अमावस्या योग


विषय : अमावस्या योग

संकलन : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : भारतीय संस्कृती कोश व कुंडली मंथन

नमस्कार,

“अमावस्या” या शब्दालाच पूर्वापार गूढ वलय प्राप्त झाले आहे. नुसते अमावस्या म्हटलं, तरी अनेकांच्या मनात अशुभत्वाची पाल चुकचुकते. वास्तविकत: ही सूर्य व चंद्राची एक आकाशस्थ स्थिती आहे, जिच्यामुळे काही फळे निर्माण होत असतात.

रवी चंद्राच्या भ्रमणामुळे तिथी निर्माण होतात. चंद्राची गती सूर्याच्या गतीपेक्षा जास्त  असल्याने चंद्र नेहमीच सूर्याच्या पुढे जातो. सूर्याच्या पुढे जात असताना चंद्र सूर्याच्या भोगाचे १२ अंश कापण्यास चंद्रास लागणारा काळ म्हणजे एक तिथी मानली जाते. चंद्र हा कलेकलेने वाढत जाऊन पौर्णिमेस पूर्णचंद्र आपल्याला दर्शन देतो. त्यानंतर उतरत्या क्रमाने त्याच्या कला कमी होत  अमावास्येला तो दिसेनासा होतो. या कला म्हणजेच चांद्रमासाची एकेक तिथी होय. या तिथीस प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी अशी नावे आहेत. पंचांगानुसार अमावस्या ही चंद्र महिन्याची ३० वी तिथी आणि कृष्ण पक्षाची शेवटची तिथी आहे. अमा म्हणजे गोळा होणे आणि वास म्हणजे वास करणे, राहणे. चंद्र आणि सूर्य युतीत आल्याची आकाशस्थ स्थिती अथवा तिथी म्हणजे ‘अमावस्या’. ज्यावेळी सूर्य आणि चंद्र यांचे क्रांतीवृत्तावरील आरंभ स्थानापासूनचे अंतर म्हणजेच भोग राशी, अंश, कला, विकलांनी समान होते, त्यावेळी अमावास्या संपते.

अमावस्या हे नाव कसे पडले असावे या विषयी मत्स्य पुराणाच्या १४ व्या अध्यायात एक रूपक कथा ऐकिवात आहे, त्यानुसार- प्राचीन काळी देवांच्या पूर्वजांनी ‘अछोड’ नावाचा तलाव बांधला होता. या देव पूर्वजांना ‘अमावसु’ नावाची एक मानस कन्या होती. तिने एकदा एक हजार वर्षे कठोर तपश्चर्या केली. म्हणून, देव पूर्वज प्रसन्न होऊन वर देण्यासाठी आले. त्यांच्यापैकी एक  अतिशय तेजस्वी पुरुष मुग्ध झाला आणि अमावसुकडे प्रेमाची याचना करू लागला. पण अमावसू चे मन यासाठी तयार नव्हते. अमावासूच्या संयमामुळे त्या दिवसाची तिथी पितरांना अत्यंत प्रिय झाली. तो दिवस कृष्ण पक्षाची १५ वी तिथी होती. तेव्हापासून ती तिथी या नावाने ‘अमावस्या’ म्हणून ओळखली जाऊ लागली. अमावास्या या तिथीची देवता ‘पितर’ असून श्राद्धकर्मादी विधी या तिथीवर करण्याबाबत आपल्या धर्मग्रंथात स्पष्ट उल्लेख आढळतो.

अमावस्येचा उल्लेख ऋग्वेदात आढळत नाही. पण सूर्यग्रहण अमावस्येलाच होते आणि अनेक ज्योतिर्विदांच्या मते ग्रहणाचा उल्लेख ऋग्वेदात आहे. वेदातील सूक्तात सूर्याला ग्रासणाऱ्या स्वर्भानूला अत्री ऋषींनी शोधून काढले, असे म्हटले आहे.

ज्योतिष शास्त्रात सूर्यास आत्मा कारक व चंद्रास मनाचा कारक मानले जाते. पाश्चात्य सूर्य राशीस महत्व देतात, तर आपल्याकडे चंद्र फलज्योतिष शास्त्रात महत्वाची भूमिका बजावतो. ज्योतिषी चंद्र कुंडलीचा विचार, ग्रहांच्या गोचर भ्रमणाशी पडताळून, भविष्य कथन करत असतो. विशोत्तरी दशा पद्धतीत जन्म काळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो, तेथून महादशा सुरु होते.

रवी चंद्र युती (अमावास्या योग) दिवशी सूर्याच्या ऊर्जेमुळे चंद्राची सर्व शक्ती नष्ट होते. मनाचा कारक ग्रह चंद्रच सूर्यामुळे अस्तंगत झाल्याने निर्बली असतो व चंद्राच्या कारकत्वात, तसेच ज्या स्थानाचा मालक असतो त्या स्थानाने दर्शविलेल्या गोष्टी, यांच्या फळात कमतरता निर्माण करतो.जर एखाद्या जातकाचा जन्म अमावस्या योगावर असेल तर चंद्र ज्या स्थानी स्थित असेल व ज्या भावाचा स्वामी असेल त्या संबंधी फळ जन्मभर कमी प्रमाणात किंवा अनिष्ट मिळण्याची शक्यता बळावते आणि म्हणूनच ही युती भारतीय पारंपरिक ज्योतिष शास्त्रानुसार अशुभ मानली जाते.

चंद्र मनाचा कारक असल्याने अनेकदा या योगात जातकास आपल्या आयुष्यात काय घडत आहे हे न समजणे, अनपेक्षित उलथापालथ झाल्यामुळे अस्वस्थ होणे, निर्विकारपणा, कमी निर्णयक्षमता, अलिप्तपणा, अशा अनेक मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते.

चंद्र मातृकारक असल्याने जातकाचे त्याच्या आईशी सतत मतभेद होऊ शकतात.

शुभ अमावस्या योग :

खालील राशीतील अमावस्या शुभ फलित प्रदान करू शकतील.

१. कोणताही ग्रह स्व राशीवर पूर्ण दृष्टी टाकत असेल, तर त्या स्थानाची शुभ फळे प्राप्त होतात. या नियमानुसार मकर व कुंभ राशीतील अमावस्या योग शुभ फळे देऊ शकेल.

२. कोणताही ग्रह स्वराशीत स्थित असेल, तर त्या स्थानाची शुभ फळे देतो. या नियमानुसार कर्क व सिंह राशीतील अमावस्या योग शुभ फळे देऊ शकेल.

३) उच्चीचे ग्रह, त्यांचे राशी अधिपती शुभ असता, शुभ फळे प्राप्त होतात. या नियमानुसार मेष व वृषभ राशीतील अमावस्या योग, त्यांचे अधिपती अनुक्रमे मंगळ आणि शुक्र शुभ असता शुभ फळे देऊ शकेल.

४) केंद्र कोणातील शुभ ग्रह शुभ फळात वाढ करतात. या उलट पाप ग्रह अशुभ फळ कमी करतात. या नियमानुसार अमावस्या योग जर कुंडलीच्या केंद्र कोणात होत असेल तर निश्चितच अशुभत्व कमी करण्यास सहाय्यक ठरेल.

अशुभ अमावस्या योग :

खालील राशीतील अमावस्या अशुभ फलिते देईल.

१) कोणताही ग्रह स्वतःचे नीचक्षेत्री असून त्याचा राशी स्वामी अशुभ असता, अशुभ फळ देतो. या नियमाप्रमाणे तूळ व वृश्चिक राशीत होणारा अमावस्या योग अनुक्रमे शुक्र, मंगळ अशुभ असता, अशुभ फळ देईल. 

२) ग्रहण युक्त अमावस्या सूर्यग्रहण हे फक्त अमावस्येलाच होत असल्याने ग्रहण युक्त अमावस्या योग नेहमीच अशुभ फळ देईल.

३) कोणताही ग्रह कुंडलीच्या ६, ८ व्या स्थानात असता, शुभ ग्रह शुभत्व कमी करतो, तसेच अशुभ ग्रह अशुभत्व वाढवतो. या पारंपरिक ज्योतिष तत्त्वानुसार कुंडलीच्या ६, ८ व्या स्थानातील अमावास्या अशुभ फळ देईल.

प्रत्येक राशीवर सूर्य चंद्र अमावस्या योगाचा स्थूल परिणाम :

मेष राशीमध्ये अमावस्या योग असता तुम्हाला कार्य क्षेत्रात बदल करावा असे वाटेल.

वृषभ राशीतील अमावस्या योग वृषभ राशीची तीव्रता वाढवते आणि आता तुम्ही जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यास सक्षम असाल.

मिथुन राशीचा स्वभाव द्वैत आहे. एकीकडे तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल उत्साही असाल तर दुसरीकडे तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंताही असेल.

कर्क राशीचा शासक ग्रह चंद्र आहे आणि तोच अस्तंगत असल्याने आणि तो नेहमी उर्जेवर प्रभाव टाकतो.

सिंह राशीच्या जातकांसाठी अमावस्या योग सकारात्मक राहणार नाही आणि तुम्ही दिवास्वप्नात हरवले असाल. तुम्हाला समस्यांवर उपाय सापडतील पण यशस्वी होणार नाही.

कन्या राशी जातकांना  अमावस्या योग खाली खेचेल आणि काळ खूप कठीण जाईल.

तूळ या राशीत अमावस्या योग आयुष्यात अनेक बदल देऊ शकतो. तुम्हाला चांगल्या गोष्टींची गरज असेल पण तुम्हाला ती नेहमी मिळणार नाही.

वृश्चिक या राशीचे जातक अमावस्या योगात अधिक निराश होऊ शकतात आणि पुढच्या क्षणी काय होईल याची तुम्हाला खात्री नसते.

धनु राशीच्या जातकाना अमावस्या योगात  साहसी उपक्रम आवडतील.

मकर राशीचे जातक त्यांना आवडत असलेल्या क्रियाकलापांमधून मजबूत नफ्याची अपेक्षा करू शकतात, परंतु करिअरशी संबंधित समस्या नेहमीच असतील.

कुंभ राशीच्या जातकांना समाजात बदल घडवून आणण्यासाठी त्यांच्या योजना पूर्ण कराव्या लागतील आणि जीवनात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागेल.

मीन राशीच्या जातकांची अनेक स्वप्ने पूर्ण होतील, परंतु तरीही त्यांना हवे ते न मिळाल्याने ते दुःखी असतील.

अमावस्या योग पीडा निवारण :

१. पूजेमध्ये कलश पूजा आणि गणेश, शिव, मातृका, प्रधान-देवता आणि नवग्रह यांसारख्या इतर देवतांची पूजा समाविष्ट आहे. कुंडलीतील अमावस्या योगाचे दुष्परिणाम दूर करण्यासाठी यज्ञ केला जातो. चंद्र नक्षत्र किंवा अमावस्येला यज्ञ केल्यास जास्तीत जास्त लाभ मिळेल.

२. सर्वपित्री अमावस्येला पितरांना नैवेद्य दाखवावा.

३. तुमच्या वडिलांचा, विशेषतः तुमच्या पालकांचा अनादर करू नका.

४. अमावस्येच्या दिवशी गरीब आणि गरजूंना तांदूळ, गूळ आणि दूध यासारख्या अन्नपदार्थांचे दान करा.

५. देवी कालीची पूजा करा, कारण ती मुख्य देवता आहे, जी अमावस्या दोषाचे परिणाम कमी करण्यात मदत करू शकते.

६. सोमवारी भगवान शिवाची आराधना करा आणि ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा १०८ वेळा जप करा. कारण शंकराने चंद्राला त्याच्या शापापासून वाचण्यास मदत केली.

७. अमावस्येच्या दिवशी शाकाहारी भोजन करा.

८. अमावस्येला दान करायच्या गोष्टी : अमावस्येला चांदी, तीळ, मीठ, कापूस, गाय इत्यादींचे दान करणे ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानले जाते.

९. अमावस्येला तीर्थ क्षेत्री स्नान केल्याने त्यांची सर्व पापे धुऊन जातात आणि नवीन कामांना सुरुवात होते, अशी लोकांची श्रद्धा आहे. या दिवशी भक्त शिवमंदिरांना भेट देतात, उपवास करतात, मनाच्या आणि आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतात, ज्यामुळे आयुष्यात आध्यात्मिक वाढ होण्यास मदत होते.

१०. अमावस्येचा उपवास : अमावस्येला उपवास करावा, म्हणजेच अन्नाशिवाय उपवास करावा, असे शास्त्रात सांगितले आहे. अमावस्येला असे काम करावे, ज्यामुळे तुम्ही देवाच्या सान्निध्यात रहाल. सांसारिक कामे शेती, व्यवसाय इत्यादी तुम्हाला देवापासून दूर नेणारी आहेत. संध्याकाळचे हवन, सत्संग, भगवंताचे स्मरण, ध्यान ई. करावे.

११. पितृपूजा (श्राद्ध) : पितरांसाठी अमावस्या तिथीला श्राद्ध आणि दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. अमावस्येच्या दिवशी पूर्वज सूर्यास्तापर्यंत वायूच्या रूपात घराच्या दारात उपस्थित राहतात आणि आप्तेष्टांकडून श्राद्धाची इच्छा करतात. पितरांची उपासना केल्याने मनुष्याला वय, पुत्र, कीर्ती, कीर्ती, पुष्टी, बल, सुख आणि ऐश्वर्य प्राप्त होते.

अमावस्येला मुलगी झाली तर इष्ट की अनिष्ट ?

अमावस्येला जन्मलेल्या मुली अत्यंत शक्तिशाली मानल्या जातात. मात्र, या मुलींची सहज दिशाभूल केली जाऊ शकते आणि लोक त्यांच्या निरागसतेचा सहज गैरफायदा घेऊ शकतात, असाही एक प्रचलित समज आहे. याच कारणामुळे अमावस्येला जन्मलेल्या मुलीच्या पालकांना त्यांच्या मुली वाढल्यानंतर त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

अमावस्येला विवाह करणे इष्ट की अनिष्ट ?

चंद्र मनाचा कारक ग्रह आहे, म्हणून लग्नाच्या हेतूंसाठी अमावस्येच्या तीन दिवस आधी आणि अमावस्येनंतर तीन दिवस चंद्राच्या स्थितीत असण्याआधी शुभ किंवा कोणत्याही नकारात्मकतेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे चंद्र आपला सकारात्मक प्रभाव देऊ शकत नाही.

या तारखेला खरेदी-विक्री आणि सर्व शुभ कर्मे करण्यास मनाई आहे.

अमावस्येची दिशा ईशान्य आहे.

सोमवार, मंगळवार किंवा गुरुवारी येणारी अमावस्या आणि अनुराधा, विशाखा आणि स्वाती नक्षत्रांमध्ये येणारी अमावस्या विशेषतः पवित्र मानली जाते.

अमावास्येचे तीन प्रकार आहेत. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असलेल्या अमावास्येला सिनीवाली अमावास्या म्हणातात. (ऋग्वेदात सिनीवाली नामक देवतेचा निर्देश आढळतो. अपत्यप्राप्तीसाठी तिची पूजा केली जात असे. अथर्ववेदात अमावास्येलाच सिनीवाली म्हटले आहे.) सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच्या काळात अंशतः चतुर्दशी व अंशतः अमावास्या असेल तर त्या अमावास्येला दर्श अमावास्या, आणि अंशतः अमावास्या व अंशतः प्रतिपदा असेल तर कुहू अमावास्या म्हणतात. सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणतात. शनिवारी येणाऱ्या अमावास्येला शनिश्चरी अमावास्या म्हणतात. भावुका अमावास्या वैशाखात असते. त्यादिवशी शनी जयंती असते. आषाढ महिन्यातल्या अमावास्येला हरियाली अमावास्या हे नाव आहे. आषाढी अमावास्येला सुसंस्कृत माणसे दिव्याची अमावास्या, तर अन्य लोक गटारी अमावास्या म्हणतात. या दिवशी मध्य आणि उत्तर भारतात ती श्रावण महिन्यातली अमावस्या असते, महाराष्ट्रातल्या श्रावण अमावस्येला पिठोरी अमावास्या हे नाव आहे. याच अमावस्येला दर्भग्रहणी अमावस्या (कुशोत्पाटिनी अमावस्या) हे दुसरे नाव आहे. त्या दिवशी बैलपोळा असतो. सर्वपित्री अमावस्या भाद्रपदात येते. दिवाळीत येणाऱ्या अमावस्येला लक्ष्मीपूजन असते. मार्गशीर्ष अमावस्येला वेळा अमावस्या हे नाव आहे. मौनी अमावस्या पौषात येते. माघ अमावस्येला द्वापारयुगादी अमावस्या म्हणतात. मार्गशीर्ष अमावस्येला वेळा अमावस्या हे नाव आहे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment