
विषय : स्वाती नक्षत्र विचार
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : नक्षत्र ज्योतिष
नमस्कार,
आज आपण स्वाती नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत. स्वाती हे नक्षत्र चक्रातील १५ वे क्रमांकाचे नक्षत्र असून इंग्रजी नाव ‘आर्कटयूरस’ असे आहे. या नक्षत्रामध्ये एकच तारा असून तो सोन्यासारखा पिवळा, टपोरा, ठळक व व्याधासारखा अप्रतिम तेजस्वी आहे. काहींच्या मते याची आकृती प्रवाळासारखी आहे. पूर्व दिशेला उगवताना तर हे नक्षत्र मोठ्या चेंडूसारखे भासते. वैशाख महिन्यात ते रात्रभर आकाशात दिसते.
स्वाती या शब्दाचा अर्थच सु + अति स्वाती. जणू काही सुंदर सरोवरात विहार करणारा दुसरा हंस पक्षी होय. स्वाती याचा अर्थ खोल, खोलात शिरा, खोल संशोधन करा असाच आहे.
स्वाती हे नक्षत्र संपूर्ण तूळ राशीत असल्याने चतुष्पादी तीर्यड्मुखी चर, सुलोचनी व चल आहे. नक्षत्राचा स्वामी राहू, राशीस्वामी शुक्र व दैवत वायुदेवता आहे. नक्षत्राच्या ४ चरणांवर अनुक्रमे गुरु, शनि व शनि आणि गुरु यांचे स्वामित्व आहे. या नक्षत्रात वाऱ्याची अचाट बुद्धीमत्ता, राहूचा चाणाक्षपणा, धूर्तपणा व शुक्राची सौंदर्यदृष्टी व कला यांचा सुंदर संगम झालेला दिसतो.
कुंतीपुत्र महापराक्रमी भीमाचे हे नक्षत्र आहे.
स्वाती नक्षत्र देवनक्षत्र असून शुभ आहे व सत्त्वगुणी व नीतिमान आहे. स्वाती नक्षत्रावर जन्म झाल्यास जातक विद्वान, बुद्धीमान, गुणी, ईश्वरभक्त, सदाचारी, धार्मिक, विनयशील, आत्मसंयमी, व्यवहार कुशल, होशी, रसिक, आनंदी, कलाकुशल व उत्तम सौंदर्यदृष्टीयुक्त, पारखी, चैनी, उपभोगी पण विवेकी असतो. स्वाती नक्षत्र शरीरप्रकृती, सौंदर्य, लक्ष्मी, सरस्वती व कला या सर्वांनाच चांगले आहे. मात्र अधिकार योगाच्या दृष्टीने ते फारसे अनुकूल नाही. या नक्षत्र जातकांना निवड करणे, पारखून घेणे, तोलून मापून बघणे यांची फार सवय असते.
पुरुष व स्त्रिया या दोघांनाही हे नक्षत्र चांगले आहे.
स्वाती नक्षत्रावर जन्मणाऱ्या पुरुष जातकांचा बांधा उंच, सडपातळ, सुडौल, अवयव उंच पण थोडे गोल व भरीव, हातापायाची बोटे जरा लांब व जाड, कपाळ उंच, चेहरा उभट, नाक सरळ, डोके लांबट असते. चेहरा सुरेख पण जरा गंभीर व प्रौढ वाटतो. शारीरिक जीवन व रोगप्रतिकारक शक्ती बरी असते. हे जातक बुद्धीमान, हुशार, हौशी, रसिक, आनंदी, उपयोगी पण रजोगुणी आढळून येतात. वागण्यात समतोलपणा चांगला दिसून येतो. तशा आळशी नसून गतिमान व नेहमी काही उद्योगात व्यस्त असतात. स्वाती नक्षत्र बिघडल्यास या व्यक्ती स्वार्थी व कंजूष वृत्तीच्या होतात.
स्वाती स्त्री जातकांना हे नक्षत्र अनुकूल आहे. सौंदर्य, वात्सल्य, प्रेमभावना, कोमलपणा व संगोपन करण्याची वृत्ती हे गुणधर्म या नक्षत्रात विकसित झालेले आहेत. स्त्रियांना ते रूप, कला, गुण व लक्ष्मी आणि बुद्धी यांची खैरात करणारे आहे. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या स्त्रिया उंच पण थोडे भारदस्त शरीर असणाऱ्या अवयव लांबट व गोल मात्र प्रमाणशीर, रेखीव, सुडौल असतात. कपाळ जरा गोल पण चेहरा उभट असतो. गाल फुगीर पण फार पुष्ट नसतात. नाक सरळ पण ठसठशीत, डोळे काळेभोर व टपोरे असतात. भुवया कोरीव असतात. चेहरा सुंदर, देखणा, पण थोडी उदासीनतेची झाक असणारा असतो. केस काळेभोर व लांब असतात. शरीर भरलेले असले तरी त्यांच्या हालचाली मात्र वाऱ्याप्रमाणे चपळ असतात. स्वभाव होशी, रसिक, उपभोगी, कलाकौशल्य व जगातील सर्व सुंदर वस्तू, चैन, आराम यांचा हव्यास असणाऱ्या असतात. त्यांना गायन, वादन, उंची कपडालत्ता, अलंकार, फुले, अत्तरे, सुगंधी पदार्थ यांची आवड असून राहणी नीटनेटके व व्यवस्थित असते. त्या आधुनिक विचाराच्या असल्या तरी अति फॅशनेबल नसतात. भडक रंगापेक्षा त्यांना आपल्या वर्णाशी व रंगाशी जुळणारेच कपडे आवडतात. मॅचिंग साडी व ब्लाऊजपेक्षा किंवा प्रिंटिंग वायल्सपेक्षा उंची व तलम साड्या व भरजरी शालूच जास्त प्रिय असतात. लांबसडक वेणी किंवा भरगच्च अंबाडे प्रिय असून त्यावर १-२ टपोरी फुले अथवा वेणी आवडते. तंग किंवा पुरुषी पोषाख फारसा आवडत नाही. रोहिणीप्रमाणे भरमसाट दागिन्यांनी मढण्यापेक्षा एखादी अंगठी किंवा नेकलेस त्यांना प्रिय असतो. वाहनांची फार हौस असते. स्वाती नक्षत्र स्त्री ही आधुनिक व सुधारक आहे. तेजस्वी असते, तसेच. चैनी, विलासी पण चपळ, तरतरीत व चुटचुटीत आहे. स्वातीला श्रीमंतीचा अभिमान असू शकतो. स्वाती स्त्री जातक कलावंत व कलाकुशल असू शकतात. स्वाती जातक स्त्रियांच्या कुंडलीत चंद्र व शुक्र असता या स्त्रिया चित्रकला, रंगकाम, विणकाम, रांगोळी काढणे, फुलांचे दागिने किंवा सुरेख वस्तू तयार करणे, कोरीव काम यांच्यात पारंगत असतात.
स्वाती नक्षत्राखाली बराचसा सघन, श्रीमंत व कलाकार वर्ग येतो. हे नक्षत्र सर्व प्रकारच्या व्यापाराला फार चांगले. या नक्षत्राखालील सर्व ठिकाणच्या घाऊक व्यापाऱ्याच्या जागा शेअरबाजार व ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पैशाच्या उलाढाली होतात अशी ठिकाणे येतात. या नक्षत्राखाली धान्य, तेले, डाळी, कापड, सोने, चांदी, हिरे, माणके, सुगंधी पदार्थ व चैनीच्या वस्तूचे घाऊक व्यापारी, सिनेमा नाटके यात काम करणारा वर्ग, नट, नट्या, चित्रकार, पेंटर्स, आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, शेअर बाजारातील दलाल, टी.व्ही., फ्रीज, मोटारी, रेडिओ, उंची फर्निचर यांचे व्यापारी, तसेच न्यायसंस्थेत काम करणारा वर्ग, न्यायाधीश, वकील बॅरिस्टर्स, अॅडव्होकेटस् किंवा मोठमोठ्या खाजगी कंपन्या, स्वायत्त मंडळे या ठिकाणी लठ्ठ पगारावर काम करणारा वर्ग ई. सर्वजण येतात.
या नक्षत्रामध्ये सर्व ग्रह निरनिराळे फलादेश देतात. कोणी शिक्षण, कोणी व्यापार, कोणी धन तर कोणी कला देतो.
स्वाती नक्षत्री रवि शरीरप्रकृती व गुणाच्या दृष्टीने साधारण असतो. सत्त्वगुणी, उदार व परोपकारी असतो. अधिकारयोगाच्या दृष्टीने अनुकूल असतो. मात्र विद्या व धनाच्या दृष्टीने मध्यम असतो.
स्वाती नक्षत्री चंद्र अनुकूल असतो. जातक सुंदर, आनंदी व देखणा असतो. विद्वत्ता व बुद्धीमत्ताही चांगली असते. रजोगुण जास्त दिसून येतात. तोलून बघण्याची वृत्ती फार आढळते.
स्वाती नक्षत्री मंगळ असता इंजिनिअरिंगच्या शिक्षणाला चांगला. यांचा उंच, सडपातळ, सडसडीत असतो. धनाच्या दृष्टीनेही चांगला.
स्वाती नक्षत्री बुध उत्तम प्रकारची बुद्धीमत्ता देतो. गणित विषय चांगला, स्मरणशक्ती, पाठांतरशक्ती, ग्रहणशक्ती चांगली असते. हे जातक हुशार, चुटचुटीत, व्यवहार कुशल व तरतरीत असतात. शरीरप्रकृतीही उत्तम असते. थोडे बुटके पण चपळ असतात.
स्वाती नक्षत्री गुरु बुद्धी व विद्येच्या दृष्टीने अनुकूल असतो. हे जातक अतिशय हुशार, ज्ञानी, बुद्धीमान व विद्वान असतात. बुद्धी खोल, विचारी, संशोधक असून तुलनात्मक अभ्यासाची बरीच आवड असते. स्मरणशक्ती, पाठांतर, ग्रहण व आकलनशक्ती उत्तम असून त्या सर्व शास्त्रांत पारंगत असतात. शिक्षक व प्रोफेसर्स यांना हा गुरु बरा. धनाच्या दृष्टीनेही बरा. पण शरीरप्रकृतीच्या दृष्टीने मध्यम. सत्वगुणाचा पुतळा असतात.
स्वाती नक्षत्री शुक्र भाग्याचे होय. हे जातक गोंडस, सुडौल व सुंदर शरीर, चेहरा तेजस्वी, आकर्षक, मोहक व टवटवीत असतात. धन भरपूर मिळते व कला कौशल्य पारंगत असतात. शुक्र उंची व चैनीच्या वस्तूंच्या व्यापारास, सिनेमा, नाटकात काम करण्यास फारच अनुकूल असतो. हे जातक फार हौशी, विलासी, शौकीन, शृंगारी, चैनी व उपभोगी असतात.
स्वाती नक्षत्री शनि बुद्धी, विद्या व धनाच्या दृष्टीने चांगला. शरीरप्रकृतीही कणखर व सशक्त असते. हाडापेराने मजबूत, काटक व भारदस्त शरीर असते. जातक बुद्धीमान, संशोधक, चिकित्सक, चौकस, सखोल बुद्धी व विद्येसाठी बरेच कष्ट व श्रम घेणारे असतात. जातक उत्तम संशोधक, शास्त्र, कायदेपंडित, प्रबंध लिहिणारे असू शकतात. व्यापाऱ्याच्या कुंडलीत स्वाती नक्षत्री शनी असता कोणत्याही वस्तूंचे विशेषतः धान्य, तेले, कापूस, कपडे यांचे घाऊक व्यापारी, गिरण्यांचे व कारखान्यांचे मालक असतात. लक्षाधीश व कोट्याधीश होऊ शकतात. स्वभावाने मात्र या व्यक्ती अति कंजूष, अरसिक, चिकित्सक असतात. धन असूनही उपभोग घेण्याची वृत्ती नसते. धनसंचयाकडे विशेष लक्ष असते.
स्वाती नक्षत्री राहू अप्रतिम बुद्धी, संशोधन व कला यांना अनुकूल असतो. स्वनक्षत्र असल्याने तो बलवान असतो. पेंटिंग, ड्रॉइंग, फोटोग्राफी, आर्किटेक्ट, कोरीव काम यांना राहू चांगला असतो. शरीरप्रकृती व बांचा ऐटबाज व आकर्षक असतो.
स्वाती नक्षत्री केतू असता जातकास रसिक, धार्मिक, पारमार्थिक, आध्यात्मिक विद्येची आवड दर्शवतो.
स्वाती नक्षत्री हर्षलल असता बुद्धी, विद्या, उच्च शिक्षण, स्वतंत्र कर्तृत्व, हुशारी दाखवल्यास तो उत्तम असतो. या जातकामध्ये बुद्धी वैशिष्ट्य दिसून येते. संशोधन करणे, नावीन्यपूर्ण कल्पना, नवीन नवीन शोध लावणे यांना तो चांगला असतो. स्वाती नक्षत्री दशमात हर्षल असता हे जातक धडाडी, कार्यकुशलता व कर्तबगारी असून आपल्या अलौकिक बुद्धी व कार्याने आपली कारकीर्द उज्ज्वल करतात.
स्वाती नक्षत्री नेपच्यून अंतःस्फूर्ती, प्रतिभाशक्ती, कल्पनाशक्ती, दुसऱ्याच्या मनातील विचार जाणण्याची शक्ती, आत्मसंशोधन यांसाठी चांगला.
स्वाती नक्षत्रावर होणारे रोग फारसे दाहक किंवा क्रूर नसले तरी बराच काळ मुरणारे असतात. विशेषतः मूत्रपिंडाचे विकार (किडनी), लघवीचे विकार, कंबर दुखणे, गुरु अनिष्ट असता रक्ताभिसरण किंवा रक्तदाबाचे विकार. चंद्र शुक्र अनिष्ट असता मधुमेह, वाताधिक्य, सर्दी, कफ यांचा फार त्रास होतो. मंगळ- शुक्र युति असून ते अनिष्ट असता गुप्तरोग व चंद्र शनि युती असता दमा अथवा श्वासोच्छ्वासाच्या विकाराचा संभव असतो. कधी कधी ओकाऱ्या, मळमळ किवा काविळीपासूनही त्रास होऊ शकतो.
स्वाती हे राहूचे नक्षत्र असल्याने काही वेळा यात शनि, राहू, मंगळ असे ग्रह असता काळी विद्या, जादूटोणा, पिशाच्च विद्या, अघोरी विद्या यात यश देते.
स्वाती नक्षत्र सुलोचनी असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास कितीही प्रयत्न केला, तरी ती परत मिळणे कठीण असते. वस्तू उत्तरेला गेलेली असते. या नक्षत्राचा भाग्यांक ६ किंवा ८ असतो. शुक्राचा हिरा किंवा शनीचा नीलमणी लाभदायक असतो, हस्ताक्षर अतिशय सुरेख, वळणदार, स्पष्ट व ठळक असते. विशेषतः व, ब, क अशा अक्षरातील गोलाकार वळण फारच सुंदर दिसते.
स्वाती नक्षत्र शुभ व देवगणी असल्याने मुहूर्तशास्त्रात या नक्षत्राचे महत्त्व फार आहे. यावर नांगर धरणे, बी पेरणे, सुगंधी पदाचांची झाडे लावणे, जनावरे घेणे, नवीन वाहन विकत घेणे व चालू करणे, नवीन वस्त्रे व अलंकार घालणे, विद्यारंभ, नवीन दुकान सुरू करणे, विहिरी खणणे, मौजी, बारसे, विवाह, गृहप्रवेश, वधू प्रवेश, औषध घेणे इत्यादी कार्यांना फारच चांगले.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)