आर्द्रा नक्षत्र विचार


विषय : आर्द्रा नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण आर्द्रा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.

६. आर्द्रा नक्षत्र :

आर्द्रा नक्षत्र हे नक्षत्र चक्रातील ६ वे नक्षत्र आहे. इंग्रजी नाव ‘ग्यामा जेमिनोरम’ असे आहे.

आर्द्रा म्हणजे ओलावा. सूर्य या नक्षत्री आला की, वसुंधरेला भिजवणारा पाऊस पडून जिकडे तिकडे आर्द्रता येते. तप्त होऊन तहानलेली पृथ्वी शांत होते. म्हणूनच या नक्षत्राला आर्द्रा असे नाव पडले. आर्द्रा नक्षत्राचे तारे कोणते धरावेत याविषयी मतभेद आहेत. काही जण मृग नक्षत्राच्या पुढील दोन पायांपैकी पूर्वेकडील पायाच्या तेजस्वी व लाल रंगाच्या ताऱ्यालाच आर्द्रा म्हणतात. तर काहींचे मिथुन राशीतल्या पाच सरळ रेषेतील ताऱ्यांचे जे दोन पुंज आहेत त्यांनाच आर्द्रा म्हणावे असे मत आहे. हे पुंज म्हणजे जणू काही रुद्राने पसरलेले दोन हातच आहेत अशी कल्पना करून या पुंजास बाहू असे म्हणतात. म्हणून आर्द्रा म्हणजे बाहू असेही समजतात.

आर्द्रा नक्षत्र तीष्ण, दारुण, ऊर्ध्वमुखी, मध्यलोचनी व मनुष्यगणी आहे. नक्षत्र चतुष्पाद नक्षत्र असून ४ ही चरण मिथुन राशीत येतात. या ४ चरणांवर अनुक्रमे गुरु, शनी, शनी व गुरुची सत्ता आहे. नक्षत्र स्वामी राहू, राशी स्वामी बुध व दैवत शिव असल्यामुळे या नक्षत्रात राहूचा पराक्रम व कुटीलपणा, बुधाचे चातुर्य व फसवेगिरी व शंकराचा रुद्रावतार व प्रसन्नता अशा सत्व-रज-गुणांचे मिश्रण आढळून येते.

या नक्षत्रामध्ये एकच तारा असून तो तेजस्वी व रंगाने लालभडक आहे. आकृती ठळक (चकाकणाऱ्या) मण्यासारखी आहे. कार्तिक, मार्गशीर्ष किवा पौष महिन्यात ते रात्रभर आकाशात दिसते. तारा तेजस्वी असला तरी हे नक्षत्र साधारण आहे. जाताकांस फार मोठ्या पदाला नेणारे नाही.

नक्षत्र तीष्ण व दारुण असल्याने हे जातक कठोर, निश्चयी, हट्टी, दुराग्रही, कृतघ्न, अविचारी व हिंसक असू शकतात. रंगेलपणा अधिक असू शकतो. प्रसंगी खोटी कामे करण्यास, फसवण्यास व विश्वासघात करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

मात्र बुद्धिमत्तेला व विद्वतेला हे नक्षत्र फारच चांगले. विशेष करून स्मरण शक्ती व पाठांतर शक्ती उत्तम असते. कोणत्याही विषयाचे आकलन यांना चटकन होते. संशोधन करण्याची फार आवड असते. राहूचे नक्षत्र असल्याने यांत्रिक कामाचा उपयोग करावयाचे कलाकौशल्य, फोटोग्राफी, ड्राईंग, कोरीव काम, आर्किटेक्ट यांना चांगले. या नक्षत्राचे दैवत शिव असल्याने शंकराच्या कृपेने (भक्तीने) कृपाप्रसाद देणारे आहे. अचानक लक्ष्मीची प्राप्ती होणे, प्रसंगी एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत मिळणे वा कल्पनेत नसलेली शुभ गोष्ट होणे हे या नक्षत्राचे वैशिष्ट्य आहे. हे जातक बुद्धिमान असले तरी अतिशय स्वार्थी, चैनी, आत्मकेंद्रित, ऐषारामी व लोभी असतात. या व्यक्तींना रेस (घोडे) व पत्त्यांचा जुगार यांचा फार नाद लागू शकतो

या नक्षत्रावर जन्मलेल्या जाताकांची शरीर प्रकृती व बांधा सामान्य असतो. जातक उंच, लांबट, हाडापेराने मजबूत व काटक असतात. शरीरात रक्त व हाडपेर चांगले पण अंगावर मांस कमी असते. सहनशीलता व सोशिकपणा चांगला असतो. शारीरिक शक्ती, जीवनशक्ती व रोग प्रतिकारक शक्ती उत्तम असते. स्त्रियांपेक्षा पुरुषांना या नक्षत्राचे महत्त्व जास्त असते. कारण पुरुषांमध्ये आढळणारे धाडस, साहस, स्वातंत्र्य, प्रेम, शौर्य, धैर्य, अधिकार लालसा व कठोरपणा हे गुण या नक्षत्रांमध्ये दिसून येतात.

स्त्री जातकांना हे नक्षत्र सौंदर्य, स्वभाव व संसाराच्या दृष्टीने फारसे अनुकूल नसते. मात्र शारीरिक व बुद्धिमत्तेच्या दृष्टीने चांगले. बांधा उंच, सडपातळ व काटक असतो. दिसण्यात ऐटबाज असतात. मात्र चेहरा जरा उग्र व रागीट असतो. प्रकृती चिवट असते. डोळे भेदक व तीष्ण असतात. या स्त्रिया स्वभावाने मात्र रागीट व बडबड्या असतात. विशेष करून या नक्षत्रात चंद्र मंगळ किंवा मंगळ बुध एकत्र असता अतिशय हट्टी, भांडकुदळ, तोंडाळ, वाचाळ, मत्सरी व उणेदुणे काढणाऱ्या असतात. क्षुल्लक कारणावरून त्या भांडणे उकरून काढतील व तोंडाचा पट्टा चालू करतील. अशा दोन भांडकुदळ स्त्रिया भांडायला लागल्या, म्हणजे आपल्या कर्कश आवाजाने आजूबाजूचा भाग दणाणून सोडतील. मात्र एखाद्या व्यसनी नवऱ्याला ताळ्यावर आणण्याचे काम त्या चांगल्या प्रकारे करू शकतात.

या नक्षत्राखाली येणारा वर्ग म्हणजे डॉक्टर, आर्किटेक्ट, बँकेत किवा खाजगी कंपनीत काम करणारे हिशेबनीस, फोटोग्राफर्स, हाफकिन इन्स्टिट्यूट किवा इतर वनस्पतीच्या औषधीसंबंधी निरनिराळी संशोधने करणारे संशोधक, रसायनशास्त्रवेत्ते छापखाने, कागद, स्टेशनरी यांचे व्यापारी तसेच लहान

प्रमाणात अधिकार गाजवणारे, अंमलबजावणी खात्यातील लोक, मांत्रिक, चोर, लुटारू, पाकिटमार व दरोडेखोर हे सर्व होत.

टीप : या नक्षत्रामध्ये जे ग्रह किंवा ग्रहांच्या शुभाशुभ युत्या असतील त्यावर वरील फलादेश अवलंबून राहील.

आर्द्रा नक्षत्री रवि फारसा शुभ नसतो. शारीरिक प्रकृती, विद्या, अधिकार योग या सर्व दृष्टीने मध्यमच असतो. स्वभाव क्रोधी व मानासाठी धडपडणारा असतो. बिघडला असल्यास रेस किंवा जुगाराचा नाद लागण्याचा संभव असतो. बऱ्याच वेळा दुःखदायक व अपमानाचे प्रसंग येतात. संकटे फार ओढवतात. आर्द्रा नक्षत्री चंद्र असता बुद्धिमान, हुशार पण स्वार्थी, मतलबी, खर्चिक व चैनी असतो.

आर्द्रा नक्षत्री मंगळ असता हाडापेराने मजबूत काटक असतो. पण स्वभावाने अतिशय कडक, दुराग्रही व हेकेखोर असतो. आर्द्रा नक्षत्री मंगळ शुभ असता स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता अतिशय प्रखर असते. डॉक्टरीकडे जाण्यास हा मंगळ फारच चांगला. त्या खालोखाल आर्किटेक्टला बरा. विद्वत्ता व बुद्धी पण चांगली असते आणि जमाखर्च विषय बरा असतो. मात्र जरा वाचाळ, स्पष्ट व्यक्त, कडक भाषा करणारा व टीकाकार असतो. बिघडला असता स्पष्ट व्यक्त व लोकांना तो फसवणारा असतो.

आर्द्रा नक्षत्री गुरु शरीरप्रकृतीला व धनालाही मध्यम. पण बुद्धिमत्ता व शिक्षणाला चांगला. विशेष करून व्याकरण, भाषा व जमाखर्च या विषयांना, तसेच शिक्षक व ओफेसर या व्यवसायाला बरा असतो. लेखन व प्रकाशन यांनाही बरा.

आर्द्रा नक्षत्री शुक्र शरीरप्रकृती बरी देईल. या व्यक्ती जरा रसिक, आनंदी पण चैनी, विषयासक्त, रंगेल व उधळ्या असतात. शुक्र रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, विज्ञान, आर्किटेक्ट या विषयांना चांगला. प्रेमाची आवड असते. पण प्रेमभंगाचे प्रसंग फार येतात.

आर्द्रा नक्षत्री शनि असता शरीरप्रकृतीने चांगला, सडपातळ, हाडापेराने मजबूत, अतिशय काटक, कणखर व चिवट असतो. बोलण्यात तोतरेपणा अथवा मुकेपणा असा दोष असतो.

आर्द्रा नक्षत्री शनि असता कोपराचा किंवा मनगटाच्या हाडांचा संधिवात. चंद्र-शनि युती असता फुफ्फुसांचा क्षय, दम, पक्षाघात. राहू असता विषारी प्राण्यांपासून दंश वगैरे.

स्त्रीच्या कुंडलीत आर्द्रा नक्षत्री चंद्र बिघडला असता, अनियमित मासिक पाळीचा त्रास व शुक्र बिघडला असता योनिमार्गाचा दाह होतो.

अंकशास्त्राप्रमाणे या नक्षत्रावर ६ किवा ८ या अंकाचे वर्चस्व व कैफियत वाटते. त्यापैकी ८ अंक जास्त पटतो. नक्षत्राचे रत्न राहूचे गोमेद किंवा बुधाचा हिरवा पाचू (पन्ना) आहे. हस्ताक्षर जरा बारीक, ठळक पण टोकदार असते. सरळ रेषेत न काढता जरा तिरके व वेडेवाकडे काढतील. लिहिताना जरा दाबून लिहितील. नक्षत्र मध्यलोचनी असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ती वस्तू दोन महिन्यांनी मिळण्याचा संभव असतो. वस्तू पश्चिमेस सापडू शकते.

मुहूर्त शास्त्रात हे नक्षत्र सर्व शुभ कार्याला वर्ज्य आहे. मात्र हे नक्षत्र दारुण व तीष्ण असल्याने शत्रूचा घात करण्यास, मंत्र तंत्र, जादूटोणा इत्यादी अघोरी विद्या शिकण्यास, पशूंना शिक्षा करण्यास चांगले आहे. नक्षत्र ऊर्ध्वमुखी असल्याने गृह, राजवाडा या संबंधी शोभादायक कृत्ये करणे, घराचा मजला वाढविणे या कार्याला चांगले तसेच सापाचे विष काढणे, लस तयार करणे, विषारी औषधे व केमिकल्स तयार करणे यांनाही चांगले.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment