
विषय : श्री गणपती उवाच
लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : स्वलिखित व आजपर्यंतच्या वाचन, चिंतनाचा परिपाक
जय गणपती गुणपती गज वदना, आज तुझी पूजा केली गौरी नंदना…
गणपतीचे नुसते स्मरण होताच एक अनामिक ऊर्जा अंगात संचारते. कारण कामास सुरुवात करायची तर त्यालाच म्हणतात, चला कामाचा श्री गणेशा करू या. कोणतेही हिंदू घर पहा, दरवाज्यावर तुम्हाला गणपतीचे रूप दिसणारच. व्यावसायिक त्यांच्या चोपडीवर श्री गणेशाय नम: लिहूनच सुरुवात करणार.
कारण तो विघ्नहर्ता बाप्पा जो भक्तांना येणाऱ्या अडचणींचे, विघ्नांचे हरण करतो, मग ते मानव असो वा देव, सगळ्यांच्या आर्ततेला साद देणारा गजानन. ज्या लोकांवर गणेशाची कृपा राहते, त्यांची मनोकामना पूर्ण होते. जे काम ते हाती घेतात ते निर्विघ्न पार पडते. श्रीगणेशाची विशेष कृपा असल्याने याना बुद्धी आणि कौशल्य उपजतच लाभते.
गणेश म्हणजे गणांचा ईश किंवा गणपती म्हणजे गणांचा पती. गण म्हणजे समूह, गण म्हणजे क्रमांक, गण म्हणजे शब्द ब्रम्ह. गणना, गणित हे शब्द याचीच व्युत्पत्ती. गणिताचा कारक ग्रह बुध, तसाच बुद्धीनायक गणपती. गणपती म्हणजे बुद्धी, वाणी, संपर्क यांचा नायक. त्यामुळे जे लोक बुद्धिनिष्ठ नोकरी व्यवसाय करतात. त्यांनी मनापासून गणपतीची उपासना करावी.
उदा. सी ए, सी एस, माहिती तंत्रज्ञान, मार्केटिंग, शिक्षक, प्रोफेसर, कर सल्लागार, लेखक, पत्रकार, कॅशियर, संपादक, ज्योतिषी, अकाऊंटंट, कॉपी रायटर, दुभाषी, प्रिंटींग, गणिती, जनसंपर्क अधिकारी, ग्रंथ, टेलीफोन, संगणक, रेडीओ, टी.व्ही., जाहीराती, श्रवणयंत्रे ई.
गुणपती म्हणजे गुणांचा पती. यात अनेक विद्या, तांत्रिक, वेगवेगळ्या कला, संगीत, नृत्य, कविता ई. येतात. कारण हा गौरी नंदन म्हणजे गौरीचा पुत्र आहे. आदिशक्ती ऊर्जा, प्रेम, सौंदर्य, मातृत्वाची देवी आहे. जी निर्मिती आणि संहार यांचे शक्ती रूप आहे. तिचीच लक्ष्मी, पार्वती, सरस्वती ही त्रिगुणात्मक रूपे आहेत. मग तिच्या मातृ भक्त पुत्रात हे सर्व गुण असणे साहजिक आहे. त्यामुळे कलेच्या प्रांतातील लोकांनी सुद्धा गणेशाची उपासना केली तर श्री कृपेने सर्व समृद्धी येईल, कारण मंगल (मंगळ) मूर्ती तुम्हाला त्यासाठी योग्य ते कौशल्य व धाडस सुद्धा प्रदान करेल.
केतू हा मोक्षकारक ग्रह गणपतीच्या अधिकारात येतो. त्यामुळे गणपतीच्या कृपेने वैदिक उपासक अहंकार, काळ, परिस्थिती याचे पलीकडे जाऊन अध्यात्मिकते द्वारे आत्मज्ञान प्राप्त करू शकतात. व त्याचेसाठी मोक्षाचे दरवाजे उघडू शकतात.
गणेश हा एकमेव देव आहे, जो ज्योतिषशास्त्रातील बुध आणि केतू या दोन भिन्न गुणाधर्मी ग्रहांचा अधिपती आहे.
गणेश पुराणानुसार रिद्धी आणि सिद्धी या ब्रह्मदेवाच्या कन्या, तर शिवपुराणानुसार त्या विश्वरूप प्रजापतीच्या कन्या. शंकर आणि पार्वती गणेशाचा विवाह योजणार आहेत, असे कळल्यावर विश्वरूप प्रजापतीने आपल्या दोन सुंदर कन्या गणेशास देण्याचा मानस बोलून दाखवला. त्यानुसार त्यांचे गणपतीशी लग्न झाले. सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ असे दोन पुत्र गणपतीस झाले.
गणपतीचे रूप सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी सांगत असते.
गणपतीचे हत्तीचे डोके आपल्याला बुद्धीनायक असूनही हत्तीसारखे अफाट सामर्थ्य दर्शवते.
सुपासारखे मोठे कान आपल्याला हे तर सुचवत नसतील, की जगात चौफेर ध्यान असू द्यात. कान इतके मोठे करा की, सूक्ष्मातील सूक्ष्म बदल देखील कानांनी टिपला पाहिजे आणि सूप जसे खडे बाजूला करते, तसे सकारात्मक गोष्टी आत्मसात करून, नकारात्मक गोष्टी खड्या सारख्या बाजूला सारा.
गणपतीचे सुंदर डोळे आपल्याला सतत सांगतात की, बुद्धी तीक्ष्ण करून सर्व कला, विद्या, साहस, सौंदर्य संपादन केले की, त्याचे विलक्षण प्रभावाने, तूमच्या तेजस्वीपणाची झांक पहिली डोळ्यात चमकते.
गणपतीची वक्र सोंड आपल्याला योगी होण्यास सांगते. आपल्या शरीरात वेटोळ्या सर्पाकृती आकारात वसलेली कुंडलिनी शक्ती जागृत करून केतुरुपी मोक्षाची वाट बुध रुपी बुद्धीने स्विकारा आणि आयुष्य सार्थकी लावा. मी येणाऱ्या सर्व विघ्नांचे हरण करेन.
लंबोदर मला अवघ्या विश्वाच्या पसार्याची व खोल बेंबी या विश्वातील अनेक अगम्य, गूढ गोष्टींची, कृष्ण विवराची आठवण करून देते.
त्याचे चार हात मला चार पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे कर्तव्य बुद्धीने जगायला प्रेरणा देतात.
शिव आणि शक्तीचा पुत्र गणेश हा एक अद्वैत रूपच आह्रे. म्हणूनच कदाचित मला ओम बघितला की त्यात गणपतीचे रूप भासते.
अशा या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचा उत्सव सुरु होत आहे. त्यानेच कदाचित माझ्यासारख्या अल्पबुद्धी ज्योतिष अभ्यासकाला लिहिण्याची स्फूर्ती दिली आणि आजपर्यंतच्या वाचनाचा परिपाक म्हणून हे लिखाण एका टप्प्यात झरझर उतरले. तरी जर अनावधानाने काही चुकीचे लिहिले असल्यास क्षमस्व.
!!! गणपती बाप्पा ….. मोरया !!!
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)