
विषय : कर्म सिद्धांत (भाग १)
संकलक व स्वैर अनुवाद : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : THEORY OF KARMA (श्री हीराभाई ठक्कर)
नमस्कार,
आज आपण कर्म सिद्धांत या विषयाची क्रमश: व थोडक्यात माहिती घेणार आहोत.भगवान श्रीकृष्णानी भगवद्गीतेत सांगितले आहे की, “गहनो कर्मणो गति” कर्माची गति फार गहन आहे.
श्रीकृष्णांचा मित्र भक्त सुदामा कर्माच्या गहनतेचे वर्णन करताना म्हणतो की,
आम्ही दोघे एकाच गुरुचे शिष्य ॥ श्रीकृष्ण झाला पृथ्वीपति । माझ्या घरांत खायला नाही माती ॥ गोकुळांत त्याने केल्या अलौकिक लीला । माझ्या बरोबर गुरुगृही आणितसे समिधा ॥आज तो बसला आहे सिंहासनावर । माझ्या हाती मात्र एकतारी नि चिपळ्या ॥
मनुष्य जन्म एकंदरीतच गूढ आणि गुंतागुंतीचा आहे. इथे प्रत्येकाची कर्मगती वेगवेगळी. एक माणूस दुःखी, तर दुसरा सुखी असें कां ? आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जगांत जे लोक लांडया-लबाडया, काळा बाजार, लांचलुचपत असा अनीतीचा मार्ग बिन-दिक्कत स्विकारतात, ते सुखाने जगताना दिसतात. त्यांचे जवळ बंगला, मोटारी, इत्यादि चैनीच्या वस्तू असतात, त्यांचे जवळ लाखो रुपये असतात व मौज-मजा करताना दिसतात. पण याउलट, जे लोक सदाचारी, पापभीरु, प्रामाणिक पणे आयुष्य जगात आहेत, त्यांच्या आयुष्यात दु:खाचे भोग वाट्यास आलेले दिसतात. असे का ?, हा प्रश्न कधी ना कधी सर्वांनाच पडत असतो. जगांत असा विरोधाभास पाहिला, की देवावरची आपली श्रद्धा डळमळू लागते, वाटू लागते की ईश्वराच्या राज्यांत काही न्याय-नीती आहे का? का सर्व अंधेर नगरीच आहे ? परमेश्वराचे राज्यांत सर्वत्र अंधार भासू लागतो…
पण वस्तुस्थिती अशी आहे कीं ईश्वरी राज्यांत अंधारही नाही व अन्यायही नाही. ही गोष्ट योग्य रीतीने लक्षांत यावयास, कर्म फळ नियमांचा अभ्यास करण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
कर्माचा अटळ सिद्धांत :
आपण पाहतो की, राज्य कारभार व्यवस्थित चालविण्यासाठी प्रत्येक सरकारी खात्यांत काही नियम केलेले असतात. पोलीस खात्यासाठी त्यांचे काही नियम (मॅन्युअल) ठरवलेले असतात. पी.डबल्यू.डी. साठीं, त्या खात्याचे काही नियम असतात. न्याय खाते चालविण्यासाठी इंडियन पीनल कोड, व अन्य अनेक कायदे आहेत. त्याच प्रमाणे रेल्वे, रेव्हिन्यू इत्यादि खात्यांचेही खातेनिहाय काही नियम केलेले असतात.
याचप्रमाणे अखिल सृष्टि व ब्रह्मांडाचे संचलन व्यवस्थित राहाण्यासाठी, सूर्य नियमित उगवतो व मावळतो, पृथ्वी, ग्रह, नक्षत्रे याना पण ठराविक गति असते. ठराविक वेळी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू सुरु होतात व संपतात. या सर्व गोष्टी योग्यवेळी घडून विश्वाचा कारभार व्यवस्थित चालण्यासाठी निसर्गाचे काही नियम आहेत आणि यालाच कर्माचा कायदा म्हणतात.हे सर्व विश्व “कर्म-कायदाच्या” आधाराने व्यवस्थित चालते, आणि त्यांत कधीही घोटाळा होत नाही. या कर्म-कायद्दाचे एक खास असें वैशिष्ठय आहे. जगातील मानव निर्मित कायद्यांत, कांहीना काही अपवाद, पळवाट वगैरे असतात. पण या परमेश्वर निर्मित “कर्म नियमांत” (कायद्यांत) कोठेही, किंचितही अपवाद अथवा पळवाटा नाहीत.
राजा दशरथ हा प्रत्यक्ष भगवान रामचंद्राचा पिता, पण त्यालाही या कर्मसिद्धांतानुसार, पुत्र विरहामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले. प्रभू रामचंद्र असे म्हणू शकले नाहीत की, राजे दशरथ माझे वडील असल्यामुळें, कर्म कायद्यांत थोडी सूट देऊन, मी वनवासांतून चौदा वर्षांनी परत येईपर्यंत त्यांचा मृत्यू थोडा पूढे ढकलण्यांत यावा. निर्गुण-निराकार, शुद्ध ब्रह्म पण जेव्हा सगुण-साकार बनून देह धारण करुन, रामचंद्र रुपाने या भूतलावर अवतरित होते, तेव्हां त्यालाही, या कर्म-कायद्याचें (सिद्धांताचे) तंतोतंत पालन करावेच लागते. कर्माचे कायद्यांत कोठेही विलंब नाही की पळवाट नाही.
कर्म म्हणजे काय ? कर्म कशाला म्हणतात ?
आपण जे जे काम (क्रिया) करतो, त्याला ‘ कर्म’ म्हणतात. उदाहरणार्थ खाणे, पिणे, स्नान करणे, धुणे, चालणे, बोलणे, उभे राहाणे बसणे, नोकरी-व्यवसाय करणे, झोपणे जागणे, पाहणे, ऐकणे, न ऐकणे, वास घेणे- वास न घेणे, स्पर्श करणे श्वासोच्छ् वास करणे, जन्मणे, जगणे, मरणे, इत्यादि सर्व शारिरीक व मानसिक क्रिया, या सर्व गोष्टी कर्मामध्ये मोडतात.
या प्रकारच्या सर्व कमांचे मुख्यतः तीन भाग करता येतातः(१) क्रियमाण कर्म, (२) संचित कर्म, (३) प्रारब्ध कर्म.
(१) क्रियमाण कर्म :
आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी काही कर्मे करतो, त्यां सर्वांचा “क्रियमाण कर्मात समावेश होतो. सकाळ पासून रात्री पर्यंत, सोमवार पासून रविवार पर्यंत पाहिल्या तारखे पासून शेवटच्या तारखेपर्यंत, चैत्रापासून, फाल्गुनापर्यंत, जन्मापासून मृत्यूपर्यंत, आपण जीं जीं कर्मे (क्रिया) करतो, त्यां सर्वाना, क्रियमाण कर्म म्हणतात.ही सर्व कर्मे केल्यावर, तीं करणारयाला फळ देऊनच शांत होतात. फळ दिल्याविना ती शांत होत नाहीत. क्रियमाण कर्मात त्या कर्माचे फळ भोगूनच सूटका होते.
उदा. : आपण तहान लागल्यावर पाणी पितो पाणी पिण्याचे ‘कर्म’ केले. तहान भागली म्हणजे पाणी पिण्याचे ‘कर्म’ त्याचे फळ त्वरित देऊन शांत झाले. आपल्याला भूक लागली खाण्याचे ‘कर्म’ केले, आपली भूक शमवून, इष्ट फळ देऊन, ते शांत झाले. आपण स्नान करण्याचे ‘कर्म’ केले, शरीर स्वच्छ झाले कर्म आपले फळ देऊन शांत झाले. आपण कोणाला शिव्या देण्याचे कर्म केले, त्याने आपल्या थोबाडीत मारली आणि आपल्याला कर्माचे फळ देऊन ‘कर्म’ शांत झाले.अशा प्रकारे प्रत्येक क्रियमाण कर्म फलद्रूप होतेच, व फळ भोगूनच आपल्याला त्यापासून मुक्ति मिळते.
(२) संचित कर्म :
कित्येक क्रियमाण कर्मे अशी असतात कीं, ती तत्काळ फळ देत नाहीत. त्यांचे फळ मिळण्यास काळ मध्ये जातो. त्या कर्माचे फळ पक्व होण्यास थोडाफार कालावधि लागतो, तोवर तीं कच्च्या स्वरूपात राहतात आणि जोपर्यंत फळ मिळत नाही, तोवर तीं जणू शिल्लक राहातात, संचित होऊन राहातात. अशा फळ न दिलेल्या कर्मानाच “संचित कर्म” म्हणतात.
ऊदा. तुम्ही आज परिक्षेचा पेपर लिहिलात, तरी फळ स्वरूप असा त्याचा परिणाम (Result) मिळण्यास काही कालावधि जावा लागतो.
तुम्ही कोणाला शिवीगाळ, मारहाण करून पळून गेलात, नंतर दहा बारा दिवसानी, संधि साधून तो मनुष्य तुमच्या त्या कर्माची सव्याज परतफेड करतो म्हणजे तुमचे कर्म पक्व होण्यास दहा बारा दिवस लागतात व मग ते तुम्हाला (फळ) देऊन शांत होते.
तुमच्या तरुण वयात तुम्ही आपल्या मातापित्याना दुःख दिलेत, परिणामस्वरूप तुमच्या वृद्धावस्थेत तुमची मुले तुम्हाला दुःख देतात व तुमच्या पूर्व कर्माचे फळ, मध्ये बराच काळ लोटला तरी, याच जन्मांत तुम्हाला मिळतें.
तुम्ही या जन्मी, संगीत साधना केलीत तर कदाचित पुढील जन्मी, लहानपणीच तुम्ही संगीतात नैपुण्य दाखवाल.
अशा प्रकारे कित्येक क्रियमाण कर्मे तात्कालीक फळ न देता कालांतराने ती जेव्हा पक्व होतात, तेव्हा तुम्हाला फळ देऊन शांत-समाप्त होतात आणि तोपर्यंत “संचितकर्म” म्हणून तुमच्या खाती जमा राहातात.
बाजरी पेरल्यानंतर तीन महिन्यानी पीक तयार होते, गव्हाला चार महिने लागतात. आंबा लागवडीस येण्यास ५-६ वर्षे लागतात, अन्य काही फळ झाडे दहा किंवा त्याहून अधिक वर्षांनी फळ देऊ लागतात. ‘क्रियमाण कर्माचे ज्या स्वरूपाचे बीज, त्या प्रमाणे त्याचे फळ मिळण्यास, मध्ये कमी अधिक काळ लोटावा लागतो. जीवात्म्याची अशी अनेक कर्मे संचित म्हणून त्याचे खातेवहीत ‘जमा म्हणून भोगण्यासाठी शिल्लक राहिलेली असतात.
उदा. समजा की आज तुम्ही १००० क्रियमाण कर्मे केलीत, त्यातील ९०० कर्मे अशी होती, की जी तात्कालीक फळ देऊन शांत झाली- समाप्त झाली, परन्तु राहिलेली १०० क्रियमाण कर्मे अशी असतील की ती पक्व होऊन, फळ देण्यास काही काळ लागेल, व तोवर ती संचित कर्म म्हणून तुमच्या खाती जमा राहातील, अशा तरहेने आज १०० कर्मे संचित झाली, उद्या कदाचित १२५ कर्मे संचितात जमा होतील, पर्वाच्या दिवशी, आजच्या व उद्याच्या संचित कर्मा पैकी ८० कर्मे पक्व होऊन, फळ देऊन शांत झाली, व राहिलेली ८०-९० कर्मे संचित म्हणून जमा राहिली अशा प्रकारे, आठवडे अखेर ३००-४०० कर्मे शिल्लक फळ न देवां संचित म्हणून तुमचे खाती जमा राहिली. महिने अखेर, १०००-१५०० क्रियमाण कर्मे फळ न देतां, संचित म्हणून राहिली वर्ष अखेर काही हजार शिल्लक.अशाप्रकारे आयुष्य संपून जाते, पण संचित कर्मे संपत नाहीत. तुम्ही पुढील जन्म घेता-पुन्हा पुढील जन्मी आणखी काही लाखांची शिल्लक वाढली. अशा प्रकारे अनादि काळापासून जमा होत राहिलेल्या कर्माचे, जणू कित्येक हिमालय पर्वतावढे संचित कर्म प्रत्येक जीवात्म्याचे खाती भोगण्यासाठीं जमा होऊन राहिलेले असतात. कोणते ही क्रियमाण कर्म, जे संचितांत जमा होऊन राहिलेले असतें, ते फळ दिल्यावाचून समाप्त होत नाही या नियमानुसार, अर्शी जन्मोजन्मी जमा होत आलेल्या कर्माची फळे, या जन्मी, पुढील जन्मी भोगून संपविल्या शिवाय माणसाची त्या पासून सुटका नाही, या गोष्टीचा माणसाने विचार केला तर त्याचा थरकाप उडेल परंतु अविद्येने, अज्ञानाने व्यापलेला जीव, याचा कधीं विचारच करीत नाही.
राजा दशरथाने श्रवणकुमाराची हत्या चुकून केली तेव्हा त्याच्या वृद्ध माता- पित्यानी “तुझा मृत्यूही पुत्र-विरहाने होईल” असा राजा दशरथाला शाप दिला. पण राजांचे हे हत्या करणाचे क्रियमाण कर्म शापा प्रमाणे तत्काळ फळ कसे देणार? कारण त्यांवेळी राजाला मुलगाच झालेला नव्हता, म्हणून हे क्रियमाण कर्म फळ देऊन शांत न होता त्याच्या संचितात जमा राहिले.कालांतराने राजाला, एकच काय, पण चार पुत्र झाले. ते मोठे झाले. त्यांची लग्ने झाली, आणि जेव्हा राम-राज्याभिषेकाचा दिवस उगवला, त्यां वेळी पूर्वीचे ते क्रियमाण कर्म पक्व होऊन फळ देण्यास सज्ज झाले आणि राज्याभिषेकाच्या मंगल दिवशींच राजाला पूर्व शापानुसार मृत्यूचे फळ देऊन शांत झाले. त्यांत क्षणाचाही विलंब झाला नाहीं. वास्तविक श्रीराम हा भगवंताचा अवतार. प्रत्यक्ष परातत्पर, परब्रहम, राम-रुपाने सगुण साकार रुप धारण करून पृथ्वीतलावर अवतीर्ण झाले होतें. ज्या रामाच्या केवळ चरण स्पर्शीने शापित शीलेची पुन्हा शापमुक्त आहिल्या झाली, ज्याच्या केवळ चरण-रज-स्पर्शाने दगडाचा उद्धार होऊन अहल्येला जीवदान मिळाले, अशा परब्रह्म असलेल्या रामाने स्वतःच्या पित्याला आपण वनवासातून परत येई पर्यंत मृत्यूपासून चौदा वर्षाचे जीवदान देता आले असते. पण कर्मफल-कायद्याचे चोख, तंतोतंत पालन झालेच पाहिजे, त्यांत कोणतीही ढवळाढवळ चालत नाही.
थोडक्यांत सांगायचे म्हणजे परमेश्वराच्या राज्यांत ना अंधार, ना अन्याय ना दिरंगाई. राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या शंभर पुत्र युद्धांत मारले गेले, तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारलें की असे कां व्हावे ? माझ्या सबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेले नाही की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या सर्व पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळया-देखत पाहून, त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावें ? तेव्हा भगवान श्रीकृष्णानी राजाला. आपले पूर्व जन्म पाहाण्याची दिव्य दृष्टि दिली.राजाने दिव्य दृष्टि द्वारा पाहिले की साधारण पन्नास जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्यांने एक वृक्षाला आग लावली होती. आग लागताच वृक्षावरील बरेचसे पक्षी पळून गेले, मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक आंधळे झाले, तर पक्षांची शंभरएक लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. राजाचे हे त्या जन्मीचे क्रियमाण कर्म, फळ देण्याची योग्य संधि पाहात संचित रूपांत शिल्लक राहिले, आणि या जन्मांत, राजाला त्याच्या काही अन्य पुण्याईचा फलस्वरूप जेव्हा शंभर पुत्र झाले, तेव्हा ते संचित कर्म पक्व होऊन राजाला फळ देण्यास सज्ज झाले. परिणामतः राजा आंधळा जन्मला, व त्याचे शंभरच्या शंभर पुत्र युद्धात मरण पावल्याचे दुःख राजाला अनुभवावे लागले. पन्नास जन्मापूर्वीच्या क्रियमाण कर्माने, इतका दीर्घकाल लोटला तरी, राजाचा पिच्छा सोडला नाही, राजाची एका जन्मांत शंभर पुत्र होण्याची पुण्वाई होई पर्यंत ते कर्म दबा धरून बसले, संधि मिळाल्याबरोबर त्याला फळ देऊन शांत झाले.
परमेश्वराचा राज्यांत ना अंधार, ना अन्याय… क्रियमाण कर्म ‘संचित रूपाने शिल्लक राहातें, व संधि मिळतांच फळ देऊन शांत होते.
(३) प्रारब्ध कर्म :
जे संचित कर्म परिपक्व होऊन फळ देण्यास तयार होते त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात (प्रारब्ध सुरु झालेले)अनादि काळापासून, जन्म-जन्मांतरातील संचित कर्माचे असंख्य हिमालयसदृश पर्वत जीवात्मांच्या खात्यांत जमा झालेले असतात. त्या पैकी जी संचित कर्मे पक्व होऊन फळ देण्यायोग्य होतात, तेवढी प्रारब्ध कर्मे भोगण्यास अनुरूप असे शरीर जीवात्म्यास प्राप्त होते, आणि त्या जीवन काळांत भोगण्यासाठी तयार झालेली सर्व प्रारब्ध कर्मे भोगल्यानंतरच त्याचे शरीर सुटते. प्रारब्ध भोगण्यास अनुरूपा असा देह आरोग्य, स्त्री-पुत्रादिक, नातलग, सुख-दुःख ई. त्या जीवनकाळ दरम्यान जीवाला प्राप्त होतात, आणि सर्व प्रारब्ध कर्म पूरेपूर भोगल्यातरंच त्याचा देह सुटतो म्हणजे तो जीवात्मा त्या देहातून सुटतो..
म्हातारपणी एकाद्याला अर्धांग वायु होऊन या कुशीचे त्या कुशीस होता येत नाही, स्वच्छतेच्या अभावी अंगाला दुर्गंधी सुटलेली असते, अशा अंथरूणात पडलेल्या अवस्थेत, भले तो वारंवार परमेश्वराला हाका मारुन देवा सोडव या यातनांतून. तुझ्या पायाशी यावयास मी केव्हाही तयार आहे.” असे वारंवार बोलून देवाची कितीही आळवणी करीत असो, तरीपण, या जन्मी भोगण्याचे निर्धारीत प्रारब्ध जोवर पूर्ण भोगून संपत नाही, तोवर त्याने काहाही केले, तरी त्याचा देह सुटत नाही. पण ज्या क्षणी ते पुरें होतें, त्यानंतर मुलाने तोंडात घातलेल्या गंगाजलाचा एकही थेंब पोटांत न जाता नाकावाटे बाहेर येतो, व एकही ज्यादा श्वास न घेता त्याचा अंत होतो.
व कर्म सिद्धांताप्रमाणे या सर्व हिशोबाचे संचित कर्म घेऊन उरलेले प्रारब्ध भोगण्यासाठी जीवात्म्यास परत नवीन अनुरूप असा नवा देह त्याला पुनः प्राप्त होतो. अशा रीतीने तो जीवात्मा, जन्म मरणाच्या चक्रात सतत फिरत असतो. अनादि काळापासून जन्म जन्मांतरातील संचित कर्मे भोगण्याचे हे चक्र अव्याहतपणे चालत आलेले असते. जोवर तो या चक्रातून सुटत नाही तोवर त्याला मुक्ति नाही.
म्हणूनच श्रीमद् आद्य शंकराचार्य म्हणतात :
पुनरपि जननं पुनरपि मरणं । पुनरपि जननी जठरे शयनं ॥
इह संसारे, बहु दुस्तारे । कृपयापारे पाहि मुरारे ॥
अशा प्रकारे अनेक योनीमध्ये जीव भटकत असतो. मनुष्य योनीत असता केलेल्या क्रियमाण कर्मातील अनेक अपरिपक्व कर्मे संचित म्हणून जमा होत राहातात त्यापैकी काही काळांतराने पक्व होऊन फळ देऊन शांत होतात. पण एकंदरीत जीवाचा संचित कर्म साठा प्रत्येक जन्मात वाढतच राहातो व या कारणे जीवात्मा मोक्षापासून दूर दूर लोटला जातो.
तुम्ही कर्म केलेंत की त्यांचे फळ तुम्हाला चिकटलेच समजा. फळ भोगल्याविना तुमची सुटकाच नाही. परिणामातून सूटण्यासाठी कितीही खटपटी- लटपटी केल्यात, तरी त्याचे परिणाम भोगल्याशिवाय त्यातून तुमची सुटका कदापि नाही.
राजा अंबरीषाचा अपराध केल्यामुळे दुर्वास ऋषिच्या मागे लागलेले सुदर्शन चक्र जसे तीन लोकांत ते पळाले, तरी त्यांचा सतत पाठलाग करीत राहिले, त्यां प्रमाणे तुमचे कृत कर्म तुम्ही जाल तेथे तुमचा पिच्छा सोडणार नाही, आणि तुम्हाला भोग देऊनच ते शांत होणार.
कदाचित तुम्ही आपल्या द्रव्यबळावर या जगांतील कोणी नामवंत वकील देऊन, निर्दोष सुटका करून घेतलीत, तरी वरील कोर्टात परमेश्वराच्या न्यायालयांत तुम्ही कदापि सुटू शकत नाही. तेथे हुशार, चलाख वकीलाचा युक्तिवाद तुमच्या मदतीस येऊ शकणार नाही.
फार वर्षापूर्वीची सत्यघटना. अहमदाबादला एक विद्वान, अनुभवी सत्र- न्यायाधीश (Session Judge) होते. वेदांताचे गाढे अभ्यासी, कर्मसिद्धांतावर त्यांचा जबर विश्वास होता. एका गावी कोर्टाचे काम चालू असतां, सत्र न्यायाधीश एकदा नदीकांठी फिरावयास गेलेले असताना, जवळूनच एक माणूस पळताना व त्याच्यापाठी सुराधरी दुसरा माणूस त्याचा पाठलाग करताना व त्याचा खून करताना त्यानी पाहिले. खुनी माणसाचा चेहरा जज्ज साहेबानी बरोबर पाहिला. ते घरी आले पण या घटनेसंबंधी कोणाशीही अवाक्षर बोलले नाही.
पुढे पोलीस तपास होऊन, पाच-सहा महिन्यानी तो खुनाचा खटला कोर्टात दाखल झाला व कर्म धर्म संयोगाने त्याच सत्र न्यायाधिशांपुढे सुनावणीस आला. परंतु कोर्टापुढे खुनाचा आरोपी उभा करण्यात आल्यावर न्यायाधीश साहेबांच्या लक्षांत आले की, त्यानी त्या दिवशी प्रत्यक्ष पाहिलेल्या माणसाऐवजी, आरोपीच्यां पिंजर्यात संशयित म्हणून उभा केलेला माणूस कोणीतरी भलताच होता.पोलिसानी सदर आरोपी विरुद्ध इतका ठोस आणि सबळ पुरावा दाखल केला, की आरोपीच खरा खुनी होता असे साक्षी पुराव्यावरून सिद्ध झालें.जज्ज साहेब मनोमन निश्चित जाणत होते की पिंजर्यातील बनावट आरोपी खरा खुनी नव्हता, कारण खरूया खुनी माणसाला त्यानी स्वतः चे डोळयानी पाहिलेला होता. न्यायाधिशाला पुराव्याचे आधारावरच निकाल छावा लागतो, पुरावा इतका ठोस होता की त्या आधारावर आरोपीला फाशीची शिक्षांच देणे अपरिहार्य होते.
परंतु प्रस्तुत न्यायाधीश गाढे वेदांती व कर्मसिद्धांतावर त्यांचा गाढा विश्वास होता. ते निश्चितपणे जाणत होते की खरा खुनी वेगळाच होता. पण समोरच्या पुराव्यानुसार एका निरपराध माणसाला फाशीची शिक्षा ठोठावण्याशिवाय त्यांच्या समोर अन्य मार्गच नव्हता. म्हणून शिक्षा फर्माविण्यापूर्वी न्यायाधिशानी सदर आरोपीला आपल्या चेंबर मध्ये खासगीत बोलण्यासाठी बोलावले. बनावटी आरोपी रडूं लागला व म्हणाला, महाराज मी पूर्ण निर्दोष आहे, खून मी केलेला नाही, व मी नाहक मारला जात आहे. न्यायाधीश त्याला म्हणाले, ही गोष्ट मी स्वतः जाणतो, तू या खटल्यातला खरा खुनी नाहीस. परंतु तुला फाशीची शिक्षाच देणे मला भाग आहे, माझ्यापुढे दुसरा पर्याय नाही. परंतु परमेश्वर निर्मित कर्माचा कायदा आहे, त्यांत काही गफलत तर नाहीना याचा मला शोध घ्यावयाचा आहे. त्या कायद्यानुसार माणसाला केवळ त्याच्या कर्मानुरोधाने फळे भोगावीच लागतात. तू निरपराधी असूनही कसा गोवला गेलास हे जाणण्यासाठी मला खासगीत तुला एक प्रश्न विचारावयाचा आहे, त्याचे तू ईश्वराला स्मरून खरे खरे उत्तर दे. मरणा पूर्वी खोटे बोलण्याचे पातक करू नकोस.
माझा प्रश्न असा आहे की “भूतकाळांत तू कोणाचा खून केला होतास का?खुनाच्या आरोपीने रडत रडत सांगितले की त्याने पूर्वी एक सोडून दोन खून केलेले होते, त्याच्यावर दोन्ही वेळा खटला पण भरला गेला होता, परंतु त्या वेळी त्याला पैशाचे पाठबळ असल्याने, त्याने दोन्ही वेळा नामवंत हुशार वकील नेमले होते व पोलीस खात्यांतही खूप पैसा पेरला होता, त्यामूळें त्यां दोन्ही खटल्यांत त्याची निर्दोष म्हणून सुटका झाली होती, पण आतां त्याची सांपत्तिक स्थिति खालावल्यामुळें, तो तसे करू शकत नव्हता, व पूर्ण निर्दोष असूनही या वेळी तोच खुनी असे सिद्ध करण्यात आले आहे.
सेशन जज्जांची पुरी खात्री झाली की परमेश्वराच्यां “कर्म-सिद्धांत” कायद्यात कोणतीही त्रुटी वा गफलत नाही. पूर्वीच्या खटल्याचे वेळी आरोपीची पुण्याई सबळ असल्यामुळे, त्याच्या क्रियमाण कर्माला फळ देण्यास विलंब झाला, व ते “संचित” कर्मात त्याचे खाती जमा राहिले. व आता त्याच्या पुण्याईला ओहोटी लागल्याने, या खेपेस तो पूर्ण निष्पाप असूनही त्याचे पूर्वीचे “संचित कर्म” प्रारब्ध म्हणून फळरूपाने त्याचेसमोर उभे राहिले, आणि आतां त्याला फासावर लटकण्या-शिवाय गत्यंतर नाही.
कर्त्याच्या पुण्याईचा जोर असल्याने संचित कर्म पक्व होण्यास विलंब लागतो, त्यां मुळें जगाच्या दृष्टिने तो दोषी असूनही काही काळ तो प्रतिष्ठित म्हणून उजळ माथ्याने जगू शकतो, पण पुण्याईचा जोर ओसरतांच, त्याचे संचित कर्म फळ देण्यास समर्थ होतें व फळ देऊन, आपला प्रभाव दाखवून शांत होतें.
म्हणून वाईट कर्म करण्यापूर्वी, माणसाने हजार वेळा विचार करावा एकदां कर्म केल्यावर, त्याचे फळ आज नाही उद्यां भोगलेच पाहिजे व त्यां वेळी छाती पुढे करून माणसाने त्यास सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. हसत हसत केलेले पाप, रडत रडत भोगावेच लागते.
आज येथेच थांबतो.
या पुढील विवेचन आपण पुढील भागांत पाहू.
क्रमशः ……….
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)