कर्म सिद्धांत भाग २


विषय : कर्म सिद्धांत (भाग २)

संकलक व स्वैर अनुवाद : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : THEORY OF KARMA (श्री हीराभाई ठक्कर)

नमस्कार,

आज पहिल्या भागात आपण कर्म सिद्धांत, क्रियमाण कर्म, संचित कर्म, प्रारब्ध कर्म याविषयी जाणून घेतले. आज या विषयाचा पुढील टप्पा क्रमश: व थोडक्यात पाहणार आहोत.

धार्मिंकावर संकटे, तर अधार्मिकाची चंगळ :

कर्माचा अटळ सिद्धांत आहे की ‘जे पेराल ते उगवेल’ ‘जसे कराल तसे नीति- भराल.’ परंतु प्रत्यक्ष व्यवहारात आपण अनुभवतो, की न्याय-धर्माने वागणार्याला, आयुष्यात खूप दुःखे भोगावी लागतात, आणि अधर्म अनीतीने वागणारे काळाबाजार, तस्करी करणारे आयुष्यात मौज-मजा करत असतात. गाडी बंगला सर्व तरहेच्या सुखसोयी यांची दारी असतात..

हे सतत पाहिले की, देवावरील आपली श्रद्धा डळमळू लागते व कर्म सिद्धांत ही एक भ्रामक कल्पना आहे असे वाटू लागते. आपणही अनीति, अधर्माने पैसा मिळवण्यास प्रेरीत होतो. परंतु ही फार चुकीची समजूत आहे. नेहमी पुण्याचे फळ हे सुख व पापाचे फळ हे दुःख च असते. पाप करणारा माणूस  आपल्याला सुख-समृद्धित वावरताना दिसतो, ते त्याच्या पापकर्माचे फळ नसून, त्यांने पूर्वी केलेली काही पुण्यकर्मे त्याच्या संचितात जमा असतात, ती आता पक्व होऊन त्याला सुख-रुपी फळें देत असतात. सध्यां तो करीत असलेली पापकर्मे, त्याच्या पूर्वपुण्याईचा जोर असल्याकारणे, फळ दिल्याविना त्याच्या संचितांत जमा होऊन राहातात, आणि पूर्वपुण्याईचा जोर ओसरतांच, प्रारब्ध बनून त्याच्या समोर उभी राहतात. पूर्वपूण्याईचा जोर असेपर्यंत पाप कर्मे आपला प्रभाव दाखवू शकत नाहीत.

संत कबीर म्हणतात :

कबीरा तेरा पुण्यका जब तक रहो भंडार । तब तक अवगुण माफ है करो गुनाहहजार ॥

या जन्मी न्याय-नीतिने वागणारी कित्येक माणसे दुःख-दारिद्र्यांने गांजलेली दिसतात, याचे कारण  त्यांची पूर्वकृत दुष्कृत्यें आता आपला प्रभाव दाखवित असतात. त्यांची या जन्मातील सतकृत्ये कालांतराने या वा पुढील जन्मी त्याना सुख-समृद्धि देणारच यांत तिळमात्र शंका नाही, कारण कर्म- सिद्धांत हा अटळ आहे त्यामुळे कर्म-सिद्धांत कायद्यावर आपला पूर्ण विश्वास ठेवावा आणि निर्धारपूर्वक न्याय-नीतिचा खरेपणाचा राजमार्ग अंगीकारावा.

ग्रामीण भागांत लोकांच्या घरात धान्य साठविण्यासाठी मोठमोठाली कोठारें असतात. त्याना बळद अथवा बळत म्हणतात. ‘बळद’ म्हणजे भिंतीत धान्य साठविण्यासाठी मोठी पोकळ जागा ठेवतात. त्यांत वरील मजल्यावरुन साठवणीचे धान्य ओततात. बळदाच्या तळाशी, खालच्या मजल्यावर धान्य बाहेर काढण्या साठी एक गवाक्ष (छोटा दरवाजा) असते, त्यांतून जरूर पडेल, तेव्हा आवश्यक धान्य काढून घेतां येते. समजा एखाद्या शेतकर्याचें बळद उत्कृष्ट समजले जाणारे धान्य जे गहू (उत्कृष्ट कर्माने, पुण्याने) त्याने भरलेले आहे. आणि दुसरया एकाद्या शेतकारयाचे बळद हलक्या प्रतीचे समजल्या जाणारूया बाजरी अथवा नाचणीने (निकृष्ट कर्माने, पापकर्माने) भरलेले आहे नंतर पहिला शेतकरी, यंदा त्याने बाजरीचे पीक घेतल्याने, आपल्या बळदांत वरुन बाजरी ओतू लागला (हलके पापकर्म), तरी जेव्हा जेव्हा तो खालचा दरवाजा उघडून धान्य बाहेर काढील तेव्हा तेव्हा, जो पर्यंत आंतील गव्हाचा साठा (उत्कृष्ट संचित कर्म-पुण्यकर्म) समाप्त होत नाही तो पर्यंत (तो जरी वरच्या दरवाज्यांतून बाजरी सारखे हलक्या प्रतीचे धान्य (पापकर्म) ओतीत असला तरी) त्याला गव्हाचाच पुरवठा होत राहाणार.

या उलट ज्या दुसऱ्या शेतकऱ्याचें बळद नाचणीने (निकृष्ट संचिताने, पापकर्माने) भरलेले आहे पण यंदाचे हंगामात त्याने गव्हाचे पीक घेतले. आणि आतां तो बळदांत वरील बाजूने गहू साठवू लागला (उत्कृष्ट कर्म- पुण्यकर्म), तरी जोपर्यंत आंतील नाचणीचा साठा (निकृष्ट संचित – पापकर्म) संपत नाही, तो पर्यंत (जरी तो गहू साठवू लागला आहे), तरी जेव्हां जेव्हां तो बळदाचे खालचे द्वार उघडील. तेव्हा तेव्हा त्याला त्यातून नाचणीच मिळत राहाणार.

परंतु असा एक दिवस निश्चित उगवणार, की जेव्हा पाहिल्या शेतकरयाचा गहू- साठा (पुण्यकर्म) संपणार, व त्याला नंतर साठविलेली बाजरी खाण्याची वेळ येणार. या उलट त्याँ दुसऱ्या शेतकरयाची नाचणीही (पापकर्म-निकृष्ट कर्म) संपणार, व मग त्याला मागाहून साठविलेले गहू (उत्कृष्ट-पुण्यकर्म) खाण्याचे भाग्य प्राप्त होणार. फक्त असे होण्यास त्याला थोडा फार काळ धीर धरावा लागणार.

म्हणून परमेश्वरावरील दृढ श्रद्धा, व कर्म सिद्धांत तत्वावरील आपला विश्वास, किंचितही ढळू न देतां. प्रत्येक मनुष्याने, जरी त्याला दुःख, हाल-अपेष्टा भोगाव्या लागत असल्या, तरी नाउमेद न होतां त्यां सहन कराव्या, व न्यायनीतिच्या मार्गावरून न ढळता, अविरतपणे सत्कर्म करीत राहावें.

एकाद्यां बैंकेचा मेनेजर जरी आपला मित्र व नातलग असला, तरी आपल्या बँक खात्यात आपली काही जमा (संचित) नसेल, तर आपण पाठविलेल्या चेकवर, तो आपल्याला काहीही रक्कम देऊ शकणार नाही, उलपटपक्षी सदर बँक मेनेजरच्या शत्रूनेही जरी काही रकमेची चेकद्वारे मागणी केली व त्याचे खात्यांत पुरेशी रक्कम शिल्लक असेल, तर चेक प्रमाणे त्या इसमाला पैसे देण्याशिवाय मेनेजरला पर्याय नसेल. त्यामुळे प्रयत्नपूर्वक आपल्या ख्यात्यातील शिल्लक वाढविणे हेच श्रेयस्कर आहे. त्याच प्रमाणे आपल्या दुःखा बदल ईश्वराला दोष देण्यात शहाणपणा नाही, तर आपले संचित, सत्कर्म करून वाढविणे हेंच आपले कर्तव्य आहे. ते पंर पाडा मग पहा भगवंत तुमच्या हाकेला धाऊन येतो की नाही ?

कोणतेही कर्म फळ देऊनच शांत होतें :

समजा की एकाद्या माणसाने काही पापकर्म केले आहे, की ज्याच्या फलस्वरूप त्याला एक दिवस उपाशी राहाण्याचें प्रारब्ध तयार झालेले आहे. हे प्रारब्ध भोगल्या शिवाय त्याची त्यापासून मुक्तता होणार नाही, कारण कर्मकायद्यानुसार कोणाचीही फळ भोगल्यावाचून सुटका होत नाही.

आतां तो मनुष्य जर सत्वगुणी असेल, तर त्याला एकादशीचा उपवास करण्याची व सर्व दिवस देवाचे चिंतन करत व्यतित करण्याची बुद्धि होईल. अशा तर्हेने तो आपले प्रारब्ध भोगून संपविल.

तो जर रजोगुणी असेल तर एखादे दिवशी त्याची पत्नी वा मुले अचानक आजारी होतील, त्याना होस्पिटल मध्यरे किंवा दवाखान्यात घेऊन जाण्याची त्याच्यावर वेळ येईल तेथे दोन तीन तास खर्च झाल्याने, त्याला ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी, उपाशी पोटीच घरुन निघावे लागेल, नेमका त्याचदिवशी ऑफिस कँटीनमध्ये संप असेल. घरी परत आल्यावर, गृहपरिस्थिति अधिक बिघडल्याने त्याला रात्री उपाशीच झोपावे लागेल. अशा तरहेने धावपळ करीत त्याला आपले प्रारब्ध भोगून संपवावे लागेल.

समजा तो माणूस तमोगुणी असेल, तर अशी एखादी घटना नेमकी जेवणाचे वेळी घडेल, की राग अनावर होऊन तो पुढे वाढलेले ताट रागाने उडवून देईल, व उपाशी पोटींच कचेरीत जाईल. पोटांत अन्ना अभावी त्याचे डोकें अधिकच भडकेल, व आपल्या सहकारयांशी भांडण होऊन त्याला शांति मिळणार नाही. संध्याकाळी घरी आल्यावर, बायकोशी भांडून तिला मारझोड केल्याने ती रात्री जेवणच करणार नाही. अशा तर्हेने खूप मनस्ताप सोसून तो आपले उपाशी राहाण्याचे प्रारब्ध भोगून संपवील.

सत्वगुणी व्रत उपवास करुन शांत मनाने आपले प्रारब्ध संपवील, व तसे करताना ईश्वरचिंतनात त्याचा वेळ व्यतित झाल्याने, तो थोडीशी पुण्याई जोडील व त्याचे नवीन चांगले क्रियमाण निर्माण होईल

रजोगुणी जीव बायको मुलांची सेवा चाकरी आपले कर्तव्य म्हणून करीत, आपले उपोषणाचे प्रारब्ध संपविल व असे करताना, त्याचे कोणतेही नवे पाप-पुण्य निर्माण होणार नाही.

तमोगुणी जीव आपलें उपाशी राहाण्याचे प्रारब्ध स्वतःला व दुसऱ्याना त्रास देत भोगील. व असे करताना नवे वाईट क्रियमाण निर्माण करील, की जे एक दिवस त्याचे प्रारब्ध बनून, त्याला नवीन क्लेश यातना भोगाव्या लागतील 

क्रियमाण कर्म पक्व होऊन प्रारब्ध रूपाने भोगल्या शिवाय कोणाचीही सुटका होत नाही, पण वरील उदाहरणाप्रमाणे सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी माणसांची ते भोगण्याची पद्धत भिन्न असते.

समजा एखाद्याचे ५०००० रुपये फायदा मिळण्याचे एखादे संचित आहे. त्याने काही जमीन ५ लाख रुपयांस विकण्याचे ठरवले आहे. एक दिवस एक गरजू माणूस त्याच्याकडे येऊन, ती जमीन घेणे गरजेचे व फायद्याचे असल्यामूळे, आपण होऊन साडेपाच लाख देऊ लागला. जर तो रजोगुण प्रधान असेल, तर आल्या संधीचा फायदा घेऊन साडेपाच लाखास व्यवहार करेल. व अशा रीतीने त्याचे प्रारब्धात असलेले ५०००० रुपये मिळवेल. असे करण्यात त्याचे काही नवीन क्रियमाण तयार होणार नाही. केवळ प्रारब्ध त्याला सुख भोग देऊन शांत होईल.

तो सत्वगुणप्रधान असेल, तर ५०००० रुपये अधिक घेण्याचे नाकारेल आणि सदर माणसाचा लाभ न उठवता, जमीन ५ लाख रूपयाना विकून व्यवहार पूर्ण करेल. या परिस्थितित, त्याचे ५०००० रुपये फायदा मिळण्याचे संचित संधीची वाट पहात फिरत राहील व सत्कर्माचे थोडे पुण्य फळ त्यात वाढेल.

तो तमोगुणप्रधान असेल, तर जास्तीत जास्त किंमत मिळवून देखील, जमिनीचा निकृष्ट भाग त्याच्या माथी मारण्याचा हेतू मनात बाळगेल व निंद्य मार्ग अवलंबिल्यामुळे, नवे पापरूप क्रियमाण निर्माण करेल.

अशा प्रकारे प्रारब्ध भोगण्याचे सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी माणसांचे भिन्न मार्ग असतात, पण प्रत्येकाला त्याचे प्रारब्ध भोगावेच लागते त्या शिवाय पूर्वीचे क्रियमाण समाप्त होत नाही.

सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी या तीन प्रकारच्या जीवांची क्रियमाण करण्याची कल्पना : 

सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी या तीन प्रकारच्या जीवांची क्रियमाण करण्याची कल्पना पण वेगवेगळी असते : 

(१) सत्वगुणी जीव म्हणतो, फळ मिळो वा न मिळो मी चांगले कर्म करीन.

(२) रजोगुणी जीव म्हणेल, मी कर्म करीन, पण मला त्यांचे फळ मिळालेच पाहिजे.

(३) तमोगुणी जीव म्हणेल, दामदुप्पट फळ मिळणार असेल तरच मी कर्म करीन.

सत्त्वगुणी जीवाला त्याच्या फळा बरोबर देणारयाच्या सदिच्छा व आशीर्वाद मिळतात. 

रजोगुणी जीवाला त्याचे फळ मिळते, पण सदिच्छा मिळत नाही.

तमोगुणी जीवाला त्याचे फळ मिळते, पण गरजेचा फायदा घेण्याची त्याची वृत्ति पाहून देणारा मनातून नाराज होतो, तळतळाट देतो..

प्रारब्धांत असतें तेवढेच मिळतें :

क्रियमाण कर्मे जेवढी आणि ज्या प्रकारची कराल, तेवढेच आणि त्या जातीचेच प्रारब्ध तयार होते, आणि तेवढेच आणि त्या प्रकारचेच फळ तुम्हाला मिळते, त्यांत किंचिंतही कमी- जास्त होत नाही. जन्म घेतेवेळी, जेवढे संचित कर्म पक्व होऊन प्रारब्धांत रुपांतरित झालेले असते, तेवढेच भोगण्याला अनुरूप असा जन्म मिळतो. मिळणारे माता-पिता, स्त्री-पुरुष, कन्या नातलग, हे सर्व प्रारब्धानुसार प्रारब्ध भोगण्यापुरतेच मिळतात, त्यांचे तुमचे पूर्व ऋणानुबंध असेपर्यंतच ते लाभतात. प्रारब्धानुरूप उच्च, नीच कुळांत जन्म मिळतो, प्रारब्धानुसार सुख-सोई आयुष्यात लाभतात.

कोणत्या माता-पित्यांच्या उदरी जन्म घ्यायचा हे, आपल्या हातांत असतें, तर आपण प्रत्येकाने टाटा-बिर्ला ई. कुळांतच जन्म घेणे पसंत केले असते, की जेथे जन्म होतांच आपण पांच-पंचवीस बंगले, मोटारी, कारखाने यांचे धनी झालो असतो, पण अशी निवड करणे आपल्या इच्छेवर अवलंबून नसते. आपल्या प्रारब्धानुसार या जीवनात आपले संबंध घडतात. आपले स्त्री-पुत्रादि, नातलग आपल्या व त्यांच्या पूर्वकर्मानुसारच आपल्याला सुख-दुःख देतात, आपले व त्यांचे ऋणानुबंध असेतोपर्यंतच आपण एकत्र नांदतो. ऋणानुबंध संपले की आपण लाख प्रयत्न केले, तरी कौटुंबिक एकोपा राहू शकत नाही. या जन्मासाठी नेमलेले प्रारब्ध पूर्ण भोगल्याशिवाय आत्महत्याही यशस्वी होत नाहीं. आपण जीं जीं शुभ-अशुभ क्रियमाण कर्मे केलेली असतील, त्या अनुसारच आपले प्रारब्ध बनणार, आणि नेमके तेवढेव सुख-दुःखाचे भोग आपल्याला मिळू शकतात.

सतत वर्षभर चोवीस तास पाऊस पडला, तरी पळसाच्या झाडाला त्रिदळच तीन पानेच फुटणार, तेथे चौथे पान (चौदळ) उगवणारच नाही. वसंत ऋतूत सर्व झाडान नवी पालवी फुटते म्हणून बांबू ला पालवी फुटत नाही आणि न फूटली तर त्यांत वसंत ऋतूचा काय दोष ? सूर्योदयानंतर, सर्वत्र उजेड पडून सर्वाना दिसू लागते, पण घुबडाला दिसणे बंद होते, यांत सूर्यनारायणाचा काय दोष ?

तुमचे जे प्रारब्ध तयार झाले आहे, ते ललाट-लिखित विधाताही पुसू शकत नाही-पालटू शकत नाही. परमेश्वर हा केवळ कर्म-फलदाता आहे त्याचेही हात आपल्याला कर्म फळ देण्यात बांधलेले आहेत.

हिंदू धर्मात अशी एक समजूत आहे की, जन्मानंतर सहावे दिवशी सटवी (प्रारब्ध देवता) कपाळावर या जन्मीचे सुख-दुःखाचे भोग लिहीते. ही कल्पना खरी मानली, तरी एक गोष्ट निश्चित की, तुमचे पूर्व जन्म जन्मांतरातील जे क्रियमाण (संचित) कर्म या जन्मी भोगण्यास प्रारब्ध रुपाने पक्व झाले असेल, तेवढेच ही सटवी तुमचे कपाळी लिहु शकेल, कारण ती केवळ कर्मफळ दाती-देवता आहे.

तुमचे प्रारब्धांत जेवढा पैसा लिहीलेला असेल, तेवढाच पैसा कितीही खटपट लटपट केलीत तरी मिळेल.  अधिक धन मिळविण्यासाठी तुम्ही कोणत्याही वाममार्गाचा अवलंब केलात, तरी ते मिळणार नाही. आणि मिळाले तरी अचानक या, ना, त्या मार्गे हातांतून निसटून जाईल, शिवाय कुमार्गाचा आसरा घेतल्याने अनिष्ट क्रियमाण निर्माण होईल ते निराळेच.

फक्त धनासाठी उगाच धावपळ करु नको, कारण केवळ धावपळ केल्याने पैसा मिळत नाही. पूर्वजन्मीचा क्रियमाण कर्मानुसारच या जन्मी सर्व सुख-दुःखे, भोग, एश्वर्य मिळणार. 

तर मग माणसाने पुरुषार्थ करूच नये ?

कर्म-सिद्धांताच्या संदर्भात पुरुषार्थाचे स्थान बरोबर न समजल्याने कित्येक कट्टर प्रारब्धवादी असे मानतात की, माणसाला कोणताही पुरुषार्थ करण्याची जरुरीच नाही. जे प्रारब्धांत असेल ते घडणारच. परीक्षेत पास होण्याचे प्रारब्ध असेल, तर आपण पास होणारच व नसेल, तर कितीही अभ्यास केला तरी व्यर्थ. म्हणून अभ्यास करण्याची काहीही आवश्यकता नाही, असा विचार करुन सर्व प्रारब्धावर सोडून देतात. असेल हरी तर देईल खाटल्यावरी, असे म्हणून स्वस्थ बसतात.

प्रारब्धात असते, तेवढेच मिळते, तेंच घडते, ही गोष्ट निर्विवाद सत्य, पण प्रारब्ध व पुरुषार्थ यांतील सीमारेषा नेमकी कोठे याचा माणसाने विवेकयुक्त विचार केला पाहिजे. नोकरी मिळणे हे प्रारब्ध, पण नोकरीत व्यवस्थित काम करुन ती टिकविणे, बढती मिळविणे, हा पुरुषार्थ आहे. पैसा मिळणे हे प्रारब्ध, पण मिळालेल्या पैशाचा योग्य विनियोग करणे, हा पुरुषार्थ आहे. स्त्री-पुत्रादिक मिळणे हे प्रारब्ध, पण असेल त्या परिस्थितीत संसार नेटका करण्याचा प्रयत्न करणे हा पुरुषार्थ.

धन खूप मिळाले तरच माणूस सुखी होतो ही कल्पना बरोबर नाही. अघर्माने मिळविलेला पैसा हा शेवटी अनर्थकारकच होतो. वाममार्गाने मिळविलेल्या पैशाने, इतराना तो माणूस भले वैभवांत असलेला वाटो, पण तो मनांतून कधीच सुखी संतुष्ट नसतो. त्याला आंतरिक शांती, समाधान कधीच वाटत नाही. वाईट मार्गाने पैसा मिळविलेल्या माणसाची मुले बहुदा उधळी, व्यसनी निपजतात. जसे बीज तशी फळें.

पैसा असेल तर माणसाने त्या परिस्थितीचा लाभ घेवून, त्याचा विनियोग धर्ममार्गाकडे, समाजोपयोगी कार्याकडे करुन आत्मकल्याण साधणे हा त्याचा खरा पुरुषार्थ आहे. प्रारब्धस्वरूप आर्थिक स्थिति बेताची असेल, तर त्या परिस्थितीत सुद्धा मनाची शांती डळमळू न देता, समाधानाने वागून  अध्यात्मिक आत्मोन्नति साधणे, यांत त्याचा खरा पुरुषार्थ आहे. कोणाचेही शिव्या शाप न घेता, थोड्याशा लाभासाठी सद्सद्विवेक बुद्धिने वागून जे प्राप्त झाले आहे, ते आपल्या लायकीहून अधिक आहे, अशी मनोभावना ठेवून, संतोषपूर्वक समाधानी आयुष्य व्यतीत करणे हा खरा पुरुषार्थ आहे.

माणसाला आयुष्यांत अनेक वस्तू प्राप्त करण्यांची इच्छा होते. धन स्त्री पुत्रादिक बंगला, मोटार, कीर्ति, दान, ध्यान, मोक्ष धर्म इत्यादि अनेक कामना तो उराशी बाळगून असतो. जीवनातल्या अशा सर्व प्रकाराच्या इच्छांचे आपल्या शास्त्रकारानी चार भाग पाडलेले आहेत.

(१) धर्म, (२) अर्थ, (३) काम (४) मोक्ष. उपरोक्त चार गोष्टी माणसाने जीवनात मिळविल्या पाहिजेत.

धर्माचे आचरण करुन माणसाने अर्थ प्राप्त करावा. धर्माने मिळविळेला अर्थ (पैसा) हा शेवटी अर्थकारकच ठरतो. धर्माने प्राप्त झालेल्या अर्थाचा योग्य उपयोग करुन, जीवनांतील सर्व कामनांची पूर्ती करुन, जीवात्म्याचे अंतिम ध्येय जें मोक्ष, ते प्राप्त करण्यांची आकांक्षा बाळगावी.

या चार पुरुषार्थी पैकी, धर्म व मोक्ष हे दोन प्राप्त करण्यासाठी माणसाने सतत प्रयत्न (पुरुषार्थ) करावा, ते कधी ही प्रारब्धावर सोडू नये. आपण नेमके उलट करतो अर्थ व काम यासाठी माणूस दिवस रात्र प्रयत्नशील असतो, व शेवटी पस्तावतो. अर्थ व काम या साठी जरूर यत्न करा, प्रण ते धर्माचा, नीतिचा राजमार्ग न सोडता, व मोक्षाची प्राप्ती करा.

प्रारब्ध व पुरुषार्थ परस्पर विरोधी नाहीत, पण एकमेकाना पूरक आहेत :

आज आपण जे क्रियमाण कर्म (पुरुषार्थ) करतो त्यातील बरेचसे संचितात जमा होऊन कालांतराने जेव्हां पक्व होतें, तेव्हां प्रारब्ध रूपाने आपणास भोगावयास लागते, आणि ते भोगण्यासाठी आपल्याला अनुरूप शरीर व परिस्थिती प्राप्त होते. आजचा पुरुषार्थच भविष्यकाळांत प्रारब्धात रूपांतरीत होतो. आजचा पुरुषार्थ हा जणू उद्याच्या आपल्या बंगल्याचा वा झोंपडीचा ‘ब्ल्यू प्रिंट’ (रूपरेखा) आहे.

म्हणजे वास्तविक पुरुषार्थ व प्रारब्ध या एकाच वस्तूच्या दोन अवस्था आहेत, आणि या दोहोंची कार्यक्षेत्रेच भिन्न असल्याने, त्यांचा एक दुसर्यार्शी विरोध ही नसतो. प्रारब्ध, शरीराला, त्याच्या चांगल्या वाईट रूपाप्रमाणे, भोग प्रदान करते, तर चालू आयुष्यांत केलेला पुरुषार्थ, कालांतराने प्रारब्धांत रूपांतरीत होऊन, भविष्य कालीन शरीराला चांगला वा वाईट भोग प्राप्त करून देतो. इंग्रजीतील “MAN IS THE ARCHITECT OF HIS OWN LIFE” ही म्हण हेच सूचित करते.

मनुष्य स्वत:चें उद्याचे प्रारब्ध, आजच्या आपल्या पुरुषार्थाने घडवत असतो. प्रारब्ध विरहित पुरुषार्थ पांगळा, तर पुरुषार्थ विरहित प्रारब्ध आंधळें.

आंधळा व पांगळा अशा दोन मित्रांच्या गोष्टीसारखे हे आहे. आंधळ्याला रस्ता दिसत नव्हता, तर पांगळ्याला चालतां येत नव्हते, त्यामुळे दोघेही विवश होते. पण दोघानी विवेकबुद्धिचा वापर केला. आंधळ्याच्या खांद्यावर बसून पांगळ्याने त्याला मार्ग दाखविला, व दोघानी आपली प्रवास यात्रा पुरी केली. आपल्या आयुष्याचा प्रवास सफल करण्यासाठी, प्रारब्ध आणि पुरुषार्थ एकमेकाना पूरक बनतात.

आपल्या प्रारब्धानुसार जीवनांत आपण सुख-दुःख अनुभवतो. दुसरे कोणीही आपल्या सुख-दुखाचे कारण असत नाहीत ते केवळ निमित्त मात्र असतात.

सुख-दुःखाचा कोणी न दाता । दुसरा देतो ही कुबुद्धि रेखा || ‘मी’ करतो हा वृथाभिमान । स्वकर्म-सूत्रे गुंफिले सर्व जन ॥

कर्म करण्यांत आपण स्वतंत्र फळ भोगण्यांत परतंत्र : 

भगवद्गीतेतील सर्वपरिचित महावाक्य सांगतें :

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।

कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण फळ भोगण्यांत तुझा अधिकार नाही. कर्म करण्याचे कर्तव्य तू कर, पण अमूकच फळ मिळाले पाहिजे असा अट्टाहास करण्याचा तुझा अधिकार नाही. या महावाक्याचा अर्थ समजण्यात थोडी चूक होण्याचा संभव आहे. भगवंत असे सांगत नाहीत, की तू कर्म तर कर, पण फळाची कोणतीही आशा, अपेक्षा ठेवूच नको.

एकाद्यार्ने महिनाभर प्रामाणिकपणे मन लाऊन नोकरी केल्यावर, महिना अखेर तू पगाराची अपेक्षा ठेवू नकोस, पगार घेऊ नकोस असे सांगण्यासारखे हे होईल.

हमालाने स्टेशनात तुमचे सामान उचलून गाडींत ठेवल्यावर, जर तुम्ही त्याला सांगितलेत, की भगवद्गीतेत असे सांगितले आहे की सामान उचलून वाहाण्याची मेहनत करण्याचा तुझा अधिकार आहे त्याचे फळ (मजूरी) तू मागू नकोस, तो तुझा अधिकार नाही, तर तो तुम्हाला ठणकावून सांगेल की माझ्या मेहनतीचा योग्य मोबदला तुम्हाला दिलाच पाहिजे. गीतेचे ज्ञान तुम्ही तुमच्या जवळ ठेवा, मला माझी मजूरी द्या. कर्म केले की काहीना काही फळ मिळणारच, फळ दिल्याशिवाय कर्म शांत होणारच नाही.

म्हणजे वरील गीतावचनाचा स्पष्ट अर्थ असा कीं, कर्म करणे वा न करणे हा तुमचा अधिकार आहे, पण एकदा कर्म केलेत की जे फळ मिळेल ते तुम्हाला भोगलेंच पाहिजे. कर्म करणे, न करणे, कसे करणे, कसे न करणे, शुद्ध बुद्धिचा उपयोग करून त्यांत प्रवृत्त होणे अगर न होणे, या गोष्टी तुमच्या अधिकारांत आहेत, पण एकदा कर्म केल्यावर फळ न भोगण्यात तुम्ही स्वतंत्र नाही. म्हणजे जे फळ मिळेल (चांगले वा वाईट) ते तुम्हाला भोगलेच पाहिजे त्यांतून तुमची सुटका नाही, त्यातून कोणतीही पळवाट तुम्हाला काढतां येणार नाही.

उदा. समजा तुम्ही एखाद्या समारंभांत जेवावयास गेला असता जेवताना कोणते पदार्थ किती प्रमाणात खायचे, हे कर्म करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. बासुंदी बिलकूल सोसत नाही, पण तुम्ही बासुंदी अधिक आवडीने खात आहात, हे यजमानाच्या लक्षांत आल्यावर तो बासुंदी वाढून, अधिक घेण्याचा अगदीं प्रेमाने आग्रह करतो. आतां आपली पचनशक्ती लक्षांत घेऊन त्याच्या आग्रहाला बळी न पडण्याचा तुम्हाला अधिकार आहे. बासुंदी प्रमाणाबाहेर “न घेण्याचे कर्म” करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. परंतु आंतरिक वासनेला बळी पडून बासुंदी प्रमाणाबाहेर खाण्याचे कर्म तुम्ही एकदां केलेत (कीं जे न करण्याचाही तुमचा अधिकार होता), तर दुसऱ्या दिवशी पोट बिघडल्यावर तुमच्या कर्माची जी फळे येतील ती न भोगण्यात तुम्ही स्वतंत्र नाही  तुम्हाला ती भोगलीच पाहिजेत. –

आज येथेच थांबतो. या पुढील विवेचन आपण पुढील भागांत पाहू.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment