अक्षर ब्रह्म


विषय : अक्षर ब्रह्म

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : मानवी जीवनातील गूढ रहस्ये, ॐ हा गुरु

नमस्कार,

लहानपणी सर्वात प्रथम काय शिकवले जाते तर अक्षर ओळख. आज आपण अक्षराचे मूळ स्वरूपाचा बोध घेणार आहोत. अक्षरामध्ये अवघे ब्रह्म व देवदेवता वसलेली आहेत, हे पाहणार आहोत. अ क्षर म्हणजे कधी ही नष्ट न पावणारे ते परम तत्व.

सोळा स्वर छत्तीस व्यंजने मिळून बावन्न अक्षरे तयार होतात. या बावन्न अक्षरांना बावन्न मातृका असे म्हटले जाते. बावन्न मातृका संपूर्ण मंत्र शास्त्राचे मूळ आहे. या आपल्या मुखामध्ये असणारे वायू योग्य प्रकारे वळविल्यानंतरच या बावन्न मातृकांचा उच्चार करता येतो. आमच्या बालपणामध्ये लृ या अक्षराचा उच्चार कसा करायचा हे आम्हाला शिकविले गेले नाही व आजकालच्या मुलांना ङ या अक्षराचा उच्चार करता येत नाही. तसेच ञ या अक्षराचाही उच्चार करता येत नाही.

शरीरातील वायुला योग्य प्रकारे वळवून स्वरयंत्राद्वारे बाहेर आणल्यानंतरच मातृकांचा योग्य प्रकारे उच्चार होतो. आमच्या अक्षरांचे आकारही विशिष्ट पद्धतीने ठरविण्यात आलेले आहेत.

उदा. ऐं हे सरस्वती बीज आहे. मोर हे सरस्वतीचे वाहन आहे व ऐं हा आकार मोरासारखा आहे.

लं हे पृथ्वीतत्त्वाचे बीज आहे. मनुष्य मांडी घालून बसल्यानंतर त्या मांडीचा आकार या लं प्रमाणे होतो.

ॐ हे ब्रह्मा, विष्णू, महेश व सर्व देवी-देवता यांचे मूळ आहे. आपल्या शरीराचे जाणीवपूर्वक निरीक्षण केल्यास बऱ्याच ठिकाणी ॐ चा आकार दिसून येईल व ॐ हे सर्व देवी-देवतांचे आदिबीज असे का म्हटले जाते हे लक्षात येईल. राम म्हणाल्याने राम प्रसन्न होईल विष्णू म्हणाल्याने विष्णू प्रसन्न होईल. शिव म्हणाल्याने शिव प्रसन्न होईल. ॐ म्हणाल्याने सर्वच देवता एकदम प्रसन्न होतील. परंतु ही ॐ कार साधना प्रारब्धशुद्धी पूर्ण झाल्याशिवाय प्राप्त होत नाही. दुष्प्रवृत्तींचा समूळ नाश झाल्याशिवाय ॐ कार साधनेचे रहस्य प्राप्त होत नाही. म्हणून प्रत्येक मंत्राच्या अगोदर ॐ लावावा असे सांगितले जाते. यात उद्देश असा की कुठल्या ना कुठल्या रूपाने ॐचे उच्चारण होत राहावे म्हणजे एक ना एक दिवस खऱ्या ॐ चा लाभ होईल.

मातृकांच्या वरती अनुस्वार दिला की त्या मातृकेला शक्ती रूप प्राप्त होते उदाः र हे अक्षर आहे. तर रं हे अग्निबीज आहे. या अग्निबीजाचा जप केला असता अग्नी निर्माण करता येतो. या करिता हे बीज सिद्ध करावे लागते. या बीजमंत्राच्या जपाने सूक्ष्मदेह शुद्ध होतो. जे लोक खूपच अपवित्र असतात दुष्ट विचारांनी भरलेले असतात त्यांनी या बीजाक्षराचा जप केला असता त्यांच्या अंगाची आग होऊ लागते व जवळ जवळ सर्व समाजच अशुद्ध व दुष्ट विचारांनी भरलेला असल्याकारणाने रं या बीजमंत्राला सौम्य करून त्याचे राम या नाममंत्रात रूपांतर करण्यात आले व रामनाम समाजाला दिले गेले

अशा प्रकारे प्रत्येक अक्षरामध्ये प्रचंड शक्ती दडलेली आहे. जप करून या शक्तीला स्वतःच्या अंगात निर्माण करावी लागते. प्रत्येक बीजाक्षराची एक एक देवता असून या देवता विशिष्ट प्रकारच्या मर्यादित सामर्थ्याने युक्त असतात. दोन अक्षरे एकत्र जोडल्यानंतर आणखी एक वेगळ्याच प्रकारची शक्ती निर्माण होते. ही शक्ती एक अक्षरी बीजापेक्षा जास्त शक्तिशाली असते.

उदा. हीं हे भुवनेश्वरी बीज असून या बीजाक्षराच्या जपाने ज्ञान व सामर्थ्य प्राप्त होते. शिव, विष्णू व भुवनेश्वरी देवी अशा तीनही देवता या एकाच बीजाक्षरात राहतात.

श्रीं हे महालक्ष्मीचे बीज असून या बीजमंत्राच्या जपाने महालक्ष्मीची प्रसन्नता प्राप्त होते.

क्लीं हे काली बीज आहे. या बीजाक्षराच्या जपाने अनेक विद्या प्राप्त होतात. क्लीं या बीजाचे सौम्य रूपांतर कृष्ण असे केले गेले व सामान्य लोकांना कृष्णभक्ती करण्यास सांगितले गेले.

गं हे गणपतीचे बीज आहे

द्राम् हे दत्तात्रेयांचे बीज आहे..

छोट्याशा बीजाक्षरामध्ये अद्भुत सामर्थ्य असते. बीजाक्षरे व त्याचा परिणाम यांचा अभ्यास करून दोन-दोन, तीन-तीन बीजाक्षरे एकत्र करून साधक जप करतात व अद्भुत सामर्थ्य प्राप्त करतात. काही काही मंत्रांमध्ये तर दहा-दहा, वीस-वीस बीजाक्षरे असतात व प्रत्येक बीज शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचे सामर्थ्य तयार करते.

ऐं ह्रीं श्रीं या बीजाक्षरांमध्ये सरस्वती, भुवनेश्वरी व लक्ष्मी अशा तीन देवतांचे तेज आहे.

ऐं ॐ ऐं या मंत्रामध्ये सरस्वतीचे तेज असून, या मंत्राच्या जपाने बुद्धी तेजस्वी होते.

ऐं क्लीं सौः हा बाला त्रिपूरा देवीचा मंत्र असून, या मंत्राच्या जपाने समृद्धी व सफलता प्राप्त होते.

ऐं ह्रीं श्रीं क्लीं या मंत्रामध्ये चार देवतांचे तेज असून, या मंत्राच्या जपाने आर्थिक सुबत्ता प्राप्त होते.

ॐ द्राम् ॐ हा दत्तात्रेयांचा बीज मंत्र असून, या मंत्राच्य जपाने दत्तात्रेयांची कृपा प्राप्त होते. तसेच योगातील रहस्यांचे ज्ञान प्राप्त होते व संकटे दूर होतात, तेजस्विता प्राप्त होते.

अपवित्र, स्वार्थी किंवा संकुचित बुद्धीच्या साधका बीजाक्षरांचा जप केला असता त्याला खूप त्रास होतो. बीजाक्षरांच जप करणारा साधक नि:स्वार्थ बुद्धीचा, परोपकारी व मोठ्य मनाचा असावा लागतो. तरच बीजाक्षरांमध्ये असलेली शक्ती त ग्रहण करू शकतो.

एक अपात्र साधक एका बीजाक्षराचा अखंड जप कर असे. त्याचे मन अशुद्ध होते. २५-३० लाख जप झाल्यानंतर त्याला जिकडे-तिकडे आगीचे लोळ दिसू लागले. आकाश लाल दिसू लागले व त्याला पराकोटीची भीती वाटू लागली व त्याने मंत्रजप करणे सोडून दिले. असे प्रकार घडू नयेत म्हणून बीजाक्षराच्या जोडीला देवतेच्या नावाचे संपुट लावून जप करणे चांगले असते.

उदा. ॐ द्राम् दत्तात्रेयाय नमः

ॐ ऐं ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा

ॐ दुम् दुर्गायै नमः

ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः

ॐ ऐं सरस्वत्यै नमः

ॐ नहीं भुवनेश्वरी नमः

अशा प्रकारे देवतांच्या नावाने संपुट लावून व शेवटी नमः किंवा स्वाहा पल्लव लाविले असता बीजमंत्राचे तेज सौम्य व सुखकर होते. याशिवाय देवतेची कृपा होते. परंतु काही माणसे अशा जपातील तेजही ग्रहण करू शकत नाहीत. अशा लोकांनी फक्त नाममंत्राचा जप करावा. नाम जपाने कसलेही नुकसान होत नाही. चित्त शुद्ध होते. मन बलवान होते. अंगी सात्त्विकता वाढू लागते, सद्गुण निर्माण होतात व मंत्रजप करण्याची योग्यता प्राप्त होते.

श्री दत्त जय दत्त,

ॐ नमो नारायणाय,

ॐ दत्त दुर्गा ॐ

ॐ नम: शिवाय

अशा विविध नाममंत्रांनी परमेश्वराचे अखंड नामस्मरण केले असता अनेक वर्षांनंतर अंगी सात्त्विकता वाढू लागते. सद्प्रवृत्ती वाढू लागतात व साधना करण्याची पात्रता निर्माण होते.

अक्षर ब्रह्माच्या सहाय्याने असंख्य देव-देवतांची शक्ती आपल्यात निर्माण करता येते, इतकेच नव्हे तर असंख्य प्रकारच्या शस्त्रास्त्रांची निर्मितीही करता येते. उदा. अग्नी अस्त्र, पर्जन्य अस्त्र, ब्र्हमास्त्र ई. या अस्त्र विद्येच्या द्वारा प्रचंड संहार घडवून आणता येतो. एकंदरीत असे म्हणावे लागते, की अक्षरांनी काय होत नाही?

प्राचीन काळामध्ये मंत्राच्या सहाय्याने पाऊस पाडला जात असे. वादळे निर्माण केली जात असत, अग्नीचा वर्षाव केला जात असे, अशा प्रकारे विविध प्रकारच्या अस्त्रांची निर्मिती केवळ मंत्रांद्वारे केली जात असे. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या विद्या अस्तित्वात होत्या. परंतु या विद्यांचा प्रचंड प्रमाणात दुरुपयोग झाल्या कारणाने या विद्या लोप पावल्या.

आजही असे साधक आहेत, की जे मंत्राने अग्नी निर्माण करतात, मंत्राने पाऊस पाडतात किंवा मंत्राने वादळे निर्माण करू शकतात,पण ते प्रसिद्धीपासून अलिप्त राहून एकांत स्थळी अखंड साधनेत मग्न असतात. अशा प्रकारे शब्द ब्रह्मामध्ये विविध प्रकारचे सामर्थ्य आहे. त्याचा सदुपयोग केला असता मनुष्य देव होऊ शकतो व दुरुपयोग केला असता माणसाचा राक्षस होतो.

सर्व देवतांचे व सर्व अक्षरांचे मूळ ॐ आहे. ॐ च्या ध्वनीमध्ये बावन्न मातृका सामावलेल्या आहेत. सर्व देव-देवता सामावलेल्या आहेत, सर्व विद्या सामावलेल्या आहेत, सर्व ज्ञान सामावलेले आहे, सर्व कला सामावलेल्या आहेत. फक्त या अक्षर ब्रह्माची साधना करण्याकरिता आवश्यक असणारी पवित्रता व योग्यता आपल्या अंगी असावी लागते. निःस्वार्थ बुद्धीच्या साधकांना ॐ काराच्या साधनेने कुंडलिनी जागृतीचा अनुभव येतो. षड्चक्रे जागृत होतात. विविध प्रकारचे ज्ञान होते. वातावरणातील देव-देवता व सिद्धपुरुष यांची दर्शने होतात, त्यांच्याकडून मार्गदर्शन प्राप्त होते. ध्यानामध्ये विविध प्रकारची दृश्ये दिसू लागतात. चिदाकाशात प्रवेश प्राप्त होतो. मरणाच्या चक्रातून सुटका होते. जन्म-अक्षर ब्रह्माच्या उपासनेने साधक जीवनमुक्त होतो, सिद्ध होतो, परमेश्वराशी एकरूप होतो. फक्त सद्बुद्धीने अक्षर ब्रह्माचा सदुपयोग करायला हवा. रावण, कुंभकर्णादी राक्षसांनी अक्षर ब्रह्माचा दुरुपयोग करून कुल संहार घडवून आणला होता. असे हे अक्षर ब्रह्म. सदुपयोग केला तर ब्रह्म पद प्राप्त करून देते व दुरुपयोग केला तर भ्रमात भरकटवीत राहते. 

‘रं’ या मंत्रामध्ये अग्नी निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे त्याचा मानसिक जप केला असता सूक्ष्मशरीर शुद्ध होण्यास मदत होते.

फार पूर्वी अनेक लोकांनी रं या मंत्राचा जप करून अनेक शक्ती प्राप्त केल्या. कालांतराने मंत्रातील तेज व शक्ती ग्रहण करण्यासाठी जे मनोबल लागते ते मनोबल कमी झाले. माणसे मानसिकरीत्या दुर्बल होऊ लागली. माणसांची मने दुर्बल झाली. रं या बीजाक्षराची साधना केल्यानंतर माणसांना सगळीकडे अग्री ज्वाला दिसू लागल्या. यामुळे तात्कालीन ऋषींनी रं या बीजाक्षराचे रूपांतर राम असे केले व राम मंत्राचा जप करण्यास जनतेला सांगितले. अशा प्रकारे राम नामाचा प्रसार सर्वत्र झाला.

रं हे बीजाक्षर तेजतत्त्वाचे कारक आहे. या बीजाक्षराच्या जपाने तेजतत्त्व (अग्नी तत्व) सिद्ध होते. सूक्ष्म शरीर शुद्ध होते. प्रकाशमय मार्गात प्रवेश प्राप्त होतो. मेष, सिंह, धनु या राशीच्या लोकांनी रं हे बीजाक्षर असलेल्या नामाचा जप करावा. उदा. ॐ रं किंवा राम नामाचा जप. यांचा मार्ग योग हा मार्ग आहे.

लं हे बीजाक्षर पृथ्वीतत्त्वाचे द्योतक आहे. या बीजाक्षराचा जप केल्याने पृथ्वीतत्त्वातून आपतत्त्वाकडे जाणारा मार्ग मिळतो. वृषभ, कन्या मकर या राशीच्या लोकांनी लं हे बीजाक्षर असलेल्या नामाचा जप करावा. उदा. ॐ लं जय माई. यांचा मार्ग कर्म हा मार्ग आहे.

वं हे बीजाक्षर आपतत्त्वाचे (जलतत्व) कारक आहे. या बीजाक्षराचा जप केल्याने आपतत्त्वातून तेजतत्त्वाकडे जाण्याचा मार्ग मिळतो. मीन, वृश्चिक, कर्क या राशीच्या लोकांनी वं (गं) हे बीजाक्षर असलेल्या नामाचा जप करावा. उदा. ॐ वं (गं) गणपये नाम: . यांचा मार्ग ज्ञान हा मार्ग आहे.

यं हे बीजाक्षर वायुतत्त्वाचे कारक आहे. या बीजाक्षराच्या साधनेने विहंगम मार्गाचे ज्ञान होते. मिथुन, तुळ, कुंभ या राशीच्या लोकांनी लं हे बीजाक्षर असलेल्या नामाचा जप करावा. उदा. ॐ यं किंवा विठ्ठल नामाचा जप. यांचा मार्ग भक्ती हा मार्ग आहे.

‘है’ हे बीजाक्षर आकाशतत्त्वाचे कारक आहे. या बीजाक्षराच्या साधनेने आकाशतत्त्वाचे ज्ञान होते.

अशा प्रकारे शब्दसृष्टीमध्ये असंख्य बीजाक्षरे असून या बीजाक्षरांच्या अनुष्ठानाने विविध प्रकारचे ज्ञान प्राप्त करता येते. विविध प्रकारच्या विद्या प्राप्त करता येतात. ज्याप्रमाणे विशिष्ट पद्धतीच्या बीजाक्षरांचा जप करून प्रकाशमय देवता प्रसन्न करता येतात, त्याचप्रमाणे विशिष्ट प्रकारच्या बीजाक्षरांचा जप करून भयानक अंधःकारमय विश्वातील भूत-भैरवांनाही प्रकट करता येते व त्यांचेकडूनही विविध प्रकारच्या विद्या प्राप्त करता येतात.

भूत, भैरव, शाकिनी, डाकिनी लवकर प्रकट होतात किंवा एक दोन दिवस साधना करून बळी दिल्याने एखादी विद्या देतात. यामुळे अंधःकारमय मार्गाच्या साधना करणारे साधक बरेच असतात. क्वचित एखादा साधक प्रकाशमय मार्गाने जातो व आपल्या सूक्ष्मदेहाला प्रकाशमय बनवितो. अंध:कारमय विश्वाची माहिती वाचकांना देणे योग्य नाही. म्हणून प्रकाशमय विश्वाचीच माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व अंध:कारमय विश्वाचा ओझरता उल्लेख केला आह्रे.

सगुण भक्ती, निर्गुण ब्रह्म, भक्तिमार्ग, योगमार्ग या सर्व गोष्टी प्रकाशमय विश्वात येतात. सद्गुणांचे आचरण, दान, नम्रता, परोपकार या गोष्टी प्रकाशमय मार्गात येतात. निःस्वार्थ प्रेम करणे, प्रेमाने वागणे व इतरांना मदत करणे हे प्रकाशमय मार्गात येते.

स्वार्थीपणा, कुढत राहण्याची प्रवृत्ती, संकुचित वृत्ती, ईर्षा, द्वेष, मत्सर करणे हे दुर्गुण म्हणजे अंध:कारमय विश्व. शब्द ब्रह्माचा म्हणजे नामजपाचा, मंत्रजपाचा आधार घेऊन आपण या अंधःकारमय विश्वाच्या पलीकडे जाऊ शकतो.

 ऐं या बीजाक्षराचा जप केला असता सरस्वतीची प्रसन्नता प्राप्त होते व ज्ञान प्राप्त होते.

श्रीम् या बीजाक्षराचा जप केला असता महालक्ष्मीची प्रसन्नता प्राप्त होते.

न्हीम् या बीजाक्षराचा जप केला असता अनेक प्रकारचे ज्ञान होते, भुवनेश्वरी देवी प्रसन्न होते.

अशा प्रकारे शब्दसृष्टीमध्ये असंख्य बीजाक्षरे असून या बीजाक्षरांचा जप केला असता अनेक देवता प्रकट होतात व भक्तांना सन्मार्ग दाखवितात. हिंदू धर्मामध्ये प्रकाशयम मार्गातील देवता म्हणून गणेशापासून दत्तापर्यंत, सरस्वती पासून दुर्गापर्यंत अनेक देवी-देवता प्रसिद्ध आहेत. यापैकी कुठल्याही एखाद्या देवतेची आराधना करून प्रकाशमय मार्गाचे आपण अनुसरण करू शकतो. 

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment