कृत्तिका नक्षत्र विचार


विषय : कृत्तिका नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण कृत्तिका नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.

३. कृत्तिका नक्षत्र :

कृत्तिका नक्षत्र, नक्षत्र चक्रातील ३ रे नक्षत्र आहे. इंग्रजीत कृत्तिका नक्षत्राला ‘इटाटारी’ म्हणतात. हे नक्षत्र त्रिपाद असून त्याचा पहिला चरण मेषेत व पुढील ३ चरण वृषभेत आहेत. या चार चरणांवर अनुक्रमे गुरु शनि, शनि व गुरु यांचे स्वामित्व आहे. कृत्तिका नक्षत्र क्रूर अधोमुखी व सुलोचनी आहे. नक्षत्राचा स्वामी रवि, राशीस्वामी मंगळ वा शुक्र असल्याने या नक्षत्रात रवीचा करारीपणा, मंगळाचा तापटपणा व शुक्राचे सौंदर्य यांचा सुरेख संगम झालेला दिसून येतो. दैवत अग्नी असल्याने त्या अग्नीप्रमाणेच प्रखर तेजाच्या व कोपिष्ठ आहेत.

या नक्षत्री ६ तारका असून त्या तेजाने लखलखणाऱ्या आहेत. ताऱ्यांचा रंग जरा लालसर पांढरा असून आकृती उघडलेल्या धारदार वस्तऱ्यासारखी किंवा मुलींच्या कानातल्या डुल सारखी वाटते. पूर्वेकडे उदित होताना कृत्तिका नक्षत्राची आकृती फुलांच्या सुंदर गुच्छासारखी मोहक भासते. कार्तिक महिन्यात हे नक्षत्र रात्रभर आकाशात दिसू शकते. कृत म्हणजे कापणे यावरून यादेखील नक्षत्राला कृत्तिका हे नाव पडले असावे. यात बऱ्याच तारका असल्याने हिला ‘बहुला’ असेही नाव आहे.

कृत्तिका नक्षत्राबद्दल एक सुंदर आख्यायिक फार प्रसिद्ध आहे. थंडीच्या दिवसात उत्तर ध्रुवानजीकच्या अंधार्या रात्रीच्या प्रदेशातून, सप्त ऋषी आपल्या प्रिय पत्नीसह प्रवास करत होते. मुक्कामी पोहोचण्याची सर्वानाच घाई झाली होती. पण बोचर्या थंडीमुळे पाय पटापट उचलत नव्हते. प्रवास करता करता सर्वजन ‘अग्नी’ या प्रखर ताऱ्याजवळ आले. गारठलेल्या मंडळींना अग्नीची उष्णता फारच आल्हाददायक वाटली. सर्वजण तिथेच शेकत बसले. पुरेशी ऊब मिळाल्यावर शिस्तीचे भोक्ते सप्तर्षी ईशान्येकडे आपल्या मुक्कामी जाण्यास सरसावले. आपल्या स्त्रियांना देखील त्यांनी आपल्याबरोबर येण्यास बजावले. पण वसिष्ठांची पत्नी अरुंधती फक्त त्यांच्यासह निघाली. सहा ऋषी पत्नी मात्र अग्नीपासून मिळणारी ऊबेच्या मोहवश तिथेच थांबल्या. सहाही ऋषी मुक्कामी पोहोचले, तरी बराच वेळ मागे राहिलेल्या सहा स्त्रियांची वाट पाहूनही ऋषी पत्नी मात्र आल्याच नाहीत. प्रथम काळजी आणि नंतर मात्र ऋषी संतापाने क्रुद्ध झाले. त्यांनी मागे राहिलेल्या आपल्या पत्नींचे तोंडही परत न पाहण्याचा पण केला. मागे राहिलेल्या या सहा ऋषिपत्नी म्हणजेच कृत्तिका होत. अद्यापही कृत्तिका आकाशात अग्नीताऱ्याजवळ दिसतील, तर अरुंधती मात्र सप्तर्षीमधील वसिष्ठ ताऱ्याजवळ दिसते. कृत्तिका पश्चिम क्षितिजाकडे गेल्यावर सप्तर्षी वायव्येकडे कलल्याशिवाय कृत्तिका डोक्यावर येत नाही. इकडे अग्नीची ऊब मिळवत बसलेल्या सहा ऋषी पत्नींच्या गर्भामध्ये शंकराने दिलेले वीर्य सापडले. त्यापासून त्यांना गर्भ राहून सहा तोंडांचा कार्तिकस्वामी जन्माला आला. म्हणून कृत्तिकेलाच षडानन असेही म्हणतात. यामुळे कृत्तिका नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती अत्यंत कोपिष्ट, करारी व निश्चयी असू शकतात.

कृत्तिका नक्षत्रावर जन्मलेले पुरुष जातक मजबूत व आकर्षक बांध्याचे, घट्ट व पिळदार शरीराचे,  हाडापेराने मजबूत व कडक असतात. चांगले शरीर अवयव, जीवनऊर्जा व रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. हे जातक पराक्रमी, धाडसी, निग्रही व करारी असतात. कोणत्याही संकटाचा समन्स परिस्थितीला धैर्याने तोंड देऊन उच्चतम पदास पोहोचलेल्या आढळून येतात. हे नक्षत्र राक्षसगणी, क्रूर व कष्टप्रद असले तरी प्रचंड कार्य करणारे, प्रसिद्धी देणारे व उच्चपदाला नेणारे आहे.

स्त्री जातकांनाही कृत्तिका नक्षत्र शरीर प्रकृती व सुंदरतेच्या दृष्टीने चांगले असते. शरीराचे अवयव पिळदार व घट्ट व उठावदार असतात. चेहरा त्रिकोणी व उभट, कपाळ भव्य, जरा पुढे आलेले, नाक मोठे असते. चेहरा सुंदर व आकर्षक असतो. पण त्यांच्या सौंदर्यात शुक्राचा नाजूकपणा किंवा कोमलपणा नसून त्यांचे सौंदर्य उग्रपणा व राकट पणात असते. तीचे सौंदर्य हे लवंगी मिरचीप्रमाणे तिखट आहे. चेहऱ्यावर एक प्रकारची बेपर्वाई, बेफिकिरी असते. चालणे व बोलणे ऐटबाज व ठसकेबाज असते. स्वभाव मानी, रागीट, करारी, दुराग्रही, हेकेखोर व जरा गर्विष्ठ असतो. बोलणे थोडे फटकळ असते, दुसऱ्यांना घालूनपाडून बोलण्यात किंवा त्यांना कमीपणा दाखवण्यात आनंद वाटतो. स्त्रिया महत्त्वाकांक्षी, पराक्रमी व कर्तृत्ववान व स्वतंत्र वृत्तीच्या असतात. पतीच्या आज्ञेत असणे जरा अवघडच, उलट पतीनेच त्यांचे सर्व ऐकावे असे त्यांना वाटते.

मैचिंग रंगापेक्षा भडकरंगी पोषाख, किंमती कपड्यांपेक्षा आधुनिक फॅशनचा उदा. बिन बाह्याचा ब्लाऊज, मॅक्सी, बेलबॉटम, स्कीन फीट, तंग पोषाख किंवा पुरुषी पोषाख परिधान करण्याची आवड असते. तसेच पायात उंच टाचेचे बूट, एकाच हातात कोपरापर्यंत भरलेल्या प्लॅटिनमच्या बांगड्या, तर दुसरा हात मोकळा, मनगटाला जाड पट्टा असलेले पुरुषी, चौकोनी आकाराचे घड्याळ अशी फॅशन असते. खऱ्या मौल्यवान अलंकारांपेक्षा कृत्रिम पण दिखाऊ अलंकार त्यांना आवडतात. लांबसडक केसांच्या वेण्या किंवा मोठ्या अंबाड्यापेक्षाही पाठीवर रुळणारा बॉबकटच त्यांना प्रिय आहे. कपाळी कुंकवाचा टिळा करण्याची हौस असू शकते. भांगेत कुंकू भरणे पसंत करू शकतात. कृत्तिका स्त्री जातक म्हणजे एक फटाकडी, रागात सुंदर भासणारी तिखट अदा व बोलण्यावर व कमनीय चालीवर भाळणारे महाभाग भुलतात आणि मग तिचा रुद्रावतार सहन करणे त्यांना भाग असते.

कृत्तिका नक्षत्र सामान्यपणे शल्य विशारद डॉक्टर्स, वैदू, इंजिनिअर्स, पोलिस खात्यातील व लष्करातील शिपाई, राजे, सरकारी अंमलदार, कस्टममधील अधिकारी, अंमलबजावणी खात्यातील लोक, आगीशी झुंजणारे निधड्या छातीचे फायरब्रिगेडमधील सेवक, फॉरेस्टर, खाटीक, फासेपारधी, शिकारी इत्यादी दर्शवते. अग्नितत्त्वाचे नक्षत्र असल्याने स्वयंपाकी, वाफेच्या यंत्राजवळ कामे करणारे, इंजिनिअर, ड्रायव्हर्स, लोहार ई. असू शकतात.

रवि कृत्तिका नक्षत्रात उत्तम फळ देतो. रवि असता हे जातक पराक्रमी, महत्त्वाकांक्षी, शूर व अधिकारी असू शकतात. रवि पापग्रहाने बिघडलेला असल्यास हे जातक जुलूमी, अन्यायी व पाशवी अत्याचार करणारे असू शकतात.

चंद्र कृत्तिका नक्षत्रात असता हा जातक चंचल, मानी, उतावळा व धडपड्या, अल्प विद्या व कमी अधिकार असू शकतात.

मंगळ कृत्तिका नक्षत्रात असता शरीर प्रकृतीला उत्तम, पण स्वभावाने अतिशय तापट, हट्टी व खुनशी असतात. स्वपराक्रमाने पुढे येईल. डॉक्टर्स, इंजिनिअर्स, सेनापती, तसेच अधिकार योगासाठी चांगला. बुधाला कृत्तिका नक्षत्र अनुकूल नाही. जातक तुसडा, बोचरे बोलणे. पण एक उत्तम टीकाकार असू शकतो. बुध बिघडला असता जातकाची बुद्धी गुन्हेगारीकडे वळू शकते.

गुरु कृत्तिका नक्षत्री असता शरीरप्रकृती, पराक्रम, मानसन्मान, शिक्षण व धन या साठी चांगला.

शुक्र शरीर-सुख, सौंदर्य, विलास, चैन करणे ई. साठी जातकास अनुकूल असतो. रजोगुणी असल्याने कामवासना प्रबळ असते. शुक्र बिघडला असल्यास, व्यसनाधीनता आढळते. विवाहसौख्यात बाधा. प्रेमभंग व घटस्फोटाचे प्रसंग जातकाच्या वाट्यास येऊ शकतात.

शनि कृत्तिका नक्षत्री असता जातक पराक्रमी, प्रयत्नशील व कष्टाळू असतो. मेष राशीत कृत्तिका नक्षत्रात असता जातक कष्ट पडले तरी, पैसे चांगले कमावतो. जमीन, धान्याचा व्यापार, लाकूड ई. व्यापारासाठी चांगला.

राहू कृत्तिका नक्षत्री असता जातक महापराक्रमी कर्तृत्ववान, निधड्या वृत्तीचा असतो. अंमलबजावणी खात्यात काम करणारा असतो. राहू बिघडला असल्यास जातक चोरटे, अनैतिक धंदे करू शकतो. केतूला कृत्तिका नक्षत्र साधारण असते. आरोग्यास बरे, खूप कष्ट पण त्याचा मोबदला कमी अशी जातकाची गात असते.

हर्षल कृत्तिका नक्षत्री जातकास उपद्व्यापी, लहरी बनवतो. विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या व्यवसायासाठी चांगला.

नेपच्यून वृषभ राशीतील कृत्तिका नक्षत्रात शेती, बागायती करण्यासाठी चांगला.

कृत्तिका नक्षत्रावर होणारे आजार उष्ण प्रकृती, दाहकता, वेदनायुक्त, दारुण व तीव्र अशा स्वरूपाचे असतात. हे जातक सहसा तापामुळे अंथरुण धरलेय असे दिसणार नाहीत. अतिउष्णतेमुळे अंगाची लाही होणे, डोळे जळजळणे, नाकातून किंवा दातातून रक्त, पडणे, खरचटणे, हाड मोडणे, कापणे, भाजणे, शस्त्रांच्या जखमांमुळे तीव्र स्वरूपाचा रक्तस्राव, व्रण, गळा, घसा सुजणे, श्वास नलिका किंवा अन्ननलिकेला फोड, मूळव्याध, मोतिबिंदू, रातांधळेपणा असे आजार होऊ शकतात.

स्त्रियांच्या कुंडलीत शुक्र कृत्तिका नक्षत्रात असता, पाळीच्या वेळी रक्तस्त्राव जास्त होण्याची भीती असते.

कृत्तिका नक्षत्रात शनि, मंगळ, राहू असून ते अशुभ स्थानात असता युद्धात, अपघातात, खुन किंवा फाशी अशा प्रकारे मृत्यू भय असते.

अंकशास्त्राप्रमाणे या नक्षत्रावर ३ या अंकाचे वर्चस्व असते. माणिक किंवा पोवळे ही रत्ने लाभदायक. कृत्तिका नक्षत्र जातकांचे लिखाण ठळक व ठसठशीत, सुरेख पण तिरपे असते. लिहिताना जरा दाबून लिहितात. कृत्तिका नक्षत्र लोचनसंज्ञा सुलोचनी असल्याने, या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ती सापडत नाही.

हे नक्षत्र मुंजी, विवाह, बारसे ई. शुभ कार्यास वर्ज्य मनात असले, तरी इतर अनेक गोष्टींना चांगले आहे. शस्त्रक्रियेसाठी व स्त्रियांच्या सिझेरीयनसाठी या नक्षत्रावरचा मुहूर्त फार चांगला. हे नक्षत्र हिंस्र श्वापदाची शिकार, सर्कशीतील वाघ, सिंह, गारुडी किंवा दरवेशी लोकांनी साप, अस्वले किंवा माकडे पकडणे, सापाचे विष काढणे, राज्याभिषेक किंवा अधिकाराचे पद ई.साठी अनुकूल. कृत्तिका अधोमुखी नक्षत्र असल्याने विहिरी व तलाव खोदणे, जमिनीत गाडलेले धन काढणे या कामांना चांगले.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment