हस्त नक्षत्र विचार


विषय : हस्त नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण हस्त नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत. हस्त हे नक्षत्र चक्रातील १३ वे क्रमांकाचे नक्षत्र असून त्याचा आकार नावाप्रमाणेच हाताच्या उघडलेल्या पंजासारखा दिसतो. या नक्षत्राचे ४ ही चरण कन्या राशीत येत असल्यामुळे ते चतुष्पादी नक्षत्र आहे. हस्त नक्षत्राचा स्वामी चंद्र, दैवत सूर्य व राशी स्वामी बुध आहे. हे नक्षत्र देवगणी आहे. या नक्षत्रात चंद्राचे वात्सल्य, प्रेम, रवीची उच्च अभिरुची व सात्विक आचारविचार, बुधाचा व्यावहारिकपणा व शहाणपण यांचा सुंदर मिलाफ आढळून येतो. या नक्षत्राच्या ४ चरणावर अनुक्रमे मंगळ, शुक्र, बुध व चंद्र या चार ग्रहांची सत्ता आहे. तसेच नक्षत्र तीर्यङ्मुख, लघु व मंदलोचनी आहे. हस्त नक्षत्रात एकूण ५ तारे असून ते हाताच्या बोटासारखे दिसतात. तारे पांढऱ्या रंगाचे, स्वच्छ व मध्यम प्रतीच्या तेजाचे आहेत. तारे सुरेख, मोहक व पावसाच्या टपोऱ्या थेंबासारखे दिसतात. चैत्र महिन्यात हे नक्षत्र रात्रभर आकाशात दिसू शकते. आकाशात हे नक्षत्र सहज ओळखता येते. हस्त नक्षत्राचे इंग्रजी नाव ‘डेल्टाकाव्हीं’ असे आहे. कीर्व्हास याचा अर्थ कावळा असा आहे. आपण ज्याला कावळा असे म्हणतो, तो सूर्यदेव अपोलो याचा लाडका होता. परंतु एक त्याने गैरवर्तणूक केली म्हणून त्याला पाणी पिता येणार नाही असा त्याने शाप दिला. तसेच जलप्रलयानंतर नोहाने आपल्या नौकेमध्ये आणलेला कावळा तोच अशा आशयाच्या पाश्चात्य साहित्यात कथा आहेत. भारतीय पुराणात मात्र हे नक्षत्र प्रजापतीच्या उजव्या हाताचा पंजा असेही समजतात.

हस्त नक्षत्र देवगणी असून ते शुभ गुणधर्म युक्त, सत्त्वगुणी आणि सुशील आहे. तसेच ते लक्ष्मीदायक व देवनक्षत्र आहे. या नक्षत्रावर जन्मणारे जातक सुंदर, कलाकुशल, विद्वान, बुद्धिवान, व्यवहारकुशल, आनंदी, सदाचारी, ईश्वरभक्त, समाधानी, संतोषीवृत्तीचे, परोपकारी, कुटुंबवत्सल, सत्यभाषणी, नम्र, विनयशील, सेवावृत्तीचे, आज्ञापालन करणारे, निर्व्यसनी आढळून येतात. हस्त नक्षत्रात शुभग्रह असल्यास त्यांना सुपारीचेही व्यसन नसते. शिवाय हे जातक रसिक, हौशी, कलाप्रिय व सौंदर्याचे भोक्ते असतात. मात्र हे जातक थोरामोठ्याच्या सहकार्यानेच या पुढे येतात.

हस्ताच्या पावसामध्ये जणू काही वसुंधरेने हिरवा शालूच नेसलेला आहे अशी सर्व जमीन हिरवीगार दिसते.

हस्त पुरुष जातकांना हे नक्षत्र सौंदर्य, बुद्धी व शरीरप्रकृतीला ठीक आहे. हस्त नक्षत्रावर जन्मणाऱ्या पुरुष जाताकांचा बांधा मध्यम उंच, प्रमाणशीर व जरा नाजूक असतो. शारीरिक ऊर्जा व रोगप्रतिकारशक्ती मध्यम असते. हे जातक बुद्धिवान व कलाकार असतात, पण अधिकारयोगाच्या दृष्टीने हे मध्यम नक्षत्र आहे. पुरुषांना लागणारे शौर्य, पराक्रम, धाडस, शूरपणा किंवा अधिकारलालसा हे गुण त्यांच्यात साधारण असतात.

हस्त नक्षत्राच्या स्त्री जातकांना हे नक्षत्र शरीर, सौंदर्य, बुद्धी, कला व गुण यांना फार अनुकूल असते. हस्त नक्षत्रावरच्या स्त्रिया या जणू बालकुमारीकाच असतात. प्रौढ वयातही या मुलींसारख्या तरुण दिसतात. त्यांचा बांधा मध्यम उंच, प्रमाणशीर, नीटनेटका व व्यवस्थित असतो. हातपाय, मांड्या, मनगटे, दंड यांचे आकार मध्यम गोलाकार असतात. चेहरा गोल पण फार फुगीर नसून शरीराला शोभेल एवढाच गोल असतो. डोक्यात बरोबर मध्ये भांग पाडायची सवय असते. अवयव फार मांसल किंवा गुबगुबीत नसून प्रमाणशीर व रेखीव असतात. चालणे जरा गजगतीसारखे असते. चेहरा सुंदर, आकर्षक व मोहक असतो व सात्विक तेज असते. त्यांचे दात फार सुंदर असतात. दात दुधासारखे पांढरे स्वच्छ असून पुढील दोन तीन दात जरा मोठे, पांढरे स्वच्छ व सरळ रेषेत असतात. त्या हसताना हे पुढील दात ठळकपणे दिसतात. त्यांचे हसणे साधे, स्मितहास्यही अत्यंत मोहक असते. हस्त स्त्री जातकांचे सौंदर्य त्यांच्या लाजण्यामध्ये आहे. शुभ स्थिती मध्ये असता त्यांना भडक रंगाचे कपडे किंवा फाजील फॅशन प्रिय नसून पांढरा, पिवळा, हिरवा, निळा अशा गढूळ रंगाची व मॅचिंग कलर्स प्रिय असतात. फुलांचे बरेच वेड असते. दागिन्यांचा फारसा हव्यास नसतो. मात्र स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा व व्यवस्थितपणा फार असतो. हस्त नक्षत्र स्त्रिया हस्तकौशल्यात विशेषतः भरतकाम, रांगोळी, कशिदा, विणणे, स्वयंपाक, पेंटिंग, चित्रकला यात फार हुशार, संसाराची फार आवड असणाऱ्या आढळतात. संसाराला अशी पत्नी मिळणे म्हणजे महाभाग्यच.

हस्त नक्षत्राखाली येणारा वर्ग बहुधा समाजातील घरंदाज व प्रतिष्ठित असा मध्यमवर्गच होय. या नक्षत्राखाली डॉक्टर्स, वकील, अॅडव्होकेटस्, शिक्षक, प्रोफेसर्स, बँका, पतपेढ्या किंवा निरनिराळ्या खाजगी कंपन्यात हिशेबी खात्यात काम करणारा वर्ग, आर्किटेक्ट, चित्रकार, कलाकार, लेखक, कवी, निरनिराळ्या वस्तूंचे किरकोळ व्यापार करणारे व्यापारी, पुस्तक विक्रेते, फिरते एजंट, जाहिरातदार, छपाई खात्यात काम करणारा वर्ग, लहान लहान शेतकरी, बातमीदार, वर्तमात्रपत्रात काम करणारे संपादक, काही वेळा नाटकात कामे करणारा वर्ग, शिंपी, कलाकार या व्यक्ती प्रामुख्याने होत. नर्स व गृहिणीही या खाली येतात.

हस्त नक्षत्री रवी असता शरीर प्रकृतीच्या दृष्टीने मध्यम असतो. हे जातक मध्यम बांध्याचे व काटक असतात,तसेच शांत, नम्र, ईश्वरीभक्ती करणारे, देव ब्राम्हणांचे पूजक, मध्यम विद्वान, गुणी असतात. विद्या व धनाच्या दृष्टीने रवि मध्यम असतो.

हस्त नक्षत्री चंद्र बुद्धी, विद्या, सौंदर्य व गुण याच दृष्टीने अनुकूल असतो. बांधा मध्यम, उंच भरलेला, जरा पुष्ट पण प्रमाणशीर असतो. चेहरा सुंदर व मोहक असतो. हे जातक बुद्धीमान व कलाकार असतात. चंद्र असता बुद्धी व कला, विद्या व सौंदर्य यांचा सुरेख संगम दिसून येतो. स्वभावही प्रसन्न, शांत, हौशी, रसिक व आनंदी असतो. धनाच्या दृष्टीने चंद्र मध्यम असतो.

हस्त नक्षत्री मंगळ असता शरीरप्रकृती सडसडीत असते. बांधा उंच, सडपातळ व काटक असतो. चेहरा जरा उग्र असतो. स्वभावही थोडा करारी, स्पष्टवक्ता व मानी असतो. मात्र तरीही हे जातक रसिक, हौशी व लोकप्रिय असतात. हस्त नक्षत्री मंगळ आर्किटेक्ट, ड्रॉइंग, डॉक्टर या विद्येला अनुकूल व  स्वतंत्र व्यवसाय करण्यास चांगला.

हस्त नक्षत्री बुध हा शरीरसंपत्ती, बुद्धी व धनाच्या दृष्टीने चांगला. बांधा मध्यमव थोडा आडवा, अवयव गोलाकार व फुगीर असतात. बुद्धी कुशाग्र असून लेखन, वाचनाची आवड असते. बुध कोणत्याही वस्तूंच्या किरकोळ व्यापाराला चांगला. तसेच तो जाहिरातदार, बातमीदार, फिरते एजंट, विक्रेते यांना चांगला.

हस्त नक्षत्री गुरु सौंदर्य व बुद्धीच्या दृष्टीने चांगला. नाजूक पण उंच बांधा, चेहरा सुंदर, आकर्षक व सात्विक तेजाचा असतो. बुद्धी कुशाग्र असते. हे जातक अतिशय बुद्धीवान व विद्वान असतात. गुरु अर्थी, वाणिज्य, कायदा अशा विषयांना चांगला असतो. हस्त जातक उत्तम शिक्षक किंवा प्रोफेसर्स होऊ शकतात. स्वभावाने हे जातक उत्तम समाजसेवक असतात. स्वभाव नम्र, निगवीं, ममताळू व उदार असतो.

हस्त नक्षत्री शुक्र हा सौंदर्य व कलेच्या दृष्टीने अनुकूल असतो. बांधा मध्यम उंच, प्रमाणशीर व रेखीव अवयव असणारा असतो. चेहरा मोहक, आकर्षक व जरा मादक असतो. शुक्र बरीच वर्षे यौवनावस्था देतो. शुक्र संगीत, नृत्य, हस्तकला, कौशल्य, पेंटिंग, ड्रॉईंग, आर्किटेक्ट, नाटक-सिनेमा कलाकार यांना चांगला असतो. मात्र पैसा व दर्जाच्या दृष्टीने मध्यमच असतो.

हस्त नक्षत्री शनी असता शरीरप्रकृती उत्तम असते. बांधा पुष्ट, भरलेला, गोलाकार अवयव पण जरा शिथिलपणा असतो. चेहरा सावळा, गंभीर पण नाकी डोळी बरा. शनि बुद्धीला चांगला. स्थापत्यशास्त्र व कायदेशास्त्र, वाणिज्यशास्त्र यांना फार चांगला. पण त्यापेक्षा व्यापाराला फार उत्तम. कापूस, तेलबिया, धान्ये, किराणा माल, कागद अशा वस्तूंचा व्यापार चांगला चालेल. धन चांगले मिळेल.

हस्त नक्षत्री राहू रूप, कला बुद्धीला चांगला. बांधा सडसडीत, उंची बांधेसूद, आकर्षक, रेखीव असतो. चेहरा मोहक व डोळ्यांत एक प्रकारची जादू असते. बुद्धी प्रकर्ष व उत्तम स्मरणशक्ती असते. पेंटिंग, डिझाईन, ड्रॉईंग, आर्किटेक्ट, संशोधन व यांत्रिक कामासंबंधीत कला, फोटोग्राफी, सिनेमा-नाटकात काम करणे यांना चांगला.

हस्त नक्षत्री केतू हा शरीरप्रकृतीला साधारण, पण बुद्धीच्या दृष्टीने मध्यम. कला वगैरेत यश नाही. थोडा धार्मिक व आध्यात्मिक प्रकृतीकडे कल.

हस्त नक्षत्री हर्षल शरीरप्रकृतीला बरा व बुद्धीलाही चांगला. उंच व रेखीव बांधा. चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज असते. तसेच हे जातक बुद्धिमान, हुशार, संशोधक वृत्तीचे व विद्वान असतात. स्वभाव फारसा लहरी किंवा विक्षिप्तपणा नसतो.

हस्त नक्षत्री नेपच्यून असता शरीरप्रकृती साधारण. चेहरा सुंदर, मोहक, प्रसन्न आनंदी व संतोषी असतो. ज्ञानमार्ग, भक्तीमार्ग, अंतःस्फूर्ती, काव्य, गायन कल्पनाशक्ती चांगली असते. वादन यांना चांगला.

हस्त नक्षत्री होणारे आजार फारसे दाहक नसले तरी बराच काळ टिकणारे आढळतात. थंडी, कफ, डोके दुखणे, अर्धशिशी, ओकाऱ्या, पोटात मळमळणे, अपचन, आतड्याचे विकार, पचनशक्ती बिघडणे, चक्कर, भोवळ येणे, कंबर दुखणे, मानसिक विकार, नैराश्य, उतारवयात रक्तदाबाचे विकार, शौचाची तक्रार असणे. अतिश्रमाने ग्लानी येणे हे आजार दिसतात. या जातकांना उगाचच औषधे व रेचके घेण्याची फार सवय असते.

या नक्षत्रावर जन्मणाऱ्यांचे हस्ताक्षर मोठे, मध्यम गोल, वळणदार व जास्त रुंद असते. ओळी सरळ व व्यवस्थित असतात. लिहिताना सहजगत्या लिहितात. नक्षत्रावर २ किंवा ५ अंकाचा प्रभाव आढळतो. २ अंक जास्त भाग्यकारक वाटतो. चंद्राचा मोती अथवा बुधाचा पाचू लाभदायक आहे. नक्षत्र मंदलोचनी असल्याने वस्तू हरवल्यास ती थोड्याशा प्रयत्नाने मिळू शकते व वस्तू दक्षिण दिशेला गेलेली असेल.

मुहूर्त शास्त्रात हस्त नक्षत्राला फार महत्त्व आहे. शुभ देवगणी व सत्वगुणी असल्याने मौजी, विवाह, बारसे, ई. साठी चांगले. तसेच या नक्षत्रावर बी पेरणे, नांगर धरणे, जनावरे घेणे, नाव, जहाज, गलबत चालू करणे, प्रयाण, नवीन दुकान चालू करणे, अलंकार किंवा वस्त्रभूषणे धारण करणे, विद्यारंभ, शिल्पकाम, औषध घेणे किंवा औषधी वृक्ष लावणे, बालकाचे कान टोचणे, अन्नप्राशन, गृहारंभ, वास्तुशांती, विहिर खणणे, राज्याभिषेक, संगीत, नृत्यादी कला शिकणे यांना फारच चांगले. कोणत्याही शुभकार्यास हे नक्षत्र चांगले आहे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment