यंत्र साधना


नमस्कार,

एखादा जातक ज्योतिषाकडे येतो, तेव्हा ज्योतिषी त्याच्या कुंडलीचे विश्लेषण करतो आणि त्यांस इष्ट तसेच अनिष्ट कालावधीची कल्पना देतो. पण काही जातक विचारणा करतात कि अनिष्ट गोष्टींसाठी काही उपाय आहे का.

खरेतर सगळ्याच गोष्टींना उपाय चालत नाही, अन्यथा विधिलिखित या शब्दाला अर्थ च उरला नसता आणि ज्योतिषी स्वत: देव आहोत असेच समजायला लागले असते.

काहींना भावपूर्ण केलेल्या उपायांचा उपयोग होतो तर काहींच्या समस्येची तीव्रता कमी व्हायला मदत होते.

हिंदू ज्योतिष शास्त्रात फार पूर्वीपासून अनेक ग्रंथांमध्ये असे पीडा निवारण्याचे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याचाच आधार घेऊन ज्योतिषाकडून उपाय सुचवले जातात.

कोणी मंत्राचा जप करण्यास सांगेल, कोणी होम हवन शांती करण्यास सांगेल, कोणी पारायण, ग्रंथ वाचन सुचवेल, कोणी देवास ठराविक नैवेद्य दाखवून साकडे घालण्यास सांगेल, कोणी रंग व गुणधर्मांचा वापर करून रत्न, खडे, वा तत्सम उपाय सुचवेल. जो तो आपल्या श्रद्धेप्रमाणे वा झेपेल जमेल असा उपाय करतो. या सर्व प्रकारां प्रमाणेच आपल्याकडे यंत्र साधन फार प्राचीन काळापासून चालत आले आहे.

तर आज मी त्यातील जे अत्यंत सोपे यंत्र साधन जे प्रत्येक ग्रहाच्या पीडा निवारण्यासाठी उपयुक्त ठरेल ते व साधना कशी करावी याची थोडक्यात माहिती आपल्याला देणार आहे.

यंत्र या शब्दाचा अर्थ भारतीय उपकरण अथवा युक्ती या अर्थाने घेतात.

ज्योतिष, रसशास्त्र, आयुर्वेद, गणित, अभियांत्रिकी ई. शाखांमध्ये या चा प्रयोग दिसतो. ब्रह्मगुप्त द्वारा रचित ब्रह्मस्फुटसिद्धान्त मध्ये  ‘यन्त्राध्याय’ नामक २२वां अध्याय आहे.

यंत्र सामान्यपणे आपल्या उद्दिष्टाशी संबंधित विशेष देवता/ ग्रह देवता यांचेशी संलग्न असतात. याचा वापर विशिष्ट लाभ, ध्यान, हानिकारक प्रभावापासून रक्षण करण्यासाठी, विशेष शक्तींचा विकास करण्यासाठी; धन, सफलता, संतती, विवाह, ई. गोष्टी प्राप्त होण्यासाठी घरात अथवा मंदिरात दैनंदिन पूजेसाठी ई. केला जातो.कधी कधी ताईत मध्ये देखील वापरला जातो. यंत्रे अंक, भूमितीय आकृती, त्रिकोण, चौकोन,, षट्कोन, अष्टभुज, प्रतीकात्मक चिन्हे, मंत्र ई. चा समावेश असू शकतो.

यंत्र हे मंत्राचेच प्रतिरूप असते. यंत्र हे मंत्राचेच स्वरूप आहे. यंत्राकृतीत ती देवता अधिष्ठित असते. यंत्राची रचना केवळ रेखांकन नसून त्यामागे एक विज्ञान आहे. चित्र व प्रतिमेप्रमाणेच यंत्रे ही देवतेची प्रतिरूपे असतात. काही यंत्रे रेखाप्रधान असतात. काही आकृतिप्रधान व संख्याप्रधान असतात. ज्याच्या नावाचे यंत्र असते त्या देवतेचा मंत्र ताम्रपटावर किंवा भूर्जपत्रावर खोदलेला असतो.

सांगितलेल्या विधीप्रमाणे नियमाने श्रद्धापूर्वक या मंत्राचे पूजन केल्याने सर्व विघ्ने दूर होतात.

सूर्य यंत्र :

सूर्योपासना करण्यासाठी अत्यंत सोपे यंत्र या ठिकाणी देत आहे. अनिष्ट रविसाठी हे यंत्र रामबाणच आहे.

प्रारंभ : कृत्तिका नक्षत्र असेल त्या दिवशी या यंत्रसाधनेस प्रारंभ करावा. जेव्हा रवि सिंह राशीत गोचर भ्रमण करतो तो काळ या साधनेस श्रेष्ठ असतो.

साधना स्थान : ज्या जागेवर बसून साधना करावयाची आहे ते शांत व स्वच्छ असावे. साधना होईपर्यंत एकाग्र चित्त असावे.

आसन व वस्त्र : साधना काळात शिवलेले कपडे घालू नयेत. न शिवलेले रेश्मी वस्त्र धारण करावे. रेश्मी वस्त्र नसेल तर स्वच्छ धोतर वापरावे. वस्त्र व धोतर लाल असावे.

साधन विधी : सूर्यमंत्र साधनेस प्रारंभ करण्यापूर्वी धूप व उदबत्त्या प्रज्वलित करून वातावरण प्रसन्न करावे. सूर्य व विष्णूचे चित्र चौरंगावर लाल कापड अंथरून त्यावर ठेवावे. साधकाचे तोंड पूर्व दिशेला असावे. सूर्य व विष्णूचे धूप-दीपांनी पूजन करावे. गंगाजलात केशर मिसळावे. त्या पाण्याने भोजपत्र स्वच्छ करावे व ते वाळवून घ्यावे. ही साधना कृत्तिका नक्षत्राच्या दिवशी सुरू करून २७ दिवसांत पूर्ण करावी.

चंद्र यंत्र :

चंद्र यंत्र साक्षात चंद्रदेवतेची प्रतिमा आहे. हे यंत्र विधिवत पूजन होम ३ हवनाने सिद्ध केल्यावर आजच्या भौतिक युगातसुद्धा अधिक शक्तिमान व प्रभावशाली बनते. म्हणून बाजारात मिळणाऱ्या यंत्राचे पूजन केल्याशिवाय ते गुणकारी ठरत नाही. चंद्रदेवतेच्या उपासनेसाठी अत्यंत साधे व सोपे यंत्र देत आहे.

प्रारंभ : शुक्ल पक्षातील रोहिणी नक्षत्र असेल त्या दिवशी साधना सुरू करावी. सोमवारी रात्री चंद्राच्या होऱ्यात ही साधना प्रारंभ करावी. 

साधना स्थान -: साधना स्थान शांत व प्रसन्न असावे. या जागेत चंद्रप्रकाश येत असेल तर उत्तम. साधना पूर्ण होईतो एकाग्रचित्त राहावे.

आसन व वस्त्र -: शिवलेली वस्त्रे परिधान करू नये. पांढरे वस्त्र, नेसावे. आसन पांढऱ्या लोकरीचे किंवा दुर्वासन असावे. धोतर चालेल.

साधना विधी -: चंद्र यंत्र साधनेपूर्वी धूप प्रज्वलित करावे. आंब्याच्या पाटावर पांढरी कमळाची फुले अंथरून त्यावर शंकराची तसबीर ठेवावी. चंद्रमौळी शंकराच्या तसबिरीसमोर साधकाने उत्तराभिमुख बसावे.

साधकाने आसनावर बसून ३ वेळा आचमन करावे. गंगाजलात केशर मिसळावे. त्या पाण्याने भोजपत्र स्वच्छ करावे. अष्टगंधाची शाई करून भोजपत्रावर आकृतीत दाखविल्याप्रमाणे चंद्र यंत्र लिहावे. यंत्र तयार झाल्यावर शंकराच्या समोर ठेवून त्याची पूजा करावी. यंत्राला नमस्कार करून जपास सुरुवात करावी. जपसंख्या ४४,०००, जप समाप्तीच्या दिवशी १०८ आहुती द्याव्यात. नमस्कार कमीत कमी ११ वेळा करावा. पुन्हा पूजन करून यंत्र उचलून घ्यावे व त्यावर थोड्या फूलपाकळ्या व होमपात्रातील भस्म ठेवावे. यंत्राच्या आधी २ घड्या कराव्यात. नंतर ४ घड्या करून रेशमी धाग्याचे १२ फेरे देऊन ५ गाठी माराव्यात. चांदीच्या ताईतात यंत्राची घडी ठेवून ताईताचे तोंड मेणबत्तीने बंद करावे. श्रद्धेने ताईत गळ्यात घालावा. दान करावे व घरातील वडील मंडळींना व नमस्कार करावा.

मंगळ यंत्र :

मंगळ यंत्र मंगळाची सजीव प्रतिमा आहे. हे यंत्र विधिवत् बनवून पूजा पाठ व होमहवनाने सिद्ध करून घेतले तर आजच्या भौतिक विज्ञानाच्या कोणत्याही यंत्रापेक्षा अधिक शक्तिशाली व त्वरित प्रभावी होते. वातावरण, आस्था व सहिष्णुतेचा अभाव आज सर्वत्र आढळतो. यामुळे बाजारात मिळणारे यंत्र विकत घेऊन त्या यंत्राची विधिवत् पूजा करावी. मंगळ ग्रहाच्या उपासनेचे एक अत्यंत सोपे यंत्र येथे देत आहे.

प्रारंभ : शुक्ल पक्षातील मृग, चित्रा धनिष्ठा या मंगळाच्या तीन नक्षत्रांपैकी एक नक्षत्र ज्या मंगळवारी येईल त्या दिवशी सूर्योदयापासून एक तासाचा कालावधी हा मंगळ यंत्रसाधनेस उत्तम आहे.

साधना स्थान : ज्या ठिकाणी बसून साधना करावयाची असेल, ती जागा स्वच्छ, शांत व प्रसन्न असावी. साधना पूर्ण होईपर्यंत मन एकाग्र असावे.

आसन व वस्त्र • साधना काळात शिवलेली वस्त्रे नेसू नयेत. फक्त – तांबडे सोवळे नेसावे. लाल रंगाचे रेशमी/लोकरीचे आसन वापरावे कुशासनही चालेल. मृगासन हे या साधनेसाठी श्रेष्ठ आसन आहे.

साधना विधी : मंगळ साधना सुरू करण्यापूर्वी धूप जाळावा, उदबत्त्या लावाव्यात. पाटावर फुले अंथरून आसन तयार करून बजरंगबलीच्या फोटोची स्थापना करावी. फोटोची स्थापना पूर्वाभिमुख करा. स्वतः साधकाने आसनावर (पाट) बसून ३ वेळा आचमन करावे. हनुमंताचे ध्यान करावे. केशरयुक्त पाण्याने भोजपत्र स्वच्छ करून वाळवावे. अष्टगंधाच्या शाईने मंगळ यंत्र लिहावे. हे यंत्र हनुमानाच्या समोर पाटावर ठेवावे. त्याची पूजा करावी. लाल फुले वाहावीत. पूजा झाल्यावर मंगळ नमस्कार मंत्र म्हणून नमस्कार करावा व संकल्पित जपास प्रारंभ करावा. एकूण जप ४० हजार करावे. जपसमाप्तीच्या वेळी १०८ आहुत्या जपमंत्राने अग्नीत द्याव्यात. यज्ञविधीत त्रुटी राहिली असेल तर त्याबद्दल क्षमायाचना करावी. मंगळ पूजा करून यंत्र पाटावरून उचलून घ्यावे. त्यावर फुलांची पाकळी व यंत्रभस्म ठेवावे. यंत्राच्या आधी तीन घड्या घालाव्यात व लाल रेशमी दोऱ्याने नऊ फेरे मारून तीन गाठी माराव्यात. ताईतात हे यंत्र घालून मेणबत्तीने ताईताचे तोंड बंद करून श्रद्धेने गळ्यात धारण करावे. या विधीनंतर गव्हाच्या पिठात गूळ-तूप घालून चुरम्याचे लाडू करून घ्यावेत. लाडवांचे जेवण ब्राह्मण व लहान मुलास द्यावे. तांबे, गूळ, पोवळा, लाल कापड दान करावे. घरातील सर्व वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा.

पथ्य : (१) यंत्रधारण करून शवाला स्पर्श करू नये. स्मशानात जाताना यंत्र बरोबर नेऊ नये, शवाला अग्नी देऊ नये. (२) यंत्र ताईतात घातल्यावर ताईत पुन्हा कधीच उघडू नये. (३) मंगळ यंत्र इतर यंत्राबरोबर धारण करू नये.

बुध यंत्र :

या ठिकाणी बुध ग्रहाचे एक अत्यंत सोपे यंत्र देत आहे. सांगितलेल्या विधिविज्ञानानुसार नियमपूर्वक श्रद्धेने या यंत्राची पूजा केल्यास सर्व अडचणींचा परिहार होऊन यशस्वी जीवन जगण्यास या यंत्राची निश्चित मदत होते. भौतिक व आध्यात्मिक दोन्ही सुखे मिळतात..

प्रारंभ : कोणत्याही महिन्याच्या बुधवारी बुध नक्षत्रांपैकी एक नक्षत्र येत असेल त्या बुधवारी सकाळी सूर्योदयापासून एक तासाच्या अवधीत साधनेस आरंभ करावा.

साधना स्थान : साधना स्थान शांत, प्रसन्न, स्वच्छ व एकाग्र असावे. आसन व वस्त्र – शिवलेली वस्त्रे नेसू नयेत. फक्त सोवळे नेसावे किंवा पांढरे धोतर नेसावे.

साधना विधी – धूप, उदबत्त्या लावाव्यात. श्री दुर्गादेवीचे चित्र पाटावर हिरवे वस्त्र अंथरून त्यावर तुमचे तोंड पूर्वेला राहिलं असे ठेवावे. आसनावर बसून देवीची षोडषोपचाराने पूजा करावी. ही पूजा बुध नक्षत्रापासून सुरू करून २७ दिवसांत पूर्ण करावी. देवीच्या पूजेनंतर तीन आचमन करावे. | गंगाजल किंवा नदीचे पाणी घेऊन त्यात केशर मिसळावे. या केशरयुक्त पाण्याने भोजपत्र स्वच्छ करून वाळवून घ्यावे. अष्टगंधाची शाई तयार करून दाखविलेल्या आकृतीप्रमाणे बुध यंत्र लिहावे. यंत्राचे नऊ भाग सारख्या आकाराचे असावेत. यंत्र लिहिताना यंत्राचे षोडषोपचारे पूजन करावे. त्यानंतर दीप प्रज्वलित करून ॐ बुध बुधाय नमः मंत्र तोंडाने म्हणत राहावा. हे यंत्र दुर्गादेवीच्या समोर त्याच पाटावर ठेवावे.

खालील मंत्र सात वेळा म्हणावा.

ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल ऐं क्लीं चामुण्डायै विच्चे ज्वलं ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ॥ ॐ ग्लौ हुं क्लीं जूंसज्वालय हंस लक्ष फट् स्वाहा ॥

त्यानंतर बुध मंत्र ॐ बुं बुधाय नमः १६००० इतक्या जपास आरंभ करावा. हा जप सात दिवसांत पूर्ण करावा.

संकल्पित जपसंख्या पूर्ण झाल्यावर गाईच्या दुधाच्या खिरीच्या २१ आहुत्या द्याव्यात.

गुरू यंत्र :

जिज्ञासू व श्रद्धावान साधकांसाठी येथे एक अत्यंत सोपे परंतु प्रभावी असे गुरू यंत्र देत आहे.

प्रारंभ : कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील गुरुवारी पुनर्वसु नक्षत्र असेल त्या गुरुवारी सूर्योदयापासून एका तासाच्या अवधीत गुरू यंत्र साधनेस प्रारंभ करावा.

साधना स्थान : शांत, प्रसन्न, स्वच्छ, एकाग्र असावे. आसन व वस्त्र – शिवलेली वस्त्रे नेसू नये फक्त पिवळ्या रंगाचे सोवळ नेसावे किंवा पांढरे धोतर नेसावे. दर्भासनही चालेल.

विधी – गुरू यंत्रसाधना सुरू करण्यापूर्वी धूप, उदबत्त्या लावाव्यात. गुरूची प्रतिमा आंब्याच्या लाकडाच्या पाटावर वस्त्र अंथरून त्यावर ठेवावी.

तुमचे तोंड पूर्वेला राहील अशा स्थितीत प्रतिमा ठेवावी. ही साधना पुनर्वसु नक्षत्राच्या दिवशी सुरू करून २७ दिवसांत तिची सांगता करावी.

गुरू प्रतिमेचे पूजन करून तीन वेळा आचमन करावे. केशरयुक्त पाण्याने भोजपत्र स्वच्छ करून वाळवावे. लेखणीने गुरू यंत्र लिहावे. यंत्राचे नऊ भाग करावे. यंत्र तयार झाल्यावर पाटावर ठेवावे. पिवळ्या फुलांनी व धूपदीपाने यंत्र पूजन करावे. प्रतिमेस नमस्कार करावा व संकल्पित जपास आरंभ करावा. मंत्रजप पूर्ण झाल्यावर मंत्र म्हणत २७ आहुत्या द्याव्यात. शेवटच्या दिवशी १०८ आहुत्या द्याव्यात. यज्ञ पूर्ण झाल्यावर पूजन करावे. तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा. यंत्र उचलून फुलाची एक पाकळी व चिमूटभर भस्म घेऊन ते यंत्रावर ठेवावे. पहिल्यांदा तीन नंतर तीन अशा यंत्राच्या घड्या घालाव्यात. पिवळ्या दोऱ्याने तीन गाठी माराव्यात. पिवळ्या वस्त्रात बांधून उजव्या हाताच्या दंडावर हे यंत्र बांधावे. यंत्र ताईतात घालून बांधल्यास सुरक्षित राहील. ब्राह्मण भोजन द्यावे, दान करावे, दक्षिणा द्यावी.

शुक्र यंत्र :

या ठिकाणी शुक्र ग्रहाचे एक अत्यंत सोपे यंत्र देत आहे. सांगितलेल्या विधीप्रमाणे नियमपूर्वक या यंत्राची पूजा केल्यास सर्व अडचणींचा परिहार होऊन शुक्र ग्रहाची अनिष्टता निवारली जाऊन साधक सर्वार्थान सुखी होईल.

प्रारंभ : कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील शुक्रवारी भरणी, पूर्वाफाल्गुनी, पूर्वाषाढा यापैकी एक नक्षत्र असेल त्या शुक्रवारी सूर्योदयापासून एक तासाच्या अवधीत यंत्रसाधना आरंभ करावी. दीपावलीच्या रात्री तिसर्र प्रहरापासून सुद्धा यंत्रसाधना आरंभ करता येईल.

साधना स्थान : शांत, स्वच्छ व प्रसन्न असावे. एकाग्र असावे. मध्येच कोणाशी बोलू नये.

आसन व वस्त्र : शिवलेली वस्त्रे नेसू नयेत. फक्त सोवळे नेसावे किंवा पांढरे धोतर नेसावे. बसण्यासाठी पांढऱ्या लोकरीचे आसन असावे. दर्भासनही उत्तम असते.

साधना विधी : शुक्राची प्रतिमा पाटावर पांढरे वस्त्र अंथरून त्यावर ठेवावी. तुमचे तोंड पूर्वेला राहील अशा स्थितीत ती पाटावर ठेवावी. आसनावर बसून, शुक्र प्रतिमा व यंत्राची धूप, दीप, फुले यांनी पूजा करावी. शुक्र नक्षत्रापैकी कोणत्याही नक्षत्रावर सुरू करून २७ दिवसांत त्याची सांगता करावी. पूजन झाल्यावर तीन वेळा आचमन करावे. केशरयुक्त पाण्याने भोजपत्र व तांब्याचे यंत्र स्वच्छ करून वाळवावे. अष्टगंधाची शाई घेऊन, भोजपत्रावर शुक्र यंत्र लिहावे. पांढरी फुले, धूप- दीपाने यंत्रपूजन करावे. शुक्राचा नमस्कार मंत्र म्हणून त्यांना नमस्कार करावा व जपाचा संकल्प करून जपास सुरुवात करावी. एकूण ६८००० जप करावा.

रोजचा मंत्र जप पूर्ण झाल्यावर २७ आहुत्या द्याव्यात. शेवटच्या दिवशी १०८ आहुत्या द्याव्यात. यज्ञ पूर्ण झाल्यावर पूजन करून नैवेद्य दाखवावा.

यंत्र पूजेतून उचलून घ्यावे. त्यावर वाहिलेल्या फुलाची एक पाकळी व सोमपात्रातील चिमूटभर भस्मही ठेवावे. भोजपत्राच्या आधी चार व नंतर चार घड्या घालाव्यात. रेशमी दोऱ्याने सात गाठी द्याव्यात व ताईतात बंद मन यंत्र उजव्या दंडावर धारण करावे. ब्राह्मणास भोजन व दक्षिणा द्यावी. यथाशक्ती दान करावे. सुख शांती, विवाहात अडचणी असतील तर निवारणासाठी, यौनरोग दूर करण्यासाठी शुक्र यंत्र धारण करावे.

शनियंत्र :

या ठिकाणी शनि ग्रहाचे एक अत्यंत सोपे यंत्रे दिले आहे.

प्रारंभ : कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील शनिवारी अनुराधा नक्षत्र असेल त्या शनिवारी रात्री दुसऱ्या प्रहरात यंत्रसाधना प्रारंभ करावी.

साधना स्थान : प्रसन्न, स्वच्छ, शांत असावे. इतर ग्रह यंत्रसाधनेसाठी लागते ती सर्व सामग्री फक्त काळी फुले व काळा दोरा शनि यंत्रसाधनेसाठी वापरावा.

साधना विधी इतर ग्रहाप्रमाणेच करावा. सर्व विधी आधी तीन व नंतर तीन अशा घड्या कराव्यात. काळ्या रेशमी दोऱ्याने झाल्यावर त्यावर सहा गाठी माराव्यात. हे यंत्र ताईतात घालून उजव्या हाताच्या दंडावर धारण करावे.

राहू यंत्र :

या ठिकाणी राहूचे अत्यंत सोपे यंत्र दिले आहे. सांगितलेल्या विधीप्रमाणे नियमांचे पालन करून यंत्राची पूजा करावी. हे यंत्र स्थापन केल्यास राहूची अनिष्टता संपुष्टात येईल व अपणास भौतिक व आध्यात्मिक दोन्ही सुखे प्राप्त होतील.

साधना स्थान : ज्या ठिकाणी बसून साधना करायची असेल ती जागा स्वच्छ, शांत व प्रसन्न असावी. सुगंधित उदबत्त्या लावून वातावरण प्रसन्न करावे.

प्रारंभ : कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील शनिवारी आर्द्रा, स्वाती किंवा शततारका नक्षत्र असेल तर त्या शनिवारी दुसऱ्या प्रहरात यंत्रसाधनेस प्रारंभ करावा.

आसन व वस्त्र – • साधना काळात शिवलेले वस्त्र नेसू नये. निळ्या रंगाचे सोवळे नेसावे. आसन निळ्या रंगाचे लोकरीचे किंवा दर्भासन असले तरी चालेल.

साधना विधी : राहू यंत्रसाधना सुरू करण्यापूर्वी राहूची प्रतिमा, राहूचा फोटो, तांबे किंवा लोखंडाच्या पत्र्यावर कोरलेले राहू यंत्र हे आंब्याच्या पाटावर निळे वस्त्र अंथरून त्यावर ठेवावे. तुमचे तोंड पश्चिमेस राहील अशी मांडणी करावी. आसनावर बसून राहू देवतेची-यंत्राची पूजा करवी. निळी फुले वाहावीत. करंजाच्या किंवा मोहरीच्या तेलाची समई लावावी. ही साधना शनिवारी आर्द्रा, स्वाती किंवा शततारका नक्षत्रावर सुरू करून २७ दिवसांत संपवावी.

राहूच्या यंत्राची पूजा केल्यावर तीन वेळा आचमन करावे. गंगाजल किंवा विहिरीच्या नदीच्या पाण्यात केशर मिसळून केशरमिश्रित पाण्याने भोजपत्र वे लोखंड तांब्यांवर कोरलेले यंत्र स्वच्छ करून वाळवावे. अष्टगंधाची शाई करून भोजपत्रावर वरील आकृतीप्रमाणे राह यंत्र लिहावे. हे यंत्र व धातूवर कोरलेले यंत्र अशी दोन्ही यंत्रे राहू लाकडाच्या पाटावर स्थापन करावीत. यंत्राला नमस्कार करावा. नंतर संकल्प प्रतिमेसमोर आंब्याच्या करून जप करावा. जप हळुवार आवाजात करावा. मध्येच कुणाशीही बोलू नये. अंग जोरजोराने हलवू नये. एकूण ७२,००० जप करावयाचा दररोज २७०० याप्रमाणे २६ दिवस जप करावा. शेवटच्या दिवशी १८०० जय । करावा. म्हणजे जपसंख्या २७ दिवसांत पूर्ण होईल. आहे.

रोजचा मंत्र पूर्ण झाल्यावर रोज २७ आहुत्या द्याव्यात. शेवटच्या दिवशी १०८ आहुती द्याव्यात.

केतू यंत्र : 

प्रारंभ : कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील आश्विनी, मघा, मूळ यापैकी एक नक्षत्र ज्या शनिवारी येईल त्या शनिवारी रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात केतू यंत्राची साधना सुरू करावी.

साधन स्थान : ज्या ठिकाणी बसून साधना करावयाची ती जागा – शांत, प्रसन्न व स्वच्छ असावी. सुगंधित उदबत्त्या लावून वातावरण प्रसन्न करावे. साधना पूर्ण होइपर्यंत एकाग्र असावे. मध्येच कोणाशी बोलू नये.

आसन व वस्त्र : साधना काळात शिवलेली वस्त्रे नसू नयेत. काळ्या रंगाचे वस्त्र नेसावे. काळ्या रंगाने रंगवलेले वस्त्र नेसल्यास अधिक चांगले. बसण्यासाठी आसन काळ्या लोकरीचे असावे. दुर्वासन किंवा कुशासनसुद्धा चालेल.

यंत्रसाधनेचा विधी : केतू यंत्र साधना सुरू करण्यापूर्वी केतूची प्रतिमा, पोलाद किंवा तांब्यावर कोरलेले यंत्र आंब्याच्या पाटावर काळे वस्त्र अंथरून त्यावर ठेवावे. आपले तोंड पश्चिमेला राहील अशा पद्धतीने पूजेची मांडणी करावी. आपण आसनस्थ होऊन केतू यंत्र व प्रतिमेचे पूजन करावे. फुले, धुरकट रंगाची असावीत. अशा रंगाची फुले न मिळाल्यास लाल कण्हेरीची फुले वाहावीत. करंज किंवा मोहरीच्या तेलाने समई लावावी. ही साधना २७ दिवसांत पूर्ण करावी.

केतू यंत्र व देवतेची पूजा झाल्यावर तीन वेळा आचमन करावे. गंगाजळ, नदी वा केशरयुक्त पाण्याने भोजपत्र व धातूवर कोरलेले यंत्र वाळवून घ्यावे. अष्टगंधाची शाई करून आकृतीत दाखवल्याप्रमाणे लेखणीने भूर्जपत्रावर केतू यंत्र लिहून झाल्यावर हे भूर्जपत्रावरील यंत्र व धातूवर कोरलेले यंत्र, केतू प्रतिमेच्या समोर पाटावर ठेवावे. केतू देवाला नमस्कार करावा. नंतर संकल्पपूर्वक जप करण्यास सुरुवात करावी. जप हळू आवाजात करावा. शांत व एकाग्र चित्ताने जप करावा. एकूण ६८,००० जप २७ दिवसांत पूर्ण करावा.

रोजचा मंत्र पूर्ण झाल्यावर रोज २७ आहुत्या द्याव्यात. शेवटच्या दिवशी १०८ आहुत्या द्याव्यात. यज्ञ पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा केतू यंत्र व प्रतिमेचे पूजन करावे. तिळवडी किंवा तिळपोळीचा नैवेद्य दाखवावा. पूजेनंतर यंत्र उचलून घ्यावे. त्यावर वाहिलेल्या फुलाची एक पाकळी व चिमूटभर भस्म ठेवावे. आधी यंत्राच्या चार घड्या व नंतर पुन्हा ४ घड्या कराव्यात. काळ्या रेशमी दोऱ्याने यंत्र बांधून सात गाठी माराव्यात. हे यंत्र ताईतात घालून ताईताचे तोंड मेणबत्तीने बंद करावे. हे यंत्र उजव्या दंडावर धारण करावे. धातूवर कोरलेले यंत्र फ्रेम करून दुकानात, फॅक्टरीत पश्चिम दिशेला लावावे. पूजेत ठेवले तरी हरकत नाही.

ब्राह्मणभोजन करावे. त्या ब्राह्मणाला तिळवडी किंवा तिळाची पोळी भोजनात द्यावी. भोजनानंतर आपल्या ऐपतीनुसार सोने, काळे तीळ, पोलादी सुरी, तेल, काळे वस्त्र व रोख दक्षिणा दान म्हणून द्यावी.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)

संपर्क : 7058115947

(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment