अश्विनी नक्षत्र विचार


विषय : अश्विनी नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण अश्विनी नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.

क्रांतिवृत्ताचे समान १२ विभाजित केलेले भाग राशी आहेत. त्याचेच २७ समान विभाग केले म्हणजे त्यांना नक्षत्रे असे म्हणतात. क्रांतिवृत्तालाच राशीचक्र किंवा नक्षत्रचक्र असे संबोधिले जाते. वर्तृळाचा आरंभ बिंदू हा कोणत्याही ठिकाणी मानता येऊ शकतो. नक्षत्र चक्रही वर्तृळकार असल्याने त्याचा प्रारंभ कोणत्याही नक्षत्रापासून मानता येऊ शकतो. पण ज्योतिषशास्त्रात ऋतुमान व कालगणना ठरविण्यासाठी मेष संपात किंवा वसंत संपात (ज्या ठिकाणी आकाशात क्रांतिवृत्त विषुववृत्ताला छेदून जाते तो बिंदू) हा राशी चक्राचा प्रारंभ मानतात. पण राशी समजण्यासाठी नक्षत्राचा उपयोग केला असल्याने या संपात बिंदूजवळ असलेले नक्षत्र नक्षत्र चक्राचा प्रारंभ म्हणून मानले जाते. निरयन राशी चक्राचा आरंभ अश्विनी नक्षत्रा पासून धरला आहे.

१. अश्विनी नक्षत्र :

अश्विनी हे नक्षत्र चक्रातील पहिले नक्षत्र असून त्याचे चार ही चरण मेष राशीत असल्याने हे नक्षत्र चतुष्पाद तसेच क्षिप्र, तीर्थमुखी, मंदलोचनी व देवगणी आहे. नक्षत्राची लांबी १ अंश ते १३ २० आहे. इंग्रजी नाव ‘बीट एरिटस’ आहे.. या नक्षत्राच्या चार चरणावर अनुक्रमे मंगळ, शुक्र, बुध व चंद्राचे स्वामित्व आहे. नक्षत्राचा स्वामी केतू, राशीस्वामी मंगळ व दैवत हे देवांचे वैद्य अश्विनकुमार आहेत. म्हणून या नक्षत्रात केतूचा त्यागीपणा, मंगळाचा पराक्रम व अश्विनीकुमारांची अप्रतिम बुद्धिमत्ता व चिकाटी यांचा सुरेख संगम दिसून येतो.

अश्विन महिन्यात हे नक्षत्र आपणाला रात्रभर आकाशात दिसू शकते. या नक्षत्रात तीन तारका असून आकृती इंग्रजी J या अक्षरासारखी किंवा पायमोज्यासारखी दिसते. काही प्राचीन ग्रंथात याचा आकार घोड्याच्या मुखासारखा किंवा तीन चाकाच्या रथासारखा सांगितला आहे. नक्षत्र चर असून तारे फिक्कट रंगाचे पांढरे व जरा धुरकट दिसतात. या नक्षत्राकडे पाहताना त्यातून वाफा निघतात, असे वाटते म्हणून ते अग्नितत्त्वाचे व तेजस्वी धरतात.

अश्विनीला घोड्याचे मुख का आले याविषयी प्राचीन ग्रंथात एक सुंदर कथा सांगितली आहे. देवांचा कारागीर त्वष्टा याला मधुविद्या (संजीवनी) येत होती. त्याने ही विद्या दधिची ऋषींना शिकवली. या विदयेमुळे दधिची ऋषी सदेह स्वर्गाला जात होते. अश्विनीकुमारांना ही विद्या शिकण्याची फार इच्छा होती. पण ही विद्या शिकण्यास इंद्राचा सक्त विरोध होता. विद्या शिकविणाऱ्याचे तो शिर उडविणार होता. तेव्हा अश्विनीने स्वतःच दधिचींचे शिर उडवून ते झाकून ठेवले व दधिचींना त्याने घोड्याचे मुख लावले व तो मधुविद्या ग्रहण करू लागला. इंद्राला हे समजल्यावर त्याने दधिचीचे अश्वमुख शिर उडवलेच, तेव्हा अश्विनीने या ठिकाणी झाकून ठेवलेले शिर पूर्ववत् लावले. मात्र अश्विनीकुमारांची ही विद्या अर्धवटच राहिली.

म्हणूनच अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या जातकांत महत्प्रयासाने विद्याप्राप्ती, विद्या ग्रहणाची आवड, असाध्य विद्या शिकण्याची हौस व चिकाटी दिसून येते.

तसेच अश्विनीने एक शिर उडवून व दुसरे शिर लावल्याने या नक्षत्रावर जन्मलेल्या जातकांत शरीराच्या कोणत्याही अवयवावर कलम करण्याची व शस्त्रक्रिया करण्याची विद्या चांगली येते.

तसेच पुराणकाळी शर्यतीच्या पणात अश्विनीकुमारांनी आपल्या बुद्धीने शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला म्हणून त्यांना सर्व प्रकारची विद्या, यश व त्रैलोक्य कीर्ती प्राप्त झाली.

या नक्षत्राला नकुल व सहदेव यांची शक्ती मिळाल्यामुळे सर्व विद्या पारंगत व त्यापासून धनप्राप्ती व ऐश्वर्यप्राप्ती हे फलादेश दिसून येतात.

शारीरिकदृष्ट्याही हे नक्षत्र अनुकूल आहे. हे नक्षत्र लग्नी (प्रथम भावात) असता किंवा या नक्षत्रात चंद्र असता जन्मणाऱ्या जातकाचा बांधा उंच, प्रमाणशीर व नीटनेटका असतो. त्या हाडापेराने मजबूत व काटक असतात. शारीरिक आरोग्य व रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असते. सहनशक्ती चांगली असून हे जातक श्रम व दगदग सहन करण्यात पटाईत व सक्षम असतात. चेहरा जरा उभट, नाकपुड्या मोठ्या व भालप्रदेश रुंद असतो. स्त्रियांपेक्षा पुरुषांना या नक्षत्रांचे महत्त्व जास्त आहे. कारण पुरुषांना लागणारा धीटपणा, धाडस, पराक्रम, कर्तबगारी, महत्त्वाकांक्षा, स्वातंत्र्यप्रियता, शौर्य, स्वावलंबित्व, अधिकार लालसा हे गुण या नक्षत्रात ठळकपणे दिसून येतात. हे नक्षत्र चर व अग्नितत्त्वाचे असल्याने हे जातक रागीट, मानी, उतावळ्या स्वभावाचे पण निश्चयी व महत्त्वाकांक्षी, उच्च आचारविचार, न्यायी, उदार, स्पष्टवक्ते, सडेतोड बोलणारे असतात. मर्दानी खेळाची आवड असून नित्य नवनव्या विद्या शिकण्याची हौस फार असते. प्रत्येक गोष्टीत त्यांना नावीन्य आवडते. प्रवासाची बरीच आवड असते. यांचे बोलणे, चालणे, लिहिणे जलद असते. हे जातक नेहमी घाई-गडबडीत असतात. वाहनात बसून प्रवासाची मौज अनुभवण्यापेक्षा बेफामपणे वाहन चालवून आपले कौशल्य व घडाडी दाखविण्याची हौस असते. हे जातक एके ठिकाणी बराच वेळ बसून राहिले तर अस्वस्थ होतात. थोडक्यात यांना व्यवहारात एक प्रकारची गतिमानता आवडते.

स्त्रियांना हे नक्षत्र मध्यम आहे. या नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्रियाही सशक्त, बांधेसूद, सडपातळ व आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या असतात. चेहरा सुरेख पण जरा रागीट, मानी, करारी व गंभीर वाटतो. डोळे जरा बारीक पण पाणीदार असतात. अंगात नाजूकपणा कमीच. त्या उच्च कुळात शालीन दिसतात. त्या पुरुष वृत्तीच्या पण सत्त्वगुणी असतात. राहणी साधी पण स्वच्छता, नीटनीटकेपणा व टापटीप यांची आवड असते. कर्तबगार व विद्याव्यासंगी असून त्यांची सर्व क्षेत्रांत पुरुषांची बरोबरी करण्याची धडपड चालू असते. त्या स्वतंत्रवृत्तीच्या असल्या तरी कुटुंबवत्सल असतात.

नक्षत्र अग्नितत्त्वाचे असल्याने प्रकृती उष्ण व पित्तकारक दर्शविते. या नक्षत्राचे मुख्य रोग म्हणजे डोके दुखणे, डोळ जळजळणे, सनस्ट्रोक हे आहेत. तसेच लहानपणी गोवर, कांजिण्या, देवी या रोगांची भीती असते. रवि मंगळ या नक्षत्रात दूषित असता वरील रोगांची भीती असते. बुध बिघडला असता चक्कर, भोवळ, ज्ञानतंतू व मज्जातंतू बिघडणे. गुरु बिघडला असता मेंदूत रक्तसंचय होणे, केतू असता मूळव्याध याचा संभव असतो. काही वेळा कापणे, भाजणे, हाड मोडणे, शरीराच्या एखाद्या भागाची शस्त्रक्रिया करावी लागणे या गोष्टी पण दिसून येतील. स्त्रीच्या कुंडलीत या नक्षत्रात शुक्र बिघडला असता मासिक पाळीच्या वेळी त्रास होतो.

रवि या नक्षत्रात फारच चांगला. या नक्षत्रात रवि असून तो विशेष करून १ किवा १० या स्थानात असता या व्यक्ती लवकर लवकर अधिकारपदाला पोहोचतील. यांच्या हाताखाली अनेक माणसे काम करत असतात. नोकरी सरकारी किंवा कुठल्याही अंमलबजावणी खात्यातील असते.

मानसन्मान व कीर्ती चांगली मिळते. I.A.S. किंवा अशा चढा- ओढीच्या परीक्षेत चांगले यश देतो. शारीरिकदृष्ट्याही रवि चांगला असतो. स्वभाव जरा कडक, शिस्तप्रिय व स्वतःला विशेष समजणारा असतो. चंद्र या नक्षत्रात असता स्वभाव चंचल, भटक्या प्रवृत्तीचा व उतावळा असतो. मंगळ असता कुलदीपक, पराक्रमी, महत्त्वाकांक्षी, धडपड्या असतो. मंगळ वैद्यकीय, इंजिनिअरिंग व लष्करी शिक्षणाला फार चांगला. १, ३, ६ व १० या स्थानात या नक्षत्रातील मंगळ अधिकार देईल, श्रेष्ठ पदाला नेईल. या व्यक्ती फायर ब्रिगेड, कारखाने, पोलिस खाते, सैन्य व ज्या ठिकाणी यांत्रिक कामाचा संबंध येतो अशा ठिकाणी नोकरी करताना दिसून येतील. शरीरप्रकृती तर फारच चांगली असेल. बुधाला हे नक्षत्र जरा प्रतिकूलच आहे. शुभ बुध असल्यास लेखक, गणिती व वैद्यकीय शास्त्रांना चांगला. या नक्षत्रात १, ६, ८ व १२ या स्थानी बिघडलेला बुध वाईट असतो. गुरु या नक्षत्रात शुभ फलादेश उत्पन्न करेल. तसे उत्तम प्रकारची शरीर संपत्ती, उच्च विद्या, ज्ञान, लेखन, धन व मानसन्मान यांना चांगला असतो. तो डॉक्टर, इंजिनिअर, वकील, अर्थशास्त्रज्ञ यांना चांगला असतो. समाजप्रियता मिळते. गुरु असता देह भरदार व अवयव पुष्ट असतात. शुक्र असता दिसण्यास सुंदर व हसतमुख, कला, कौशल्य, गायन, वादन, नाटक, सिनेमा यांची आवड असणारा असतो. वाहनसौख्याची आवड जास्त, मात्र विद्येच्या बाबतीत मध्यम शरीरप्रकृतीलाही साधारणच असतो. शनीला हे नक्षत्र शरीरप्रकृतीच्या दृष्टीने बरे, पण विद्या, धन, ऐश्वर्य, अधिकार या दृष्टीने अनुकूल नसते. शरीर मजबूत, काटक, हाडाळ व शिरायुक्त असते. अंगावर मांस कमी असते. अंगमेहनत व कष्टाची कामे जास्त पडतात व त्या प्रमाणात धन मध्यम मिळते. राहू, केतू या नक्षत्रात शरीरप्रकृती व आरोग्य चांगले देतात. या व्यक्ती अतिशय धाडसी, पराक्रमी, शूर व कर्तबगार असतात. मंत्र तंत्र, जादूटोणा, गूढविद्या, मोहिनी विद्या, गारुडी विद्या, दैविक विद्या यांना हे ग्रह चांगले. केतू आध्यात्मिक व वैद्यकीय विद्येलाही चांगलाच. मात्र राहू या नक्षत्रात जसे धन, ऐश्वर्य व अधिकार देईल तसा केतू देऊ शकणार नाही. राहू बिघडला असता कुटिल, दुष्ट व त्रासिक स्वभाव दर्शवितो. केतू मात्र उदार, त्यागी व समाधानी वृत्ती दाखवील. हर्षल ज्योतिषशास्त्र, गूढ विद्या, संशोधन, विमान विद्या व विजेच्या साहाय्याने चालणाऱ्या मशिनरीसंबंधीचे शिक्षण व नवीन शोध यांना चांगला. शरीरप्रकृतीलाही बरा. नेपच्यून आरोग्य व शरीर प्रकृतीलाही मध्यम पण गूढविद्या, ज्योतिष, अंतःस्फूर्ती, साक्षात्कार, तत्त्वज्ञान व धार्मिक विद्येला चांगला.

या नक्षत्राचा अंक १ किंवा ८ आहे. त्यापैकी १ अंकाचे वर्चस्व जास्त वाटते. रत्न पोवळे आहे. यांना पांढरा व तांबूस रंग शुभ आहे. हस्ताक्षर फिकट, उभट व टोकदार असते. लिहिणे जरा जलद नक्षत्र मंदलोचनी असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवली असता ती थोड्याशा प्रयत्नाने पण जरा विलंबानेच दक्षिण दिशेला सापडू शकते.

मुहूर्त शास्त्रामध्ये या नक्षत्राचे महत्त्व फार आहे. हे प्रारंभीचे नक्षत्र असल्याने कोणत्याही शुभ कार्याला आरंभ या नक्षत्रावर करावा. विशेषतः कोणतीही विद्या शिकण्याचा आरंभ, कलाकौशल्याची कामे, संगीत, गायन, नवीन वास्तू किंवा दुकानाचे उद्घाटन, नवीन धंदा किंवा नवीन कारखाना सुरू करणे, नवीन वाहन विकत घेणे, बागेत नवीन झाडे (विशेषतः औषधी वनस्पती) लावणे, डॉक्टरांनी आपला दवाखाना सुरू करणे यांना फार चांगले. या नक्षत्रावर कोणतीही शस्त्रक्रिया चांगली व यशस्वी होते. आम्ही बऱ्याच डॉक्टरांना या नक्षत्राचा मुहूर्त दिला असता शुभ परिणाम दिसून आले. या नक्षत्रावर कोणत्याही वास्तूचा उद्घाटन समारंभ करावा. गृहप्रवेशाला हे नक्षत्र चांगले. मात्र मंगळवारी अश्विनी नक्षत्र असता अमृतसिद्धीयोग असूनही गृहप्रवेश करू नये. घर जळते. हे नक्षत्र राजनक्षत्र असल्याने राज्याभिषेकाला चांगले. कोळ्यांनी आपली नवी गलबते सुरू करावीत. रोग्यांना औषध घेण्यास व वैद्यांना औषधे करण्यास हे नक्षत्र शुभ असते. नक्षत्र चर असल्याने प्रवास, नवीन मोटार सायकल किंवा स्कूटर वापरण्यास सुरू करणे चांगले. इतर हलण्यासारखी शुभ कार्येही या नक्षत्रावर करावीत.

(टीप : जी नक्षत्रे शुभ कार्यासाठी सांगितलेली आहेत ती जर पापग्रहाने युक्त असतील किंवा त्या नक्षत्रावर ग्रहण झाले असता घेऊ नयेत.)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment