
विषय : गुप्त धन अथवा अकल्पित धन योग
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : जातक निदान
नमस्कार,
माणसाला पूर्वापार गुप्त धन अथवा अकल्पित धन योग, लॉटरी अशा धनाचे थोडक्यात विनाकष्ट मिळणार्या धनाचे नेर्हमीच आकर्षण वाटत आले आहे. आज त्या विषयीच काही माहिती आपण घेणार आहोत. जातक निदान या ग्रंथात सायन व परीभ्रमण पद्धतीने यावर विपुल लिखाण आहे. पण निरयन पद्धतीला देखील हि फळे चपखल बसतात, असे मला वाटते.
जन्मकुंडलीतील २ रे स्थान व ११ वे स्थान स्वतःच्या नोकरी व्यवसाय धंद्याच्या द्वारे, कर्तबगारीने मिळणारा पैसा दर्शवते. परंतु गुप्त धन, अकल्पित धन, लाचलुचपतीतून मिळविलेले पैसे, स्त्री धन, वारसा संपत्ती ई. पाहताना ८ वे स्थानाचे परीक्षण केले पाहिजे. २ रे स्थानापासून हे स्थान ७ वे येते. म्हणजे धनस्थानाची पूर्तता ८ वे स्थान करते. ७ वे स्थानापासून हे स्थान २ रे आहे जे स्त्रीचे धनस्थान आहे. म्हणून स्त्री धन, सासऱ्याकडून मिळणारा पैसा ई. दर्शवते. अष्टमेश सप्तमस्थानी किंवा सप्तमेश भाग्यस्थानी असावा लागतो.
८ वे स्थान मृत्युस्थान मानले जाते. म्हणून मृत्यूपासून, मृत्यूपत्रानुसार मिळणारे पैसे, विमा ई. दर्शवते. एखाद्या नातेवाईकाच्या मृत्यूपासून किंवा सासऱ्याकडून पैसा मिळण्याची शक्यता असते. ह्या पैकी कोणताही ग्रह ८ वे स्थानी स्वगृही असेल अगर मित्रगृही असेल, तर अकल्पित धन मिळण्याची शक्यता जास्त बळावते.
गुरु, चंद्र व शुक्र हे ग्रह गुप्तधन देण्यास समर्थ आहेत. जन्मकुंडलीमध्ये ८ वे स्थानी गुरु, चंद्र व शुक्र हे ग्रह, अष्टमेश २ रे स्थानी व पंचमेश ११ वे स्थानी अशी स्थिती असेल, तर अशा जातकास नोकरीमध्ये विशेष श्रम न करता अथवा लाचखोरीने प्राप्ती होते.
अष्टमस्थानी असणाऱ्या ग्रहावर जर शनि, हर्षल, मंगळ यांचा काटकोन योग अगर प्रतियोग असेल, तर वारसा मिळण्याचे अगर अकल्पित धनलाभाचे कामी अडथळे येतील व वारसाची पूर्ण रक्कम अगर संपूर्ण इस्टेट मिळणार नाही. शनि, हर्षल, मंगळ यांपैकी एखादा ग्रह अष्टमातील ग्रहांशी युतित असेल व ती युति स्वगृही अगर मित्रगृही नसेल, तर त्या योगाचा नाश होईल व ही युति अनुकूल राशीत असेल तर वारसा, धन वगैरे मिळेल; परंतु पुष्कळ संघर्षाने मिळेल.
गुरु-चंद्राची युति अगर चंद्र-शुक्राची युति अष्टम स्थानी असेल तर अकल्पित द्रव्यलाभास फार उत्तम असते. या योगावर कोणत्याही ग्रहाची अशुभ दृष्टि नसेल, तर मात्र लॉटरीमध्ये मोठे घबाड हाती लागण्याचा संभव असतो. स्वगृहीचा अगर उच्च राशीचे गुरु, चंद्र, शुक्र हे लॉटरीचे बाबतीत फार अनुकूल असतात.
हे ग्रह केव्हा फल देतील हे फार महत्त्वाचे असते.
अष्टम स्थानी गुरु असेल तर त्याचे फल १२, २४, ३६, ४८, ६० ह्या वर्षी मिळू शकते.
शुक्र असेल तर ८, १६, २४, ३२, ४०, ४८, ५६ ह्या वर्षी मिळू शकते.
शुक्र असेल तर प्रत्येक चवथे वर्षी तसा योग येईल. (चंद्राचा परिभ्रमण योग चार वर्षांचा आहे)
अष्टम स्थानी राहू, केतू असणे गुप्त अगर अकल्पित द्रव्यलाभास फार वाईट. राहू येथे मिथुन राशीचा असेल तर मात्र बरा. इतर राशीचा राहू असेल तर अकल्पित लाभाचे आलेले योग नाहीसे होतील. अष्टम स्थानी राहू असता स्त्री धन मिळण्याची मुळीच आशा नाही.
अष्टम स्थानी केतू असणे दारिद्र्य योग आहे.
अष्टम स्थानी बलहीन अगर अशुभ दृष्टियोगात असलेला शनि गुप्त धन देणार नाही. शनि बलवान असेल तर शेतीचा वारसा मिळेल. बलहीन शनि वृद्धापकाळी दारिद्र्य देईल. स्वतःचे जीवित दुसऱ्यावर अवलंबून असेल.
अष्टम स्थानी मंगळ गुप्त धनास प्रतिकूल. अशा लोकांनी लॉटरीची तिकिटे घेऊ नयेत.
अष्टम स्थानी कन्या अगर मिथुन राशीचा बुध अकल्पित द्रव्यलाभास फार चांगला असतो. स्त्रीधन वगैरे मिळतेच, परंतु सट्ट्याच्या व्यापारात फायदा होतो.
अष्टम स्थानी हर्षल अशा कामास मुळीच अनुकूल नाही. येथे हर्षल मकर, कुंभ अगर मीन राशीच्या जोरदार ग्रहांच्या दृष्टित असेल तर लॉटरीमध्ये अकल्पित लाभ होईल, कोणा नातेवाईकाच्या अकस्मित मृत्यूमुळे फायदा होईल; परंतु सर्वसाधारणपणे हर्षल प्रतिकूल समजावा.
हर्षल अष्टम स्थानी असताना व तो हर्षल शुभदृष्टि संबंधात असेल तर वारसा वगैरे मिळण्याचा संभव असतो. अनपेक्षित लाभ होतील; परंतु हर्षल हा ग्रह विलक्षण गुणधर्माचा असल्याने चांगली अगर वाईट फले केव्हा मिळतील हे निश्चित नसते. अष्टमेश हर्षल असता (अष्टमात मीन राशि असेल तर) अगर अष्टमात हर्षल असता असा प्रसंग येतो, त्यात धोका होण्याचा संभव असतो. त्याप्रमाणेच अशा लोकांनी भांडणाच्यामध्ये जाऊ नये अगर दंगा असलेल्या ठिकाणी देखील जाऊ नये.
नेपच्यून ह्या ग्रहाचा संबंध अष्टमस्थानी असता अकल्पित धनलाभाचा योग येत नाही; परंतु एखादे वेळी असा योग दुसऱ्या ग्रहामुळे आल्यास दुसरा कोणीतरी कपट करून अगर विश्वासघात करून पैसा लाटेल. अष्टमस्थानी नेपच्यून असताना केमिस्ट अगर ड्रगिस्टकडून औषधे घेताना काळजीपूर्वक घ्यावीत. औषधामध्ये प्रामाणिक चूक होऊन प्राण गमविण्याची पाळी येते.
वार्षिक कुंडलीमध्ये जेव्हा रवि, शुक्र, गुरु जन्मतः अष्टम स्थानी असलेल्या ग्रहांशी शुभ योग करतील तेव्हा अकल्पित द्रव्यलाभाचे जन्मत: असलेले योग उत्तेजित होतील.
अष्टम स्थानी रवि अकल्पित द्रव्यलाभास अनुकूल नाही. मात्र इतर ग्रहांमुळे होणारे गुप्त धनयोग रविमुळे भंग पावणार नाहीत.
अष्टमस्थानी चंद्र असून तेथे रवि असेल तर चंद्राचे योगात जास्त भर पडेल.
तसेच रवि, गुरु, शुक्र यांचे समजावे.
अष्टम स्थानातील शुभ ग्रहांशी मंगळाची युति धनयोग भंग करील. युतीच्या गुणधर्माप्रमाणे अनुकूल अगर प्रतिकूल युतीचे निदान करावे.
अष्टमेशावर कोणत्याही ग्रहाची पापदृष्टि असेल तर वारसा वगैरे मिळणार नाही. पापदृष्टि एखादी परंतु शुभदृष्टियोग फार बलवत्तर, तर तसे योग थोड्या प्रमाणात येतील. सरकारी नोकरीत लांचलुचपतीपासून द्रव्य मिळविणाऱ्या लोकांच्या कुंडलीत जन्मतः, चंद्र अगर शुक्र अष्टम स्थानी असतो तो कोणत्याही राशीचा असला तरी चालेल; पैसा मिळेलच. राशिबली असला तर जास्त पैसा मिळेल. ह्या ग्रहांवर हर्षल, रवि, मंगळ यांची अशुभ दृष्टि विशेषतः काटकोनयोग असून शनि ९,१०, १२ वे स्थानी असेल तर मात्र अशा लोकांनी फार जपून असावे. त्यांचेवर चौकशी होऊन खटले होतील.
चंद्र-शुक्रावर अशुभ दृष्टि नसेल तर मात्र असा द्रव्ययोग चांगला पचनी पडेल.
अष्टमेश रवि असून वर सांगितलेल्या स्थानी शुभ दृष्टि असेल तर वारसा दजनि आपल्यापेक्षा जास्त असलेल्या नातेवाईकांकडून मिळेल व तो नातेवाईक वडिलांच्या बाजूचा आपल्या कुळातील पुरुष असेल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवावी की, अष्टमेश म्हणून ह्या रविला काही महत्त्व नाही. त्यामुळे वारसा वगैरे मिळण्याचा फारसा संभव नसतो. अष्टमेश रवि बलिष्ठ असेल तर सासरा मोठ्या दर्जाचा मिळून त्याचेकडून रोख प्राप्ती होते. वारसा वगैरे मिळत नाही किंवा उद्योगधंद्यामध्ये चांगले भागिदार मिळून त्यात पैसा मिळतो. हा योग वयाचे १९ अगर ३८ ते ४२ वर्षेपर्यंत येईल.
अष्टमेश चंद्र असून बलिष्ठ नसेल, तर वारसा, लॉटरीत पैसा वगैरे मिळण्याचा फारसा संभव नाही. नोकरीमध्ये बक्षिसाच्या रूपाने काही पैसा मिळेल. सार्वजनिक संस्थेच्या बाबतीत फायदा होईल. सार्वजनिक हिताची कामे हाती येऊन त्यामध्ये फायदा होईल. असा योग असता तो २०, २४, ३०, ३६, ४०, ४४ वर्षी येईल.
अष्टमेश बुध ‘असेल तर ह्या बाबतीत तो मुळीच अनुकूल नाही. स्त्रीधन वगैरे मिळणार नाही. पैशासंबंधी नेहमी अडचणी येतील. बुध बलिष्ठ असेल तर एखाद्या इस्टेटीचे ट्रस्टी वगैरे नेमण्यात येईल व त्यामध्ये थोडी प्राप्ती होईल. अष्टमेश बुध अष्टम स्थानी असल्यास अकल्पित प्राप्ती होईल.
अष्टमेश शुक्र असेल तर धनाचे कामात उत्तम. त्याच्या योगाने केव्हातरी आयुष्यात वारसा अगर अकल्पित द्रव्यलाभ होण्याचा योग असतो. स्त्री चे नातेवाईकाकडून पैसा मिळेल. मृत्यूपत्राद्वारे अकल्पित धनलाभ होईल, अगर एखादी इस्टेट मिळेल. जेव्हा जेव्हा जन्मशुक्राशी वार्षिक कुंडलीतील ग्रह शुभ दृष्टियोग करतील तेव्हा तेव्हा चांगलाच फायदा होईल. लॉटरीमध्ये पैसा मिळेल. उद्योगधंद्यामध्ये कल्पनेबाहेर लाभ होतील. शेवटचे दिवस शांततेमध्ये जातील. अपघात, धोका वगैरे होण्याची भीति नसते. शुक्राचे परिभ्रमण आठ वर्षांनी असल्यामुळे १६, २४, ३२, ४०, ४८ ही वर्षे फार महत्त्वाची जातील. ह्यावेळी सांपत्तिक स्थितिमध्ये काहीतरी अनुकूल परिस्थिती प्राप्त होईल..
अष्टमेश मंगळ असेल तर वारसा, लॉटरीत पैसा वगैरे मिळण्याची आशा करू नये. तसा योग व्यावहारिकदृष्ट्या असला तरी प्रत्यक्ष वारसा हाती असल्याखेरीज ह्याची खात्री वाटत नाही. मंगळ अतिशय बलिष्ठ असेल तर नातेवाईकाकडून जमिनीच्या रूपाने थोडासा वारसा मिळेल. परंतु पुष्कळ वेळा अष्टमेश मंगळ असता खोटी आशा लावतो. शेवटी ती आशा केव्हाही सफल होत नाही. अष्टमेश मंगळ असता रेल्वे, मोटार अगर सार्वजनिक वाहनांसंबंधी अपघात होण्याचा संभव असतो. मंगळ बलिष्ठ असता थोडासा वारसा मिळण्याचा संभव वयाचे ३० ते ४५ ह्या वर्षी असतो.
अष्टमेश गुरु बलिष्ठ असेल तर ह्या सर्व बाबतीत फार उत्तम असतो. मृत्यूपत्राद्वारे इस्टेट मिळते. नातेवाईकांकडून फायदा होतो. भागिदार अगर कुटुंबाच्या नातेवाईकांकडून फायदा झालाच पाहिजे असा हा योग आहे. हा योग असा आहे की, त्याच्या योगाने प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष रीतीने फायदा होतोच. ज्याला नशीब अगर चान्स म्हणतात ते अनुकूल असते. सरकारी नोकरांच्या कुंडलीत असा योग असता असा अनुभव आला आहे की, एखादा मनुष्य सिनिअर वगैरे नसता एखाद्या हंगामी जागी नेमला जातो. काही अडचणीमुळे कायमचा मनुष्य रुजू होऊ शकत नाही. तेव्हा हा मनुष्य त्याचा हक्क नसतानाही त्या जागी पुष्कळ दिवस राहू शकतो किंवा सिनिअर माणसाच्या अकाली मृत्यूमुळे त्याचा फायदा होतो. दुसऱ्याच्या नुकसानीने स्वतःचा फायदा होणे हा ह्या योगाचा मुख्य धर्म आहे. सर्व ग्रहांमध्ये ह्या बाबतीत अष्टमेश म्हणून गुरूला जास्त महत्त्व आहे. शेवटचे दिवस शांततेमध्ये जातील. गुरूची परिभ्रमण वर्षे २४, ३६, ४८, ६०.
अष्टमेश रवि असेल तर या बाबतीत फायदा होणार नाही. निराशा व आशाभंग होईल. दुसऱ्याकडून पैसे मिळण्याची केव्हाही आशा धरू नये. स्त्रीधन मिळणार नाही. उलट स्त्री गरीब घराण्यातील मिळेल. व्यापारधंद्यामध्ये भागिदार चांगले मिळणार नाहीत. शनि अष्टमेश असताना एकच फायदा असतो तो हा की, मनुष्य पुष्कळ वर्षे जगतो व आपल्या आयुष्यातील बऱ्यावाईट कृतींचा विचार करण्यास त्यास भरपूर वेळ मिळतो. शेवटचे दिवस थोड्या विवंचनेत जातात. खिचपत पडणाऱ्या आजाराने शेवट होतो.
सट्टे, जुगार, शर्यती यांचा विचार ५ वे स्थानावरून होतो. पंचमेश ५, ९, ११, १, ३ रे स्थानी शुभ दृष्टिमध्ये असेल, तर अशा बाबतीत पैसा मिळण्याचा संभाव असतो. पंचमेश रवि, मंगळ, गुरु असेल तर अनुकूल असतात. रवि, गुरु यश देतील. मंगळ धाडस देईल, परंतु त्यांत अविचार असेल. शनि, हर्षल, नेपच्यून, बुध हे पंचमेश असून शुभ संबंधित असतील तर साधारण फायदा होईल. मात्र हे ग्रह पंचमेश असून कोणत्याही ग्रहांचे अशुभ दृष्टिसंबंध असतील तर ह्या योगावर जन्मलेल्या लोकांनी सट्टे, जुगार, शर्यती यात नुकसान होईल. शुभ ग्रहांचा अशुभ दृष्टियोग असेल तर नुकसान येईलच परंतु ते ऐपतीबाहेर नसेल. परंतु अशुभ ग्रहांचा दृष्टियोग होईल तर अशा जातकास खूप नुकसान संभवते. हर्षल पंचम स्थानी असल्यास सट्टे, शर्यतीचा नाद जरूर लागतो व त्याचा परिणाम हर्षल मकर, कुंभ, तूला राशीचा नसेल अगर त्यावर रवि-चंद्राचा शुभयोग नसेल तर फार वाईट होईल. इतर वेळी हर्षल, पंचमस्थानी जुगार, सट्टे, शर्यती यास बरा असतो. स्वभाव धाडसी असतो. पंचमस्थानी चंद्र शुभ राशीचा व अशुभ दृष्टिरहित असेल तर सट्टे वगैरे मध्ये चांगली प्राप्ती होईल. मात्र चंद्र पंचमस्थानी असता जुगाराचा नाद फार लागतो. ज्यामध्ये धोका आहे अशा धंद्याकडे लक्ष जाते व पंचमस्थानी चंद्र असलेले लोक अनेक धंदे हाती घेतात.
सट्टे, शर्यती ई. गोष्टी करताना वार्षिक कुंडलीमध्ये रवि-शनि, शनि-हर्षल, रवि-हर्षल, मंगळ-हर्षल यांचे एकमेकांशी त्या वर्षी अशुभ योग नसावेत, ज्या महिन्यात या गोष्टी करावयाचे असतील त्यावेळी चंद्राचा मासिक अशुभ योग नसावा. गुरु अगर शनि गोचर पद्धतीने अशुभ नसावेत व साडेसातीचे अनिष्ट वर्ष नसावे. ज्या दिवशी सट्टे, शर्वती, फरक बगैर कामे करावयाची असतील त्या दिवशीचा चंद्र पंचमेशाशी शुभ योग करीत असावा.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)