
विषय : रोहिणी नक्षत्र विचार
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : नक्षत्र ज्योतिष
नमस्कार,
आज आपण रोहिणी नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.
रोहिणी हे नक्षत्रचक्रातील ४ थे नक्षत्र आहे. या नक्षत्राचे ४ ही चरण वृषभ राशीत येत असल्याने हे नक्षत्र चतुष्पाद नक्षत्र आहे. तसेच ते स्थिर उर्ध्वमुखी व अंधलोचनी आहे. नक्षत्रांचे कारकांश वृषभ राशीच्या १० ते २३ २० पर्यंत आहे. इंग्रजी नाव ‘आल्डेबरान’ आहे. या नक्षत्राच्या ४ चरणांवर अनुक्रमे मंगळ, शुक्र, बुध व चंद्राचे अधिपत्व आहे.
रोहिणी नक्षत्राचा आकार इंग्रजी V सारखा दिसतो. या नक्षत्रात ५ तारे असून यातील मुख्य तारा थोडा लाल आहे. हे ५ ही तारे ठळक असून अतिशय तेजस्वी, सुंदर व उठून दिसणारे आहेत. तारे रंगाने थोडेसे लाल व पिवळसर आहेत. ब्रम्ह या नक्षत्राचे दैवत आहे. राशी स्वामी शुक्र व नक्षत्राचा स्वामी चंद्र असल्याने या नक्षत्रात शुक्राचा मोहकपणा, सुंदरता, कोमलपणा व चंद्राचा आनंदीपणा, लावण्य, शांती यांचा सुरेख संगम दिसून येतो. हे नक्षत्र चंद्राचे अतिशय आवडते असल्याने साहित्यामध्ये चंद्र- रोहिणीचा संबंध दांपत्यासारखा सारखा केलेला आढळतो. महिन्यातून एकदा चंद्र आपल्या लाडक्या रोहिनीशी जवळीक साधून जातो, हे अतिशय विलोभनीय दृश्य दिसते.
रोहिणी या शब्दाचा अर्थ आरोहण असा आहे. या बाबतीत असे सांगितले जाते की, या नक्षत्रातील मुख्य लाल तारका स्वर्गात जाण्यासाठी एकसारखी वरवर चढत गेली म्हणून तिला रोहिणी म्हटले आहे. दुसरी एक आख्यायिका अशी आहे की, रोहिणीच्या सौंदर्यावर लुब्ध होऊन प्रजापतीने हिचा पाठलाग केला म्हणून ती रागाने लाल झाली. असेही सांगण्यात येते की, रोहिणीचा प्रियकर चंद्राच्या तिच्यावरील उत्कट प्रेमाने ती lajjiत होऊन आरक्त झाली. रोहित शब्दाचा अर्थ लाल असा आहे.
रोहिणी ही शांत व आनंदी आहे. कारण तिचा चेहरा रागाने लाल नव्हे, तर ते लाजून गुलाबी झालेला आहे.
रोहिणी नक्षत्र अतिशुभ, प्रचंड कार्य करणारे व सिद्धी देणारे मानले जाते. आकृती V सारखी म्हणजेच कोणत्याही कार्यात विजय (Victory) मिळवून देणारी आहे. रोहिणी हे असे नक्षत्र आहे, जे शारीरिक, मानसिक व ऐहिक सौख्य आणि सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्रदान करते. रोहिणी नक्षत्रावर जन्मलेल्या जातकाचे व्यक्तिमत्त्व शांत, सालस, आनंदी, रसिक, विलासी, विद्वान, चतुर, मधुर भाष्य, संगीत, कलेची फुलांची व सुगंधी अत्तरांची आवड असणारे, भावनाप्रधान तरी विचारी व विवेकी असते. जातकाची बुद्धी व विचार स्थिर असतात. प्रेम, प्रणय, वाहनसुख व अलंकार ई.साठी रोहिणी नक्षत्र अनुकूल असते. या नक्षत्रावर जन्मणाऱ्यां जातकांचा बांधा सुंदर असतो. हे जातक मध्यम उंचीचे व सशक्त असतात. चेहरा तेजस्वी व मोहक असतो.
पुरुषांपेक्षाही स्त्रियांना रोहिणी नक्षत्र हे खूप चांगले आहे. या नक्षत्रात चंद्र व शुक्र असता ते स्त्रियांना लावण्यवती बनवतात. या स्त्रिया जन्माने अतिशय सौंदर्यवान किंवा श्रीमंत घराण्यातील असू शकतात. जुन्या ग्रंथात रोहिणीचे केलेले वर्णन फार बोलके आहे. एक अतिशय धनवान व भरल्या घरातील, भव्य वाड्यात राहणारी मालकीण, जिचे घर धन धान्य व फळाफुलांनी भरलेले आहे. जिच्या गोठ्यात अनेक गाई-म्हशी आहेत, दाराशी हत्तीची अंबारी डुलत आहे. घरामध्ये सोने-नाणे व अलंकार आहेत. हाताखाली चोकरचाकर आहेत. घरात मुलेबाळे, सासुसासरे आहेत असे केलेले आढळते. आपण हे वर्णन तारतम्म्याने घेणे गरजेचे आहे. आजची आधुनिक रोहिणीही दिसायला सुंदर, बंगल्यात किंवा फ्लॅटमध्ये किंवा सुखवस्तू कुटुंबात राहत आहे. तिच्या दारात सुंदर मोटार आहे. घरात रेफ्रिजरेटर, टेलिव्हिजन, उंची वस्त्रे व अलंकार आहेत ई.
या नक्षत्रावर जन्मणाऱ्या स्त्रि जातकांचा बांधा गोंडस असतो. त्या अंगाने भरलेल्या असतात. शरीर मांसल व गुबगुबीत असू शकते. मांड्या, पोटऱ्या, दंड, मनगटे ई. पुष्ट व घाटदार, गोलाकार, चेहरा गाल रुंद, गोल व भव्य, सुंदर व पाणीदार मोठे डोळे, काळे व लांबसडक केस असे असू शकते. रोहिणी नक्षत्राच्या स्त्रियांना उंची वस्त्रे व सोन्याचे दागिन्याची आवड आणि मोह असतो. अंगभर दागिने, पूरक रंगाचे उंची शालू, पैठण्या, साड्या याची आवड असते. खोट्या व कृत्रिम अलंकारापेक्षा सोन्याचे खरे व खुलून दिसणारे भारी अलंकार समारंभात मिरवणे त्या पसंत करतात. साध्या मंगळसूत्राप्रमाणे गळ्यात चपलाहार, मोहनमाळ किंवा मोत्याचा कंठा, कमरेला कमरपट्टा, दंडाला वाकी, हातात घाटदार बांगड्या किंवा तोडे, सोन्याच्या पाटल्या, घड्याळाला सोन्याचा पट्टा, चष्मा असल्यास त्याला सोनेरी फ्रेम, बोटात दोन-तीन अंगठ्या, लांबसडक केसांचा अंबाडा व अंबाड्यावरही भरगच्च अशा दोन-तीन वेण्या अशी स्त्री रोहिणी नक्षत्र जातक असण्याची जास्त संभावना असते.
रोहिणी ही शांत व आनंदी असली पण रोहिणी जातकाना आपल्या रूपाचा फार गर्व असून आपल्यापेक्षा दुसरे कोणी सुंदर नाही असेच वाटते. सहसा आपल्यापेक्षा कमी सौंदर्यवान स्त्रियांत व गरीबवर्गात त्या मिसळणे टाळू शकतात. रोहिणी ही मालकीण आहे. नोकर नाही. स्वतः काम करण्यापेक्षाही हाताखालच्या हुकुम करून नोकराकडून काम करून घेणे हे जातक पसंत करतात. यांना श्रमाचा थोडा कंटाळा असून जरा सुस्त असू शकतात. रोहिणी जातक स्त्रिया ऑफिसमध्ये नोकरीला असतील, तर घरी आल्यावर स्वयंपाक करणार नाहीत. स्वयंपाक, घरकामासाठी असलेल्या नोकरांनी घरी आल्यावर स्वयंपाक तयार ठेवला पाहिजे. नसेल तर बाहेर जेवणे वा बाहेरून पदार्थ मागवणे अशी मानसिकता असू शकते.
रोहिणी नक्षत्राच्या अधिकारात फुलांचे व्यापारी (चाफा, चमेली, मोगरा, गुलाब वगैरे) धनिक शेतकरी, धान्य सोने-चांदी, अलंकार, उंची रेशमी वस्त्रे, अत्तरे, सुगंधी पदार्थाचे व्यापारी, जवाहिरे, गुरेढोरे पाळणारे, दूध-दुभत्याचे व्यावसायिक, सुशिक्षित समाजवर्ग, शेतकीविषयक व भौतिक शास्त्राचे पदवीधर, सिनेमा व नाटकात काम करणारे नटनट्या येतात. हे नक्षत्र रोख पैसा देणारे असल्याने द्राक्षे, मोसंबी, ऊस, चिक्कू, आंबे अशा बागायतीला अनुकूल आहे. कमी कष्टात भरपूर मोबदला हा या नक्षत्राचे फलादेश आहे.
रोहिणी नक्षत्राचा प्रभाव स्वर, गळा व घशावर आहे. या नक्षत्रावरच्या लोकांना फळे, फळांची सरबते, शीत पेये व गोड पदार्थ फार आवडतात. यामुळेच यांना होणारे आजार गळा किंवा घशाचे रोग, सर्दी, कफ, घसा बसणे, सुजणे, घटसर्प, टॉन्सिल वाढणे, पोटात गॅसेस धरणे, हवामानातील बदलामुळे तब्येत बिघडणे, शरीरात साखर उत्पन्न होऊन मधुमेह (उत्तरार्धात) होणे अशा प्रकारचे असतात. परंतु रोहिणी नक्षत्रावर होणारे आजार फारसे दाहक किंवा तीव्र नसून सौम्य पण सारखे उद्भवणारे असतात. या जातकांनी आहार व वागण्यामध्ये नियमितपणा ठेवल्यास व व्यायामाची सवय लावल्यास ठणठणीत राहतील.
सर्वसाधारणपणे या नक्षत्रात बहुतेक सर्वत ग्रह शुभ फळे व थोडे तरी धन देणारे आहेत.
रोहिणी नक्षत्री रवि उत्तम शरीरप्रकृती देतो. धनिक शेतकरी, बागवान, सरकारी अमलदार तसेच मानमान्यता यांना चांगला.
रोहिणी नक्षत्री चंद्र यश, सौंदर्य, शांतता, ऐश्वर्य, रसिकता, व्यापार, शेती, दलाली व वाहनसौख्य चांगले देतो.
रोहिणी नक्षत्री मंगळ शेतीवाडी, जमीनजुमला, दुभती, गुरेढोरे पाळण्यास किंवा वाहन अथवा वस्त्रासंबंधी यांत्रिक कामाचे शिक्षण ई. प्रदान करतो.
रोहिणी नक्षत्री बुध व्यावहारिकपणा, सर्व वस्तूंची विशेषतः धान्य व वस्त्रांच्या व्यापारातील दलाली, किरकोळ व्यापार तसेच चतुरपणा, हिशेबीपणा देतो. शिक्षणासाठीही बुध अनुकूल.
रोहिणी नक्षत्री गुरु उत्तम बुद्धिमत्ता, वाणिज्य व निरनिराळ्या शास्त्रातील उच्च शिक्षण, लेखन, काव्य, सौंदर्य, ऐश्वर्य, मानसन्मान व संसारसुख देतो.
रोहिणी नक्षत्री शुक्र सौंदर्य, भोग, अलंकार, वाहन सौख्य, ऐश्वर्य, विलास, गायन, वादन ई. कला, समाजप्रियता देतो. चंद्र, शुक्र या नक्षत्रात असल्यास या स्त्रि जातकांना हवाई सुंदरी अथवा मॉडेलिंग क्षेत्रासाठी चांगला असतो.
रोहिणी नक्षत्री शनि असता स्थिर बुद्धी, मोठा व्यापारी विशेषतः कापड, धान्य व लॉटरी, कॉन्ट्रॅक्टर तसेच मोठ्या प्रमाणावर शेतीवाडी, जमीन व गुरेढोरे असणारा असतो. शास्त्र, व्यापार अथवा इंजिनिअरिंग शिक्षणासाठी चांगला.
रोहिणी नक्षत्री राहू गावी शेतीवाडी, जमीनजुमला व इस्टेट देतो. तसेच मेंढपाळ अथवा गुरेढोरे व म्हशी बाळगण्यासाठी चांगला असतो. शास्त्रीय तसेच स्थापत्य शास्त्राच्या शिक्षणासाठी अनुकूल असतो. गावात वजनदार व्यक्ती म्हणून नावलौकिक असू शकतो.
रोहिणी नक्षत्री केतू फारसे नाही, पण उत्तम शरीरयष्टी व गरजेपुरते धन देईल.
रोहिणी नक्षत्री हर्षल असता विलक्षण बुद्धी, संशोधक, जरा रसिक, आनंदी व थोडीफार मालमत्ता करणारा असतो.
रोहिणी नक्षत्री नेपच्यून शांत व आनंदी स्वभाव, संगीताची व सौंदर्याची आवड, तसेच साक्षात्कार व ईश्वरभक्ती यांना अनुकूल असतो.
रोहिणी नक्षत्र सुंदर व तेजस्वी असल्याने हस्ताक्षरही मोठे, गोल, वळणदार व सुरेख असते. या नक्षत्रावर २ व ६ या अंकाचे वर्चस्व आहे. आणि रत्न चंद्राचा मोती किंवा शुक्राचा हिरा आहे. नक्षत्र अंधलोचनी असल्याने या नक्षत्रावर एखादी वस्तू हरवल्यास, ती थोड्याच प्रयत्नाने व जवळच सापडू शकते.
मुहूर्त शास्त्रात रोहिणी हे तर महत्वाचे नक्षत्र आहे. मुंजी, विवाह, बारसे, नवीन वस्त्र नेसल्यास किंवा सोन्याचे अलंकार अंगावर धारण करण्यास, अलंकार करावयास देण्यास, नवीन वाहन किंवा सुखसोयीच्या वस्तू विकत घेण्यास तसेच गायन, वादन व कलाकौशल्याची कामे शिकण्यास फारच चांगले. स्थिर नक्षत्र असल्याने पायाभरणी, शिलान्यास, कोनशिला बसविणे, वास्तुशांती किवा गृहप्रवेश, ई कार्यासाठी शुभ असते. ऊर्ध्वमुखी असल्याने शोभादायक कृत्ये, घरावर मजला चढवणे, देवळावर कळस चढवणे ही कार्ये करणेस चांगले. शेतकरी वर्गाला बी पेरण्यास, बागायतदार, फळाफुलांचे व सुगंधी वस्तूंचे व्यापारी यांना नवीन व्यवसाय किंवा दुकान सुरू करण्यास उत्तम.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)