ग्रह गती आणि वक्री, स्तंभी, मार्गी ग्रह


विषय : ग्रह गती आणि वक्री, स्तंभी, मार्गी ग्रह

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : सुलभ ज्योतिष शास्त्र

नमस्कार,

आज आपण ग्रहांची गती आणि वक्री, स्तंभी व मार्गी ग्रह या बाबत माहिती घेणार आहोत.

आपल्या सर्वांनाच माहित आहे की, आपल्या सूर्यमालेत सूर्याभोवती ७ ग्रह व छाया बिंदू राहू आणि केतू गोलाकार मार्गात फिरत असतात. या प्रत्येक ग्रहाची गती ही वेगवेगळी असते. व प्रत्येक ग्रह फिरताना पृथ्वीशी वेगवेगळे कोण तयार करत असतात. ज्योतिषशास्त्र हे भूमध्य पद्धतीवर आधारित असल्यामुळे पृथ्वीवरून जे काही दिसते, जसे दिसते ते तसेच त्याचे परिणाम पृथ्वीवर होणार या आधारे ज्योतिषशास्त्रातील फलिताची रचना करण्यात आली आहे.

ग्रहांच्या विविध गती : अयन म्हणजे गती. ज्योतिष शास्त्रातील सायन व निरयन अशा दोन पद्धती आहेत. सायन म्हणजे गती सह व निरयन म्हणजे गती वजा करून स्पष्ट ग्रह काढण्यासाठी वापरलेली पद्धत. या साठी ग्रहांच्या वेगवेगळ्या गती माहीत असणे आवश्यक आहे.

चंद्र सोडला तर कोणत्याही ग्रहाची गती २ अंश ४० कलेपेक्षा जास्त नसते.

१. शनिची गती : ३ ते ४ कला असते.

२. गुरूची गती : ६ ते ७ कला असते.

३. मंगळाची गती : ३० ते ३५ कला

४. रविची गती : १ अंश

५. शुक्राची गती : १ अंश १० ते १५ कला

६. बुधाची गती. अर्धा अंश ते २ अंश

७. चंद्राची गती १५ अंश.

ग्रह गती व कोनानुसार ग्रंहांच्या ३ स्थिती तयार होतात.

१. मार्गी ग्रह

२. वक्री ग्रह

३. स्तंभी ग्रह

या तीन स्थिती पैकी मार्गी व वक्री ग्रह या स्थिती फलितासाठी महत्वाच्या आहेत.

१) मार्गी ग्रह : प्रत्येक ग्रह अवकाशात रोज आपल्या विशिष्ट मार्गाने पुढे पुढे जात असतो. म्हणून पंचांगामध्ये किंवा एफिमेरीजमध्ये त्यांच्या अंश, कला दररोज वाढताना दिसतात. त्यालाच ‘मार्गी ग्रह’ असे म्हणतात. ग्रह मार्गी असल्याचे पंचांगामध्ये किंवा एफिमेरीजमध्ये मुद्दाम लिहून दर्शविले जात नाही. रवि आणि चंद्र हे दोन ग्रह कायम मार्गीच असतात व कधीही वक्री होत नाहीत.

२) वक्री ग्रह : जे ग्रह अवकाशात रोज मागे मागे जाताना दिसतात, म्हणजे भासतात, त्यांना ‘वक्री ग्रह’ असे म्हणतात. पंचांगामध्ये किंवा एफिमेरीजमध्ये त्यांच्या अंश, कला दररोज कमी कमी होताना दिसतात.प्रत्यक्षात वक्री ग्रह ही भासमान गोष्ट आहे. ज्या वेळी एखादा मंदगती ग्रह पृथ्वीच्या अगदी जवळ आल्यास, पृथ्वीच्या जास्त गतीमुळे तो ग्रह मागे मागे जाताना दिसतो म्हणजे भासतो. तो ग्रह प्रत्यक्षात मागे जात नसतो. केवळ तो मागे मागे जात असल्याचा भासतो.

ज्या दिवशी ग्रह वक्री होतो त्या दिवशी पंचांगामध्ये किंवा एफिमेरीजमध्ये स्पष्ट ग्रहांमध्ये त्या ग्रहांसमोर वर किंवा खाली वक्री किंवा कंसात (व) असे लिहिलेले असते व ज्या वेळी तो पुन्हा मार्गी होतो त्या वेळी ‘ मार्गी असे लिहिलेले असते.

रवि आणि चंद्र हे दोन ग्रह कधीही वक्री होत नाहीत, तर  राहू व केतू हे बिंदू नेहमीच वक्री म्हणजे उलट्या दिशेने फिरत असतात, म्हणून त्यांना मार्गीच समजतात व पंचांगामध्ये किंवा एफिमेरीजमध्ये ते ग्रह वक्री असल्याचे लिहिले जात नाही.

बुध साधारणपणे वर्षातून दोन ते तीनदा १० ते १३ दिवसांच्या अवधीसाठी वक्री होतो. व कोनात्मक अंतर साधारण २४ ते ३० डिग्री असते.

शुक्र साधारणपणे १८ महिन्यातून ४० ते ४३ दिवसांच्या अवधीसाठी वक्री होतो. व कोनात्मक अंतर साधारण ५ ते ८ डिग्री असते.

मंगळ साधारणपणे २ वर्षातून ६० ते ८० दिवसांच्या अवधीसाठी वक्री होतो. व कोनात्मक अंतर साधारण ८ ते १५ डिग्री असते.

गुरु साधारणपणे १३ महिन्यातून १२० दिवसांच्या अवधीसाठी वक्री होतो. व कोनात्मक अंतर साधारण ९ ते १५ डिग्री असते.

शनि साधारणपणे वर्षातून १४० दिवसांच्या अवधीसाठी वक्री होतो. व कोनात्मक अंतर साधारण ६ ते १२ डिग्री असते.

हर्शल साधारणपणे वर्षातून १५० दिवसांच्या अवधीसाठी वक्री होतो. व कोनात्मक अंतर साधारण २ ते १० डिग्री असते.

नेपच्यून साधारणपणे वर्षातून १६० दिवसांच्या अवधीसाठी वक्री होतो. व कोनात्मक अंतर साधारण १ ते ३ डिग्री असते.

प्लुटो साधारणपणे वर्षातून १६० दिवसांच्या अवधीसाठी वक्री होतो. व कोनात्मक अंतर साधारण १ ते ३ डिग्री असते.

३ ) स्तंभी ग्रह : मंदगती ग्रह ज्या वेळी मार्गीकडून वक्री होतो किंवा वक्रीकडून मार्गी होतो, त्या वेळी काही काळ एकाच जागेवर स्थिर असल्याचे भासतो. त्यालाच ‘ स्तंभी ग्रह ‘ असे म्हणतात. पंचांगामध्ये किंवा एफिमेरीजमध्ये त्याच्या अंश, कला स्थिर असतात.

कुंडलीतील वक्री ग्रह फलादेशाच्या दृष्टीने विशेष बलवान समजले जातात, कारण त्या ग्रहांचे वास्तव्य एकाच राशीत किंवा एकाच नक्षत्रात बराच काळ असते, तर स्तंभी ग्रहाच्या कारकत्वात न्यूनता निर्माण करतात.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment