ऋषी पराशर आणि स्थान विचार


विषय : ऋषी पराशर आणि स्थान विचार

लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : टेक्स्टबुक ऑफ अस्त्रोलोजी

नमस्कार,

पराशर ऋषींनी “बृहत पराशर होरा शास्त्रम्” मध्ये नमूद केले आहे की, ग्रह जातकांस लग्न स्थानाच्या अधिपतीनुसार अनुकूल आणि अनिष्ट परिणाम देतात. त्यांच्या मतानुसार, ५ आणि ९ वे स्थान  अनुकूल परिणाम दर्शवतात. तर ६, ८, १२ आणि ११ वे स्थान हानिकारक आहेत. बाकीची स्थाने परिस्थितीनुसार परिणाम देतील.

पण वेगवेगळ्या कुंडल्यांचा अभ्यास करताना असे आढळून येते की, ६, ८, १२ स्थान आजार, कोर्ट कचेरी, वाद, भांडणे, अडथळे, वासना, मृत्यू, दुर्भाग्य, गैरमार्ग, हानी, चिंता, अपघात इत्यादी वाईट परिणाम देतात.

परंतु ११ वे स्थान चांगले परिणाम देते. ११ वे स्थान अनुकूल असल्याशिवाय जातक काहीही सहज साध्य करू शकत नाही, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. ११ वे स्थानास आपण लाभ स्थान असे मानतो. ६, ८, १२ देखील ११ वे स्थान संबधित असेल, तर काही चांगले परिणाम देतात. ५ आणि ९ वे स्थान कधीतरी प्रतिकूल परिणाम दर्शवतात.

मग पराशर ऋषींनी असा दृष्टिकोन का व्यक्त केला असावा ?

या गोष्टीवर विचार करताना माझ्या असे लक्षात आले की, ऋषी आणि विचारवंत यांचा ओढ आत्मिक, अध्यात्मिक उन्नती करण्याकडे असतो. त्यांना काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपू स्वत:ची असलेल्या सहा भावनांवर विजय मिळवून परमात्मा जो निर्गुण म्हणजेच सत्व, रज, तम रहित असतो, त्याचे प्राप्तीसाठी अवघे आयुष्य समर्पित केलेले असते. सांसारिक बाबींमध्ये रस उरलेला नसतो. हे षड्रिपू त्यांच्या उच्च ध्येयप्राप्ती मध्ये अडसर असतात, ज्या भावनांमुळे मन अशांत होते. व एकचित्त साधना होऊ शकत नाही.

विधात्याने मानवी जीवनाची रचना अशी केली आहे की, सर्वत्र समतोलत्वचा नियम आढळून य्रेतो. त्याला जीवनात एक गोष्ट प्राप्त झाली तर, त्याला दुसऱ्याचा त्याग करावा लागतो. डोंगर आला म्हणजे त्याबरोबरोबर दरी देखील आलीच.

५ आणि ९ वे स्थान यांना अत्यंत प्रिय असते.

५ वे स्थान मंत्र, ग्रंथ, चिंतन उपासना, पूर्वजन्म, संस्कृती, ज्ञान, ई. दर्शवते.

९ वे स्थान भाग्य, उच्च ज्ञान, तत्वज्ञान, धर्म, धर्म श्रद्धा, तीर्थ यात्रा, मंदिर, पुरण, सत्संग, दृष्टांत, पुण्यकर्म, उपासना, गुरु, संशोधन, उपदेश, अध्यात्मवाद ई. दर्शवते.

११ वे स्थान सर्व भौतिक आकांक्षांची पूर्ती, जसे कि पैसा, नफा, अलंकार, सोने, मित्र, आयुष्याचा जोडीदार, संतती ई. प्रकारचे लाभ दर्शवते.

अशा प्रकारचा भौतिक सुखाचा लाभ हा त्यांच्या आध्यात्मिक कार्यात अडथळा असून निरुपयोगी आहे. आत्मिक प्रगती साधायची असेल तर भौतिक गोष्टीत मन रमून कसे चालेल. म्हणून ऋषींनी ते अपायकारक मानले असावे.

ग्रहांची शुभ अशुभता संबंधी ऋषींनी सांगितलेले नियम खालीलप्रमाणे आहेत:

१) त्रिकोन स्थानांचे अधिपती नेहमीच शुभ परिणाम देतात. त्यांची दुसरी रास जरी ६, ८, १२  स्थांनामध्ये जरी पडले तरीसुद्धा शुभ परिणाम प्रदान करतात. त्रिकोणातील ९ वे स्थानाचा स्वामी ५ वे स्थानापेक्षा बलवान असतो. ५ वे स्थानाचा स्वामी लग्न स्थानापेक्षा बलवान असतो.

२) जर त्रिकोन स्थानांचा अधिपती केंद्र स्थानाचा पण स्वामी असेल, तर तो ग्रह योगकारक ग्रह बनतो. योगकर्ता नेहमीच शुभ परिणाम देतो.

३) सर्व केंद्र स्थानांपैकी १० वे स्थानाचा स्वामी सर्व केंद्रस्थान स्वामी पेक्षा बलवान असतो. १० वे स्थानाचा स्वामी ७ वे स्थानाच्या स्वामी पेक्षा बलवान असतो. ७ वे स्थानाचा स्वामी ४ थे स्थान स्वामी पेक्षा बलवान असतो. आणि ४ थे स्थानाचा स्वामी लग्न स्थान स्वामी पेक्षा बलवान असतो. जर केंद्र स्थानाचा स्वामी नैसर्गिक पापग्रह असेल तर, तो शुभ परिणाम देईल. जर केंद्र स्थानाचा स्वामी नैसर्गिक शुभग्रह असेल तर, त्याला केंद्राधिपत्य दोष प्राप्त होतो.

४) ३, ६, ११ या उपचय स्थानांचे स्वामी अशुभ परिणाम देतात. ३ रे स्थान हे ६ व्या स्थानापेक्षा कमी अशुभ परिणाम देते. तर ११ वे स्थान हे ३, ६ व्या स्थानापेक्षा सर्वाधिक अशुभ परिणाम देते.

५) ६, ८, १२ घरांचा स्वामी अशुभ परिणाम देतो.

६) २, ७ वे स्थानाचे स्वामी हे मारक घरांचे स्वामी आहेत. याचा अर्थ असा होतो की, ते मृत्यूदर्शक आहेत.

७) जर चंद्र आणि सूर्य ८ व्या स्थानाचे स्वामी असतील, तर ते इतर ग्रहांप्रमाणे अशुभ नाहीत.

८) जर एखाद्या ग्रहाची मूळ त्रिकोन रास त्रिकोनातच असेल आणि दुसरी ६, ८, १२ स्थांनामध्ये असेल तरी ग्रह शुभ परिणाम देईल. या उलट जर एखाद्या ग्रहाची मूळ त्रिकोन रास ६, ८, १२ स्थांनामध्ये  असेल आणि दुसरी त्रिकोनात असेल तरी ग्रह अशुभ परिणाम देईल.

९) लग्नेश त्रिकोण आणि केंद्र स्वामी असल्यामुळे, नेहमी शुभ परिणाम देतो. जर लग्नेश हाच ८ व्या स्थानाचा स्वामी असेल तर तो शुभ परिणाम देतो.

उदा. मेष लग्नास ८ वे स्थानी वृश्चिक रास येते, येथे त्यांचा स्वामी मंगळ शुभ परिणाम देईल.

तूळ लग्नास ८ वे स्थानी वृषभ रास येते, येथे त्यांचा स्वामी शुक्र शुभ परिणाम देईल.

१०) बाधक स्थानांचे स्वामी देखील मृत्यूदर्शक आहेत.

हे सर्व सांगायचे तात्पर्य एवढेच की, एखाद्या जातकाची कुंडली तपासताना तो ऐहिक प्रगती साधू इच्छितो की भौतिक प्रगती साधू इच्छितो हे जाणून घेऊन व कुंडलीत कोणत्या स्थानी कोणता त्रिकोण येत आहे (धर्म त्रिकोण, अर्थ त्रिकोण, काम त्रिकोण, मोक्ष त्रिकोण) त्यांचे स्वामी कोठे स्थित आहेत या सर्वाचे नीट अवलोकन करून त्यानुसार जातकास फळ सांगावे. कोणता नियम कोठे वापरायचा याचे आकलन सर्वात महत्वाचे आहे.  

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment