात. फार उच्च ध्येय किंवा महत्त्वाकांक्षा नसून खावे-प्यावे, मजा करावी असा स्वभाव दिसून येतो. विशाखा नक्षत्र धनाच्या दृष्टीनेही साधारण आहे.
विशाखा नक्षत्र पुरुष व स्त्रियांना मध्यमच आहे. पुरुषांना लागणारा स्वावलंबीपणा, पराक्रम, अधिकार गाजवण्याची वृत्ती, धाडस हे गुणधर्मच जास्त प्रमाणात दिसून येतात. विशाखा नक्षत्रावर जन्मणारे पुरुष जातक उंच, सडपातळ, प्रमाणशीर पण लांबट अवयव, उभट चेहरा व हाडापेराने जरा मजबूत, सडसडीत व जरा काटक दिसतात. चेहऱ्यावर मात्र बुद्धीमत्ता व विद्वत्तेचे तेज दिसून येते.
विशाखा नक्षत्र स्त्रियांना हे नक्षत्र साधारण आहे. कारण सौंदर्यकला अथवा धनाच्या दृष्टीने ते कमी प्रतीचेच आहे व अनिष्ट असता सद्गुणापेक्षाही दुर्गुणच जास्त आढळतात. या नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्रियांचा बांधा उंच, सडपातळ, प्रमाणशीर असतो. कपाळ रुंद पण चेहरा त्रिकोणी दिसतो. नाक सरळ असते. सडसडीत असल्या तरी पुरुषीवृत्ती व बांधा दिसून येतो. नाजूकपणा, कोमलपणा, सौंदर्यहानी, हळवेपणा अथवा नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा, अथवा कलाकौशल्याची अजिबात आवड दिसून येत नाही. मात्र बुद्धीमत्ता व विद्वत्ता चांगली असते. विशाखा नक्षत्री बुध, गुरु असता त्या उच्च शिक्षण घेतलेल्या असतात. खाणेपिणे, कपडालत्ता, छानछोकीपणा, रंगेलपणा, खर्चिक वृत्ती, उधळेपणा असू शकतो. उपभोग (ऐहिक) व देह सौख्याकडे जास्त प्रवृत्ती असते. चालणे झपझप असले, तरी जरा धांदरट व जरा नीट नेटकेपणाचा अभाव असतो. असतात. फॅशनची आवड असली तरी तारतम्य, रंगसंगती या बाबत कमी आस्था दिसून येते. दागदागिने, उंची वस्त्रे, फुले, वेण्या यांचाही फार शौक नसतो. सिनेमा, नाटके व करमणुकीच्या साधनांची बरीच आवड असते.
विशाखा नक्षत्राखाली येणारा साधारण वर्ग बुद्धीमान लोक, शिक्षक, प्रोफेसर्स, सरकारी किंवा खाजगी कंपन्या क्षेत्रातील सेवक व अधिकारवर्ग, लहान लहान व्यापारी, वकील, इंजिनिअर्स, औषधी कंपनीत काम करणारा वर्ग, प्रवासी व बांधकाम खात्यात काम करणारा वर्ग इ आढळून येतात.
विशाखा नक्षत्री रवि फारसा अनुकूल नसतो. रवि असता बांधा उंच, सडपातळ पण जरा अशक्तच व नाजूक असतात. शारीरिक उर्जा कमी असून बुद्धीमत्ता साधारण असते. अधिकारयोग मिळत नाहीत. विशाखा नक्षत्री चंद्र असता जरा आडवा परंतु प्रमाणशीर बांधा, देखणा पण रागीट चेहरा, विद्या व बुद्धी कमी, गूढ व दुष्ट मनाचा. थोडा द्वेषी, चैनी, खर्चिक व उधळ्या असतो. छानछोकीकडे जास्त लक्ष असते.
विशाखा नक्षत्री मंगळ असता सडसडीत, उंच चपळ असतो. मंगळ मेडिकल लाईनचे शिक्षण किंवा सायन्सला बरा. औषधी वस्तूंचा व्यापार अथवा औषधी वस्तूंच्या दुकानात अथवा कारखान्यात नोकरी मिळेल. अपघात व वारंवार संकटे भोगणारा.
विशाखा नक्षत्री बुध असता शरीरप्रकृती व बुद्धीच्या दृष्टीने बरा असतो. बुद्धी तीष्ण, खोल व कुशाग्र असते. बांधा जरा आडवा पण चपळ व भरलेला असतो. मात्र स्वभावाने हे जातक खलबुद्धी, स्वार्थी, थोडे कुमार्गी व अतिव्यवहारी असू शकतात.
विशाखा नक्षत्री गुरु बुद्धी व विद्येच्या दृष्टीने अनुकूल असतो, पण शरीरप्रकृती व धनाच्या दृष्टीने फारसा अनुकूल नसतो. गुण चांगले पण नशीब प्रतिकूल असते. बांधा उंच, सडपातळ पण जरा नाजूक व अशक्त असतो. पचनशक्ती व रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. दम लागणे किंवा रक्तदाबाचे विकार लवकर होतात. शिक्षक, प्रोफेसर, वकील या शिक्षणाला हा गुरु उत्तम, मात्र त्यांना गुणवत्तेप्रमाणे नोकरीत यश मिळत नाही.
विशाखा नक्षत्री शुक्र प्रमाणशीर व देह व बांधा देतो. मात्र चेहऱ्यावर शुक्राचे सौंदर्य, मोहकपणा अथवा आकर्षकपणा कमी आढळतो. शुक्राच्या शुभ गुणधमपिक्षा अशुभ गुण जास्त दिसून येतो. बुद्धी, विद्या व कला साधारण असतात. व्यवस्थितपणा, नीटनीटकेपणा, टापटीप कमी असून स्वच्छंदी, चैनी, खर्चिक, उधळ्या, विलासी व रंगेल असू शकतो. बिघडलेला असता अविचारी, व्यसनी, वाईट वासनेचा, स्त्री लंपट, स्वच्छंदी व अनीतीच्या मार्गाने जाणारा व त्यामुळे शरीरप्रकृती रोगी व खराब करून घेणारा आढळतो. विशाखा नक्षत्री शनि असता हाडापेराने मजबूत पण हाडाळ, जरा वेडावाकडा बांधा, चेहरा उदास, गंभीर व प्रौढ दिसणारा असतो. स्वभाव कुजका, द्वेषी, कपटी दुसऱ्यांच्या दुःखात आनंद मानणारा, स्वार्थी, अविचारी, कंजूष, लोभी व गूढविद्येची (पिशाच्च) आवड असणारा असतो. बुद्धीमान, विद्वान व शिकलेला असला तरी त्याचा फार फायदा कमी होतो.
विशाखा नक्षत्री राहू शरीरप्रकृती व बुद्धीमत्ता यांच्या दृष्टीने उत्तम असतो. मात्र अतिसाहसी, धाडसी व जरा पापी वृत्तीचा, चैन, मजा, देहसौख्य, ख्याली- खुशाली यांचेकडे ओढ असू शकतो. बिघडलेला असता तर गुन्हेगारीच्या मार्गाने अथवा अनैतिक धंदे करून द्रव्य मिळविण्याकडे प्रवृत्ती असते. विषारी प्राणी दंशाची भीती असते.
विशाखा नक्षत्री केतू हा फक्त दैविक, आध्यात्मिकदृष्ट्या बरा असतो. शरीरप्रकृती किंवा बुद्धीमत्ता यांच्या दृष्टीने साधारण.
विशाखा नक्षत्री हर्षल असता सडपातळ उंच बांध्याचा, बुद्धीमान पण विलक्षण डोक्याचा असतो. बुद्धी विधायक कायपिक्षा विध्वंसक मार्गाकडे वळू शकते. वागणे विक्षिप्त, लहरी व स्वैर असते.
विशाखा नक्षत्री नेपच्यूनही फारसा अनुकूल नसतो. शरीरप्रकृती मध्यम असून त्या मानाने नेहमी उदास व नैराश्यवादी दिसतात. गूढ रोग होतात.
विशाखा नक्षत्री होणारे रोग फारसे दाहक नसले, तरी बरेच रेंगाळणारे, चिकट व त्रास देणारे असतात. मूत्रपिंडाचे विकार, रक्तदाबाचे विकार, त्वचेचे विकार, रक्तदोष, पित्त, विषबाधा तसेच कंबर दुखणे, लघवीचे विकार, ओकाऱ्या, मळमळणे, मंगळ बिघडलेला असता गुप्तरोग, कावीळ, कापणे, भाजणे, खरचटणे अशा रोगांपासून भीती असते. स्त्रियांच्या कुंडलीत शुक्र बिघडलेला असता चक्कर, भोवळ व दम लागतो.
या नक्षत्राला शाखाहीन नक्षत्र असेही म्हणतात. म्हणून या नक्षत्रात गुरु किंवा शनि असता संतती होण्यात खूप अडचणी येण्याचा संभव असतो.
विशाखा नक्षत्री हस्ताक्षर वेडेवाकडे, तिरके, गचाळ व अव्यवस्थित आढळते. धावत्या लिपीत लिहिण्याची आवड असते. नक्षत्रावर ३ किंवा ६ अंकाचा प्रभाव वाढतो. गुरुचा पुष्कराज लाभदायक वाटतो. अंधलोचनी नक्षत्र असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ती पूर्वेला लवकर सापडू शकते. हे नक्षत्र राक्षसगणी असल्याने मुहूर्तशास्त्रात शुभकार्यासाठी फारसे महत्त्वाचे नाही. हे अधोमुखी नक्षत्र विहिर खणण्यास आरंभ करणे, पुरलेले धन काढणे, जमीन नांगरणे, बी पेरणे, द्यूत खेळणे, राज्याभिषेक, बागाईत करणे, अग्निहोमादी क्रिया, दत्तक पुत्र घेणे या गोष्टींना चांगले.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)