मघा नक्षत्र विचार


विषय : मघा नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण मघा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.

१०. मघा नक्षत्र :

मघा नक्षत्र हे नक्षत्र चक्रातील १० वे नक्षत्र आहे.

“मघा”

मघा नक्षत्र चतुष्पादी, क्रूर, उग्र, अधोमुखी व मध्यलोचनी आहे. या नक्षत्राचे ४ ही चरण सिंह राशीत येतात. या चार चरणांवर अनुक्रमे मंगळ शुक्र, बुध व चंद्र येनचे प्रभुत्व आहे. नक्षत्र स्वामी केतू, राशी स्वामी रवि व दैवत पितर असल्याने या नक्षत्रात केतूची सेवा व त्यागीवृत्ती, रवीचा पराक्रम व अधिकार लालसा आणि पितरांची शाप किंवा आशीर्वाद देण्याची वृत्ती यांचा मिलाफ आढळून येतो.

नक्षत्राची आकृती विळा किंवा कोयत्यासारखी आहे. नक्षत्रामध्ये ५ तारे असून पूर्वेकडे उगवून वर येताना ही आकृती स्पष्ट दिसते, त्यात वरील ३ तारे म्हणजे कोयत्याचे पाते व खालील २ तारे मुठीतले होत. नक्षत्रातील तारे अतिशय तेजस्वी, प्रखर व ठळक असून ते लखलखीत असतात. ताऱ्यांचा रंग पांढरा व तांबडा आहे. तारे अग्नितत्त्वाचे वाटतात. या नक्षत्राच्या उत्तरेकडे सिंह राशी सारखीच लहान आकृती असून तिला लघुसिंह म्हणतात, तर या नक्षत्राच्या योग ताऱ्याच्या जरा दक्षिणेला सरळ रेषेत वासूकीहय हा तारा आहे. माघ महिन्यात ते रात्रभर आकाशात आढळते व अतिशय तेजस्वी व ठळक असल्याने सहज ओळखता येते. सिंह राशीची सुरुवात मघा नक्षत्रापासून होत असल्याने हे नक्षत्र गंडांतर तारा योगातले आहे. मघा नक्षत्राच्या प्रारंभीच्या २ घटिका किंवा २ गडांतर तारा योगात येतात. मघा हे नक्षत्र म्हणून व्यूहभेदक किंवा एकदम स्थित्यंतर करणारे आहे. या नक्षत्राचे इंग्रजी नाव रेग्युलस’ असे आहे.

मघा आणि आकाशाकडे बघा, जर पडतील मघा, तर पिकतील शेते बघा.

पडल्या मघा, नाही तर वरती बघा

अशा म्हणी ग्रामीण भागात पूर्वापार प्रचलित आहे. धान्य पिकून हाती येण्यासाठी मघाच्या पावसाची गरज भासते. पहिल्या ६ नक्षत्रांचा भरपूर पाऊस पडूनसुद्धा मघा नक्षत्र जर कोरडे गेले, तर हातातोंडाशी आलेले पीक जाईल, या काळजीपोटी मघा नक्षत्रात शेतकरी आशेने आकाशाकडे डोळे लावून बसलेले असतात.

अशीच एक म्हण अस्सल ग्रामीण इरसाल भाषेत प्रसिद्ध आहे.

पडतील मघा तर चुलीपुढे हगा. ( मघा नक्षत्रातला पाऊस इतका सातत्याने पडतो की, माणूस घराबाहेर पडू शकत नाही, उबेसाठी तो चुलीपाशी बसतो असा याचा मतितार्थ आहे.)

मघा शब्दाचा अर्थ सुबत्ता असा आहे. याकाळी धान्य पिकून हातात येत असते. या नक्षत्रात सूर्य आला म्हणजे तो पितृलोकात जातो असे वेदात म्हटले आहे.

माघा नक्षत्र हे शरीरप्रकृती, सौंदर्य व गुणाच्या दृष्टीनेही अनुकूल असे नक्षत्र आहे. मात्र स्त्री जातका पेक्षा पुरुष जातकांना जास्त अनुकूल आहे. कारण पुरुषांना लागणारे साहस, धाडस, अहंकार, स्वातंत्र्यप्रेम, स्वावलंबित्व, निर्भयता, अधिकारलालसा हे गुण या नक्षत्रामध्ये ठळकपणे दिसून येतात. मघा नक्षत्रावर जन्मलेल्या जातकांचा बांधा उंच, सडपातळ, प्रमाणशीर, थोडा तगडा, हाडपेराने मजबूत असतो. पिळदार अवयव, बारीक कंबर, खांदे जरा जास्त रुंद, पिळदार मांड्या व दंड, अतिशय रुंद कपाळ,  छाती शारीरिक उर्जा व रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असते. हे जातक छाती पुढे काढून ऐटबाज चालणारे असून चेहरा मोहक, देखणा व सुंदर असला तरी चेहऱ्यावर करारी व रागीटपणाची झाक असते. त्यामुळे राजस भासतात. यांचे सौंदर्य जरा रांगडे असते. हे स्त्री व पुरुष जातक लौकिक, कूळ व चालीरीती यांना महत्त्व देतात.

मघा नक्षत्राचा पुरुष जातक म्हणजे ‘गडी अंगाने उभा नि आडवा, त्याच्या रूपात गावरान गोडवा’, हे जातक स्वभावाने मानी, शिस्तप्रिय, आज्ञाधारक, उच्च आचारविचार, महत्त्वाकांक्षी, न्यायी, उदार, स्पष्टवक्ता, पराक्रमी, राजनिष्ठ, स्वामीनिष्ठ, कोणत्याही गोष्टीत कमीपणा न घेणारे, अहंपणा व अधिकाराची लालसा असे असतात.. मात्र शुभ गुण जास्त असतात. मघा नक्षत्रात रवि-मंगळ असता वरील स्वभाव वैशिष्ट्ये ठळकपणे दिसून येतात. या जातकांना मर्दानी खेळ व पोषाखाची आवड असते. जरा तंग अथवा राजचिन्हे असलेला पोषाख जास्त प्रिय असतो. चालणे, उठणे, बसणे, खेळणे, बोलणे अशा प्रत्येक गोष्टीत त्यांची ऐट दिसून येते.

माघा स्त्री जातकांना हे नक्षत्र शरीरप्रकृती व कर्तृत्वाच्या दृष्टीने जास्त अनुकूल आहे. मात्र सौंदर्याच्या दृष्टीने थोडे कमी. या नक्षत्रावरच्या स्त्रिया पुरुषी बांधा व पुरुषी वृत्तीच्या असू शकतात. त्या हाडापेराने मजबूत, काटक, सशक्त व पीळदार अवयवाच्या असतात. चालणे मर्दानी व ऐटबाज असते. चालण्यात झाशीच्या राणीची ऐट असते. त्या महत्त्वाकांक्षी, शूर व अधिकारलालसा असणाऱ्या असून प्रसंगी, पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून धडपड करत, कष्ट उपसत व पराक्रम गाजवून राणी सारख्या राहतात. फक्त शिक्षणात किंवा केवळ ऑफिसातील बैठ्या नोकरीत बरोबरी न करता प्रत्यक्ष अंमलबजावणी किवा शासकीय खात्यात पुरुषांप्रमाणेच मर्दुमकी दाखवून नाव कमावण्याची त्यांची हौस असते. संसारात मात्र पतीने आपल्या ताब्यात राहावे अशी त्याची फार इच्छा असते.

मघा नक्षत्रावर होणारे आजार प्रखर व दाहक असतात. हे जातक कधीही साध्या तापाने बिछान्यावर पडून राहणार नाहीत. हे उष्ण प्रकृती दर्शविते. यांना उष्णतेने अंगाची लाहीलाही होणे, डोळे जळजळणे, अंगावर लाल पुरळ उठणे, भयंकार डोके दुखणे (अर्धशिशी), कापणे, भाजणे, हाड मोडणे, शस्त्रास्त्रांच्या जखमा, ऑपरेशन, अपघात अशा बाह्य रोगांची संभावना असते. स्त्रियांच्या कुंडलीत मघा नक्षत्रात शुक्र असता मासिक पाळीच्या वेळी फार त्रास होतो.

मघा नक्षत्र अंतर्गत सरकारी खात्यात काम करणारा वर्ग, विशेषतः अंमलबजावणी किंवा शासकीय खात्यातील लोक, सरकारी अंमलदार, रेव्हेन्यू ऑफिसर्स, कलेक्टर, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, कस्टम अधिकारी, पोलिस किंवा लष्करातील वर्ग, डॉक्टर त्यातून शस्त्रक्रिया किंवा सर्जरी करणारे डॉक्टर्स, इंजिनिअर्स, मिल किंवा कारखान्यातील जॉबर्स, मुकादम, फायर ब्रिगेडमध्ये काम करणारा वर्ग, कारखानदार, कंत्राटदार, फॉरेस्टर, गावातील पोलिस पाटील ई. वर्ग येतो. मघा नक्षत्रात रवि असता नोकरी सेंट्रल गव्हर्नमेन्टमध्ये मिळण्याचा संभव असतो.

मघा नक्षत्र स्वपराक्रमाने अधिकार देणारे आहे. मघा नक्षत्राचे दैवत पितर असल्याने या नक्षत्रात गुरु अथवा पंचमेश असता संतती साठी अनिष्ट आहे. याला कारण पितरांचा शाप आहे मानतात. अशा वेळी पितरांची श्राद्धाची धार्मिक क्रिया राहिली असल्यास, ती करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यास सांगितले जाते. मघा नक्षत्राचा वृक्ष वटवृक्ष आहे. वटवृक्षाच्या खाली किंवा आजूबाजूला झाडांना वाव नसतो. हे कदाचित संतती साठी अनिष्टता दर्शवत असेल.

मघा नक्षत्री रवि फार अनुकूल असतो. तो शरीरप्रकृती व नोकरीत अधिकार योगाच्या दृष्टीने फार चांगला. मघा नक्षत्री रवि असता जातकाचा शरीरबांधा उंच, सशक्त, काटक व उत्तम असतो. व्यक्तिमत्त्व उत्तम व ऐटबाज असते. मघा नक्षत्री रवी विशेषतः लग्नी, तृतीयात किंवा दशमात असता कोणत्या ना कोणत्या प्रकारचा अधिकार योग नोकरीत प्राप्त होतो. प्रतिष्ठा, मानसन्मान, अधिकार, शौर्य, कर्तृत्व, पराक्रमाला चांगला. हा एक प्रकारचा राजयोगच आहे.

मघा नक्षत्री चंद्र असता स्वभाव, गुण व प्रसिद्धीच्या दृष्टीने बरा. हा जातक मानी, धीट, पराक्रमी, महत्त्वाकांक्षी, निश्चयी आपल्या बळाने लोकांकडून काम करून घेणारा व कर्तबगार असतो. आरोग्य पण बरे असते. चंद्र मन स्थिर ठेवतो,

मघा नक्षत्री मंगळ फार चांगला असतो. शरीरप्रकृती फारच चांगली, बांधा उंच, सडपातळ व अवयव पीळदार असतात. हे जातक अतिशय काटक व चपळ असतात. उसळेपणा असतो. मात्र मंगळ असता अतिशय तापट, उतावळ्या, रागीट, आक्रमक वृत्तीच्या व अतिमानी स्वभावाचे असतात. शत्रूवर त्यांचा दरारा असतो. स्वभाव कडक असतो. मंगळ डॉक्टर्स, इंजिनिअर्स, लष्करी शिक्षण, सेनापती यांना चांगला.

मघा नक्षत्री बुध फारसा अनुकूल नसतो. शरीरप्रकृती मध्यम, चपळ, मज्जातंतू बलवान असतात. मर्दानी खेळासाठी बरा.

मघा नक्षत्री गुरु बुद्धी व विद्येच्या दृष्टीने चांगला. तो शरीरप्रकृती, बुद्धी, ऐश्वर्य व अधिकार अशा सर्वच दृष्टीने अनुकूल असतो. बांधा उंच, सशक्त, ऐटबाज, चेहरा देखणा व तेजस्वी असतो. हे जातक बुद्धिमान व कर्तृत्ववान असतात. इंजिनिअर, डॉक्टर्स व नोकरीत किंवा राजदरबारी मोठ्या पदावर असतात. नावलौकिक व मानसन्मान चांगला मिळतो.

मघा नक्षत्री शुक्र सौंदर्य व ऐश्वर्याच्या दृष्टीने जास्त बरा. स्त्रियांच्या कुंडलीत असा शुक्र असता त्या पुरुषी बांध्याच्या, कर्तबगार व अधिकार गाजविण्याची हौस असणाऱ्या असतात. फॅशनेबल किंवा पुरुषी वृत्तीच्या असल्या तरी वर्तन शुद्ध व वागणे विनयशील असते. पुरुषांच्या कुंडलीत असा शुक्र असता त्यांची विषयवासना जास्त असते.

मघा नक्षत्री शनि शरीरप्रकृती व अधिकाराच्या दृष्टीने बरा पण सौंदर्य किंवा ऐश्वर्याच्या दृष्टीने अनुकूल नसतो. या व्यक्ती हाड दिसणाऱ्या, शिरा जास्त दिसणाऱ्या, राकट, त्वचा जाड व खरखरीत असणाऱ्या असतात. श्रम, कष्ट, धडपड व दगदग फार करावी लागते. मात्र न्यायी, कठोर अंतःकरणाच्या व कर्तबगार असतात.

मघा नक्षत्री राहू सौंदर्य, शारीरिक प्रकृती, अधिकार या दृष्टीने उत्तम. पण या नक्षत्रात राहू म्हणजे शापित राजपुत्र मनाला जातो. अगदी उच्च तरतरीत असतो. चेहरा मोहक व मायावी दिसतो. या व्यक्ती अतिशय शूर, धीट, पराक्रमी व साहसी असतात. खेडेगावात त्यांचा जास्त वचक असतो.

मघा नक्षत्री केतु शरीर प्रकृतीच्या दृष्टीने चांगला. पण शरीर हाडाळ व अप्रमान्बाद्ध असू शकते. जातक कष्टाळू, मेहनती व कामसू असले तरी अधिकार योग कमी. गुरु अनुकूल असता हा केतू औषधे, रसायने, शस्त्रक्रिया या विद्येत यश देतो.

मघा नक्षत्री हर्षल बुद्धिमत्ता देतो. यांत्रिक कामे, इंजनिअरिंग, युद्ध साहित्याचे कारखाने यांना फार चांगला.

मघा नक्षत्री नेपच्यूनही साधारण असतो. तो पीळदार शरीर पण नितळ त्वचा देईल. हे जातक शूर, पराक्रमी, तेवढ्याच रसिक व हौशी असतात.

मघा नक्षत्राचा अंक १ किंवा ८ आहे. १ अंकाचे वर्चस्व जास्त वाटते. भाग्यरत्न रविचे माणिक आहे. हस्ताक्षर ठळक, व्यवस्थित व मोठे असते. दोन शब्दांत सारखे अंतर असते. मात्रा, वेलांटी, उकार हे टोकदार असतात. तांबूस किंवा सोनेरी रंगाच्या वस्तू लाभदायक होतात. हे मध्यलोचनी नक्षत्र असल्याने या नक्षत्रावर एखादी वस्तू हरवल्यास ती वारंवार बरेच प्रयत्न केल्यावर पश्चिम दिशेला मिळू शकते.

मघा नक्षत्र मुहूर्त शास्त्रामध्ये बऱ्याच शुभ कार्यासाठी हे नक्षत्र अनुकूल आहे. हे राक्षसगणी नक्षत्र असले, तरी विवाहासाठी हे नक्षत्र चांगले. अधोमुख नक्षत्र किंवा तलाव खोदण्यास आरंभ करणे, द्रव्य काढणे किंवा पुरणे, मद्य काढण्यास आरंभ करणे, नवीन शस्त्र वापरणे, शस्त्रविद्या शिकण्यास आरंभ करणे ई. साठी चांगले. तसेच हे क्रूर नक्षत्र असले तरी शस्त्रक्रिया करण्यास चांगले. राज नक्षत्र असल्याने राज्याभिषेकासही चांगले. मघा नक्षत्राच्या प्रथम चरणावर जन्म झाला असता शांती सांगितली जाते. 

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment