हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे…


विषय : हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे …

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : स्वयंस्फुर्ती व स्व अभ्यास

खरच भारत हे एकमेव राष्ट्र आहे, जेथे अनेक देवदेवता प्रत्येकाच्या हृदयात वास करतात. या देशाला धर्म कार्याची प्राचीन परंपरा आहे. हेच ते राष्ट्र जेथे अनेक प्रेषित जन कल्याणा चे काम अंत्यंत तन्मयतेने आणि भक्तिभावाने कित्येक शतके पार पाडत आले आहेत.आणि चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचेच प्रकाश दानाचे कार्य व समाजातील अंध रुढींचा नायनाट करण्याचे कार्य लखलखत ठेवणार आहेत.

लाखो देशभक्तीपर गाणी असताना नेमके हेच गाणे का आठवले याचे कारण अगदी सोपे आहे. ज्योतिष अभ्यासक म्हटल्यावर त्याला सगळीकडे चंद्र सूर्य, ग्रह गोल असेच दिसत राहते ना…

अशा या विविधतेतून एकता साधणाऱ्या भारत देशाचा राष्ट्रीय ध्वज आहे तिरंगा.

त्यातील पहिला पट्टा आहे केशरी रंगाचा. केशरी रंग प्रतिक आहे त्यागाचा, धैर्याचा, शौर्याचा, ज्ञानाचा.

ज्योतीषी च्या दृष्टीकोनातून केशरी रंग पाहिल्यास सर्व प्रथम डोळ्यासमोर येते ते अग्नी तत्व. अग्नीतत्व आपल्याला असीमित उर्जा दर्शवते. अग्नीतत्वाच्या राशी जरी डोळ्यासमोर आणल्या तर तुम्हाला लक्षात येईल की,

अग्नितत्वाची मंगळाचे अधिकारातील मेष रास जी धैर्य, शौर्य, धाडस प्रदान करते, जी अवघ्या जगाला निक्षून सांगते की येणारा काळात भारताच्या वाटेस जाल तर, अग्नी दिव्यास सामोरे जावे लागेल. कठोर मेहनत, दुर्दम्य आत्मविश्वास, असामान्य धाडस यामुळे आम्हास चंद्र व मंगळ सुद्धा जवळचे वाटू लागतात व अवकाश क्षेत्रातील धडाडी पाहून भलेभले दिग्गज देशसुद्धा अचंबित होताना दिसतात.

अग्नितत्वाची सूर्याचे अधिकारातील सिंह रास जी नेतृत्व गुण, प्रशासकीय योग्यता, ज्ञानसंपन्नता, वैद्यकीय कौशल्य ई. दर्शवते. म्हणून भारत देश हा जगावर नेतृत्व करण्याची क्षमता ठेवतो. फक्त विध्वंसक शस्त्रांनीच नव्हे, तर आज जगाकडे नजर फिरवून बघा आज अमेरिका असू दे, इंग्लंड असू दे नाहीतर आणखीन कोणता देश असू दे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात भारतीय ज्ञान कौशल्याने व प्रशासकीय गुणांनी उच्च पदस्थ म्हणून मिरवताना दिसेल. कोविड सारख्या जागतिक महा संकटात तर भारताने दाखवून दिले की, आमचे औषध निर्माण क्षेत्रातील अफाट बुद्धिमत्ता, वेळेचे व्यवस्थापन, व्यावसायिक कौशल्य व सक्षम नेतृत्व या अंगभूत गुणांनी आम्ही आत्मनिर्भर तर झालोच पण त्या सोबत सूर्याप्रमाणे अवघ्या जगाला मदतीचा हात आम्ही दिला. जे बघून सर्वांचे डोळे दिपले. जगाची भारताकडे पाहण्याची दृष्टीच बदलून गेली. आज विविध जागतिक संघटनाच्या व्यासपीठावर, जागतिक राजकारणात भारताची उपस्थिती नोंद घेण्यासारखी आहे.

अग्नितत्वाची गुरुचे अधिकारातील धनु रास जी ज्ञान, गुरु, अध्यात्मिकता, नैतिकता, प्रगती, कीर्ती, आत्मसंयम ई. दर्शवते. यातून आम्ही जगाला हेच दाखवून देतो की, आम्ही सर्व बाबतीत ज्ञान संपन्न असलो, प्रगतीशील असलो, कीर्ती सर्वदूर पसरत असली तरी आम्ही नैतिकतेची आणि आत्मसंयमाची पाठराखण करतो. खुमखुमी म्हणून किंवा लालसेपोटी कधीच आमचे शक्तीचा माज करत नाही. सायकल वर सुट्टे भाग नेऊन आम्ही महाविस्फोटक अणू बॉम्ब बनवण्याची क्षमता राखत असून देखील अणू बंदीचा पुरस्कार करणारे देखील आम्हीच आहोत. शांती चा सूक्ष्म अर्थ आम्हाला शतकानुशतके आमचे दैवत व प्रेषित, संतवचणे आम्हाला बिंबवत आले आहेत. फक्य आमच्या संयमाची परीक्षा पाहायला जाऊ नका. जशास तसे आम्हालाही वागता येते.

केशरी रंग हा तयार होतोच मुळी सूर्य मंगळाच्या लाल व गुरूच्या पिवळ्या रंगाच्या मिश्रणाने.

मधला पट्टा आहे पांढऱ्या रंगाचा. पांढरा रंग प्रतिक आहे निर्मळता, पावित्र्य, सत्य, विचार स्वातंत्र्य, सहिष्णुता, संयम आणि समर्पणाचा.

हे सर्व गुण पाहिल्यावर चंद्र डोळ्यासमोर नाही आला तरच नवल. केशरी रंग जसे तारा बळ दाखवतो तसे पांढरा रंग चंद्र बळ दाखवतो. चंद्र मातृ कारक आहे. सूर्य पित्याचे कर्तव्य पंर पाडतो, तसे चंद्र मातेचे कर्तव्य पार पाडतो. अग्नीतत्व युक्त तेजस्वीपणा जेवढा महत्वाचा, पण त्या तेजाला संवेदनशीलता, हेतूची निर्मळता, विचारांचे पावित्र्य, संयम आणि सहिष्णुता, मातेच्या हृदयाची आपल्या मुलाबाळांसाठी स्वत:स समर्पित करण्याची वृत्ति हे गुण जोडीस असणारी एकमेवाद्वितीय भारतीय संस्कृती आहे. चंद्र भावनांचा कारक ग्रह आहे. सुजलाम सुफलाम अशा या धरणी मातेला व भारत हि माझी मातृ भूमी आहे हे म्हणताना नकळत आपला ऊर भरून येतो.

जलतत्वाची आठवण करून देणारा चंद्र व त्याचा पांढरा रंग.

जलतत्वाची चंद्राचे अधिकारातील कर्क रास जी मातेच्या मायेचा ओलावा, ममता दर्शवते. एकमेकांच्या भावनेचा व विचारांचा आदर करायला शिकवते.

जलतत्वाची मंगळाचे अधिकारातील वृश्चिक रास जी, मुलांच्या मांगल्यासाठी प्रसंगी मायेचा ओलावा सोडून कठोर बोलणे सुचवते. वेदनेचे, दु;खाचे, अपयशाचे कटू घोट पचवल्याशिवाय, विपरीत परिस्थितीशी सामना केल्याशिवाय, ज्ञानरूपी पित्यासारखी प्रगती, कीर्ती, भाग्य लाभणार नाही हेच मंगळाची पण जलतत्वाची ही रास आपल्याला आईच्या आर्ततेने सुचवत असेल.

एवढे करून मातेचे समाधान झाले तर नवल.

जलतत्वाची गुरुचे अधिकारातील मीन रास जी, प्रसंगी माशां सारखी आपली तडफड बाजूला ठेवून सतत आपल्या मुलाबाळांसाठी सेवा वृत्तीने झटत असते. त्यांना हेच ज्ञानरूपी संस्कार करत असते कि, बाळा आपल्या दोन घासातील एक घास गरजूंना द्यावा. गांजलेल्यांची सेवा करावी. कमाई तील काही हिस्सा दान करावा, तर वासनेने बरबटलेले मन निर्मळ व पवित्र होऊन मुक्त होईल.

एकाच मातेचे किती हे विलोभनीय अविष्कार.

पांढरा रंग हा तयार होतोच मुळी सप्तरंग चक्र प्रवाही गतीने फिरवल्यावर.

तिसरा पट्टा आहे हिरव्या रंगाचा. हिरवा रंग प्रतिक आहे सुफलतेचा, समृद्धीचा, प्रगतीचा, धनिकतेचा, बुद्धी प्रगल्भतेचा,

बुधाचा रंग हिरवा. बुधाची मिथुन रास वायुतत्वाची तर कन्या रास भूमी तत्वाची. भारतीयांनी आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर सर्व ऋतू मानांचा सखोल अभ्यास करून, वायुतात्वाचा लहरीपणा सहन करत, त्याचा शुक्राच्या तुळ राशीप्रमाणे तुलनात्मक अभ्यास करून, शनीप्रमाणे कर्मास प्राधान्य देऊन कन्या राशीप्रमाणे हवामान व जनजीवन याची गणिते मांडून वृषभ राशीचा संयम व कठोर परिश्रम अंगी बाळगत जमीन कसली आणि शनीसारखे लांब पल्ल्याचे उद्दिष्ट ठेवून शेवटी बळीराजाने शेतीमध्ये प्राविण्य मिळवत आपल्या धरणी मातेला पाचूचा हिरवा शालू भेट दिला. भारताला ऋषि प्रधान देश म्हणून गणले जाऊ लागले. या सर्व गोष्टींची आठवण करून देणारा रंग. सर्व तत्वांचा एकत्रित बुद्धी कौशल्याने ज्ञानाची जोड देत आकाशाला गवसणी घातली आणि आकाशाप्रमाणे विशाल यश मिळवले, याचे स्मरण करून देणारा हा रंग.

हिरवा रंग हा तयार होतोच मुळी शनीच्या कष्टात ज्ञानाचा पिवळा रंग मिसळून.

या सर्वांच्या मधोमध अशोक चक्र त्याच्या चोवीस आरे सकट विराजमान आहे. आकाशाचा निळा रंग विशालता, शांती दर्शवते, तर २४ आरे असलेले हे चक्र सम्राट अशोकाप्रमाणे धर्म चक्र किंवा काल चक्र दर्शवते. जे आपल्याला संदेश देते की, २४ तास सतत कार्यरत राहा, प्रगती करत राहा, पण आपल्या मूळ धर्माची कास सोडू नका, तरच तुम्हाला शांती व आकाशाप्रमाणे विशालत्व प्राप्त होईल.

आकाशाचा निळा रंग हा मूळ रंग आहे. म्हटले तर आकाशाचा रंग निळा भासतो, पण मुळात आकाश म्हणजे नक्की काय आहे, पोकळी… जी अमर्याद आहे. कुंडलीत सुद्धा आकाशतत्व हे सूक्ष्म रूपाने असतेच.

असाच आपला भारत विविधतेतून समता साधलेला एकमेव देश आहे. त्यास माझे त्रिवार वंदन..

तर असा हा माझ्या अल्प बुद्धीने आपल्या भारताच्या ध्वजाचा ज्योतिष अभ्यासाशी सांगड घालण्याचा एक प्रयास. कदाचित चुकले असेल काही तर क्षमा करा, पण एवढे मात्र नक्की की, आपल्या मातृभूमीच्या जाज्वल्य अभिमानातून व स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण काहीतरी लिहावे या उर्मीतून अंतस्फुर्तीतून हा लेख झरझर उतरत गेला आहे. बस्स…

आपण सर्वांना  स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

जयहिंद… जय भारत !!!

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment