
नमस्कार,
असे मानले जाते कि स्त्री जातकाच्या कुंडलीत सप्तम स्थानात सूर्य स्थित असेल तर, पतीस स्त्री सौख्य लाभत नाही. या संदर्भात एक श्लोक वाचण्यात आला होता. तो येथे देत आहे.
दिनपताविह कामनिकेतनं गतवति प्रवराप्यवराभवेत् । जनुषि वल्लभभावविवर्जिता सुजनतारहिता वनिता भृशम् ।।
या श्लोकाचा अर्थ असा आहे –
जर सूर्य सातव्या घरात असेल, तर सर्वात उत्कृष्ट स्त्री देखील क्षुद्र आणि निरुपयोगी बनते, तिच्यात प्रेमाची भावना नसते.
तिच्या पतीसाठी, ती सभ्यतेपासून वंचित आहे आणि उग्र आहे, म्हणजेच ती रागीट स्वभावाची आहे.
खरे तर अशा नियमांचे प्रत्येक स्थानानुसार अगदी बारकाईने परीक्षण करून त्यातील तथ्य तपासणे अत्यंत आवश्यक असते. उगाच दोन चार कुंडल्याना लागू झाले म्हणजे ते अंतिम सत्य मानून त्या आधारे भविष्य कथन केले तर, ते एखाद्या विवाहित जोडीसाठी जीवघेणा खेळ ठरू शकते. लोक विश्वासाने ज्योतिषाकडे येतात, तर त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे ज्योतिषाचे कर्तव्यच आहे.
आता वरील श्लोकाचेच उदाहरण घेऊ या..
या श्लोकानुसार अशी सूर्य स्थिती असेल तर संसारात मिठाचा खडा टाकायला सर्वस्वी पत्नी जबाबदार असेल असा अर्थ सरळ सरळ ध्वनित होतो. विचार करा एकटा सप्तमस्थ सूर्य एवढी हानी करत असेल तर सप्तम स्थान भार्या स्थान आणि स्त्री च्या कुंडलीतील सूर्य पती कारक मानण्याला काय अर्थ उरतो. माझ्या मते असे श्लोक विशिष्ट लग्नास नजरेसमोर ठेऊन रचले गेले असावेत व त्याच बरोबर इतर हि काही अनिष्ट योग अशा परिणामास कारणीभूत असावेत, त्याशिवाय हे असंभव वाटते.
आता हेच लक्षात घ्या कि, दररोज सूर्य संध्याकाळी साधारण ६ ते ८ वाजता पश्चिमेस सप्तम स्थानात असतो. आता या दोन तासात जगभरात लाखो आणि आत्तापर्यंत करोडो स्त्रियांचा जन्म झाला असेल. त्या सर्व स्त्रिया त्यांचे पतीस वैवाहिक सौख्यासाठी मारक ठरल्या आहेत. हे बुद्धीस न पटणारे आहे.
केवळ सातव्या घरात सूर्य दिसत असला तरी, तो सूर्य कोणत्या नक्षत्रात, चरणात वा उप नक्षत्रात आहे, कोणत्या राशीत आहे, कोणत्या ग्रहाच्या युतीत आहे, कोणकोणते ग्रह कशा प्रकारची सूर्यावर दृष्टी ठेवून आहेत, त्या स्त्री ला अशा प्रकारची फळे देणाऱ्या कारक ग्रहांच्या दशा अंतर्दशा चालू आहेत का, ग्रह गोचर स्थिती काय इंगित करते अशा सर्व बाबी तपासून च मग अशा गंभीर निर्णयावर येणे आवश्यक ठरते.
उलट पक्षी मी एवढे मात्र म्हणेन कि प्रत्येक जातकास मग लग्न रास कोणतीही असो, ७ वे स्थान हे एक बाधक स्थान असल्याने त्या स्त्री स अनारोग्याचे फळ प्राप्त होऊ शकते.
या श्लोकांत वर उल्लेख केलेल्या बाबींचा काहीच उल्लेख नाही. तरी त्या श्लोकाप्रमाणे दिलेले फळ किमान प्रत्येक लग्न राशीला लागू होते का हे आपण पाहू या.
१. मेष लग्न असेल आणि सूर्य ७ वे स्थानात स्थित असेल तर :
सप्तम स्थानात तूळ रास येईल. तूळ राशीत सूर्य नीचेचा मानला जातो.
५ वे स्थानात सूर्याची सिंह रास येईल, ५ वे व ७ वे स्थानाचा संबंध प्रस्थापित होत असल्याने त्या स्त्रीचे प्रेम संबंध असू शकतात.
अर्थात हि स्थिती पतीस हानिकारक असणारा एक घटक असू शकते.
२. वृषभ लग्न असेल आणि सूर्य ७ वे स्थानात स्थित असेल तर :
४ थे स्थानात सिंह रास येईल, सुख स्थानाचा मालक सूर्य जोडीदारास अनिष्ट फळ निर्माण करणार नाही.
३. मिथुन लग्न असेल आणि सूर्य ७ वे स्थानात स्थित असेल तर :
३ रे स्थानात सिंह रास येईल, साप्तमापासून भाग्य स्थानाचा मालक सूर्य जोडीदारास अनिष्ट फळ निर्माण करणार नाही. तसेच काम त्रिकोणातील हे एक स्थान आहे.
४. कर्क लग्न असेल आणि सूर्य ७ वे स्थानात स्थित असेल तर :
२ रे स्थानात सिंह रास येईल, कुटुंब स्थानाचा मालक सूर्य जोडीदारास वैवाहिक सौख्य प्रदान करेल.
५. सिंह लग्न असेल आणि सूर्य ७ वे स्थानात स्थित असेल तर :
लग्न स्थानात सिंह रास येईल, लग्न स्थानाचा मालक सूर्य जोडीदारास सामान्य फळ प्रदान करेल..
६. कन्या लग्न असेल आणि सूर्य ७ वे स्थानात स्थित असेल तर :
१२ वे स्थानात सूर्याची सिंह रास येईल. पतीच्या घरातून ६ वे स्थानाचा स्वामी असल्याने तो पतीला अस्वस्थता देईल. पतीचे आरोग्य चांगले राहणार नाही.
७. तूळ लग्न असेल आणि सूर्य ७ वे स्थानात स्थित असेल तर :
११ वे स्थानात सिंह रास येईल, लाभ स्थानाचा मालक सूर्य जोडीदारास वैवाहिक सौख्य प्रदान करेल. तसेच काम त्रिकोणातील हे एक स्थान आहे.
८. वृश्चिक लग्न असेल आणि सूर्य ७ वे स्थानात स्थित असेल तर :
१० वे स्थानात सिंह रास येईल, कर्म स्थानाचा मालक सूर्य जोडीदाराच्या सुख स्थानाचा मालक होत असल्याने सामान्य फळ निर्माण करेल..
९. धनु लग्न असेल आणि सूर्य ७ वे स्थानात स्थित असेल तर :
९ वे स्थानात सिंह रास येईल, भाग्य स्थानाचा मालक सूर्य जोडीदारास वैवाहिक सौख्य प्रदान करेल, कारण जोडीदाराचे काम त्रिकोणातील हे एक स्थान आहे.
१०. मकर लग्न असेल आणि सूर्य ७ वे स्थानात स्थित असेल तर :
८ वे स्थानात सिंह रास येईल, अष्टम स्थानाचा मालक सूर्य स्वत:स अडचणीचा ठरू शकतो. तसेच स्वताचे सासर हे स्थान दर्शवते. जोडीदारास २ रे स्थान दर्शवत असल्याने धन लाभ होऊ शकतो. आरोग्यासाठी मात्र बाधक स्थान असेल.
११. कुंभ लग्न असेल आणि सूर्य ७ वे स्थानात स्थित असेल तर :
७ वे स्थानात सिंह रास येईल, भार्या स्थानाचा मालक सूर्य जोडीदारास साधारण वैवाहिक सौख्य प्रदान करेल. तसेच स्त्रीच्या काम त्रिकोणातील हे एक स्थान आहे.
१२. मीन लग्न असेल आणि सूर्य ७ वे स्थानात स्थित असेल तर :
सूर्य सातव्या स्थानात ६ वे स्थानाचा स्वामी म्हणून येईल आणि जे स्त्रीच्या आरोग्यास हानिकारक ठरेल तसेच त्यामुळे ६ वे स्थान वाद, भांडणे आणि भांडणांचे घर असल्याने व सप्तम स्थानाचे देखील व्यय स्थान येत असल्याने वैवाहिक सौख्यात बाधा निर्माण करू शकते.
हा लेख लिहिण्या मागे उद्देश एवढाच आहे, कि कोणत्याही नियमावर डोळे झाकून विश्वास ठेवून अवलंबून न राहता त्या नियमाचे सर्व प्रकारे अवलोकन करून, अलिखित अशा गोष्टींचा मागोवा घेऊन, कुंडलीतील इतर सर्व घटक तपासून मगच एखाद्या निर्णयावर यावे. जेणेकरून तुमच्या कडे येणाऱ्या जातकास योग्य दिशेने मार्गदर्शन मिळून त्यानुसार त्यास वाटचालीत दिशादर्शक ठरेल.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)