ॐ तत्वे आणि राशीचे गुण अवगुण


विषय : ॐ तत्वे आणि राशीचे गुण अवगुण

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : ‘ॐ हा गुरू’

नमस्कार,

‘ॐ हा गुरू’ हा ह.भ.प. श्री. गणोरेबाबा यांनी लिहिलेला ग्रंथ मध्यंतरी वाचनात आला. ग्रंथ मनाला खरोखरच भावल्यामुळे त्यातील तत्व विचार येथे देत आहे. क्लिष्ट विषयही अतिशय अत्यंत सोप्या भाषेत लिहिलेला हा ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचण्यासारखा आणि त्यावर मनन चिंतन करण्याजोगा आहे.

ज्योतिषशास्त्र हे एक चिंतनावर, अनुभवावर आणि ऋषिमुनींच्या सखोल अभ्यासातून निष्पन्न झालेल्या ज्ञानावर आधारित असे शास्त्र आहे. अनेक नियम व आडाखे यांनी त्या शास्त्राला विचित्र व विविध वळणे घ्यावयाला लावली आहेत. एकाच कुंडलीवर अनेक शास्त्री परस्परविरोधी विचार सुचवून त्याला आधार दाखवू शकतील, हे आजचे वास्तव आहे. या अथांग माहितीच्या सागरात सत्य शोधण्याचा प्रयत्न करणाराला उपयोगी ठरणारे असे विवेचन या ग्रंथात आहे.

‘ॐ हा गुरू’ ह्या पुस्तकात त्यांनी परमार्थाची वाटचाल अत्यंत सोपी करून सांगितली आहे व दाखविली आहे. राशी तत्वे, त्यांचे राशींचे स्वामी आणि त्यांचे गुणधर्म, स्वभाव व देवता यांचे विवेचन दिलेले आहे. त्यात आपण काय करावयास पाहिजे, काय करावयास नको, कशापासून सावध रहावे व कोणत्या गोष्टीचे पथ्य पाळावयाचे, आपले गुण व दोष हे समजावून सांगितले आहे. इतक्या सोप्या व सहज भाषेत स्वरूप बोधावर कोणी लिहीलेले पहावयास सहसा मिळत नाही.

ज्या ॐकाराचे ज्ञान प्राप्त झाले तोच तो व तूही तोच. तोच विश्व व तेच विश्वबीज. त्याच बीजातून सर्व निर्माण झाले. तोच ॐ हा गुरू, त्याप्रमाणे या ग्रंथास ‘ॐ हा गुरू’ हे नाव दिले.

वासने मुळे घ्यावा लागणारा जन्म, रूपाला नाम, नामाला रास, राशीची असणारी वासना, वासनेचे असणारे तत्त्व, तत्त्वाची असणारी इच्छा, परब्रह्माचे असणारे स्फुरण असे हे वरपासून ब्रह्म ब्रह्मांड, पिंड येथपर्यंत चालत आले ते याप्रमाणे. ज्या ब्रह्माव जाणीव-नेणीव नाही तो ‘भगवंत’ असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. पिंडी ते ब्रह्मांडी, मी आणि तू या व्यावहारिक कल्पनेकरिता ते ब्रह्म, तो भगवंत.

तू प्रेम, प्रभू तोच सर्व जीवदशेत परमाणुरूपाने परमेश्वर बसलेला आहे. तोच आत आत्माराम आहे.

‘प्रेम प्रभू है’ असे तुलसीदासांनी म्हटले आहे.

तोच परमेश्वर सर्व जीवमात्रातः परब्रह्म परमाणू रूपाने बसलेला आहे. त्याला संत एकनाथ महाराजांनी म्हटले आहे की,

परमाणु परमेश्वर हृदयी। ध्यान लावूनिया अंतरी।

ज्याच्यामध्ये घट आणि वाढ आहे असे जे नामरूप जगत आहे ते नाशीवंत आहे म्हणून कवी मोरोपंतांनी म्हटले आहे,

‘जग हे असार आहे। जे दिसते ते अखेर जायाचे ॥

असा हा असार आकार. त्याच्यात शाश्वत असणारा आत्माराम.

याच परब्रह्माला संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे की,

तैसा हृदयामाजी मी रामू । असता सर्व सुखाचा आरामु ॥

जे ब्रह्म तेच प्रेम ब्रह्मांडात. परमाणूरूपाने प्रत्येक कणाकणात तोच भरून उरला आहे. तोच जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तोच विश्वंभर भरला आहे. तोच सर्व जीवांचे मूळ आहे. तोच सर्व जीवांच्या समाधाना- करिता नादब्रह्मरूपाने नटला आहे. तोच सर्व जीवांच्या व्यवहाराकरिता शब्द परब्रह्मरूपाने प्रत्येकाच्या मुखात आहे. म्हणून प्रत्येक जीवाची भाषा हा त्याचा मंत्र आहे.

तेच ब्रह्म आकाशरूपाने तत्त्व म्हणून राहिले, पुढे ईश्वर म्हणून बायुतत्त्वरूपाने, सर्व जिवांना जिवंत राहण्याकरिता स्वयं सोऽहं श्वासरूपाने चालविणारी सत्ता त्याचीच आहे.

म्हणून ‘चाले हे शरीर कुणाचिया सत्ते’ असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.

तोच निराकार ईश्वर, तीच ईश्वरी माया श्वासरूपाने या कायेत आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जेथूनी चराचर त्यासी भजे ॥

पुढे तोच निरनिराळी कलाकृती व अलंकार करणारा, आपल्या ठिकाणी नेत्रस्थानात बसलेला आहे व तोच निर्गुणरूपाने आत-बाहेर अग्नितत्त्वरूपाने भरलेला आहे. पुढे तेच ब्रह्म ज्ञानमय सर्व जीवांच्या ठिकाणी रसनारूपाने वसले व आत-बाहेर जलतत्त्वरूपाने भरले. म्हणून प्रत्येक जीवाला आपला मतलब समजतो. कारण जलाचे निजतत्त्व विवेक आहे. म्हणून आपण परमात्याला ज्ञानमय म्हणतो.

आता पुढे तेच ब्रह्म ब्रह्मरूपाने भूमितत्त्वात आले व त्यानेच चार खाणी चौऱ्यांशी लक्ष योनींमध्ये लहान मोठे आकार धारण केले. आकाररूपाने तोच भगवंत नटलेला आहे. ही सत्य साक्ष आहे.

कारण संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की,

“जे जे भेटे भूत। ते ते मानीजे भगवंत। हा भक्तियोग निश्चित। जाण माझा।”

सुरवातीला तर ज्ञानेश्वरांनी ज्ञान असणारे व नसणारे ब्रह्म याला भगवंत म्हटले आहे. मग त्यांनी आकाराला भगवंत का म्हटले आहे ? व हे दोन्ही सत्य आहे. ते कसे ते पहा शरीर हे अजाण व निर्दोष आहे. शरीर हे कर्ते नसून अकर्ते आहे. शरीर सुखाला व दुःखाला जबाबदार नाही; पापाला व पुण्याला जबाबदार नाही. या सर्वाला जबाबदार अतींद्रिये आहेत. ती जशी हलतील तसे शरीर हालेल व ती बोलतील तसे बोलेल. ती जशी पाहतील तसे हे पाहणार. हे शरीर निमित्त मात्र आहे पण निमताळे नाही. म्हणून हे शरीर भगवंताचेच रूप आहे.

या रूपाकडे या दृष्टीने पाहिले म्हणजे मनुष्य लीन होतो. म्हणून

‘नम्र झाला भूता । तेणे कोंडिले अनंता’ किंवा ‘शरण तुला भगवंता’ असे म्हणतात.

असा हा आतबाहेर असून कर्ता आहे व कर्ता नाही. हा भेद कळला म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते पटेल –

मी तू हा भेद विवेके शोधावा। गोविंदा माधवा याच देही ।।

तेव्हा या दृष्टीतून रूपाकडे पाहिल्यावर संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे –

रूप पाहता लोचनी । सुख झाले वो साजणी ॥

हे ज्ञान झाल्यावर इंद्रियांचे समाधान होते. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात,

झाले समाधान। आता विसावले मन ।।’ आता मनाच्यापुढे आत्मारामाच्या आनंदाकडे जायचे. ‘अनामीच्या ठायी तेथे विठ्ठल भेटी देई।’

या अनुभवासाठी जी ओढ आहे ती ही की, ‘माझ्या देहाचा देव कसा होईल? तोच मार्ग या ग्रंथात आहे.

असो. त्यांनी या ग्रंथात हे सर्व खूप छान उलगडून दाखवले आहे, त्याचे सार इथे कोष्टक रूपाने देत आहे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment