
विषय : मन करा रे प्रसन्न, आरोग्य वृद्धीचे साधन
लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : स्व अभ्यास
नमस्कार,
कुंडलीचा थोडाफार अभ्यास असणाऱ्या सगळ्यांना माहित आहे की, कुंडलीतील ६ वे स्थान आजार दर्शवते. ६ वे स्थानास रिपू किंवा शत्रू किंवा रोग स्थान अशी नावे आहेत. खरतर अर्थ त्रिकोणातील हे एक स्थान आहे. अर्थ त्रिकोणात ६ वे स्थान प्रयत्न, संघर्ष वा नोकरी दर्शवते. १० वे स्थान कर्म अथवा व्यवसाय दर्शवते. आणि २ रे स्थान जे धन स्थान मानले जाते (जे आरोग्यासाठी एक मारक स्थान आहे). आजच्या धकाधकीच्या आयुष्यात सर्वच जन भौतिक सुख व पैसा अडका मिळवण्यासाठी प्रचंड धकाधकीचे आयुष्य जगत असतात. व ही दगदग शरीरास असह्य झाली की आजार निर्माण होतात. आपण औषधोपचार घेतो व पटकन बरे व्हायचा विचार करत असतो. पण या सर्व रस्सीखेच शर्यतीत आपण आपल्या मनावर प्रचंड ताण निर्माण करत असतो, त्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो.
एखादा पेशंट हास्पिटलमध्ये अॅडमिट असतो. त्याच्या प्रकृतीत काही केल्या सुधारणा दिसत नसते. नातेवाईक डॉक्टरना विनवत असतात की, “काहीही करून आमच्या पेशंटला बरे करा”. तेव्हा डॉक्टर सांगतात, ‘अहो, आम्ही खूप प्रयत्न करतो आहोत. पण पेशंटचा ” ट्रीटमेंटला रिस्पॉन्सच मिळत नाहीये.”
आता पेशंटचा रिस्पॉन्स नाहीये म्हणजे काय ? याचा अर्थ डॉक्टरांनी नुसती औषधे शरीरात पाठवून उपयोग नसतो. पेशंटने त्या औषधांना प्रतिसाद द्यावा लागतो. तरच औषधांचा परिणाम शरीरावर होतो. पेशंट प्रतिसाद देत नाही म्हणजे पेशंटचे शरीर आणि मनही प्रतिसाद देत नसते. कोणत्याही आजारात, कोणत्याही ट्रिटमेंटमध्ये पेशंटच्या शरीर आणि मनाचा प्रतिसाद उत्तम असणे आवश्यक असते. जर आपण आपल्या मनाची शक्ती वाढवली तर आपल्याला आरोग्यप्राप्ती आणि रोगमुक्ती मिळवता येते. यासाठी आपल्या मनाबद्दल आणि त्याच्या भूमिकेबद्दल जाणून घेऊ या.
माणसाला मन असते, पण शरीराच्या आतही कुठे मन नावाचा अवयव नाही. कारण, मनाला भौतिक अस्तित्व नाही. म्हणजे मनाला आकार, वजन नाही. ते डोळ्यांनी दिसत नाही, पण तरीही मनाचे अस्तित्त्व असते. मन आपल्या अनुभवाला येते. या मनाची आपल्या आरोग्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका असते, कारण व्यक्ती ही मन आणि शरीर दोन्हींची मिळून बनलेली असते. आपल्या आयुष्यात जे काही घडते ते आपल्या मनाच्या इच्छेमुळे. मनाप्रमाणे शरीरात बदल होतो. जरी आपण म्हणतो की शरीराला इच्छा होते. तरी ते पूर्ण सत्य नाही. माझ्या जिभेला गोड खाण्याची इच्छा झालीय, असे आपण म्हणतो. पण ती इच्छा खरी मनाची असते. जिभेला गोड चव आवडत असती, तर सर्वच व्यक्तींच्या जिभेला ती आवडली असती. पण तसे होत नाही. आवड निवड हे मन ठरवत असते. आपल्याला होणाऱ्या आजाराचे मूळ कारण हे कित्येक वेळेला मन असते. मनोकायिक आजार (सायको सोमॅटिक डिसिजेस) हा शब्द आपण ऐकला असेल. मनाचा परिणाम शरीरावर होऊन निर्माण झालेले आजार. सध्या वाढत्या प्रमाणात असलेले आजार म्हणजे मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, त्वचेचे आजार, श्वसनसंस्थेचे आजार, कॅन्सर असे अनेक आजार मनातील नैराश्य, चिंता, ताण यामुळे होतात, असे संशोधन सांगते. त्यामुळे कोणत्याही आजारामध्ये शरीराला ट्रिटमेंट देण्याबरोबरच त्याला मनाची शक्ती वाढवण्यासाठीच्या उपायांची जोड देणे गरजेचे आहे. मनाचा परिणाम शरीरावर होतो आणि ते रोज आपण अनुभवत असतो.
उदा. आपल्याला जो राग येतो, तो आपल्या मनाला येतो का शरीराला? तुम्ही म्हणाल मनाला, पण मन दिसत नाही, मग राग कसा दिसतो? एखादी व्यक्ती रागावली आहे हे आपल्याला कसे समजते? रागावलेल्या व्यक्तीचा चेहरा संतापाने लालबुंद होतो. डोळे मोठे होतात, तो माणूस मोठमोठ्याने बोलत राहतो. हे वर्णन तर शरीराचे झाले ना. याचाच अर्थ राग मनाला आहे पण त्याचा परिणाम शरीरावर दिसतो आहे. रागावलेल्या व्यक्तीचे हे झाले बाह्य वर्णन, पण रागामुळे. व्यक्तीच्या शरीरांतर्गतही अनेक बदल होत असतात. हृदयाचे ठोके वाढतात, नाडीगती वाढते, रक्त तापते इ.
आता मनातल्या रागाचा जो शरीरावर परिणाम झालेला असतो, त्यामुळे शरीरांतर्गत चाललेली अनेक महत्त्वाची कामे थांबतात. रागामुळे जो बिघाड झालेला असतो, तो दुरुस्त करण्यासाठी शरीरातील पेशींना काम करावे लागते. रागावलेल्या व्यक्तीला या सगळ्याची जाणीव नसते. तिला अस वाटत असत की मी रागावून समोरच्या व्यक्तीला कसं गप्प केलं. पण रागामुळे आपण त्या व्यक्तीच थोड आणि स्वत:चं जास्त नुकसान केलं आहे, हे तिला समजत नाही. जस रागाचं आहे तसं इतर भावनांचंही आहे. आपल्या मनातील प्रत्येक भावनेचा परिणाम: आपल्या शरीरावर होत असतो. नकारात्मक भावनांचा नकारात्मक आणि सकारात्मक भावनांचा सकारात्मक परिणाम होतो. नकारात्मक भावनांमुळे आजार निर्माण होतात. आपण रागावलो की शरीरावर जो परिणाम झालेला असतो, तो शरीर काही वेळात दुरुस्त करते. पण आपण सतत रागवत राहिलो तर शरीरावर त्याचे सखोल परिणाम होत राहातात आणि त्यातून पुढे दीर्घ आजारांची निर्मिती होऊ शकते.
माणूस आयुष्यभर इंद्रियांच्या साहाय्याने बाह्य जगातील सुखाची लयलुट करतो. त्या इंद्रियांना सुखाचे साधन म्हणून वापरतो. बाह्य जगातील भौतिक सुख प्राप्तीसाठी गतीशील राहतो. अशा साधनांकडून मिळालेल्या सुखाची सवय, त्याच्या मनाला लागलेली असल्यामुळे, ते मन प्रतीगतीच्या नियमानुसार सतत दुःख भोगत राहाते. अशाप्रकारे भावना आणि सुखगती यांच्याशी गुंफण घातलेल्या माणसाला, दुःखगतीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. रोगाची निर्मिती हा त्याचाच परिणाम आहे. माणूस मरणाला घाबरतो, यामागील सुप्त कारण कदाचित हेच असेल की त्याला जगण्याची आस असते.
६ वे स्थान वासना देखील दर्शवते. रिपू स्थान म्हणजे शरीराचे किंवा आपले शत्रू यात आपले मन भावनांना, विकारांना, वासनेला, मोहाला, बळी पडून आपला शत्रू बनते हे आपण सोयीस्कर विसरतो.हे षड रिपू म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया. या भावना आपण अतिरेकाने वापरतो. आयुष्यात भावना हव्यातच. पण या सहा भावना संयमाने आणि नियमाने वापरल्या तर त्या आपल्या मित्र ठरतात. आपल्या बाबतीत जे काही चांगले आणि वाईट घडत असतं, तो आपणच निर्माण केलेल्या कारणांचा परिणाम आहे. आपण जे वागतो, निर्णय घेतो, कृती करतो याचा परिणाम म्हणून आपल्याला सुख किंवा दुःख येते. आपल्या सुख- दुःखाला आपणच जबाबदार असतो. आपण आपल्या मनाने ठरविल्याप्रमाणे आपण वागत सुटतो. त्याचे परिणाम आपल्याला स्वीकारावे लागतात. आपल्या आजारांना, दुखांना आपण इतर व्यक्तींना जबाबदार समजत असतो. जो पर्यंत आपण जबाबदार आहोत हे आपण मान्य करत नाही. तो पर्यंत आपल्याला आपले प्रश्न सोडविता येत नाहीत.
शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी माझ्या अभ्यासानुसार आजारी पडण्याआधीच तुमचा धर्म त्रिकोण बळकट केला तर त्याचा खूप सकारात्मक परिणाम आयुष्यावर झालेला दिसेल.
१, ५, ९ हि स्थाने धर्म त्रिकोण दर्शवतात.
१ ले स्थान आपले व्यक्तिमत्व दर्शवते. व्यक्तिमत्त्व हे शरीर व स्वभाव या दोन्हीचे मिश्रण आहे.
शरीर उर्जा टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी नियमित व्यायाम करा.
मानसिक शक्ती टिकवण्यासाठी स्वत:मध्ये कोणत्या नकारी आणि अतिरेकी भावना बिघडल्या आहेत याचे परीक्षण करा आणि जाणिवपूर्वक त्या भावनांचे संयमन करा.
५ वे स्थान खेळ, क्रीडा, कला, उपासना दर्शवते.
शाररीक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही मैदानी खेळाची आवड जोपासू शकता.
मानसिक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही संगीत, कला याचा आधार घेऊ शकता. आजकाल रोगमुक्तीसाठी म्युझिक थेरपी चा वापर केला जातो. तसेच उपासना सुचवण्या मागे हे ही एक कारण असते की, मनातील विकार नाहीसे झाल्याने मन शांत होऊन एकाग्रता वाढीस लागते. मनात सकारात्मक भावना निर्माण झाल्याने आत्मसंयमन करता येते. आपले आजार मन अस्थिर झाल्यामुळे तसेच आपली कृती (६ वे व १० वे स्थान) बिघडल्यामुळे होतात. प्रत्येक माणसाला ५०% सुख आणि ५०% दुःख मिळते. कोणीही अतिदुःखी किंवा अतिसुखी नसतो. आपल्याला काय मिळाले नाही हे आठवून रडत बसण्यापेक्षा काय मिळाले याचा विचार करून समाधानी रहाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे मन शांत, खंबीर, धैर्यशील होते. म्हणून तुम्ही घेत असलेल्या सावधानी/औषधोपचारांना मनाचा समतोल राखणेसाठी कला, क्रीडा, संगीत, उपासना याची जोड द्या.
९ वे स्थान धार्मिकता अध्यात्मिकता, नीती, उपासना, प्रगती ई. दर्शवते.
भौतिक प्रगती करत असताना, कीर्ती मिळवता असताना समतोल साधण्यासाठी त्यात नीती व्यवहार असणे महत्वाचे असते. तसेच मला काय मिळायला पाहिजे यापेक्षा मी कोणाकोणाचे देणे लागतो याचा विचार करायला हवा. आपले आईवडील, कुटुंब, समाज, देश आणि निसर्ग यांच्याकडून खूप काही मिळत असते. त्यांच्या प्रती आपले देण्याचे कर्तव्य जाणून जाणीवपूर्वक आपण निरपेक्ष काम केले पाहिजे. कुटुंबासाठी आपण करतो, पण समाजाप्रती करायचे राहून जाते. आपल्या श्रमाचा आणि धनाचा नियोजित वाटा दर महिन्याला त्यागरूपाने समाजातील दुःख दूर होण्यासाठी द्यायला हवा.
ध्यान म्हणजे जाणीवपूर्वक स्वार्थी बुद्धीला विश्रांती देणे. ध्यानामुळे आत्मविश्वास व शारीरिक क्षमता वाढतात. ध्यानाचे परिणाम आपल्या मनावर मेंदूवर शरीरांतर्गत कार्यावर अतिशय चांगले होतात. रोज संध्याकाळी साडेसात वाजता दिव्याच्या ज्योतीवर १२ मिनिटांचे ध्यान करावे. यामुळे दिवसभरातील ताणतणावाचे स्वतःवर झालेले दुष्परिणाम दूर होतात. मनशांती वाढते.
तसेच उपासना, देवदर्शन आदि गोष्टी देखील मनाचे पावित्र्य आणि शांती टिकवण्यास उपयुक्त ठरतात. भाग्य स्थान तुम्ही अशा पद्धतीने लिहिले तर श्रमदान सार्थकी लागेल. ( १० वे चे १२ वे स्थान जे श्रमाचे दान दर्शवते.) त्याग, दान आणि सत्कृत्याची जोड माणसाला उन्नती प्रदान करते.
शरीर हे जड माध्यम असल्यामुळे प्रकृतीचे नियम लागू असतात. न्यूटनच्या गतीच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे अॅक्शनला रिअॅक्शन असते. रिअॅक्शन ही अॅक्शनच्या सम प्रमाणात आणि विरूद्ध दिशेने असते. शरीराच्या अॅक्शनमधून मन सुख भोगते. त्यामुळे रिअॅक्शन स्वरूपात दुःख त्याच्याकडे येते. यानुसार सुखाचे दुःखात आणि दुःखाचे सुखात रुपांतर होत असते. आजाराचे दुःख घालवायचे असेल तर औषध उपचार याचे दुःख सकारात्मक भावनेने घ्यायला हवे.
या भावनांवर संयमन न करता आपण आजारात नुसते औषधोपचार केले, तर त्याचा परिणाम नीट होत नाही. म्हणून कोणाचाही आजारामध्ये शरीराबरोबर मनालाही ट्रिटमेंट देणे आवश्यक आहे. मनाला ट्रिटमेंट देण्यासाठी प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जावेच लागते असे नाही. आत्मचिंतन आणि आत्मपरिक्षण करून आजाराच्या आणि दुखाच्या मूळ कारणापर्यंत पोहोचणे, मनातील बिघाड जाणून तो दुरुस्त करणे
गरजेचे ठरते व मग त्यावर इलाज करणे सोपे जाते.
सर्वांना आरोग्यदायी सुखी जीवनासाठी शुभेच्छा !
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)