ग्रह विचार – राहू आणि केतू (Ascending & Descending Nodes )


विषय : ग्रह विचार – राहू आणि केतू (Ascending & Descending Nodes )

लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : सुलभ ज्योतिष शास्त्र, प्रेडिक्टीव्ह स्टेलर ॲस्ट्रोलॉजि

 नमस्कार,

आज आपण राहू आणि केतु विषयी माहिती घेणार आहोत.

राहू-केतू हे प्रत्यक्षात आकाशात दिसणारे ग्रह नसून गणिताने सिद्ध केलेले काल्पनिक बिंदू आहेत. सर्व ग्रह क्रांतिच्या पट्ट्यावरून भ्रमण करीत असतात. आपली पृथ्वीदेखील याच पट्ट्यावरून फिरत असते. पृथ्वीचा उपग्रह चंद्र हादेखील पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालीत असतो. चंद्राची कक्षा क्रांतिवृत्ताला बरोबर दोन ठिकाणी १८० अंशामध्ये छेदते. हे दोन्ही छेदन बिंदू उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे स्थित आहेत. त्यातील उत्तरेकडच्या छेदनबिंदूला राहू आणि दक्षिणेकडच्या छेदनबिंदूला केतू असे म्हटले जाते. राहू, केतूची सर्वसाधारण गती ३ कला आणि १९ विकला आहे. राहू-केतूला ३६० अंशाचे भ्रमण करण्यासाठी साधारणपणे १९ वर्षे लागतात. राहू आणि केतू एका राशीत दीड वर्षे असतात. विंशोत्तरी महादेशत राहूला १८ वर्षे, तर केतूला ७ वर्षे दिली आहेत. आर्द्रा, स्वाती, शततारका ही राहूची नक्षत्रे आहेत. अश्विनी, मघा, मूळ ही केतूची नक्षत्रे आहेत. रत्नशास्त्रानुसार गोमेद ( Zircon ) नावाच्या रत्नावर राहूचा अंमल आहे, तर लसण्या (Cat’s eye stone ) रत्नावर केतूचा अंमल आहे, दिशेमध्ये नैऋत्य दिशा राहू-केतूच्या अधिपत्याखाली येते. 

राहू  व केतु हया दोन ग्रहांना ‘नेचर्स डा फोर्सेस’ असे पाश्चात्य ज्योतिर्विद म्हणतात. 

हिंदू ज्योतिष विद्वानांनुसार राहू हा व्यक्तीच्या घराण्यावर प्रकाश टाकतो एखाद्या घराण्यात असलेला शाप, बाधा, वंशपरंपरागत असलेले आजार, चेटुकविधा, करणी, संमोहनविद्या, सर्पदोष, कुलदेवतेचा रोष व त्यामुळे संतति किंवा विवाह न होणे, श्राद्धकर्म विधी न केल्याने होणारा अतृप्त आत्म्यांचा पीडाकारक संचार, घरात अघोरी अशुभ शक्तीचा वावर असणे, पूर्वकर्मापासून भोग भोगावे लागणे, विचित्र व धन्वंतरीनाही न उलगडणारी दुखणी मानवी बुद्धीला न आकलन होणाऱ्या मन चक्रावून टाकणाऱ्या पिशाच्च बाधेसारख्या गोष्टी वगैरे राहूवरून समजतात. गारुडी विद्या, मायाजाल, पाशवी मंत्रतंत्रविद्या, आयुष्यभर शाप किंवा वळतळाट भोगावा लागणे, वास्तुदोष स्मृतिभ्रंश, कुलक्षय, उत्तरती कळा लागणे, निपुत्रिकरण, विषारी प्राणी, सर्पदंश, विषप्रयोग होणे, मृत्यूपश्चात चांगली गति न मिळणे, दैवाधीन संकटे, कोणत्याही मानवी प्रयत्नाने गुण न येणारी दुखणी किंवा ज्यांचे बौद्धिक समर्थन करता येत नाही, असे विषयही राहूच्याच अंमलाखाली असतात. राहू पूर्वजन्मीचे शाप दर्शवितो व त्याला उपायही दैवीच असावे लागतात.

हा संततीस्थानात असला की ‘सर्पदोष’ मानतात व त्यावर ‘नारायण नागबळी’ हा धार्मिक विधी करावा लागतो किंवा राहूच ‘गोमेद’ हे रत्न वापरावे लागते. म्हणजे सर्पदोषापासून मुक्तता होऊन संतती होते असे सांगितले जाते.

केतू देखील राहू प्रमाणे पीडा कारक आहे. आधुनिक वैद्यकीय ज्योतिष शास्त्रात केतू हा कॅन्सरचा कारक धरला जाऊ लागला आहे. केतू काळी विद्या, अघोरी विद्या चे प्रयोग करून एखाद्यास मृत्यूसम पिडा देणे, मेस्मेरिझम, हिप्नॉटिझम, व्रणविकार, असाध्य व क्लेशदायक दुखणी, त्वचां रोग, परकायाप्रवेश, परलोकविद्या, संन्यास, योगमार्ग, सर्पविद्या, आईच्या तीन पिढया ई.गोष्टी दर्शवतो.

राहू केतू हे दोन्ही अदृश्य, परंतु अघोरी शक्तीचे कारक असल्याने त्यांनी आणलेली दुःखे, रोग हे दाखवता येत नाहीत, त्याचे समर्थन करता येत नाही. हे भोग भोगावे लागतात. मानवी आयुष्यात अशा कितीतरी गोष्टी आहेत की, ज्यांचे स्पष्टीकरण शास्त्रीय निकषा वर करता येत नाही. परंतु त्यांचे अनुभव येतात.

राहू काहीवेळा ऐहिक उन्नती देतो, तर केतू उच्च पातळीची आध्यात्मिक शक्ती निर्माण करतो. राहूमुळे अनेक अडचणी आणि संकटे वारंवार येत असतात. अशा व्यक्तींना सतत मानसिक दबाव झेलावा लागतो. आरोग्याची साथदेखील पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. केतूमुळे भोंदुगिरी, फसवाफसवीचे अनुभव जास्त येतात. गुन्हेगारी प्रवृत्तीची वाढ होते. जीवन दिवसेंदिवस खालच्या पातळीवर जात असते.

हिंदू ज्योतिष विद्वानांनुसार राहू व केतू नीच जातीमध्ये जन्म घेणे दर्शवतो. जातक मुलींबरोबर षडयंत्र करणारा असू शकतो. जातकांचे विचार व आचरण निंद्य असू शकते.

उत्तर कालामृत नुसार जातक असंतुष्ट राहील, फिरण्याचा शौकीन, दक्षिणी तोंड असलेले घर पसंत करू शकतो, पर्वतावर अथवा मोठ्या जंगलात भटकायला आवडू शकते. खोटे बोलण्याची सवय अथवा कटु बोलण्यामध्ये न संकोचणारा, चालताना खाली पाहून चालणारा असा असू शकतो.

फलदीपक नुसार राहू व केतु शरीरावर प्रभाव टाकतो, गैस ट्रबल्स, शुळ पीडा यांचे द्वारे होतात, गारूडी, गाढव, मेंढे लांडगा, ऊंट, साप, विषारी किडे, अंधारी जागा, डास, ढेकूण, सारखे कीडे, वटवाघुळ, घुबड ई. राहू व केतू द्वारा दर्शित होतात. राहू केतू काळे चणे व केतू घोडयाचे चणे दर्शवितात.

राहू वडील) व केतु आजोबा दर्शवतो. दोन्ही ग्रह तुरुंगवासाचे कारण ठरू शकतात. जहाजाच्या बरोबर बुडणे, रोगग्रस्त स्त्री शी विवाह, कोड, भ्रमित होणे, कुस्ती, गुहा ई. राहू द्वारा दर्शित होते. भयाची भावना, वेडेपणा, कोड, जखम, आग दुर्घटना, शासनाचा दंड, दु:ख व कटु अनुभव घेतल्यानंतर साक्षात्कार होणे, परस्त्रीगमनमुळे  कमजोरी या ग्रहाने दिसते.

भाड्याच्या घरात राहणे, दुस-याचे खर्चावर जीवनाचा आनंद घेणे, दुस-याच्या वाहनाचा, ऑफिस कार चा वापर करणे, दतक घेणे, मुलांना धोका व दोष, धार्मिक यात्रा, जातकाचे अनारोग्य, दृष्टिदोष या गोष्टी कुंडलीतील राहू केतू च्या स्थिति वर निर्भर करतात.

कालिदास अनुसार राहू केतू जर वाईट स्थानामध्ये स्थित अस व शुभ ग्रहांनी युक्त असतील, तर जातकास मृत्यु प्रदान करतात. राहू वा केतु ६, ८, १२ वे स्थानी स्थित असेल वा त्याचे स्वामी बरोबर युती किंवा दृष्टिमध्ये असतील तर त्याचे दशामध्ये जातक कष्ट सहन करेल.

 राहू आणि केतू यांना स्वतःची रास नाही. राहू, केतू ज्या राशीत असतात त्या राशीच्या स्वामीप्रमाणे फळे देतात. ते छायाग्रह असल्यामुळे ग्रहांपेक्षा बलवान मानले जातात.यामुळे ते ज्या राशीमध्ये असतात त्या राशीच्या अधिपतीला फलित देऊ देत नाहीत व ती फलिते स्वतःच देण्याचे प्रयत्न करतात. कृष्णमूर्ती पद्धतीप्रमाणे राहू आणि केतू यांच्या फलिताबाबत विचार करताना, प्रथम राहू आणि केतू यांच्या राशीस्वामी चा विचार करावा. नंतर त्यांचेवर दृष्टी असलेल्या ग्रहांचा विचार करावा. त्यानंतर राहू आणि केतू यांच्या युतीत असलेल्या ग्रहांचा विचार करावा.

राहू कोणत्या स्थानात स्थित आहे, त्यानुसार काही स्थूल फळे आपण पाहू.

लग्नी राहू : 

जातकास संतती जन्मात धोका उत्पन्न होऊ शकतो. डोक्यावर मसा किंवा घावाचे चिन्ह, दूष्ट स्वभाव सहानुभूति नसणारा, विकार ग्रस्त असू शकतो.

द्वितीयात राहू : असंतोशी, आजारी, संतातिकरता कष्ट, काळा चेहरा, एकापेक्षा अधिक पत्नी, हनुवटी जवळ मस्सा किंवा चिन्ह, भांडण करण्यात पुढे-मागे पाहत नाही.

तृतीयात राहू : 

शेतीची आवड, दृढ, धनवान, भोजन सामग्री ची कमतरता भासणार नाही.

चतुर्थात राहू :

हीरे, जवहरात घालणारा, दोन विवाह करतो, नोकर ठेवेल, आईस अशुभ, शुभ ग्रह संबंधित नसेल तर संशयी व अविश्वासू.

पंचमात राहू : 

संततीसाठी धोकादायक, दुष्ट, शासन दंडित, घाणेरड्या घरात वा गावात राहणे.

षष्ठात राहू :

दृढ, शुर, आयुष्याचा आनंद घेणारा, वादात यश, दीर्घायुष्य, चंद्रा बरोबर युतीत असेल तर सभ्य व उच्च स्त्री पसंत करेल.

सप्तमात राहू : 

दोन बायका, गर्विष्ठ, अहंकारी, रोगग्रस्त

अष्टमात राहू :

नेहमी आजारी, दुःखी, भ्रमित, उदासीन, उद्देश पूर्ती मध्ये विलंब

नवमात राहू : 

मुलांकरिता सहाय्यक नाही, हलक्या स्त्रीशी संबंध, नोकर असतील, कोणाचे उपकार ठेवणार नाही, आईवडिलांचा तिरस्कार, धनवान व प्रसिद्ध असू शकतो.

दशमात राहू : 

विधवा स्त्री बरोबर, घाणेरड्या जागी राहणे पसंत करू शकतो, दुष्ट व्यक्ति

लाभात राहू : 

अनेक संतती, धनवानजमीन व घराचा मालक, थोडा बहिरा, काही युद्ध कार्यामध्ये प्रसिद्ध, पंडित विद्वान व्यक्ति, शत्रुवर विजय

व्यायात राहू : 

कमी संतान, दृष्टि दोष, पापी, संतानहीन, बेपर्वा, पण अपंगांची सहाय्यता करणारा असू शकतो.

केतू कोणत्या स्थानात स्थित आहे, त्यानुसार काही स्थूल फळे आपण पाहू.

लग्नी केतू :

मृत संतान जन्म होणे, चेह-यावर चिन्ह, आजारी, कंजूस, शुक्र ग्रह युक्त असेल तर धनवान व दीर्घायु संतान होईल.

द्वितीयात केतु : 

काही बचत होणार नाही. अस्वस्थ, कुटुंबाकरिता दु:खी, विशेष रुपाने मुली करता, काळा चेहरा, दोन वेळा विवाह, केतु बरोबर शुभ ग्रह असेल तर हणूवटी वर मस्सा, भाग्यवान लोकांचा द्वेष करणारा.

तृतीय मध्ये केतू : 

चांगल्या स्वभावाचा, धनवान, संवाद वाहक, ठेकेदार

चतुर्थ मध्ये केतु :

धनवान, जवाहरात वाला, दोन वेळा विवाह, आई वडिला करिता अनिष्ट, जर शुभग्रह युक्त असेल तर वाईट परिणाम कमी होतील.

पंचमात केतु : 

संतती करिता वाईट, वाईट दृष्टि, शासना द्वारे दंडित, नीच लोकांचा शेजार, कपटी होईल, पिसाळलेला कुत्रा चावल्याने होणारे रोग, अस्वस्थ.

षष्ठात केतू :

साहसी, पूर्ण संतुष्ट जीवन, पण काही बचत नाही, प्रसिद्ध विद्वान व अध्ययनशील

सप्तमामध्ये केतु :

प्रथम पत्नीच्या हानि नंतर पुनः विवाह,केतुच्या जोडीस एखादा पापग्रह असेल, तर दुसरी पत्नी दीर्घ रोगाने त्रस्त. शुभग्रह युक्त असेल तर तो दीर्घायु होईल. भाग्यशाली पत्नी असेल. पापग्रह जोडीदाराच्या चरित्र हनन करतात व विवाहित आयुष्यात तणाव निर्माण करतात. निरूद्देश्य जगणे, भटक्या दुष्ट 

अष्टमात केतू :

दीर्घ रोग, मृत्युपत्र द्वारा धनाची प्राप्ति, दुस-याचे पैशावर मजा, दुस-याचे पत्नी बरोबर सहवासाने सुख प्राप्त करेल, मैथुन रोग, कंजूस, केतूबरोबर वा शुभग्रह दृष्टी दीर्घायु व धनवान बनवेल.

नवमात केतू :

संततीस दीर्घायुष्य, हलक्या स्त्री बरोबर, नोकरांनी बरोबर संबंध, कधीही सहानुभूति नाही ठेवत, कधीही दान नाही करत, लगेच उत्तेजीत होणारा, तर्क युक्त, चांगल्या गोष्टी करणारा, दुस-याशी वाईटपणा घेणारा, वाईट व्यक्ति, हट्टी, आत्मप्रशंसा करणारा, अहंकारी व प्रशंसक गोळा करणारा.

दशमात केतू :

विधवा स्त्रीशी सहयोग, घाणेरड्या जागी राहणारा, शुभ ग्रह अशुभ फळ कमी करेल, स्वामीभक्त नोकर असतील, कूटनीतिज्ञ, बहादुर,  स्वाभाविक सफलता, प्रवासाची आवड

लाभात केतू :

पुष्कळ मुले, धनवान, साहसी, सामाजिक सफलता प्राप्त, कीर्तिवान, कार्य करण्याकरिता उत्सुक, कमी खर्चिक

व्ययात केतू :

अल्प संतती, कमजोर दृष्टि, पापी, सिद्धांत हीन, वरिष्ठांचे धन व प्रतिमेचा नाश.

(टीप : वरील स्थुलमांन अनेक घटकांवर आधारित आहे, कोणतेही निष्कर्ष काढताना जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)

संपर्क : 7058115947

(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment