चित्रा नक्षत्र विचार


विषय : चित्रा नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण चित्रा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत. चित्रा हे नक्षत्र चक्रातील १४ वे क्रमांकाचे नक्षत्र असून त्याचा आकार नक्षत्राचा आकार मोत्यासारखा असून त्याचा एक ठळक व मोठा तारा आहे तारा हिरव्या रंगाचा असून अतिशय तेजस्वी आहे. आग्नेयेकडे उगवताना हे नक्षत्र  दिव्यासारखे चमकत असते. चैत्र महिन्यात हे नक्षत्र रात्रभर आकाशात दिसू शकते व हे नक्षत्र अतिशय ठळक, मोठे असल्याने आकाशात सहज ओळखता येते. या नक्षत्राला इंग्रजीत ‘स्पायका’ असे म्हणतात.

या नक्षत्राचे पहिले २  चरण कन्या राशीत व शेवटचे २ चरण तूळ राशीत येत असल्याने हे नक्षत्र द्विपाद आहे. नक्षत्राचा स्वामी मंगळ, दैवत त्वष्ठा हा देवांचा कारागीर असून राशी स्वामी बुध व शुक्र असून हे राक्षसगणी आहे म्हणून या नक्षत्रात मंगळाचा हट्टीपणा, कर्तृत्व, बुधाची अप्रतिम बुद्धिमत्ता व शुक्राचे सौंदर्य व कलाकौशल्य व त्वष्टाची उत्तम कामगिरी यांचा अपूर्व संगम दिसून येतो. तसेच ते तिर्यङ्मुख, मध्यलोचनी व मित्रगणी आहे.

चित्रा या शब्दाचा अर्थच चित्रासारखे एखादे चित्र जसे, बराच काळ सुंदर व जशास तसे दिसते तसे चित्राने म्हणजे चिरकाल तारुण्य देणारे, नेहमी टवटवीत दिसणारे. चित्रा नक्षत्रावरच्या आई व मुली सारख्याच दिसतात. वडील व मुलगा बरोबर फिरायला निघाले की लोक त्यांना ‘भाऊ-भाऊ’ किंवा वडिलांनाच मुलगा समजतात.

चित्रा नक्षत्र राक्षसगणी असून शुभ गुणधर्मानी भरलेले आहे. तसेच लक्ष्मीदायक आहे. चित्रा  नक्षत्रावर जन्मलेले जातक उग्र बुद्धीचे, सुंदर, विद्वान, कलाकौशल्याची व छानछोकीची आवड असणारे,  बुद्धिमान, चळवळ्या स्वभावाचे, धडपडे, शूर, धाडसी, कर्तृत्ववान पण थोडे रागीट, तामसी व हट्टी असतात. मात्र त्यांच्यात क्रूरपणा किंवा खुनशीपणा दिसून येत नाही. तसेच त्या सदाचारी, ईश्वरभक्त, परोपकारी, कुटुंबवत्सल, व्यवहारकुशल, सेवावृत्तीच्या, संसारी आणि तडफदार असतात. हे जातक  स्वकर्तृत्वाने पुढे येतात.

चित्राच्या पावसात मोती तयार होतात. म्हणून ते मोत्यांना व खड्यांना चांगले.

चित्रा पुरुष जातकांना हे नक्षत्र शरीरप्रकृती, कलाबुद्धी व सौंदर्यालाही अनुकूल आहे. पण अधिकारयोगासाठी साधारण आहे. चित्रा पुरुष जातकांचा बांधा उंच, सडपातळ, सडसडीत, हाडापेराने मजबूत, काटक व प्रमाणशीर असतो. हे जातक श्रम व कष्ट करणारे व सौंदर्यवान वस्तू ख्यालीखुशाली, चैन, कलाकौशल्य याचीसुद्धा आवड असणारे असतात व धन व सुख यात या रमणारे असतात.

चित्रा स्त्री जातकांना मात्र हे नक्षत्र फार चांगले आहे. स्त्रियांना रूप, सौदर्य कलाकौशल्य, बुद्धी, धन अशा सर्वच दृष्टीने उत्तम आहे. या सर्वच गोष्टीचा मिलाफ चित्रा नक्षत्रात दिसून येतो. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या स्त्रिया उंच पण सडपातळ बांध्याच्या प्रमाणशीर व रेखीव अवयव असणान्या, कंबरेच्या खालील भाग जरा उंच, कंबर बारीक, उभार, चेहरा, लावण्य असणारा, चमकदार, आकर्षक, मोहक, नाक सरळ व सुरेख काळेभोर डोळे, कमानशीर भुवया, व ओठ धनुष्याकृती, चेहरा अगदी मुसमुसणारा असतो. या नक्षत्रावरच्या स्त्रिया चिरकाल तरुण दिसणाऱ्या असतात. चित्रा स्त्री जातक हसताना असो, रागावलेली असो, उभी असो, बसलेली असो, लाजत असो किवा काम करत असो, तिच्या सौंदर्यात गोडवाच असतो. या नक्षत्रात फणकारा, तृप्तपणा, अवखळपणा, स्वप्नाळूपणा, लाजणे, ठसठशीतपणा, मादकपणा व तेजस्वीपणा या सर्वांचे अनोखे मिश्रण आढळून येते. या नक्षत्रावरच्या स्त्रियांना कधी शेपटे, कधी अंबाडा, कधी मोकळे केस, कधी गजरा तर कधी नुसतीच फुले यांची आवड असते. त्या फाजील फॅशनेबल नसल्या तरी थोडया नटून सजणाऱ्या असतात. दागिन्यांचा हव्यास नसला तरी मोत्याच्या माळा व खड्याच्या अंगठ्या प्रिय असतात. भरदार शालू किवा गडद अथवा मॅचिंग कपड्यापेक्षा त्यांना प्रिंटेड वायल्स अथवा पातळे जास्त आवडतात. विशेषत: निरनिराळ्या डिझाईनची व सताठ कडक राहणाऱ्या साड्यांची फार आवड असते. नेसणेही व्यवस्थित व आकर्षक असते.  सौंदर्यदृष्टी, चिकित्सक वृत्ती व निवड करण्याची वृत्ती अप्रतिम असते. त्या रसिक, हौशी, कलाप्रिय, आनंदी, सौंदर्यदृष्टीची आवड असणाऱ्या व विनयशील असल्या तरी रागीट, तामसी व थोड्या हट्टी असतात. त्या पटकन रागावतात व शांतही होतात. तसेच वेळप्रसंगी त्या धीट व धाडसीही बनतात. या स्त्रियांचे सौंदर्य हेच बऱ्याच वेळा त्यांच्या संकटाला कारण ठरू शकते. चित्रा नक्षत्रांच्या स्त्रियांचा आवडता छंद म्हणजे शॉपिंग होय. दोन-चार मैत्रिणींना घेऊन तीन-तीन, चार-चार तास शॉपिंग करणं यांना फार आवडते. प्रत्येक गोष्ट त्या अतिशय चिकित्सेने पहात असतात. एका साडीसाठी त्या संबंध दिवस व १५-२० दुकाने पालथी घालतील. तसेच त्या चित्रकला, नृत्य, रांगोळी. भरतकाम, शिल्पकाम, खोदकाम, कोरीव काम, कशिदा विणणे यातही पारंगत असतात. चंद्र व शुक्र या नक्षत्रात असता हे गुणधर्म विशेष आढळून येतात.

चित्रा नक्षत्राखाली येणारा वर्ग बराचसा सुखवस्तू व श्रीमंत असतो. विशेष करून कारागीरवर्ग जास्त आहे. सोनार, हिरेघासू, तांबा, पितळ अथवा इतर भांड्यांचे कारागीरी संबंधित, शिंपी, चित्रकार, पेंटर्स, शिल्पकार, सौंदर्यप्रसाधन तयार करणारे, सोने, चांदी, हिरे, माणके, रेशमी व उंची वस्त्रे यांचे व्यापारी, आर्किटेक्ट, इजिनिअर्स, शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर्स, डेकोरेटर्स, अत्तरे, फुले यांचे व्यापारी, पान्याचे व्यापारी, सुंदर व शोभेच्या वस्तू तयार करणारे, नाटक, सिनेमा यांना लागणारे पडदे व इतर वेशभूषा यांचे व्यापारी, चैनीच्या वस्तूंचे व्यापारी, सिनेमात करणारा वर्ग, स्त्रियांचे कपडे शिवणारे शिपी, कॉन्ट्रॅक्ट ई.

याखाली येतो.

चित्रा नक्षत्रात रवी शरीरप्रकृतीच्या दृष्टीने साधारण असतो. शरीर काटक व मजबूत असते. शारीरिक उर्जा उत्तम. बुद्धीने साधारण, अधिकार योगाला बरा.

चित्रा नक्षत्रात चंद्र नक्षत्रात अनुकूल असतो. बांधा गोंडस व प्रमाणशीर, चेहरा सुंदर, मोहक व मोठे डोळे बर्यापैकी बुद्धी, धीट, विनोदी व हुशार असतो. रूप, कला व धन प्राप्तीसाठी अनुकूल.

चित्रा नक्षत्रात मंगळ हे नक्षत्र स्वतःचेच असल्याने चांगला, बांधा उंच, सडपातळ, सडसडीत व काटक असतो. चेहरा सुंदर पण जरासा उग्र असतो. मंगळ आर्किटेक्ट, शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर्स, इंजिनिअर्स, यांत्रिक कलाकौशल्य यांना चांगला, पण रागीट, चैनी व कामासक्त प्रवृत्तीचा असू शकतो. बिघडला असता कामी, व्यसनी, व्यभिचारी, गर्विष्ठ व अस्थिर बुद्धीचा होतो.

चित्रा नक्षत्रात बुध फारसा अनुकूल नाही. बांधा मध्यम, चेहरा सुंदर, बुद्धी मध्यम असते. विनोदी, खुषमस्कऱ्या, आळशी व थोडा दुर्गुणी असतो. गणित व भूमितीला बरा.

चित्रा नक्षत्रात गुरु रूप व धन चांगले देतो. शरीर साधारण भरलेले, सशक्त, बुद्धी मध्यम, पण श्रीमंत व्यापारी, सोनार यांना अनुकूल असतो.

चित्रा नक्षत्रात शुक्र अनुकूल ठरतो. रूप, कला, धन या सर्वच दृष्टीने चांगला असतो. शरीर प्रमाणशीर, सुडौल, रेखीव अवयव, सुंदर आकर्षक व मोहक चेहरा असतो. तो टेक्स्टाईल इंजिनिअर, आर्किटेक्ट, गायन, वादन, नृत्य, कलाकौशल्याची कामे व उंची वस्त्रे, हिरे, माणके, सोने व सौंदर्यप्रसाधने यांच्या व्यापाराला चांगला, धन चांगले मिळते. वाहनसौख्य मिळते.

चित्रा नक्षत्रात शनि प्रतिकूल ठरतो. शरीरप्रकृती बरी, बुद्धी व रूपाने मध्यम, मात्र धनाच्या दृष्टीने उत्तम. कापड, धान्य, कापूस कारखाने, कॉन्ट्रॅक्टर व सर्व वस्तूंच्या घाऊक व्यापाराला चांगला, मात्र जरा कंजूष, लोभी व संशयी असतो.

चित्रा नक्षत्रात राहु अनुकूल ठरतो. बांधा उंच प्रमाणशीर, रेखीव ऐटबाज व डोळ्यात एक प्रकारचा मोहकपणा किंवा जादू आढळते. राहू हा आर्किटेक्ट, फोटोग्राफी, पेंटिंग, ड्रॉइंग, हस्तकला कौशल्य, जादूची विद्या यांना चांगला. मात्र हे जातक चैनी, विलासी, रंगेल, व्यसनी असू शकतात, धन मात्र चांगले मिळते.

चित्रा नक्षत्रात केतू फारसा चांगला नाही. शरीरप्रकृती बरी असली तरी बांधा जरा अप्रमाणबद्ध असतो. धन असूनही विरक्त, अरसिक, आळशी व राहणाऱ्या असतात. मात्र शस्त्रक्रियेला चांगला.

चित्रा नक्षत्रात हर्षल बुद्धीला व शरीरप्रकृतीसाठी बरा असला, तरी बांधा जरा अप्रमाणबद्ध असतो. धन असूनही जातक अरसिक, आळशी व गबाळा राहणारा असू शकतो. शस्त्रक्रियेला चांगला असतो.  कल्पनाशक्ती, संशोधनवृत्ती व यांत्रिक, कलांना ठीक. इंजिनिअरिंग, मोठमोठे व्यापारी, कारखानदार यांना चांगला. पण अतिफॅशन, विलास, चैन व ख्याली- खुशालीची आवड असते. रंगेलपणा जास्त असतो. चित्रा नक्षत्रात नेपच्यून, शरीरप्रकृती व रूप यांना बरा. बांधा प्रमाणशीर, गोंडस व चेहरा सुंदर, तेजस्वी, मोहक व प्रसन्न दिसतो. तो तंतुवाद्य, संगीत, कल्पनाशक्ती, प्रतिभाशक्ती, अंतःस्फूर्ती यांना अनुकूल असतो, मात्र विलासीपणा दिसून येतो. या जातकांना गूढविद्येची आवड असू शकते.

चित्रा नक्षत्रावर होणारे आजार मोठे नसले तरी दाहक असू शकतात. अतिउष्णतेने डोके दुखणे, डोळे जळजळणे, ताप, कंबर दुखणे, कापणे, भाजणे, खरचटणे, शस्त्रक्रियेच्या जखमा, स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास होणे किंवा लघवीचे विकार, मूतखडा, किडनीचे विकार, व्यसनामुळे होणारे रोग, कावीळ, डोळयाचे विकार हे प्रमुख होत. मंगळ अशुभ योगात असता ऑपरेशनने अपघात, चिघळणार्या जखमा संभवतात.

चित्रा नक्षत्रावर जन्मणाऱ्यांचे हस्ताक्षर मोठे, ठळक व उभट व रेखीव असते. वळण छान असते. लिहिताना सरळ व वरवर लिहितात. नक्षत्रावर ६ व ९ या अंकाचे वर्चस्व जास्त असते. ६ अंक भाग्यांक वाटतो. शुक्राचा हिरा किंवा बुधाचा पाचू लाभदायक असतो. मध्यलोचनी नक्षत्र असल्याने वस्तू हरवल्यास ती बऱ्याच प्रयत्नांनी वस्तू पश्चिमेला शोधाशोध केल्यावरच मिळते.

चित्रा हे राक्षसगणी नक्षत्र असले तरी मुहूर्त शास्त्रात यांचे महत्त्व जास्त आहे. या नक्षत्रावर नवीन अलंकार व वस्त्र घेणे, धारण करणे, नृत्य, कला, संगीत शिकण्यास प्रारंभ करणे, विद्याभ्यासास आरंभ करणे, औषधे घेणे, औषधी झाडे लावणे, विहिरी खणणे, शस्त्रक्रिया करणे, जनावरे घेणे व देणे, गलबत पाण्यात लोटणे, जमीन नांगरणे तसेच जावळ काढणे, बारसे, मुलाचे नाक, कान, टोचणे, मौंजी, वधू प्रवेश, घर बांधणे, फळे व फुले यांचे वृक्ष लावणे यांना चांगले. नारदमते हे नक्षत्र विवाहालाही अनुकूल आहे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment