न्यूरो तंत्रज्ञान आणि ध्यान


विषय : न्यूरो तंत्रज्ञान आणि ध्यान

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : मनशक्ती दिवाळी अंकातील श्री. चंदने यांचा लेख

नमस्कार,

काय ध्यान आहे हा मुलगा… ध्यान कुठे आहे रे तुझे… आत मी ध्यानाला बसणार आहे, मध्ये व्यत्यय आणू नकोस… किती सहज हा शब्द आपण बोलण्यात वापरत असतो.

योगाभ्यासात मनाकडून आत्म्या पर्यंतचा प्रवास हा ध्यानाचा हेतू आहे. आजच्या स्पर्धेच्या, धकाधकीच्या जीवनात अनेक ताण आपल्यावर आहेत. दुसऱ्या बाजूने माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मन भरकटलेलं आहे अशी भावना प्रबळ होते आहे. स्वतःची ओळख आपण विसरत चाललेलो आहोत. एका ठिकाणी एकाग्र होण्याची क्षमता कमी झालेली आहे. या सगळ्यातून मार्ग काढून आपण आत्मशोध घ्यायला हवा. आनंद आणि शांती ही मनाच्या खोल गाभाऱ्यात आहे, तो मनाच्या शुद्धीत आहे. अशुद्ध, विकारसहित आत्मा म्हणजे मन, आणि विकार रहित शुद्ध मन म्हणजे आत्मा. मन आणि आत्मा ह्यात गुणात्मक फरक आहे. एखाद्या काचेच्या चकचकीत ग्लासामध्ये काठोकाठ शुद्ध पाणी भरलं तर लांबून त्या ग्लासामध्ये पाणी आहे हे समजत नाही. परंतु त्यात विविध रंग, गढूळता, मचुळता टाकली तर त्या ग्लास मध्ये पाणी आहे हे आपल्याला समजतं. ग्लासमधलं अशुद्ध पाणी म्हणजे मन, पण त्या पाण्यातली गढूळता, मचूळता काढली तर जे शुद्ध स्वच्छ पाणी राहील तो म्हणजे आत्मा, जो आनंदमय, निर्मळ, निरामय आहे.

तैतेरीय उपनिषदात भृगु ऋषींच्या बालपणाची एक सुंदर कथा सांगण्यात आली आहे. एकदा गुरु आणि वडील वरुण ऋषी यांना त्यांचा शिष्य व पूत्र भृगु शंका विचारतो की, आपण सगळे कशाचे बनलेलो आहोत आणि ह्या सृष्टीचे मूलतत्त्व काय आहे? त्यावर वरुण ऋषीनी ज्ञानोपादेश देऊन त्यांस  सांगितले की,’ ते समजण्यासाठी साठी एकांतात कठोर तप करून आत्मशोध घ्यायला पाहिजे. त्यानुसार  भृगुनी एकांतात तपाचारणाद्वारे आत्मशोध घेतला व वडिलांकडे येऊन म्हणाला,

सगळं विश्व हे अन्नमय आहे. हे विश्व कणांचे म्हणजेच जड (matter) चे बनलेले आहे. सगळ्या वस्तुजाताचं पोषण अन्नाद्वारे (पंचमहाभूते) होतं असून पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश यांचं विश्व बनलेलं आहे. आणि त्याचा लयदेखील अन्नात म्हणजे पंचमहाभूतातच होतो.

भृगु चे हे उत्तर ऐकून आपल्या मुलाला स्थूलाच्या मूलभूत गोष्टीचा शोध लागला यामुळे वरूण ऋषि आनंदित झाले. परंतु ते भृगुला म्हणाले की, ज्याचा शोध लागला आहे, त्यापेक्षाही काहीतरी सूक्ष्म आहे, तू त्याचा शोध घे.

वरुण ऋषींच्या सांगण्याप्रमाणे भृगु खूप संशोधन करून बऱ्याच दिवसांनी परत आले व वरुण ऋषींना सांगितले की, अन्नमय कोषावर ती प्राणाची सत्ता आहे. पंच प्राण हे अन्नमय कोषास हलवतात. प्राण, उदान, समान, व्यान आणि अपान या पंच प्राणांनी अवघी सृष्टी व्यापली आहे.

वरुण ऋषि आपल्या मुलाची प्रगती पाहून आनंदित झाले, पण त्यास म्हणाले की, आता ह्या पंच प्राणांच्या मागे अजून एक सूक्ष्म शक्ती ह्या पंच प्राणाच्या माध्यमातून कार्य करते, याचा तू शोध घे.

भृगु परत एकदा कठोर तप, स्वाध्याय करून आले आणि आत्मशोध सांगितला.

‘मन’ हे या सगळ्याचा स्रोत आहे. मन, मनातल्या इच्छा, भावना, विकार हे ह्या प्राणमय आणि अन्नमय कोषाकडून क्रिया करून घेतात. सुख-दुःख, प्रेम-द्वेष, आवड-नावड ह्या आणि अशा अनेक गोष्टीं ज्या मनोमय कोषाच्या भाग आहेत, त्यातून ह्या सृष्टीचे चलन वलन चालते. ‘मन’ अदृश्य असले, तरी पण तेच या सगळ्याला कारणीभूत आहे.

वरुण ऋषी म्हणाले, तू योग्य मार्गावर आहेस, पण आता ह्या मनोमय कोषावर ज्याची सत्ता आहे, त्याचा तू शोध घे. भृगु पुन्हा तपश्चर्या करून सूक्ष्मतेचा शोध घेऊन परत आले.

” ‘ज्ञान’, ‘विवेक’ जो ह्या मनोमय कोशावर नियंत्रण ठेवू शकतो. हा विवेक, संयम, ज्ञान जिथे जागृत होतं ते ‘विज्ञानमय कोश’.

भृगुना अवगत झालेले ज्ञान पाहून वरुण ऋषी खूष झाले व त्यापुढील जी सूक्ष्मता आहे त्याचा अनुभव घेन्यास सांगितले. या वेळेला भृगु तपासाठी गेले आणि ते खूप दिवस उलटून गेले, तरी पुन्हा आलेच नाहीत. आपला मुलगा अजून का आला नाही हे बघण्यासाठी वरुण ऋषी जंगलात गेले आणि भृगुना बघून आश्चर्यचकित झाले. त्यांना भृगु हे पूर्ण आनंदमय, शांत आणि समतेत आणि परमानंदात विलीन झालेले असे दिसले. नक्की काय शोध लागला हे सांगायला भृगुंचं मी पण संपून गेलं होतं. आनंदमय कोशात ते विलीन झाले होते.

भृगुंनी अनुभवलेली आनंदमय, प्रशांत, शांत अशी अवस्था ही आपल्या अस्तित्वाची खरी अवस्था आहे. ही मनाची उत्कट अशी अवस्था आहे. परंतु मनात गडबड झाली कि समस्या निर्माण होते. याबाबत योगशास्त्रात छान विचार आला आहे. प्रकट होणाऱ्या ‘व्याधी’ ही नंतरची पातळी आहे. व्याधींच्या अगोदरची पातळी म्हणजे ‘आधी’ होय. आनंदमय कोशात व्यक्ती ही संपूर्ण आरोग्यपूर्ण, समतोल अशी असते. मनोमय कोशात पहिल्यांदा विकार, आवड निवड, सुख दुःख हा असमतोल निर्माण होतो. मधुमेह असतानाही पथ्यास न जुमानता गुलाबजाम खायचाय ही इच्छा मनात असमतोल निर्माण करते. ह्या प्रकारच्या विकारग्रस्त असमतोल म्हणजेच ‘आधी’. आधीचं मूळ कारण म्हणजे स्वतःच्या संपूर्ण आनंदमय स्थितीचं अज्ञान. ती आनंदमय स्थिती सोडून विकारांच्या आधीन होऊन ज्या मनाचा ताबा घेऊन तशा कृती करायला भाग पाडतात त्या ‘आधी’. ह्या पातळीवर त्याचे शरीरात म्हणजेच अन्नमय आणि प्राणमय कोशात व्याधींच्या रूपाने तत्काळ परिणाम दाखवत नाहीत, पण हळूहळू ह्या ‘आधीं’ चे प्रकटीकरण शरीरात दिसायला लागत. आणि व्याधीत रूपांतर होतं.

आपल्याला जडणाऱ्या व्याधींपैकी सुमारे ८० टक्के व्याधी या सायको सोमॅटिक म्हणजेच मनोकायिक प्रकारात मोडतात. याचा अर्थ अशा व्याधी की, ज्या निर्माण होण्यासाठी कुठलाही बाह्य विषाणूची गरज लागत नाही. केवळ मनातून, ताणातून, विचारातून निर्माण होणाऱ्या व्याधी त्याला मनोकायिक आजार असं म्हणतात.

ज्या शरीरात व्याधी निर्माण होतात ते शरीर ‘जड’ आहे. जर जड शरीराच्या मागे मन, मनातली ऊर्जा किंवा शक्ती नसेल तर ते निर्जीव आहे. ह्या ऊर्जेच्या किंवा शक्तीच्या माध्यमातून तर मन आपल्या इच्छा शरीराच्या माध्यमातून पूर्ण करू शकतं. आपल्या शरीराची रचना बघितली, तर लक्षात येईल की मन हे शरीराचा राजा आहे. तर मेंदू हा शरीराचा प्रधान आहे. सगळ शरीर मज्जारज्जूला जोडलेले आहे. मज्जारज्जू हा मन मेंदू यामार्फत येणाऱ्या आज्ञा शरीराकडे पोहोचवतो आणि शरीराकडून मिळणारी माहिती मेंदूकडे आणि पर्यायाने मनाकडे पोहोचवण्याचे कार्य करत असतो. थोडक्यात संपूर्ण शरीराची आणि मन मेंदूची मध्यस्थी करण्याचं काम मज्जारज्जूकडे आहे.

आपल्या पूर्वजांनी देखील ही गोष्ट बरोबर ओळखली होती. म्हणूनच त्यांनी मज्जारज्जूतील मुख्य स्थाने म्हणजे चक्र यांना महत्व दिलं. योगशास्त्रातील चक्र ही कल्पित आहेत. ती प्रत्यक्ष दिसत नाहीत. योगशास्त्रातील चक्रे आणि शरीरशास्त्रातील प्लेक्सीस ही शरीरातील महत्वाची ठिकाणं, किंवा असे चौक आहेत की, तेथून माहितीचं, आज्ञांचं, शक्तीचं वहन सगळ्यात जास्त होत असतं. ह्या सगळ्या निरोपाची देवाण घेवाण चालते ती विद्युत शक्तीच्या माध्यमातून. इलेक्ट्रिकल इम्पल्स किंवा विद्युत प्रवाहांचं वहन हे पेशी, मज्जापेशी यांच्या माध्यमातून होतं. ह्या विद्युत शक्तीचं वहन चक्र किंवा प्लेक्सिसच्या ठिकाणी सगळ्यात जास्त असतं. त्या त्या चक्रांना किंवा प्लेक्सेसला शरीराचे ठराविक भाग किंवा ग्रंथी आणि त्याची कार्ये जोडलेली आहेत. त्या त्या चक्रांशी संबंधित शारीरिक मानसिक क्षमता ह्या मुख्यतः त्या चक्रांच्या अखत्यारीतला भाग असतो.

षडचक्र आणि त्याचा शारीरिक आणि मानसिक स्थितीशी संबंध असतो.

१. मूलाधारचक्र :

संलग्न ग्रंथी, अवयव, संस्था, क्रिया : अॅडरेनल ग्रंथी, हालचाल ऊर्जा याचा स्त्रोत, पाय, पावले, अस्थी, मोठे आतडे, मज्जारज्जूचा खालचा भाग, रक्ताभिसरण संस्था

शारीरिक व्याधी : स्थूलता, भूक न लागणे मलावरोध, सायटिका, स्टॅमिना कमी होणे, अशक्तपणा, थंडीशी जुळवणूक करण्याची क्षमता कमी, शारीरिक हालचाली करण्यास त्रास, समन्वय व रक्ताभिसरण समस्या

मानसिक समस्या : भित्रेपणा, निरुत्साह, प्रेरणाहीन, लोभीपणा, अशक्तता, कर्मठपणा, वास्तवाचे भान व जुळवणूकीची क्षमता कमी व अकार्यक्षम

मानसिक क्षमता : जगण्याची उमेद, एखाद्या गोष्टी टिकून राहणे, शक्ती स्थिरता याचा मूळ स्त्रोत.

२. स्वाधिष्ठान चक्र :

संलग्न ग्रंथी, अवयव, संस्था, क्रिया : जनन ग्रंथी, गर्भाशय, जननेंद्रिय, किडणी, मूत्राशय, कंबर ओटीपोटाशी संबंधित अवयव, मोठे आतडे, प्रजननाशी संबंधित अवयव.

शारीरिक व्याधी : जनन व उत्सर्जन संस्था निगडित व्याधी

मानसिक समस्या : सृजनशीलता अभाव, निष्क्रियता, अति कामुकता, अपराध भावना, स्पर्श संबंधित सुख, विवेकशून्य सुख घेण्याची इच्छा, भावनिक आधार शोधणे ई.

मानसिक क्षमता : अति भावनाशीलता, संवेदनशीलता, सृजनशीलता.

३. मणिपुर चक्र :

संलग्न ग्रंथी, अवयव, संस्था, क्रिया : पेंक्रियाज, अॅडरेनल, पचन संस्था, यकृत, गॉल ब्लॅडर, शक्ती निर्मितीचे केंद्र, अन्न शक्तीचे रसशक्तीत रूपांतर करणारे केंद्र, शरीरातल्या संस्थांशी संबंध, चयापचय, पोट, छोटे आतडे, लिव्हर, पेंक्रियाज प्लिहा, प्रतिकारशक्ती, त्वचा, मज्जासंस्था, व्यवस्थित कार्यरत राहण्यास मदत.

शारीरिक व्याधी : पचन विकार, उच्च रक्तदाब, निरंतर थकवा

मानसिक समस्या : न्यूनगंड, निरुत्साह, भित्रेपणा, निष्क्रियता, संदिग्ध, शरणागती पत्करणारा, आत्म प्रतिष्ठेचा अभाव, बळी गेल्याची भावना, अधिकार नसल्याची भावना

मानसिक क्षमता : आशावाद, उत्स्फूर्तता, समंजसपणा, लवचिकपणा, आनंद, विनोदबुद्धी, हास्य, भावनांचे केंद्र, बल आणि सत्ता नियंत्रण भावना, बदल करण्यासाठीची प्रेरणा देणारे, स्वतःमध्ये तसेच आजूबाजूला बदल साधणारे केंद्र, प्रभुत्व गाजवणे, आक्रमकता, अधिकार गाजवणे.

४. अनाहत चक्र :

संलग्न ग्रंथी, अवयव, संस्था, क्रिया : थायमस, फुफ्फुसे, हृदय, रक्ताभिसरण संस्था, हात, सात चक्रांचे मध्यवर्ती चक्र, डायफ्राम, हात, तळवे, श्वसन वाढ व विकास

शारीरिक व्याधी : अस्थमा, हृदयविकार, फुफ्फुसाचे विकार

मानसिक समस्या : असंवेदनशील, अक्षमाशील, कोरडेपणा, अलिप्त राहणे, अंतर राखणे, प्रेमातिरेक

मानसिक क्षमता : समतोल, समानता, प्रेम, बदलाला स्वीकाराची क्षमता, बदलाला संलग्न होण्याची क्षमता, काळजी घेणे, इतरांशी संबंध प्रस्थापित करणे, जुळवणूकीची क्षमता, शिस्त, दैनंदिन कार्यामध्ये बांधीलपणा, स्थिरता आणि शिस्त आणणे, व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित सर्व बाजू, स्वतःचा मार्ग शोधण्याची व सांभाळण्याची क्षमता, शांती, सहनशक्ती, स्वप्नदृष्टी, इतरांच्या गरजा व स्वतःच्या गरजा कळणे, आपली दिशा माहीत असणे, आत्मविश्वास, क्षमाशीलता.

५. विशुद्ध चक्र :

संलग्न ग्रंथी, अवयव, संस्था, क्रिया : थायरॉईड ग्रंथी, पॅराथायरॉईड, घसा, कान, मुख, खांदे, मान, हात

शारीरिक व्याधी : अस्थमा, हृदयविकार, फुफ्फुसाचे विकार, घशाचे विकार, मानदुखी, खांदेदुखी, थायरॉईडच्या व्याधी, मानेचे विकार, कानाच्या समस्या, टॉन्सिल्स

मानसिक समस्या : सृजनशीलता व संवादाचा अभाव, आत्मकेंद्री, नैराश्य, लाजाळू, भिडस्त, समजून व ऐकून घेण्याचा अभाव, अति वाचाळता, अहंगंड, न सुचणे, प्रेरणेचा अभाव, संवाद प्रस्थापित करण्यात अडचणी, व्यक्तित्वात प्रकटीकरण करण्यास अडथळे, व्यक्तित्व दबून राहणे, व्यक्त होण्यास अडचण

मानसिक क्षमता : संवाद, आंतरिक ओळख टेलिपॅथी, वक्तृत्व, सृजनशीलता, आत्मप्रतिष्ठा, संवाद कौशल्य,

६. आज्ञा चक्र :

संलग्न ग्रंथी, अवयव, संस्था, क्रिया : पीनियल, नेत्र, भुवया, कवटीचा तळभाग

शारीरिक व्याधी : दृष्टी मंदावणे, डोकेदुखी, भयंकर स्वप्न पडणे, दृष्टी मध्ये बिघाड

मानसिक समस्या : निर्णयक्षम नियोजन क्षमतेचा व अंमलबजावणीचा अभाव, वैचारिक गोंधळ, नवकल्पना यांच्याबाबतीत अलवचिक, मनोराज्यात रमणे, अति ध्येयासक्त, विचारांवर मळभ येणे, व्यावहारिक निर्णय घेता न येणे, आंतरज्ञानाची किंवा सहजस्फूर्तीने होणारी संवेदना कमी होणे, भयानक स्वप्न पडणे

मानसिक क्षमता : बुद्धी, समज, विश्वास, समजून घेण्याची कुवत, वास्तवाचे विश्लेषणाची ताकद, अंतर्मुखता, नेतृत्व, नेत्र आणि मेंदूचे जाणीवपूर्वक चालणारे काम यावर प्रभाव असणे, ज्ञानेंद्रियांकडून आलेल्या संवेदनांचे माहितीत रूपांतर करणे, स्मृती आणि नियोजनाचे काम, स्थळकाळाचे भान विसरणे, अधिक उन्नत जाणीव, या चक्रात स्थिर स्वरूपाची शक्ती, आंतरस्फुरण, आंतर प्रेरणा, आंतरज्ञान, दूरदृष्टी आणि कल्पकता.

जेव्हा एखादी शारीरिक व्याधी किंवा मानसिक समस्येचा उद्भव होतो तेव्हा त्याचं मूळ मनात असतं किंवा त्या भावना, विकारांमध्ये असतं पण त्याचं प्रकटीकरण त्या त्या चक्रांशी संबंधित अवयवात किंवा भागात होतं. त्या चक्रात असमतोल निर्माण होतो. तो असमतोल सुधारला, तर ती शारीरिक किंवा मानसिक व्याधी कमी होऊ शकते किंवा संपुष्टात येते. त्यासाठी ह्या चक्रांच्या माध्यमातून शरीरातल्या त्या त्या अवयवांशी, कार्याशी, पेशी समूहाशी आणि पेशींशी संवाद साधायला हवा. तसेच तिथल्या शक्तीचं संतुलन करायला हवं.

न्युरो तंत्रज्ञानाचा वापर करून हे संतुलन साधायला सुलभ जाते. व्यक्तींच्या प्रकृती परीक्षणाद्वारे शारीरिक आणि मानसिक ‘आधी’ ‘आणि ‘व्याधी’ काय आहेत ते तपासलं जातं. कफ, पित्त, वात यापैकी कुठलं प्राबल्य आहे तसेच पंचवायू पैकी कुठला वायू दोष आहे हे तपासलं जातं. प्राण, अपान, समान, व्यान, उदान ह्या पंचवायूचा चक्रांशी सुद्धा संबंध आहे. त्यामुळे ह्या सर्व प्रकृती परीक्षणावरून तसेच स्वभाव परीक्षणावरून कुठल्या चक्राशी संबंधित कमी जास्त पणा आहे हे कळतं. त्यानंतर प्रत्यक्ष ध्यानाची प्रक्रिया सांगितली जाते व शारीरिक मानसिक समतोल साधला जातो. शारीरिक आणि मानसिक आरोग्य एका स्थिर पातळीवर येण्यासाठी न्यूरोतंत्रज्ञान उपयुक्त ठरते.

ध्यानाचा मेंदूशी संबंध आहे. आपल्या मेंदूतून सतत मेंदूलहरी बाहेर पडत असतात. इ.इ.जी मशीनवर त्या मोजता येतात. डेल्टा, थिटा, अल्फा, बीटा या मेंदूतून निघणाऱ्या प्राथमिक लहरी आहेत.

१. डेल्टा लहर : १ ते ४ आवर्तन प्रति सेकंद. गाढ झोपेच्या अवस्थेत मेंदूतून निघणारी लहर

२. थिटा लहर : ४ ते ८ आवर्तनं प्रति सेकंद. स्वप्नावस्थेत किंवा ध्यानाच्या अवस्थेत निर्माण होणारी लहर

३. अल्फा लहर : ८ ते १३ आवर्तनं प्रति सेकंद. जागृत, सुख दुःख, जागृत अवस्थेत निर्माण होणारी लहर

४. बीटा लहर : १३ ते ३० आवर्तन प्रति सेकंद संताप, भावनिक उद्विग्नता, चिंता ह्या भावनांमध्ये निर्माण होणारी लहर

ध्यानावस्थेत मेंदूतून निघणाऱ्या लहरींपैकी अल्फा-थिटा लहरीं विशिष्ट प्रमाणात निर्माण होत असतात. ह्या अल्फा-थिटा लहरींचा रेशो मोजला तर, सदर व्यक्ती ध्यानावस्थेत आहे किंवा नाही, तसेच किती प्रमाणात ध्यानावस्थेत आहे हे समजू शकत. बऱ्याच वेळा ध्यान करताना मन भटकत असतं. त्यावेळी अल्फा थिटा रेशो कमी असतो. ज्या वेळी व्यक्ती ध्यानावस्थेत समशांती अनुभवत असते तेव्हा मेंदूलहरीत बदल होतो. अल्फा थिटा रेशो वाढतो. त्यावरून ती व्यक्ती ध्यानावस्थेत आहे किंवा ताणमुक्त समशांत अवस्था अनुभवते आहे, असं समजू शकत.

हे सर्व मोजण्याची यंत्रणा माळवली येथील मनशक्ती केंद्रात उपलब्ध आहे. इ.इ.जी. चा बँड वापरून सहभागी व्यक्तीने ध्यान करायचे असते. ध्यान झाल्यावर ताबडतोब त्या व्यक्तीला प्रत्येक चक्रावर किती टक्के ध्यान झालं, तसंच एकूण किती टक्के ध्यान झाल हे समजतं. त्या व्यक्तीची षड्चक्रांपैकी कुठली चक्र जास्त प्रभावी आहेत, कुठली कमजोर आहेत ते कळतं. कमजोर चक्राच्या ध्यानाची टक्केवारी कमी असते व अशा चक्रावर ध्यान करताना व्यत्यय जास्त येतो आणि मन जास्त विचलित होते. त्या चक्राशी संबंधित साधना करणे, त्या चक्राशी संबंधीत असलेल्या भावना विकारांना संयमित करणे, त्यासाठी त्यागवताचा आधार घेणे अशा उपायांनी व्याधी आणि आधी कमी होतात. बऱ्या होतात.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment