नक्षत्र गोचरी पद्धत


विषय : नक्षत्र गोचरी पद्धत

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : कुंडलीची गोलंदाजी

नमस्कार,

भविष्य कथनाच्या अनेक विविध पद्धती ज्योतिष शास्त्रात पूर्वापार चालत आलेल्या आहेत. कोणी दशा पद्धत वापरेल, काहीजण राशी गोचर ला महत्व देतील, कोणी अंक शास्त्र, कोणी कृष्मुर्ती पद्धत उपयोगात आणेल. कोणी दिन वर्ष पद्धतीचा वापर करतो.

अशीच एक जुनी व सहज सोपी पद्धत आज पाहणार आहोत ती म्हणजे नक्षत्र गोचरी.

क्रांतीवृत्ताचे ३६० अंशाचे १२ विभाग केले असता राशी चक्र तयार होते, तसेच ३६० अंशाचे २७ नक्षत्रांमधे विभाजन करून नक्षत्र चक्र तयार होते. एका ग्रहाच्या मालकीची ३ नक्षत्रे असतात. या नक्षत्र चक्र आणि राशी चक्राची फ़ार सुंदर गुफ़ण करण्यात आली आहे. थोड्क्यात १ नक्षत्र म्हणजे १३ अंश २० कला चा एक विभाग. सहाजिकच राशीफ़लात सुक्ष्मता आणण्यासाठी नक्षत्र विभागाचा उपयोग होतो. या नक्षत्रांचा क्रम ठरलेला असतो. मेष राशीतील अश्विनी हे पहिले नक्षत्र जे केतूचे आहे तिथुन सुरु होऊन केतू, शुक्र, रवी, चंद्र, मंगळ, राहू, गुरु, शनी, बुध व परत केतू पासून बुध पर्यंत अशा क्रमाने ३ वेळा ९ ग्रह मिळून २७ नक्षत्रांचे एक चक्र पूर्ण होते. थोडक्यात ९ ग्रहांची एक माला १२० अंशात पूर्ण होते. १२० अंश गुणिले ३ माला बरोबर ३६० अंश.

जातकाचे जन्माचे वेळी ज्या नक्षत्रात असतो ते तुमचे जन्म नक्षत्र मानले जाते. हे नक्षत्र फार महत्त्वाचे असते. नक्षत्रावरुन रास समजते, राशिवरुन चंद्र समजतो त्यावरुन मन व मनावरुन वासना सर्व गोष्टी मनावर अवलंबून असतात. मनाचे समाधान म्हणजे सर्वसमाधान, मन, वासना व देह हे त्रिकुट रोजचे जीवन जगत असते. त्याच्याशी निसर्गाचा व समाजाचा संबंध येऊन अडचणी व दुःखे येतात.

ही नक्षत्र गोचरी एका दृष्टीने राशिगोचरी पेक्षाही अधिक महत्त्वाची आहे. राशि हा ३० अं. भाग आहे व नक्षत्र १३ अं. २० क. चा भाग आहे. म्हणजे एकाराशीत २। नक्षत्रे येतात. नक्षत्र राशीपेक्षा जास्त सूक्ष्म भाग असल्याने फलादेशातही अधिक सूक्ष्मता येते. नक्षत्रांचे नऊ नऊ नक्षत्रांचा एक असे तीन वर्ग करून जन्म नक्षत्रापासून दर एक नक्षत्रास निरनिराळे फल खालीलप्रमाणे कल्पिले आहे.

जन्मसंपद्विपत्कोमः प्रत्वरः साधकस्त्या । नैधनो मित्रवर्गश्च परमो मैत्र एवच ।।

जन्म नक्षत्रापासून

१ ले नक्षत्र : उत्पत्तिकर

२ रे नक्षत्र : संपत्कर

३ रे नक्षत्र : विपत्तिदायक (अनिष्ट)

४ थे नक्षत्र : क्षेमकर

५ वे नक्षत्र : प्रयाणदर्शक (अनिष्ट)

६ वे नक्षत्र : साधकतादर्शक

७ वे नक्षत्र : मृत्युदायक (अनिष्ट)

८ वे नक्षत्र : मित्र प्राप्ती दर्शक

९ वे नक्षत्र : नक्षत्र : परममित्ररुप.

असा हा फळदर्शक क्रम आहे. नऊ नक्षत्रांचा एक क्रम पूर्ण झाल्यावर याच क्रमाने १० व्या पासून सुरुवात करावयाची. जातकाच्या जन्मनक्षत्रापासून ३ ५ ७ वे नक्षत्रात ज्यावेळेला गोचर ग्रह येतात, तेव्हा ते त्रासदायक ठरतात. मंद ग्रहांच्या वक्री ग्रहांचा परिणाम जास्त होतो. पंचांगात प्रत्येक ग्रहांचा नक्षत्र प्रवेश दिलेला असतो. त्याचा अभ्यास करावा.

मानवाला नेहमी प्रकाशाचा प्रभाव असावा असे वाटते. अंधाराचा प्रभाव सहन होत नाही. ठराविक काळात माणसाच्या बुध्दीला जडत्व येऊन विचार सुचत नाही. बुध्दी ठाम निर्णय घेऊ शकत नाही, संभ्रम होतो. जन्म नक्षत्रापासून ३-या, ५व्या, ७व्या, नक्षत्रात नुसते चंद्राचे भ्रमण झाले, तरी मनाच्या विरुध्द घटना घडतात, असा अनुभव येतो. पापग्रहांचे भ्रमण त्रासदायक जाते.

जन्मनक्षत्रापासून ३,५,७, वी दशा किंवा अंतर्दशा त्रासदायक जातात. जन्म नक्षत्र निश्चित माहित असले की, या गोष्टी पाहणे फार सोपे जाते. हा नऊ, नऊ नक्षत्राचा एक गट प्रभावीपणे मार्गदर्शक ठरतो.

जन्मचंद्रापासून रवि ३,५,७ व्या नक्षत्रात असल्यास व वर्षाने परत त्याच नक्षत्रात येतो त्यावेळेस जन्मतः जो ऋतु असतो त्या ऋतुसंबंधी प्रकृतीस त्रासदायक होतो. सर्व जगाच्या पाठीवर ऋतु मुख्यधरुन सण येत असतात म्हणुन ज्योतिष शास्त्र दृष्ट्या ऋतुमानाप्रमाणे आरोग्याबद्दल विचार करावयाचा म्हणजे रविच्या भ्रमणाचा परिणाम इतर ग्रहांच्या तुलनेने करावा लागेल. कारण रविच्या भ्रमणामुळे ऋतु आढळून येतात. आपले जन्मनक्षत्र समजले म्हणजे त्या त्या तक्त्यात प्रत्येक नक्षत्रात रवि केंव्हा येतो हे समजते उदा.- रविचे भ्रमण मेष राशीत आहे म्हणजे अश्विनी, भरणी, कृत्तिका ह्या नक्षत्रातून आहे. इंग्रजी महिन्याप्रमाणे एप्रिल मध्यापासून मे मध्यापर्यंत असते. त्यावेळी उष्णतासुध्दा सारखी वाढत्या प्रमाणात असते अशावेळी मंगळ सुध्दा मेषेला असल्यास उष्णतेचे प्रमाण भयंकर असते त्यावेळी ज्यांचे ३, ५, ७, नक्षत्रे येत असल्यास त्यांना सनस्ट्रोक, आगी लागणे वगैरे त्रास होतो रक्तदाब वाढतो. काही वेळेस मेंदूमध्ये सुध्दा रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. मेष ही चर राशी असल्यामुळे रविचे त्यातील नक्षत्राचे आस्तित्वामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊन गोवर कांजिण्या सारखे सांसर्गिक रोग संभवतात व सामुदायिक रित्या ते ते नक्षत्र त्या मुलांना वाईट असते. असा अनुभव त्या त्या काळात येतो. सामुदायिक अपघाताच्या बाबतीतसुध्दा या नुसार संशोधन झाले पाहिजे. म्हणून प्रत्येकाने पावसाळा, उन्हाळा, हिवाळा ह्या तीन नक्षत्रांचा अभ्यास केला तरी बरेच काही हाती येईल. अनुभवांती व सरावाने आपल्या जन्मनक्षत्राप्रमाणे तक्त्यातील ९,९ गट पावसाळ्यात, उन्हाळ्यात, हिवाळ्यांत कसे येतात व त्यातील रविचे भ्रमण ३,५,७ नक्षत्रामध्ये असतांना कसा त्रास होतो हा अभ्यासाचा विषय आहे. माझ्या अल्पमतीने ह्यावर मी विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे ह्यावर प्रत्येकाने अनुभव घेऊन संशोधन करावे ही विनंती.

९ या अंकाला जन्मापासूनच महत्त्व आहे. एखाद्या जातकाचा जन्म आश्लेषा नक्षत्रावर झाला म्हणजे बुधाची नक्षत्रे आश्लेषा, जेष्ठा आणि रेवती या नक्षत्रावर अगर पुष्य हा परममित्र नक्षत्रावर गर्भधारणा झाली असे समजावे. सर्वसाधारण ९ महिने ९ दिवसानी बालकाचा जन्म होतो ते २७९ दिवस येतात त्याची बेरीज ९ च येते. नव ग्रहांना विंशोत्तरी दशेत स्थान देण्यात आले आहे. ९ ग्रहांचे ३ मालिका मिळून २७ नक्षत्रांचे चक्र पूर्ण होते. २७ ची बेरीज ९ च येते. २७ नक्षत्रे ३६० अंशात समाविष्ट असतात, ३६० याची बेरीज ९ च येते. अधिक सूक्ष्मता येण्यासाठी नवमांश स्वामी देखील अभ्यासावा. तो जन्म नक्षत्रापासून कितव्या नक्षत्राचा स्वामी आहे त्यावरून फळ शुभ अथवा अनिष्ट असेल हे ठरवता येईल. प्रत्येक नक्षत्रात ४ चरणे अशी २७ नक्षत्रे मिळून १०८ चरण होतात, ज्याची बेरीज देखील ९ येते. त्यामुळे जप माळ १०८ मण्यांची असते. ९ वे स्थान हे भाग्याचे, उपासनेचे, धार्मिकतेचे, प्रगतीचे आयुष्यातील महत्व दर्शवणारे स्थान असते. याच पध्दतीवर हल्लीच्या राशिगोचरी आलेली आहे. सूक्ष्मतेने पाहिले तर ६/८/१२ ही त्रिक स्थाने नेहमी अशुभ मानतात. जन्मलग्नापासून किंवा जन्मराशी पासून ६व्या राशीच्या आरंभी तिसरे म्हणजे विपत्तिदायक नक्षत्र येते. आठव्या राशीच्या प्रारंभी दुसऱ्या क्रमातील सातवे किंवा नैधन (वध) नक्षत्र येते. १२ व्या राशीच्या आरंभी २५ वे म्हणजे तिसऱ्या क्रमातील ७वे किंवा पुनः नैधन नक्षत्रच येते ही सर्व नक्षत्रे अशुभ फलदर्शक आहेत. हीच स्थिती शुभयोगांची. जन्मस्थ लग्न किंवा चंद्रापासून ५ वी ९ वी त्रिकोणराशि असल्याने शुभ असते. या राशीच्या प्रारंभी जन्म, कर्म म्हणजेच शुभ नक्षत्रे येतात.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment