
विषय : उत्तराफाल्गुनी नक्षत्र विचार
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : नक्षत्र ज्योतिष
नमस्कार,
आज आपण उत्तराफाल्गुनी नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत. उत्तराफाल्गुनी नक्षत्र हे नक्षत्र चक्रातील १२ वे नक्षत्र आहे. या नक्षत्राला इंग्रजीत ‘डेनिबोला’ असे म्हणतात. या नक्षत्राची आकृती शय्येसारखी असून त्यात दोन सुरेख व ठळक तारे आहेत. ताऱ्यांचा रंग जरा पांढरट निळा असून ते बरेच तेजस्वी आहेत. फाल्गुनी महिन्यात हे नक्षत्र रात्रभर दिसू शकते.
नक्षत्राचा १ ला चरण सिंह राशीत व पुढील चरण कन्या राशीत येत असल्याने हे नक्षत्र त्रिपाद आहे, तसेच ते ऊर्ध्वमुखी, स्थिरमिश्र, मनुष्यगणी व अवलोचनी आहे. नक्षत्र स्वामी रवि, राशी स्वामी रवि व बुध व दैवत सूर्यदेवत असल्याने या नक्षत्रात प्रामुख्याने रवीचे विविध गुणधर्म आढळून येतात. विशेषतः रवीची कर्तबगारी व कर्तृत्व, उदात्तपणा, राजाचे शुभ गुण व बुधाचा चुटचुटीत व चुणचुणीतपणा यांचा सुंदर मिलाफ झालेला दिसून येतो. अग्नीसारखा प्रखर रवि या नक्षत्रात शीतल फलादेश देतो.
उत्तराफाल्गुनी नक्षत्र सात्त्विक प्रवृत्तीचे तसेच थोडे पराक्रमीदेखील आहे. तसेच सेवावृत्तीचे असून आश्रित आहे. थोरामोठ्यांच्या साहाय्यानेच हे जातक पुढे येतात. उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेले जातक सत्वगुणी, सभ्य, शांत, नम्र, विनयशील, उदार व उदात्त आचारविचाराच्या, हौशी, रसिक, विद्याव्यासंगी, टापटीप, नीटनेटकेपणा, स्वच्छता यांची आवड, थोडे शूर, पराक्रमी, आनंदी व संतोषी प्रवृत्तीचे असतात. हे नक्षत्र स्त्री व पुरुष दोघांनाही अनुकूल असते. कारण स्त्री व पुरुषांना लागणाऱ्या गुणाचे मिश्रण या नक्षत्रात दिसून येते. पुरुषांना शरीरप्रकृतीच्या दृष्टीने हे नक्षत्र अनुकूल आहे.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्या पुरुष जातकांचा बांधा, उंच, सडपातळ, सडसडीत, अंगाखांद्याने मजबूत व काटक असतो. शारीरिक उर्जा व रोग प्रतिकारक शक्ती चांगली असते. दिसण्यात हे पुरुष जातक साधारण असतात. अधिकार मिळाल्यास त्याचा जनतेसाठी, लोकांसाठी किंवा समाजासाठी चांगला उपयोग कसा करता येईल, याकडे या जातकांचे लक्ष असते. उत्तराफाल्गुनी नक्षत्रावरचे अधिकारी प्रजाहित दक्ष, लोकांच्या अडचणी सोडवणारे, कार्यतत्पर व कर्तव्यनिष्ठ असतात.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्री जातकांसाठी हे नक्षत्र शरीर प्रकृती, सौंदर्य, कला, विद्या, शुभगुण या दृष्टीने अनुकूल असते. मात्र वैभव, श्रीमंती व राजयोग यांना फारसे अनुकूल नसते. या नक्षत्राची स्त्री मध्यमवर्गीय कुटुंबाची राणी असते. प्रमाणशीर उंच, रेखीव, आकर्षक बांधा थोडासा बारकट, कंबर बारीक पण कमाणीय असतो. हे स्त्री जातक फार काटक किंवा राकट वा नाजूकही नसून मध्यम असतात. चेहरा सुंदर पण मादक नसतो. तेजस्वी असतो पण रागीट नसतो. हे स्त्री जातक नेहमीच हसरे, आनंदी आणि समाधानी दिसतात. चेहऱ्यावर रवीचे सात्विक तेज व प्रसन्नता दिसून येते. चेहरा थंडीच्या दिवसात पूर्वेला उगवणाऱ्या सूर्यासारखा कोमल, प्रसन्न व ऊबदार असतो. त्यांच्या स्वभावात स्त्री-पुरुषाच्या गुणांचे मिश्रण दिसून येते. त्या शांत, आनंदी, समाधानी, संतोषी, संसारी, कर्तव्यदक्ष, चतुर, व्यवहारकुशल, कष्टाळू व सेवावृत्तीच्या असतात. मनाने कोमल, दयाळू व भावनाप्रधान असल्या तरी प्रसंगी कठोर, शिस्तप्रिय, बाणेदार असतात. रसिक, होशी व कलाप्रिय असल्या तरी चैनी किंवा उधळ्या नसतात. उत्तराफाल्गुनीची स्त्री खेळकर व मिळून मिसळून राहणारी, बोलण्यात मधुरता व नम्र, विनयशील, साधी व हौशी असते. थोडी स्वप्नात रंगणारी अथवा संकटाला घाबरून न रडता धैर्याने तोंड देणारी असते धाडसी व सज्ज असते. उत्तराफाल्गुनी एक आनंद निर्माण करणारी आदर्श गृहिणी आहे. उत्तराफाल्गुनीची स्त्री संसारातील रखरखत्या व तणावाच्या वातावरणात आपल्या सेवेने व गुणाने घरातील वातावरण प्रसन्न व आनंदी करून टाकते.
उत्तराफाल्गुनी नक्षत्र सरकारी किंवा खाजगी कंपनीतील दुय्यम अधिकारीवर्ग, हिशेबनीस, सचिव, लहान लहान व्यापारी, छापखान्यात काम करणारा वर्ग, लेखक, लहान लहान शेतकरी वर्ग, आर्किटेक्ट, कलाकार, वकील, इंजिनिअर्स, धान्य, गवत व कागदाचे व्यापारी, तलाठीवर्ग, म्युनिसिपालटी, ग्रामपंचायती, स्थानिक समित्याचे पदस्थ, समाजसेवक पुढारी ई. दर्शवते
उत्तराफाल्गुनी नक्षत्रात रवि शुभ व चांगली फळे देतो. उत्तराफाल्गुनी नक्षत्रात रवि असता शरीरसौष्ठव उत्तम असते. उंच, हाडापेराने मजबूत, काटक, ऐटबाज बांधा असतो. लहान प्रमाणात अधिकारयोग मिळतो. कीर्ती, प्रसिद्धी, मानसन्मान चांगला मिळतो.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रात चंद्र अनुकूल असतो. शरीरप्रकृती, सौंदर्य व कला यांना अनुकूल असतो. हे जातक देखणे, प्रसन्न, आनंदी, हौशी कलाकार व गुणी असतात. तसेच सधन, बुद्धिमान, उदार व थोड्या ऐषोआरामी असतात.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रात मंगळ मध्यम शरीरप्रकृती देतो पण जातक काटक, शूर, धडपड्या, चळवळ्या असतो. आर्किटेक्टला उत्तम व अधिकार बरा.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रात बुध चांगला असतो. मध्यम, उंच, आडवा, थोडा भरलेला बांधा असतो. हे जातक चपळ व तरतरीत असतात. बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, प्रतिभाशक्ती चांगली असते. हे जातक थोडे खोडकर असतात. लेखन, वाचन, साहित्य यांची आवड असते. व्यापाराला बरे.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रात गुरु बांधा प्रमाणशीर, उंच, बारीक, चेहरा सात्विक, सुंदर, प्रसन्न व समाधानी वृत्ति देतो. हे जातक बुद्धिमान, हुशार, विद्याव्यासंगी व शिक्षित असतात. उच्च मध्यमवर्गात मानसन्मान मिळतो. मात्र गुरु सांपत्तिक व अधिकारदृष्ट्या मध्यम असतो.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रात शुक्र रूप, कला यांना अनुकूल असतो. पैसा, मान, विद्येच्या दृष्टीने साधारण असतो. शुक्र असता बांधा उंच, गोंडम व सुडौल, ललितकला, आर्किटेक्ट यांना चांगला.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रात शनि साधारण असतो. शरीरप्रकृती बरी असते. हाड व शिरा जास्त दिसतात. श्रम, कष्ट, धडपड जास्त, पण त्या प्रमाणात धन मिळत नाही. संकटे भोगणारा व दुःखी असतो.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रात राहू शरीरप्रकृती, कला यांना अनुकूल. बुद्धिमत्ता व हुशारी बरी असते. ड्रॉईंग, फोटोग्राफी व आर्किटेक्ट ई. चांगले जमते. मानसन्मान, साधारण कीर्ती, पण धन चांगले मिळेल.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रात केतू शरीरप्रकृतीच्या दृष्टीने बरा असतो. कला, बुद्धिमत्ता यांसाठी प्रतिकूल.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रात हर्षल असता जातक बुद्धिमान, कर्तबगार व हरहुन्नरी असतो. संशोधन चांगले होते.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रात नेपच्यून असता जाताकास शरीरप्रकृती बरी, आनंदी चेहरा, आनंदी, संतोषी व समाधानी वृत्ति प्रदान करतो. अंतःस्फूर्ती, प्रतिभाशक्ती, अंतर्ज्ञान, आत्मज्ञान, ध्यानधारणा चांगली असते.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर होणारे आजार फारसे दाहक नसून सौम्यच आहेत. यांना उत्तरार्थात जास्त आजार संभवतात. डोके दुखणे, अर्धशिशी, उष्णतेचा त्रास, कंबर दुखणे, पोटाचे विकार, चक्कर किंवा भोवळ येणे, उतार वयात रक्तदाब वाढणे ई या आजार हे नक्षत्र दर्शवते.
उत्तराफाल्गुनी हे त्रिपाद नक्षत्र असल्याने थोडेसे आरिष्टदायक आहे. सीतेचा विवाह या नक्षत्रावर झाल्याने तिच्यावर विवाहानंतर तिच्यावर बरीच आरिष्टे आली. या नक्षत्रावर जन्म झाला व इतर आरिष्ट योग असल्यास शांती करण्यास सुचवले जाते.
उत्तराफाल्गुनी नक्षत्र ठळक व सुंदर असल्याने हस्ताक्षरही मोठे, गोल व ठळक आढळते. लिहिताना हे जातक सरळ व एका रेषेत लिहितात. गति मध्यम असते.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर १ व ३ या अंकाचे वर्चस्व असते. रविचे माणिक किंवा बुधाचा पाचू लाभदायक असू शकतो. अंधलोचनी नक्षत्र असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ती लवकरच पूर्व दिशेला सापदु शकते.
उत्तराफाल्गुनी नक्षत्र मुहूर्त शास्त्रात महत्वाचे मानले जाते. हे नक्षत्र शुभ असल्याने विवाह, उपनयन अशा शुभ कार्याला चांगले. स्थिर नक्षत्र असल्याने वस्तू, गृहप्रवेश, घर बांधणे, कोनशिला बसविणे यांना चांगले. ऊर्ध्वमुखी असल्याने घरचा मजला वाढवणे, छप्पर घालणे, देवालयावर कळस चढवणे यांनाही चांगले. तसेच या नक्षत्रावर बारसे, राज्याभिषेक, बी पेरणे, बाग लावणे, औषधी झाडे लावणे, विहिर खणणे, नाक कान टोचणे, शांतिकर्म, शेतकामास आरंभ व विद्याभ्यास या कार्याला योग्य आहे.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)