
विषय : पुष्य नक्षत्र विचार
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : नक्षत्र ज्योतिष
नमस्कार,
आज आपण पुष्य नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.
८. पुष्य नक्षत्र :
पुष्य नक्षत्र हे नक्षत्र चक्रातील ८ वे नक्षत्र आहे. या नक्षत्राचे ४ ही चरण कर्क राशीत असल्याने ते चतुष्पादि आहे. नक्षत्राचा स्वामी शनि, राशी स्वामी चंद्र व दैवत बृहस्पती असून ते देवगणी असल्याने या नक्षत्रात शनीचा मुत्सद्दीपणा, चंद्राचे लावण्य व मोद, बृहस्पतीचा उदात्तपणा व न्यायीपणा अशा विविध गुणांचे सुरेख मिश्रण आढळून येते. नक्षत्राच्या ४ चरणांवर अनुक्रमे रवि, बुध, शुक्र व मंगळ यांचे स्वामित्व आहे. तसेच ते ऊर्ध्वमुख, लघु व अंधलोचणी आहे. इंग्रजी नाव ‘डेल्टा कांक्री’ आहे.
पुष्य या नक्षत्राचा अर्थच पुष्ट होणे, भरणे हा आहे. रवि या नक्षत्रात आला की वनस्पती व जीवांचे पोषण होते. कणसे भरून झाडे व सृष्टीवरचे जीव पुष्ट होतात. नवे जीव जन्माला येतात.
एकदा देवाला कोणीतरी विचारणा केली, की तू कोणासोबत आहेस? तेव्हा देवांनी उत्तर दिले की, पुष्य नक्षत्र ज्याचे असेल त्याला देवाचा पाठिंबा आहे. पुष्यात कोणताही ग्रह असला तरी तो शुभ फल देईल. असे हे श्रेष्ठ नक्षत्र म्हणजे नक्षत्रांचा राजाच होय. त्यातून पुष्य नक्षत्रात चंद्र व गुरु असणे म्हणजे दुग्ध शर्करा योगच होय.
प्रजाहितदक्ष श्री प्रभु रामचंद्रांचा चंद्र पुष्य नक्षत्री होता. कर्तबगार व महत्त्वाकांक्षी भूतपूर्व पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे लग्न व शनी पुष्य नक्षत्री होते, तर लोकशाही वाचविण्यासाठी झगडणारे व अंधारातील प्रकाश के. जयप्रकाश नारायण यांचे लग्नही पुष्यच होते. लोकमान्य टिळकांचे लग्नही पुष्यातच होते. सर्वजण निरनिराळ्या पक्षांचे होते. मग असेनात का? नद्यांचे प्रवाह विविध दिशेला जातात, पण नदी शेवटी सागरालाच मिळते. तसेच पुष्य नक्षत्राच्या सर्व व्यक्ती जनसागरातच विलीन होतात. पुष्य नक्षत्र हे लोक प्रातिनिधिक राजनक्षत्र आहे. नदी जशी आपल्या स्वच्छ व वाहत्या पाण्याने आजूबाजूची गावे सुपीक करते, शेत व बागा फुलवते. तशी पुष्य नक्षत्रावरची माणसे लोकांच्या आयुष्यात आनंद फुलवतात.
पुष्य नक्षत्र मात्र थोडेसे प्रसिद्धीविन्मुखच दिसते. कारण आकाशात ते ओळखता येणे कठीणच असते. हे नक्षत्र दिसण्यात थोडे फिकट आहे. या नक्षत्रामध्ये ३ तारे असून ते त्रिकोणासारखे आहेत. रंग पांढरा व पिंगटसर आहे. त्रिकोणाच्या आकाराच्या या नक्षत्रात मध्यभागी एक प्रकाशाचा ठिपका आढळतो. हा एक प्रसिद्ध तारकागुच्छ असून त्यालाच मधाचे पोळे असे म्हणतात. याच्याकडे छोट्या दुर्बिणीतून पाहिल्यास त्यात सुटे ४० तारे दिसतात. तर प्रभावी दुर्बिणीच्या साहाय्याने पाहिल्यास त्यात ३६३ तारे दिसतात. काळोख्या रात्री हे नक्षत्र डोक्यावर आले म्हणजे ही जाळी स्पष्ट दिसते. पौष महिन्यात हे नक्षत्र रात्रभर दिसते. इजिप्शिअन लोकांनी पोळ्याच्या ऐवजी गुरांच्या गव्हाणीची कल्पना दिली असून ग्रीक लोकांच्या मते मनुष्याच्या शरीरात प्रवेश करणारे आत्मे स्वर्गातून पृथ्वीवर उतरताना या द्वारातून उतरतात अशी समजूत आहे. देवगुरू बृहस्पती यांचा जन्म पुष्य नक्षत्रातच झाला. प्रथम या नक्षत्राजवळ गुरु असता हे नक्षत्र दिसत नव्हते, नंतर गुरु पुढे गेल्यावर या नक्षत्राचा शोध लागला.
पुष्य हे नक्षत्र अत्यंत शुभ, देवगणी व सत्त्वगुणी आहे. या नक्षत्रावर जन्मणारे जातक आनंदी, समाधानी, परोपकारी, उदार, न्यायी, नीतिमान, कायदा पाळणारे, सत्यभाषणी, विद्वान, सदाचारी, ईश्वरभक्त, परमार्थी, समाधानी, लोक कल्याणासाठी झटणारे, समयसूचक, दानशूर, लोकांना सन्मार्गाला लावणारे, महत्त्वाकांक्षी, उदात्त आचारविचार असणारे असतात. पुष्य नक्षत्र हे पराक्रमी व अधिकार देणारे व उच्चपदाला नेणारे आहे. सोन्याच्या संग्रहासाठी हे नक्षत्र चांगले. या नक्षत्रात इतकी संपत्ती आहे की एखाद्या पारड्यात पुष्य याची संपत्ती व दुसऱ्या पारड्यात कुबेराचे भांडार टाकले तरी पुष्याचेच पारडे जड राहील असे मानतात. गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असला म्हणजे होणारा गुरुपुष्यामृत योग तर प्रसिद्धच आहे.
पुरुष व स्त्रिया दोघांनाही पुष्य नक्षत्र अनुकुल आहे. या नक्षत्रावर जन्मलेले पुरुष जातक उंच व भरलेले भारदस्त शरीर व प्रमाणशीर बांध्याचे असतात. अवयव मोठे व गोल, चेहरा भव्य व वाटोळा, प्रसन्न व शांत असतो. कपाळ भव्य असते. अवयव मांसल असतात. शारीरिक उर्जा व रोगप्रतिकारक शक्ती ठीक असते. जातक स्वभावाने शांत, आनंदी, हौशी व रसिक असतात. जातक बुद्धिमान व हुशार असून थोडीशी अधिकारलालसा असते. अधिकार गाजविण्याची किंवा पुढारीपणाची कामे चांगली जमतात.
पुष्य जातक स्त्रियांना तर हे नक्षत्र शरीरप्रकृती, सौंदर्य, संपत्ती, गुण व अधिकार बहाल करते. विशेष म्हणजे हे नक्षत्र स्त्री व पुरुषांत फार भेद करत नाही. कारण या नक्षत्रात स्त्री व पुरुष असे दोघांनाही लागणारे शूर धाडसीपणा, स्वावलंबित्व, कोमलपणा, वात्सल्य, प्रेम इ. गुण प्रदान करते. या नक्षत्रावरच्या स्त्रिया म्हणजे राजाच्या राणी होत. यांचा बांधा उंच व प्रमाणशीर आडवा, भव्य, भारदस्त पण प्रमाणबद्ध, अवयव, पुष्ट, गोलाकार व मांसल असतात. चेहरा सुंदर मोहक, आकर्षक, प्रसन्न, गोड व देवीसारखा असतो. चेहऱ्यावर ज्ञान आणि मोठेपणाची झाक असते. या स्त्रियांचे सौंदर्य त्यांच्या शांत, प्रसन्न व समाधानी चेहऱ्यात असते. स्वभावाने शांत, आनंदी, होशी, रसिक, दयाळू पण वेळप्रसंगी कठोर होणाऱ्या, सत्याची व न्यायाची चाड असणाऱ्या असतात. अंगावर फार ठळक दागिने किवा भरदार वस्त्रे नसली तरी त्यांचे राजतेज लपत नाही. साध्या पोषाखातदेखील त्या सुंदर व आकर्षक दिसतात. विद्येची किंवा अधिकाराची हौस व जागरुक असून वागण्यात विचारीपणा आढळतो. दागिन्यांची किंवा सोन्याची हौस, अनुरूप व योग्य तेवढीच फॅशन करणाऱ्या असतात. असतात. आपले स्त्रीत्व कायम ठेवूनच त्या सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करताना दिसतात. पुष्याची स्त्री म्हणजे एक जगत्माताच आहे.
पुष्य नक्षत्राखाली येणारा वर्ग म्हणजे राजे, युवराजे, सरकारी अमलदार, मोठे अधिकारी, सरकारात मोठ्या पदावर काम करणारा वर्ग, न्यायाधीश, वकील, बरिस्टर्स, सोने, चांदी, हिरे माणकांचे व्यापारी, धनिक शेतकरी, बागवान, शीतपेयांचे व्यापारी, मोठमोठे पुढारी, राजकीय मुत्सद्दी, परदेशी वकील असा धनिक व उच्च अधिकारी वर्ग येतो.
पुष्य नक्षत्री रवि असता शरीरसंपत्ती व अधिकार योगाला चांगला. सदाचारी, ईश्वरभक्त, लोकप्रिय, सार्वजनिक हिताची कामे करणारा, प्रसिद्धी व आपले नाव मागे ठेवणारा होतो.
पुष्य नक्षत्री चंद्र रूप, संपत्ती व सुख अशा सर्वच दृष्टीने अनुकूल असतो. धनवान, हौशी, रसिक व कलाप्रिय असतो. लांबचे प्रवास करणारा असतो.
पुष्य नक्षत्री मंगळ असता शरीर प्रकृतीच्या दृष्टीने कमजोर पण अधिकाराला बरा असतो. गर्विष्ठ, मोठ्यांची निंदा करणारा, भिडस्त असतो. काही वेळा मंगळ इंजिनिअरिंगला चांगला.
पुष्य नक्षत्री बुध असता बांधा फोफसा व आडवा असतो. भक्तिवान, वकील, कायदेपंडित, थोडा ढोंगी, विद्वानांचा द्वेषी असतो.
पुष्य नक्षत्री गुरु फारच चांगला असतो. अवयव पुष्ट व मोठे असतात. चेहरा भव्य व मोठा असतो. पुष्य नक्षत्री शुक्र या नक्षत्रात रूप व धनाच्या दृष्टीने चांगला. मात्र चैनी, विलासी, रंगेल व ख्यालीखुशालीत दंग असणारा असतो. वाहन सौख्यालाही गुरु शुक्र चांगले.
पुष्य नक्षत्री शनी असता शरीरप्रकृती वातुळ असते. साधारण बुद्धिमत्ता, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी, धूर्त पण साहसी, सहनशील, सात्त्विक विचारांचा, नीतिमान व कुटुंबवत्सल असतो. परदेशातील वकिलाती व मुत्सद्दी यांसाठी चांगला.
पुष्य नक्षत्री राहू मात्र फारसा अनुकूल नसतो. शरीरप्रकृती बिघडवतो. त्वचेचे विकार व पोटाच्या विकाराची भीती असते. मानसिक नैराश्य फार येते.
पुष्य नक्षत्री केतू शरीरप्रकृतीला किंवा विदयेला अनुकूल नसतो. केतू हा धार्मिक, दैविक व आध्यात्मिक विधेच्या दृष्टीने चांगला. मंत्रतंत्राची आवड देतो. बुद्धी मंद असते. अति धार्मिक असतो.
पुष्य नक्षत्री हर्षल बुद्धी व संपत्तीच्या दृष्टीने बरा असतो. बुद्धी कल्पक व शोधक असते. चैनी व विलासी असतो.
पुष्य नक्षत्री नेपच्यून शुभ मानला जातो. शरीरकांती चांगली असते. चेहरा भव्य असतो.
पुष्य नक्षत्री नेपच्यून दैविक विद्या, अंतःस्फूर्ती, अंतर्ज्ञान यांना अनुकूल. प्रतिभाशक्ती, कल्पनाशक्ती, कला व संगीत यांना चांगला.
या नक्षत्रावर होणारे आजार फार दाहक नसले तरी दीर्घ मुदतीचे असतात. रोग सुखवस्तू लोकांनाच जास्त होतात. शीत विकार, थंडी, वात, पोटाचे विकार, अपचन, आतड्याचे विकार, मधुमेह, कॅन्सर, स्त्रियांना स्तनाच्या कॅन्सरची संभावना असते. शौचाच्या तक्रारी, जलोदर, पित्त, पंडूरोग, पोटात वात धरणे, आंबट किंवा करपट ढेकर येणे, किंवा रक्तन्यूनतेमुळे येणारा पांडुरता हे संभाव्य आजार होत. खाण्यापिण्यात समतोलता व नियमित व्यायाम ही पथ्ये पाळल्यास आरोग्य चांगले राहते. पाप ग्रह असता अॅपेंडिसायटीस, ट्यूमर किवा आतड्याची कॅन्सरची भीती राहते.
हस्ताक्षर गोल, मोठे व ठळक असते. विशेषतः व, ब, ट, ठ, ळ, श अशा अक्षरातील वळण गोल व मोठे असते. या नक्षत्रावर ४ व ८ या अंकाचे वर्चस्व दिसते. गुरूचा पुष्कराज किंवा चंद्राचा मोती लाभदायक असतो. नक्षत्र अंधलोचनी असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ती वस्तू पूर्वेला शोधल्यास सहज सापडू शकते.
मुहूर्त शास्त्रात या शुभ नक्षत्राचे महत्त्व फार आहे. पुष्य नक्षत्रावर घर किंवा देवालय बांधण्यास आरंभ करणे. राज्याभिषेक, सोने किंवा चांदी, हिरे, माणके, अलंकार अथवा वस्त्रे यांचे नवीन दुकानाचे उद्घाटन, सोने किंवा अलंकार घेणे अथवा धारण करणे. विद्यारंभ, औषध घेणे, मुलांचे नाक व कान टोचणे, नांगर धरणे, बी पेरणे, अग्निहोत्रादी क्रिया, यज्ञमाग, वृक्ष लावणे, मौजी यांना फार चांगले. हे राजनक्षत्र शुभ असले तरी विवाहाला मात्र फारसे अनुकूल नसते. म्हणून पंचांगातही गुरुवारी पुष्य नक्षत्र आले असता गुरुपुष्यामृत सिद्धियोग (विवाहास वर्ज्य) असे लिहिलेले आढळते.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)