भरणी नक्षत्र विचार


विषय : भरणी नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण भरणी नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.

२. भरणी नक्षत्र :

भरणी हे नक्षत्र चक्रातील दुसऱ्या क्रमांकाचे नक्षत्र असून त्याची व्याप्ती १३ २० ते २६ ४० आहे. या नक्षत्राचे ४ ही चरण मेष राशीत येत असल्याने हे नक्षत्र चतुष्पादी आहे. हे अधोमुखी, उग्र व क्रूर नक्षत्र आहे. इंग्रजीत या नक्षत्राला ४१ ऐटरेस’ असे नाव आहे. याच्या ४ चरणांचे स्वामी अनुक्रमे रवि, बुध, शुक्र व मंगळ आहेत. या नक्षत्री शुक्राची चैनी वृत्ति, मंगळाचा उतावळेपणा व यमाचा कठोरपणा यांचा संगम आढळून येतो.

नक्षत्राची आकृती योनीसारखी किंवा त्रिकोणासारखी आहे. नक्षत्रात ३ तारे असून, ते रंगाने काळसर व फिकट आहेत. तेजामध्ये हे नक्षत्र जरा कमी प्रतीचे आहे. आकाशामध्ये हे नक्षत्र ठळकपणे दिसत नाही.

या नक्षत्रावर जन्म घेणारे जातक मध्यम उंचीचे आढळतात. सडपातळ बांधा, मजबूत हाडाचे, काटक पण कमी मांसल असतात. डोके मेंढ्यासारखे, डोक्याचा मागचा भाग जरा रुंद व पुढे कपाळापर्यंत  निमुळते होत गेलेले असते. नाक सरळ व नाकपुड्या बारीक असतात. मान थोडी बारीक व उंच असते. शरीराला प्रमाणशीरपणा किंवा नीटनेटकेपणा थोडा कमी असून थोडा बेढबपणा असू शकतो. शारीरिक ऊर्जा, जीवनशक्ती व रोगप्रतिकारक शक्ती ठीक असते. झपाझप चालताना या व्यक्ती मध्येच थांबत पुन्हा चालताना आढळतील. हे जातक दिलदार, उदार, प्रामाणिक, विश्वसनीय असतात. पण रजोगुणी, निष्काळजी, आळशी, नेभळट, दुसऱ्यावर आंधळा विश्वास टाकून काही वेळा स्वतःचे नुकसान करून घेतात. कोणतत्याही श्रीगणेशा जोरात करून, नंतर मध्येच अर्धवट सोडणे, एकदम राग येऊन लगेच शांत होणे, जास्त महत्त्वाकांक्षा नसणे, मागचा पुढचा विचार न करणारी, व्यसनाधीन ई. असतात. नक्षत्राचा मुख्य अशुभ गुण म्हणजे जुगारी वृत्ति होय. कमी श्रमात भरपूर धन मिळविण्याची इच्छा बाळगल्याने या जातकांना पत्ते, रेस, जुगारांचा नाद लागण्याची संभावना जास्त असते. जुगारापायी या व्यक्ती आपला शारीरिक व आर्थिक नाश ओढवून घेतात. द्रौपदीची अब्रू जाण्याचा प्रसंग येऊन पांडवांना वनवास भोगावा लागला हे सर्वश्रुत आहेच.

हे नक्षत्र कला कौशल्य किवा सौदर्य देणारे नसल्याने स्त्री जातकास हे फारसे अनुकूल नाही. या नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्रिया जरा बावळट भासू शकतात. शरीराच्या ठेवण गोंडस नसते. चेहरा मेषपात्रा सारखा असतो. यांचे सौंदर्य त्यांच्या बावळट भासण्यातच आहे. या स्त्रिया थोड्याशा धांदरट व वेंधळ्या असतात. यांच्या वागण्यात, राहणीत किंवा पोषाखातही व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा व आकर्षितपणा याचा अभाव असू शकतो. दुसऱ्या स्त्रीचे अंधानुकरण करण्याची सवय असते, एखाद्या सुंदर स्त्रीने रेशमी किंवा वायलची साडी अथवा इतर फॅशनेबल पोषाख घातलेला पाहिल्यास, या जातकांना ही त्यांचे अनुकरण करण्याचा मोह होतो, तो पेहराव, साड्यांचा रंग किंवा फॅशन स्वत:स कसे दिसेल हा विचार करणार नाहीत व अजागळ वाटतील. हे स्त्री जातक अंगापिंडाने मजबूत असल्याने यांना कलाकुसर पेक्षा घरातील स्वयंपाक व इतर अंगमेहनतीची कामे चांगली जमतात.

या नक्षत्राचे दैवत यम असल्याने हे नक्षत्र यमा प्रमाणे कठोर व काटेकोरपणे न्याय देणारे आहे. या नक्षत्राजवळ क्षमा हा शब्द नाही. एखाद्या न्यायाधीशाच्या कुंडलीत या नक्षत्रामध्ये शनि असल्यास तो काटेकोरपणे न्याय देईल. जसे कर्म तसे फळ या तत्त्वाने सर्व गोष्टी मोजूनमापून पाहिल्या जातात.

या नक्षत्रावर अनिष्ट कृत्य केल्यास त्याचे फळ भोगावेच लागते. मग जप करून, देवाला नैवेद्याची लालूच दाखवून किंवा बोटात रत्न घालून त्यातून सुटका होत नाही. अश्वत्थामा हत्तीच्या वेळी ‘नरो वा कुंजरो’ असे मोघम बोलल्याने धर्मराजांनाही स्वर्गात थोडेतरी शासन मिळालेच.

भरणी या शब्दाचा अर्थच भरणी करा, भरून घ्या असा आहे. एखादी व्यक्ती मृत झाल्यास पितृपक्षात (भाद्रपद कृष्ण पक्ष) जे प्रथम भरणी श्राद्ध करण्याची पद्धत आहे. आपली प्रिय व्यक्ती स्वर्गाच्या प्रवासास निघालेली आहे, तेव्हा प्रवासात लागणारे अन्न उपलब्ध असावे असा तो विधी आहे. कोणत्याही वस्तूची भरणी म्हणजेच साठा या नक्षत्रावर केल्यास तो बराच काळ टिकतो असे मानले जाते.

हे नक्षत्र पित्तप्रकृतीचे असल्याने वैद्यकीय शास्त्राप्रमाणे या नक्षत्रावर होणारे रोग पित्ताची उलटी किंवा कावीळ होणे, अतिदाहक ताप, तापात बडबडणे, रक्तविकार, तसेच दंतरोग, पायोरिया, हिरड्या सुजून पू किंवा घाण येणे, तोंडाला वास येणे हे आहेत. हे नक्षत्र बिघडले असता शरीरात विजातीय अथवा दूषित द्रव्य साचून दीर्घ मुदतीचे रोग होऊ शकतात. शरीरात भयंकर उष्णता वाढून ती साचून रहाते व परिणाम स्वरूप निरनिराळ्या भागात गळवे, मोठमोठे फोड, आवाळू यांच्या रूपाने ती बाहेर पडते.

या नक्षत्री गुरु असता मेंदूत रक्त साठू शकते. या जातकांना होणारे रोग त्यांच्या व्यसनामुळे व खाण्यापिण्यातील अतिरेकीपणामुळे झौ शकतात. अतिरेकी मद्यपान, धूम्रपान, जागरण व सारखा चहा पिणे अशा सवयी स्वतःच्या शरीरास घटक ठरू शकतात याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. गुप्तरोगाचीही संभावना असते.

रवि या नक्षत्रात शरीरप्रकृती व आरोग्याला बरा असतो. कर्तव्य, अधिकार यासाठी फारसा अनुकूल नसतो. कठोर, आळशी व खाण्यापिण्यात मजा मारणारा व रवि बिघडला असता जुगाराचा नाद लागू शकतो.

या नक्षत्री चंद्र असता चंचल मनाचा, दिसण्यात बावळट व भोळसट, सांगकाम्या, सुस्त, घाबरट व उतावळा असतो. पैशांची लालसा असते. मध्यंतरी एक कुंडली पाहण्यात आली. या कुंडलीत चंद्र भरणी नक्षत्रात २ रे स्थानात, ८ वे स्थानात शुक्र राहूच्या स्वाती नक्षत्रात असल्याने ही मुलगी श्रीमंती व चैनीच्या हव्यासापायी चोरी करायला लागली होती.

या नक्षत्री मंगळ चोरटा व्यापार, शरीरप्रकृती व आरोग्याला बरा. हे जातक मजबूत हाडाचे व काटक असतात. तसेच डॉक्टरीपेक्षाही इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी चांगला असतो. जातक जरा रागीट, उतावळा व स्वार्थी स्वभावाचा असतो.

या नक्षत्री बुध शरीरप्रकृती व आरोग्यासाठी चांगला. हे जातक चपळ व तरतरीत असतात. मात्र बुद्धीने अगदीच साधारण व मंद असतात. पोस्टमन, पाळत ठेवणारा, बातमीदार, फिरते एजंट या कामासाठी चांगला.

या नक्षत्री गुरु शरीर मजबूत देतो. मात्र हे जातक जरा सुस्त व आळशी असतात. इंजिनिअर, ललितकला, कायदेशास्त्र यांचेसाठी अनुकूल असते.

या नक्षत्री शुक्र हा शारीरिक प्रकृती व आरोग्य यांना फारसा अनुकूल नसतो. तब्येतीची नेहमी तक्रार राहते. विषयवासना जास्त असू शकते. हे जातक पैशासाठी लोभी, चैनी, विलासी, सट्टेबाज, व्यसनाधीन तसेच नाटक, सिनेमा, गायन-वादन यांची आवड असणारे असू शकतात. शिक्षणाच्या बाबतीत मध्यम फळ देते.

या नक्षत्री शनी असता शरीर हाडापेराने मजबूत असते. शरीरातील नसा जास्त उठून दिसतात. हे जातक कमी मांसल असतात परंतु काटक, कणखर, कष्टाळू व मेहनती असतात. या नक्षत्राखाली कष्टकरी मजूर व कामगार व रोजंदारी करून पोट भरणारे येतात. धन संपत्तीसाठी शनि फारसा अनुकूल नसतो.

या नक्षत्रात राहू शरीरप्रकृती व आरोग्यासाठी चांगला असतो. विद्या व बुद्धी कमी राहते. शारीरिक कष्टाची कामे चांगली जमतात. राहू बिघडला असता वाममार्गाने धन मिळवण्याकडे कल असतो. उदा. चोरी, चोरटा व्यापार, दारूचे किंवा जुगाराचे अड्डे चालवणे ई. तसेच भूत पिशाच्च किंवा अघोरी विद्येची फार आवड असते. केतूही राहूसारखीच फळे देतो, मात्र यांना अघोरी विद्यापेक्षा गारुडी विद्या, मंत्रतंत्र, आध्यात्मिक विदयेची आवड असते.

या नक्षत्री हर्षल शरीरप्रकृती व आरोग्याला बरा. जातक जरा रागीट, हट्टी, विक्षिप्त व लहरी असतो. चंचल मन व फिरण्याची आवड असते. तसेच रेस, सट्टे, लॉटरी ई. नाद असू शकतो.

या नक्षत्री नेपच्यून शरीरप्रकृती, विद्या व बुद्धी यांना मध्यम फलदायी असतो.

भरणी नक्षत्र काळ्या रंगाच्या वस्तूंच्या व्यवसायासाठी चांगले असते. तसेच हे अधोमुखी नक्षत्र असून त्याचा खाणीशी संबंध असल्याने कच्चे लोखंड, तांबे, शिसे तसेच रॉकेल अशा वस्तूंच्या व्यापारास अनुकूल ठरते. प्रेत दहनाला लागणाऱ्या वस्तूचा व्यापार, चामडी व कातडी कमावणे या धंद्यांना पण दर्शवते.

या नक्षत्रावर २ किंवा ६ या अंकाचे वर्चस्व आहे. भाग्य रत्न शुक्राचा हिरा किंवा शनीचा नीलम आहे. हस्ताक्षर जरा गिचमीड, फिक्कट व लहान आढळते. लिहिणेही जरा पटपट, मध्येच हळू व परत पटपट असते. मध्यलोचनी असल्याने या नक्षत्रावर एखादी वस्तू हरवल्यास ती फार प्रयत्नानेच मिळू शकते.

हे नक्षत्र मनुष्यगणी, क्रूर व देवता यम असल्याने या नक्षत्रावर शुभ कार्ये करू नयेत. याचे महत्त्व पितृपक्षात पितरांसंबंधी कार्य करण्यास किंवा श्राद्ध वगैरे करण्यासाठी जास्त आहे. हे अधोमुखी नक्षत्र असल्याने खणणे, विहिरी, तलाव वगैरेंची कामे सुरू करणे, जमिनीत गाडलेले धन बाहेर काढणे किंवा जमिनीत पैसे अथवा इतर वस्तू पुरून लपवणे, मद्य काढण्यास आरंभ करणे यांना अनुकूल. भरणी नक्षत्र खोदकामास चांगले असले तरी ते अशुभ असल्याने पायाभरणीस मात्र योग्य नाही. क्रूर असल्याने घातपात, विषप्रयोग, वशीकरण, भूतपिशाच्च अथवा अघोरी विद्या शिकण्यास चांगले. 

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment