
विषय : पुनर्वसू नक्षत्र विचार
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : नक्षत्र ज्योतिष
नमस्कार,
आज आपण पुनर्वसू नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.
७. पुनर्वसू नक्षत्र :
पुनर्वसू नक्षत्र हे नक्षत्र चक्रातील ७ वे नक्षत्र आहे. इंग्रजी नाव ‘पोलक्स’ आहे. नक्षत्राचे दैवत आदिती, नक्षत्र स्वामी गुरु व राशी स्वामी बुध, चंद्र असल्यामुळे या नक्षत्रात आदितीचा उदारपणा, गुरुची बुद्धिमत्ता, बुधाची स्मरणशक्ती व चंद्राचा स्वप्नाळूपणा या गुणांचा सुरेख संगम आढळून येतो. पौष महिन्यात हे नक्षत्र रात्रभर आकाशात दिसते व ठळक आणि सुंदर ताऱ्यामुळे सहज ओळखता येते.
या नक्षत्रामध्ये ४ तारे असून ते डाव्या व उजव्या बाजूला दोन दोन असे समांतर रेषेत आहेत. या ताऱ्यांपैकी डावीकडील (उत्तरेकडील) दोन तारे व उजवीकडील (दक्षिणेकडचा) वरचा तारा असे तीन तारे अतिशय ठळक असून उजवीकडील खालचा तारा थोडा फिक्कट आहे. या दोन ताऱ्यांना कॉस्टर व पोलक्स असे म्हणतात. कॉस्टरचा वर्ण हिरवट पांढुरका व पोलक्सचा रंग नारिंगी असतो. हे चारही तारे दिसण्यात सुंदर असून पाऱ्याप्रमाणे चमकताना दिसतात. या नक्षत्राला स्वर्गाचे महाद्वार असे म्हणतात. कारण सर्व ग्रह पुनर्वसु नक्षत्रांतून जाताना या ४ ताऱ्यांच्या मधूनच जातात. नक्षत्राचा आकार काहीं जन घरासारखा तर काहींच्या मते शंकरपाळ्यासारखा आहे.
फार वर्षांपूर्वीची गोष्ट. देव आणि राक्षस यांच्यात तुंबळ युद्ध सुरू होते. शेवटी युद्धामध्ये देवांचा पूर्ण पराभव झाला. त्यांचे सर्व धन व भूमी गमावल्यामुळे देव निर्वासित झाले. गेलेले द्रव्य व भूमी परत मिळविण्यासाठी व यज्ञासाठी देव भूमी शोधायला निघाले. शेवटी पुनर्वसु नक्षत्रावर देवांनी नवीन जमीन पाहून यज्ञ केला व राक्षसांचा युद्धात पराभव करून गेलेली जमीन व सर्व धन परत मिळविले. या नक्षत्रावर देवांचे परत वसन झाले म्हणून या नक्षत्राला पुनर्वसु नाव पडले.
पुनर्वसु नक्षत्र नावाप्रमाणेच परत वसन करणारे आहे. जर व्यापाऱ्याचे व्यापारात दिवाळे वाजले असेल, कोणी बेघर झाले असेल, कोणाची नोकरी गेली असेल किंवा विधुरता अथवा वैधव्य योग आला असेल व त्यांचे जन्मनक्षत्र पुनर्वसू असेल तर त्यांच्या सर्व गोष्टी परत होतील.
पुनर्वसु हे नक्षत्र सात्विक व शुभ गुणधर्मी आहे. या नक्षत्रावर जन्मलेला जातक खोल बुद्धीचा, धनवान, रसिक, कलेची आवड असणारा, विश्वासू, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, चित्रकला, रंगकाम यांची आवड असणारा, थट्टेखोर, नीतीने वागणारा व दुसऱ्यावर उपकार करणारा असतो. सौंदर्यदृष्टी चांगली असते. हे नक्षत्र रूप, धन, कला व विद्या यांना अनुकूल असले, तरी अधिकाराला फारसे अनुकूल नाही. पुनर्वसु आश्रित नक्षत्र मानले असल्याने थोरामोठ्यांच्या कृपेने व सहाय्यानेच प्रगती करणारे आहे. वेल ही नेहमी झाडाच्या आश्रयानेच पुढे येते.
पुनर्वसु नक्षत्रावर जन्मणाऱ्या जातक पुरुषांचा उंच, सडपातळ व रेखीव बांधा, अवयव लांबट असतात, चेहरा उभट असतो. मात्र शारीरिक जीवन व रोग प्रतिकारक शक्ती कमी असते. हाडापेराने कमी मजबूत व काटकपणा कमी असतो. मात्र हे जातक बुद्धिमान, हुशार, प्रामाणिक, रसिक, हौशी व संतोषी वृत्तीचे असतात. नक्षत्र अनिष्ट असल्यास जातक बडबड्या स्वभावाचे व स्वप्नात रमलेले असतात व प्रत्येक कार्यात अर्धवटपणा असतो.
पुनर्वसु नक्षत्रावर जन्मणाऱ्या जातक स्त्रियांना तर पुनर्वसु नक्षत्र एक देण असते. विनय, वात्सल्य, संसारीपणा, दयाळूपणा, कोमलपणा हे गुण जास्त आढळून येतात. हे नक्षत्र स्त्रियांना सौंदर्य, कला, बुद्धिमत्ता व शिक्षण या सर्वच दृष्टीने चांगले असते. या नक्षत्रावर जन्मलेल्या जातक स्त्रियांचा बांधा उंच, रेखीव अवयव व प्रमाणबद्ध शरीर, पायापासून कमरेपर्यंतचा भाग उंच, तर हात पाय व हातपायाची बोटे लांबट व टोकदारही असतात. चेहरा सुस्वरूप व थोडा स्वप्नाळू भासतो. कपाळ उंच व कपाळावर थोडे केस भुरभुर उडत असतात. डोळे काळे (निळसर झाक) व पाणीदार असतात. चेहऱ्यावर स्वप्नमय भाव दिसतात. भडक रंगाच्या किंवा भरजरी वस्त्रापेक्षा रेशमी व मध्यम रंगाची वस्त्रे तिला प्रिय असतात. दागिन्यांचा फार सोस नसला, तरी गळ्यात एखादी माळ, सोन्याची अंगठी, केसांची कधी वेणी तर कधी मानेवर रुळणारा अंबाडा व त्यावर एखादे टपोरे फूल अशी वेशभूषा असते. बोटांची नखे वाढविण्याकडे व नेल पॉलिशने रंगवण्याची आवड असू शकते. तिचा बांधा वेलीसारखा नाजूक व कमनीय असतो. या स्त्रिया साध्या राहणाऱ्या असल्या, तरी सौंदर्यदृष्टी चांगली असते. व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा, स्वच्छता यांची फार आवड असते. तसेच हस्तकला कौशल्य, गायन, वादन, नृत्य, संगीत, चित्रकला, रंगकाम, भरतकाम, रांगोळी, कशिदा काढणे यात प्रवीण असतात. त्यांच्या चित्रकलेत एक प्रकारचा जिवंतपणा भासत असतो. एखादे चित्र रंगवताना लांबसडक बोटात धरलेला तिचा कुंचला सफाईने फिरतो. वाद्य वाजवत असल्यास लांबसडक बोटे तंतुवाद्यावरून फिरू लागली की, भावसरगम गाऊ लागली की मनाला प्रसन्न वाटते. पुनर्वसुची स्त्री कलेप्रमाणे विद्येतही पारंगत असते. अतिशय हुशार, बुद्धिवान, उत्तम प्रकारची स्मरणशक्ती, एक उत्तम, सुशिक्षित, सुशील, सुंदर, संसारी, कलानैपुण्य असणारी स्त्री होय.
पुनर्वसु नक्षत्र शारीरिक दृष्टीने मध्यम असते. थोडे नाजूक असल्याने अति शारीरिक श्रमाने मलूल होतात. प्रकृती थोडी शीत व वातुळ असते. थंडी, वारा, कफ यांच्यापासून फार त्रास होतो. पोटात गॅसेस होणे, अपचन, ओकाऱ्या, मळमळणे या तक्रारी असू शकतात. छातीत कफ भरणे, दमा, खोकला, फुफ्फुसाचा क्षय, म्हातारपणी कोपरांची किंवा हातापायांच्या बोटांची संधिवाताची भीती असते. भावनाप्रधान व विचार जास्त असल्याने मानसिक रोग, चिंता, नैराश्य, चक्कर व भोवळ या रोगांपासूनही त्रास होतो.
पुनर्वसु नक्षत्राखाली येणारा वर्ग म्हणजे कलाकार, गायक, वादन, हिशेबनीस, पेंटर, चित्रकार, आर्किटेक्ट, शास्त्री, शिक्षकवर्ग, प्रोफेसर, लेखकवर्ग, नाटक- कार, वकील, दळणवळण खात्यात काम करणारे जासूद, फिरते एजंट, दलाल, लहान लहान वस्तूंचे किरकोळ व्यापारी, बुद्धिजीवी वर्ग, सेल्स टॅक्स किवा इन्कम टॅक्स, जमाखर्चाचे स्वतंत्र व्यवसाय करणारे लोक दर्शवते.
पुनर्वसु नक्षत्री रवि या नक्षत्रात कीर्ती, प्रसिद्धी व विद्येच्या दृष्टीने बरा असतो. शरीरप्रकृतीच्या दृष्टीने मात्र मध्यम होय. गुणाला (सत्त्व) पण रवि चांगला,
पुनर्वसु नक्षत्री चंद्र असता तो सौंदर्यबुद्धी व कला यात चांगला. या व्यक्ती रसिक, हौशी, कलाप्रिय, धनवान, विद्वान, लेखक, गायन वादनाच्या शौकीन असतात.
पुनर्वसु नक्षत्री मंगळ असता सडसडीत, उंच, सडपातळ व काटक असतो. मात्र चेहरा जरा उग्र, स्वभाव थोडा कडक व हट्टीही असतो. मंगळ आर्किटेक्ट, इंजिनिअरिंग व मेडिकलला चांगला.
पुनर्वसु नक्षत्री बुध या नक्षत्रात विद्या व बुद्धी चांगली देतो. रूप व बांधा सापा असला तरी अतिशय बुद्धिमान, हुशार, तरतरीत, चुणचुणीत व चुरचुरीत असतात. स्मरणशक्ती उत्तम असते. या व्यक्ती थोड्या विनोदी, खुषमस्कऱ्या, कवी किवा लेखक असतात. तसेच त्या उत्तम शास्त्री, पुराणिक, हरिदास व उत्तम कीर्तनकार होतात.
पुनर्वसु नक्षत्री गुरु या नक्षत्रात रूप बुद्धी यांना चांगला. गुरु असता बांधा उंच, सडपातळ, नाजूक व सुडौल असतो. चेहरा सुंदर असून चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज असते. मात्र शारीरिक प्रकृतीला तो मध्यमच असतो. अंगकाठी बारीक असते. कलेपेक्षा तो विधेला जास्त चांगला. त्या व्यक्ती हुशार, खोलवर बुद्धीच्या व संशोधक असतात. कोणत्याही शाखेतील उपशिक्षण (डिग्री) पूर्ण होते. तो शिक्षक, लेखक, पुढारी यांना चांगला. बांधा रेखीव व सुडौल असतो. कलाकौशल्यात त्या पारंगत असतात. कवी, संगीतकार, नाटककार, नृत्यकला, फोटोग्राफी यांना चांगला. तो फोटोग्राफी, पेंटिंग व चित्रकलेलाही चांगला. शनी असता उंच व काटक बांध्याचा असतो. बुद्धिमान पण खोल विचारांचा व संशोधक वृत्तीचा असतो. तो विचारी, शांत, सावकाश कामे करून घेणारा, खोल मनाचा, चेंगट स्वभावाचा व धडपड्या असतो.
पुनर्वसु नक्षत्री शनी शास्त्र, आर्किटेक्ट, कायदा व अर्थशास्त्र या विषयांना चांगला. शारीरिक प्रकृतीही बरी असते.
पुनर्वसु नक्षत्री राहू या नक्षत्रात रूप व कला यांना चांगला. बांधा सडसडीत, उंच, पीळदार, चेहऱ्यावर बौद्धिक तेज नसले तरी आकर्षकता चांगली असते. डोळे दुसऱ्यावर छाप पाडणारे किंवा मोह घालणारे असतात. फोटोग्राफी, संगीत, चित्रकला, नाट्य यांची फार आवड असते व नैपुण्यही मिळते. बुद्धी कुशाग्र, स्मरणशक्ती, प्रतिभाशक्ती, कल्पनाशक्ती उत्तम असते.
पुनर्वसु नक्षत्री केतू शरीरप्रकृती बरी देतो. बुद्धिवान असल्या तरी धार्मिक, आध्यात्मिक, तत्त्वज्ञान या विषयाकडे जास्त लक्ष असते. कलाकौशल्याला केतू अनुकूल नाही.
पुनर्वसु नक्षत्री हर्षल असताना बांधा उंच, अवयव प्रमाणाबाहेर लांबट असतात. चेहरा सुंदर, संशोधकाचे तेज असणारा पण थोड्या लहरी व विक्षिप्तपणाच्या छटा असतात. वागणे जरा नखरेल असते.
पुनर्वसु नक्षत्री नेपच्यून असता सौंदर्य व कला यांना चांगला. भावना व विकारवशता जास्त असू शकते. अंतःस्फूर्ती ज्ञानधारणा, आत्मसंयमन, दैविक विद्या, तंतुवाद्य यांना चांगला.
पुनर्वसु नक्षत्रावर जन्मलेल्या जातकांचे अक्षर ठळक, सुंदर व उभट असते. लिहिणे भरभर व सहजगत्या असते. नक्षत्रावर ३ व ७ या अंकाचे वर्चस्व जास्त असते. बुधाचा हिरवा पाचू किंवा गुरुचा पुष्कराज अथवा नेपच्यूनचे ओपल ही रत्ने यशदायक असतात.
सुलोचनी नक्षत्र असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास बराच प्रयत्न करूनही मिळत नाही. वस्तू पूर्वेला गेलेली असते. मुहूर्त शास्त्रामध्ये पुनर्वसु नक्षत्र बऱ्याच शुभकार्यांना चांगले आहे. ते चौल, मुंजी, विद्याभ्यासारंभ, औषध घेणे, बारसे, प्रयाण, नवीन वाहन चालवणे, नवीन वस्त्रे धारण करणे, नृत्य किंवा गायन वादनाचे वर्ग सुरू करणे, शिकणे यांना चांगले. विवाहाला मात्र हे नक्षत्र फारसे अनुकूल नाही. चर व तीर्यङ्मुखी असल्याने हलव्यासारखी कृत्ये करावीत. तसेच बीज पेरणे, नांगर धरणे, फुले वेली व फळझाडे लावणे यांनाही चांगले. नक्षत्र पुनर्वसनास चांगले असल्याने सरकारनेही या नक्षत्रावर निर्वासितांचे, धरणग्रस्तांचे पुनर्वसन केल्यास ते यशस्वी होईल.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)