मूळब्रह्म, मनश्चक्र, शरीरातील तत्त्व व त्रिविध ताप


विषय : मूळब्रह्म, मनश्चक्र, शरीरातील तत्त्व व त्रिविध ताप

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : ॐ हा गुरु

ॐकार हे सर्व विश्व व्यापून आहे. ॐ हेच एक अक्षर ब्रह्म आहे. हा शब्द आपल्याला आत्मस्वरूपाची जाणीव करून देतो. या शब्द ब्रह्माचे अनेक संत विभूतींनी मुक्त कंठाने वर्णन केले आहे.

संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘शब्द हा बहु-उपकाराचा रासी’.

भगवद्गीतेतही ‘शब्द हे परब्रह्म’ असे म्हटले आहे.

संत एकनाथ म्हणतात ‘शब्द हाचि थोर जगताचा आधार’

संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ‘पै ब्रह्मवीजा जाहला अंकुरू । घोष, ध्वनी, नादाकारू। तयाचे भुवन गा जो ॐकारू । तोही मी गा।’

आता हे शब्दब्रह्म ब्रह्मांडापासून पिंडापर्यंत कसे आले ते पहा. मूळ ब्रह्माच्या ठिकाणी ज्ञान अज्ञान नाही. जाणीवेच्या पातळीवर सर्व शून्य आहे. म्हणूनच शून्यास ब्रह्म व पूज्य अशी नवे आहेत. आकाश, प्रकाश, प्रेम हेच मूळ ब्रह्म. या आकाशात शब्द आहे, पण तो प्रकट नाही. जेव्हा तो प्रकट होतो तेव्हा घोष, ध्वनी, नाद होतो व आनंदलहरी निर्माण होतात. ज्यावेळी आनंदाची हालचाल होते, त्यावेळी त्यातून वायू निर्माण होतो, त्यातूनच अहंकार निर्माण होतो व तेच ब्रह्म मायारूपाने जीव बनून गुणांत येते. गुणांतून तत्त्वात येते व तत्त्वातून शब्दात येते. तेच ब्रह्म अष्टदिशांना बाहेर, तेच शरीरात अष्टवृत्ती, परमार्थात अष्टसिद्धी व शरीरातील मनशक्रात, अष्टदशकमळ कसे चालविते ते दिव्य पहा –

१. निर्गुण ब्रह्म : आकाश, प्रकाश, प्रेम ही अजःन शक्ती आहे. याला ज्ञान अज्ञान नाही.

२. जीवब्रह्म : घोष, ध्वनी, नाद यातूनच आनंद व नंतर जीवरूप आकारास येते.

३. मायाब्रह्म : जीवरूपातून अहंकार निर्माण झाला व तो वायुरूपात मिळून मायारूप झाला.

४. गुणब्रह्म : मायारूपाने अहंकार घेतल्याने तीन गुणांत विश्वनिर्मितीची इच्छा झाली.

५. तत्त्वब्रह्म : विश्वनिर्मितीची इच्छा झाल्याने गुणब्रह्मानेच पंचतत्त्वे निर्माण केली.

६. शब्दब्रह्म : या पंचतत्त्वातून जे आकार निर्माण झाले त्यांच्या व्यवहारासाठी हेच शब्दरूपाने नटले.

७. अन्न हे पूर्णब्रह्म : या सर्व अकारी जीवांना जगविण्याकरिता तेच अन्नब्रह्मरूपाने नटले.

८. नादब्रह्म : जगताकार जीव, त्यात नादब्रह्म हीच त्या ब्रह्माची संपत्ती आहे.

सर्व एकातच आहे, तो व मी एकच आहोत. हेच ज्ञान झाले म्हणजे आत्मज्ञान होते. ‘सोऽहं’ या दोघांचा उच्चार करताना मध्ये जो ‘अ’ आहे तोच आत्मा आहे. श्वास घेताना व सोडताना ‘सोऽहं’ असा ध्वनी होतो. म्हणून ‘अहं ब्रह्मास्मि’, ‘अयं ‘आत्मा’ असे म्हटले आहे. ‘अ’ म्हणजे अंतरीचा आत्माराम! हेच गुह्य, हेच आत्मज्ञान व हेच आपले स्वरूप! हे अनुभवाचे बोल आहेत.

संत कबीर म्हणतात, ‘हौ नाही के बीचमें साहेब समा रहा हैं।’

तसेच संत ज्ञानेश्वर म्हणतात, ‘मी तू हा भेद विवेके शोधणे। गोविंदा माधवा याच देही ।”

जोपर्यंत जीवन हे बाह्याधारी असते तोपर्यंत देव भेटणार नाही. याला उदाहरण द्यायचे म्हणजे द्रौपदीचे वस्त्रहरणाच्या प्रसंगी द्रौपदी जोपर्यंत स्वतः बचावाचा प्रयत्न करीत होती तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण गप्प बसले. कारण ती स्वतःचा आधार घेत होती. मात्र शेवटी जेव्हा ती पूर्णपणे निराधार झाली व देवाचा धावा आक्रोशाने करू लागली तेव्हाच देवाने वस्त्रे पुरविली व तिची लाज राखली, म्हणून सर्व काही त्याच्यावर सोपवा.

काम ही मनाची वृत्ती आहे. पण प्रेम ही मनोवृत्ती नाही. प्रेम जीवाचा स्वधर्म- स्वभाव आहे. कोणत्याही वस्तूची अपेक्षा न करता तो आनंद भोगत आहे. प्रेम हे ब्रह्म आहे. आत्म्याच्या ओळखीसाठी हा शब्द आहे. तेच ब्रह्म स्फूरण पावले व नंतर मानसिक ‘आनंदस्वरूप जीव पण तो झाला, तोच या देहात रमला. नंतर जेव्हा त्याला वाटले की आपण या विश्वात अन्य वस्तूंमध्ये आनंद भोगावयास जाऊ. तेव्हा तो आशेने, – मनाच्या द्वारे व इंद्रियांच्या आधारे आनंद लुटण्यामागे सैरावैरा पळत सुटतो; पण क्षणांत आनंद तर क्षणांत दुःख असा अनुभव त्याला येतो. शेवटी त्याला ज्ञान होते की बाहेर भोगात सुख नाही तर त्यागात सुख आहे. बाहेर नाही तर आत आत्मज्ञान आहे व अशा आत्मज्ञानाच्या अनुभवात नित्य आनंद आहे. यास्तव यालाच नित्य ‘सत्यब्रह्म’ म्हणतात. हेच सत्य व जगत् मिथ्या ! म्हणूनच सर्व जीवांवर प्रेम करण्यास शिकले पाहिजे. सर्व जीवांमध्ये तो प्रेमप्रभू सर्वत्र समान आहे हा अनुभव येईल. तो केव्हा तर जेव्हा आपण शुद्ध प्रेमभावाने वागू तेव्हा. म्हणून वाचेने गोड बोला. समदृष्टीने पहा, अंतरी दयाभाव ठेवा. समोर दिसणारे प्रत्येक रूप ‘तोच प्रभू’ या रूपाने नटलेला आहे हे ओळखून वागा. हाच तो शुद्ध प्रेमभाव.

‘जेये ज्याचा भाव लक्षिला । तेथे त्यासि देव भेटला ।’ आता सांगा, ‘तेथे काय उणे आम्हासी ?”

जोपर्यंत अंतःकरण मीलन आहे म्हणजे जो पर्यंत पापवासनायुक्त, विक्षेपसहित व चंचल असते तोपर्यंत आत्मज्ञान होणार नाही.

आता मनःश्चक्राबद्दल काही माहित करून घेऊ.

मनश्चक्र

मनुष्याच्या उजव्या बाजूला स्तन व कंठ यांच्या मधोमध जे हृदय आहे त्याच्या मागे म्हणजे पाठीच्या बाजूला मनश्चक्र आहे. त्याला आठ पाकळ्या आहेत त्याच त्या अष्टवृत्ती व तेच विचार. जागृत अवस्थेत आपले मन याच पाकळ्यांतून भ्रमण करते व पाकळीनुसार वृत्ती उद्भवते.

१) पूर्वपाकळी : रंग पांढरा

येथे मनाने प्रवेश केला असता धैर्य, औदार्य, धर्मबुद्धी, येईल तो लाभ अशा वृत्ती उठतात.

२) आग्नेय पाकळी : रंग रक्त

येथे मनाने प्रवेश केला असता उद्वेग, आळस, निद्रा या वृत्ती उठतात.

३) दक्षिण पाकळी : रंग काळा

येथे मनाने प्रवेश केला असता द्वेष, क्रोध, दुष्टबुद्धी उद्भवते

४) नैऋत्य पाकळी : रंग निळा

येथे संसारासक्ती व स्त्री-पुत्रादिकांविषयी अत्यंत प्रेम या वृत्ती उठतात.

५) पश्चिम पाकळी : रंग धूम्रवर्ण

अज्ञानानंद, हास्य, विनोद व सुखमयता या वृत्ती उठतात.

६) वायव्य पाकळी : रंग श्याम

तीर्थयात्रा, सत्संग या वृत्ती उठतात.

७) उत्तर पाकळी : रंग पिवळा

अष्टभोगांबद्दल प्रिती निर्माण होते.

८) इशान्य पाकळी : रंग गौर

येथे मनाने प्रवेश केला असता कृपा, क्षमा, शांती ज्ञान, किर्तन श्रवण या वृत्ती उठतात.

शरीरातील तत्त्व विभागणी व दैवत

शरीराचा प्रत्येक भाग तत्वांच्या अधिकाराखाली असतो. व प्रत्य्रेक तत्वासाठी एक इष्ट देवता असते.

१.      भूमितत्त्व : पायापासून गुडघ्यापर्यंत, दैवत : चतुर्भुज ब्रह्मा

२.  जलतत्त्व : गुडघ्यापासून नाभीपर्यंत, दैवत : पीतांबरधारी नारायण

३.  अग्नितत्त्व : नाभीपासून हृदयापर्यंत, दैवत : त्रिलोचन महारुद्र

४.  वायुतत्त्व : हृदयापासून भ्रुकुटीपर्यंत, दैवत : सर्वशक्तीमान ईश्वर

५.      आकाशतत्त्व : भ्रुकुटीपासून शेंडीपर्यंत, दैवत : गौरवर्ण महादेव

त्रिविध ताप

त्रिविध ताप ही एक महान शक्ती आहे. त्यातून कोणीही सुटत नसतो. ती शक्ती केव्हा आक्रमण करेल हे कोणालाही सांगता येत नाही. याच शक्ती मध्ये आपण सर्व गुरफटलो आहोत.

संत रामदास म्हणतात, ‘त्रिविध तापे बहु तापलो मी रामराया ।’

आधिभैतिक, आध्यात्मिक व आधिदैविक असे तापांचे तीन प्रकार आहेत.

आधिभैतिक तापाचा संबंध नेत्रांशी आहे. म्हणजेच अग्नितत्त्वाशी आहे. या लोकांना भयानक दृश्य पाहिले असता परिणाम होऊन मृत्यू भय राहते.

आध्यात्मिक तापाचा संबंध वाचेशी आहे. म्हणजे भूमितत्त्व व जलतत्त्व यांच्याशी आहे. या तत्त्वाच्या लोकांना कटू शब्दामुळे परिणाम होऊन दुःख होते व मृत्यू भय राहते.

आधिदैविक तापाचा संबंध कानाशी आहे. म्हणजेच वायूतत्त्वाशी आहे. या लोकांना अचानक वार्ता ऐकून धक्का बसतो व मृत्यू भय राहते.

या तापांपासून मुक्त होण्यासाठी खालीलप्रमाणे साधना कराव्यात.

आधिभौतिक तापाचा संबंध अग्नितत्त्वाशी म्हणजे मेष, सिंह, धनु या राशींशी आहे. या राशींच्या लोकांनी डोळे मिटून हृदयामध्ये ‘राम’ आठवावा.

आधिदैविक तापाचा संबंध वायुतत्त्वाशी म्हणजेच मिथुन, तुळ व कुंभ या राशीशी येतो. या राशींच्या माणसांनी या तापापासून मुक्त होण्यासाठी नासाग्री दृष्टी ठेवून अंतर्मुख होऊन समचरण आठवावे किंवा ‘ळ’ हे अक्षर हृदायात आठवावे.

आध्यात्मिक तापाचा संबंध भूमितत्त्वाशी म्हणजे वृषभ, कन्या व मकर व जलतत्त्वाच्या राशी म्हणजे मीन, वृश्चिक व कर्क अशा सहा राशींशी येतो. या सहा राशींच्या लोकांनी याचेमध्ये ‘हरि ॐ’ म्हणावे.

ॐॐॐ

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment