विषय : नक्षत्र फळ विचार
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : ज्योतिष मार्गदर्शिका

नमस्कार,
कुंडलीतील राशीवरुन फलोदशाबरोबरच संबंधित ग्रह कोणत्या राशीचे, कोणत्या नक्षत्रात आहे याचा विचार करुन फलादेश सांगण्याने, फलितात अचुकता व सूक्ष्म कालनिर्णयाची प्रचिती येते.
उदा. मेष राशी मध्ये अश्विन चार चरण, भरणी ४ चरण व कृत्तिकेचे १ चरण आहे. मेष रास अश्विन नक्षत्रातील व्यक्ती विद्यादायी व नेतृत्व गुणाची व भरणी नक्षत्रातील परावलंबी व स्वार्थी, तसेच कृत्तिका नक्षत्रातील कर्तृत्ववान पण चिडखोर असण्याची शक्यता असते. तेव्हा भावाचे (स्थानाचे) मूळ गुणधर्म, त्यात असणारे ग्रह. ग्रहाची नक्षत्रे, यावर आधारित भविष्य अचुक येऊ शकेल. यावरील विवेचनावरुन असे दिसून येईल की उदा. सर्व मेष राशीच्या व्यक्तींच्या, लग्नी मेष रास असेल तर, एकाच प्रकारचा स्वभाव असू शकत नाही.
नक्षत्रे ही अढळ असतात. सूर्याच्या भ्रमण मार्गात (क्रांतिवृत्तात) काही ठळक, आकर्षक अशा तारकापुंजांना नक्षत्र असे म्हणतात. नक्षत्रे ही स्वयंप्रकाशित असतात. नक्षत्राचे गुणधर्म चर, स्थिर, मृदु, क्रूर, अंध, मध्य, मंद व सुलोचनी, ऊर्ध्व, अधो, तिरयक मुखाची असतात (तक्ता सोबत जोडला आहे). तशीच ती देवगण, मनुष्यगण, राक्षसगण यातही विभागली आहेत. यावरुन फलित सिद्ध करावे, तसेच मुहूर्त काढणेस उपयोग करुन घ्यावा.
गोचर विचारात जन्म राशीवरुन, गोचर ग्रहाचा परिणाम जसा आपण बघतो, त्याचप्रमाणे त्याहून सुक्ष्मरीत्या, तो गोचर ग्रह कोणत्या नक्षत्रात आहे. हे पाहून सूक्ष्म भविष्य सांगता येते.
आपल्या जन्म नक्षत्रापासून गोचर नक्षत्राचे परिणाम पुढीलप्रमाणे असतात.
प्रथम – उन्नतिकारक
दुसरे – संपत
तिसरे – विपत्त
चौथे – शुभ (क्षेम)
पाचवे – अशुभ (प्रयाण, प्रलय)
सहावे – साधक
सातवे – मृत्युकारक (वध)
आठवे – मित्रता दर्शक (मैत्र)
नववे – परम मित्रता दर्शक (परममैत्र)
परत दहाव्या पासून वरील क्रम पाहावा. पंचांगात ज्या त्या दिवसाचे कोणते नक्षत्र गोचरी आहे, हे दिलेले असते. त्यावरुन संबंधित दिवस आपणास कसा जाईल हे समजते.
नक्षत्राचे गुणधर्म :
ज्येष्ठा, मूळ, आश्लेशा नक्षत्रावर जन्म असलेस जनन शांती बाबत सविस्तर माहिती पंचांगा आधारे घेऊन शांती करावी. कसेच तिथी गंडान्त व लग्न गंडान्त या समयात जन्म झाला असल्यास ही जननशंती करावी लागते.
नक्षत्रात १४ योनी असून त्या त्या प्राण्याच्या स्वभावाप्रमाणे नक्षत्राचे गुण दिसून येतात. याबाबत अवकहडा चक्राचा अभ्यास करावा. नक्षत्राच्या देवता, आराध्यवृक्ष, चरणाक्षरे याचाही मानवी जीवनात उपासनेकरता वापर केला जातो.
चंद्रनक्षत्रावरुन महिन्याची नावे रूढ झाली आहेत. उदा. चित्रा चैत्र, अश्विनी – अश्विन इ.
सूर्य नक्षत्रे – रवि एका वर्षात २७ नक्षत्रातून भ्रमण करतो. पर्जन्य भविष्यात सूर्य नक्षत्राचा वापर करतात.
१) हरवलेली वस्तु असा प्रश्न असल्यास :
अंधलोचन नक्षत्रावर – पूर्वेस सापडते.
मंदलोचन नक्षत्रावर – हरवलेली वस्तू दक्षिणेस थोड्या वेळाने सापडते
मध्यलोचन नक्षत्रावर – पश्चिमेस दीर्घ प्रयत्नाने सापडण्याची शक्यता असते.
२) नक्षत्र – गण :
देव गण, मनुष्य गण, राक्षस गण यावरुन स्वभाव कळून येतो.
३) धृव नक्षत्रे, चर नक्षत्रे : उदा. धृव – घर बांधणे, चर – वाहन चालविणे. अशी नक्षत्रे पाहून त्यादिवशी संबंधित व्यवहार करावे.
४) उर्ध्व मुख नक्षत्र : राज्याभिषेक, कळस चढवणे, तोरण बांधणे
अधोमुख नक्षत्र : विहीर खोदणे, पाया खोदणे
तिर्यगमुख नक्षत्र : पशु खरेदी, वाहन चालविणे
अशा प्रकारे कुंडलीचा अभ्यास करते वेळी जन्म नक्षत्राचा तसेच प्रत्येक स्थित ग्रहांच्या नक्षत्रांचा विचार करणे संयुक्तिक ठरते.
जन्म नक्षत्र व व्यक्तीचे वर्णन :
आश्विन (केतू) : माणसे उत्तम व्यक्तीमत्वाची व धार्मिक असतात, त्यागी, पराक्रमी, बुद्धीमान
भरणी (शुक्र) : आकर्षक बांध्याची व उद्योगात यशस्वी होणारी असतात.
कृत्तिका (रवी) : नक्षत्राची माणसे हुशार, नवनवीन विचारांची व नशिबाच्या फेऱ्यात अडकणारी असतात.
रोहिणी (चंद्र) :ज्ञानी, प्रवासप्रिय व कला जोपासणारी
मृग (मंगळ) : संशोधनात उत्कृष्ट कार्य करणारी, उदात्त विचारांची
आर्द्रा (राहू) : धार्मिक, भावूक, जीवनाकडे स्वप्नाळू वृत्तीने पाहाणारी.
पुनर्वसु (गुरु) : सुस्वभावी, यश अपयशाला सामोरी जाणारी.
पुष्य (शनी) : धनिक, संशयी, मृदुभाषी, सर्व कलेची थोडीफार माहिती असणारे
आश्लेषा (बुध) शीघ्र कोपी, कठोर वाचा असणारे
मघा(केतू) : जरब ठेवणारे, धनिक, सामाजिक कार्यात रस घेणारे
पूर्वा (शुक्र) : ज्ञानी, धंद्यामधे पुढे येणारे, स्वार्थी..
उत्तरा (रवी) : विश्वासू परंतु लोभी व धरसोड वृत्तीचे..
हस्त (चंद्र) : हुशार, वक्तृत्व कलेत निपुण, भांडकुदळ पण स्वार्थत्यागास तयार.
चित्रा (मंगळ) : अंधश्रद्धाळू, कठोर मनाचे
स्वाती (राहू) : सुसंस्कृत मायाळू
विशाखा (गुरु) : स्वप्नाळू, ज्योतिषप्रेमी, दानशूर
अनुराधा (शनी) : ज्ञानी, भक्तियुक्त, मृदु, संगीतप्रिय.
ज्येष्ठा (बुध) : कलाकार, शेतीतज्ज्ञ व शूर
मूळ (केतू) : बलवत्तर, आकांक्षा, वाचाळ सहाय्यक वृत्ती
पूर्वाषाढा (शुक्र) : चाणाक्ष, स्वार्थी, कुट बुद्धीचे
उत्तराषाढा (रवी) : शिक्षण, आदरणीय परंतु शीघ्रकोपी
श्रवण (चंद्र) : शूर, प्रशासक, प्रसंगाशी जमवून घेणारे
धनिष्ठा (मंगळ) : संयमी, समाजप्रिय
शततारका (राहू) : सुसंस्कृत, प्रतिभावान, धार्मिक
पूर्वा भाद्रपदा (गुरु) : धार्मिक वृत्ती तथापि लोकप्रियतेची आकांक्षा व आवड
उत्तराषाढा (शनी) : मृदु स्वभाव, सहाय्यकारक, नियोजनाची आवड असणारा.
रेवती (बुध) : उत्तम गुणांचा संचय असणारा व आदरणीय
असे हे जन्म नक्षत्राचे गुण असले तरी कुंडली फलितात इतरही बाबींचा विचार करुन निर्णय द्यावा लागतो. उदा. राशीची स्थानगत फले व त्यांच्यातील योग, ग्रह दृष्ट्या व इतर बाबी यांचा सांकल्याने पूर्वीच्या प्रकरणात विचार मांडला आहेच. सोबत नक्षत्रांचे शुभ-अशुभत्व, मुख, लोचन, स्वभाव गुण, कोणते कार्यास योग्य व नक्षत्र फलित यांचा तक्ता जोडला आहे. हा तक्ता, कुंडली – ग्रह नक्षत्राधारे फलादेशाकरता, तसेच निरनिराळ्या कार्याचे मुहूर्ताकरता उपयोगी पडेल.
वरील नक्षत्रे, एकाच राशीत असू शकतील (चारी चरणे) अथवा दोन राशीत विभागून असेल. उदा. अश्विनी नक्षत्राचे चारी चरण मे राशीत आहेत तथापि कृतिका नक्षत्राचे १ चरण मेष राशीत असून बाकी ३ चरण वृषभ राशीत आहेत. तेव्हा नक्षत्र व त्याचे चरण व ते कोणत्या राशीत आहे हे पाहून फलादेश द्यावा लागतो. याबाबत संपूर्ण तक्ता पंचागांतील अवकहडा चक्र पाहून ठरवावा.
नक्षत्र वर्णन :
१) आश्विनी नक्षत्र मेष रास : पराक्रमी नक्षत्र. आश्विनकुमार यास दधिची ऋषींकडून धर्नुविद्या शिकावयाची होती. तथापी, इंद्राचा त्यास विरोध होता. म्हणून आश्विनकुमारांनी दधिचेच मुख उडवून त्या जागी घोड्याचे मुख बसवून विद्या घेणेस प्रारंभ केला. हे इंद्रास कळाल्यावर त्याने घोड्याचे शिर उडवले. या नंतर आश्विनाने परत दधिचीचे तोडलेल शिर दधीचीला बसवले. अशा प्रकारे हे नक्षत्र उत्तम. शल्यविशारद समजले जाते. आश्विनकुमाराची धनुर्विद्या मात्र यामुळे खंडीत झाली. हे या नक्षत्रावर कार्यारंभ करतात. उच्चपदवी प्राप्त करणाऱ्यांचे असे नक्षत्र असते.
२) भरणी मेष रास :
क्रूर नक्षत्र, चैनबाज, या व्यक्तीत यमाचा कठोरपणा आढळतो. म्हणून हे यमधर्मी नक्षत्र मानतात. व्यक्ति काटक अंधश्रद्धी, स्त्रियांना अनुकूल नाही. स्त्रिया बेढब असतात. या नक्षत्रावर पूर्व जन्माचे पाप भोगावेच लागते. उपासनेचा उपयोग होत नाही. असे म्हणतात. अधोमुखी नक्षत्र, विहीर खणणेस योग्य. पाया भरणीसही चांगले.
३) कृतिका मेष- ४ थे चरण, वृषभ ३ चरण : कर्तृत्ववान पण कुर्रेबाज. या नक्षत्रात ६ तारकांचा पुंजा आढळतो. या मागील कथा अशी आहे. सप्तर्षी (सात ऋषि) आपल्या पत्निसह ध्रुव प्रदेशातून दक्षिण दिशेस वाटचाल करत होते. मध्यंतरी उबेसाठी त्यांनी शेकोटी केली. काही समयानंतर सात ऋषि मार्गस्थ झाले. तथापि त्यांचे सोबत वसिष्ठासह फक्त अरुंधति मार्गस्थ झाली व बाकी सहा कन्या शेकोटीपाशीच थांबल्या व शापामुळे त्या जागीच स्थित झाल्या. या सहांना शंकरांचे प्रसादाने कार्तिकस्वामी षडाननाची पुत्र प्राप्ती झाली. हे नक्षत्र कोपिष्ट व निश्चयी आहे. सुलोचनी नक्षत्र, बांधा मजबूत व आकर्षक, स्त्रिया सुंदर पण उग्र, फटकळ व फॅशनेबल. या नक्षत्रात डॉक्टर्स, इंजिनिअर्स व अम्मलदार आढळतात. शस्त्रक्रियेच्या मुहूर्ताला हे नक्षत्र योग्य आहे.
४) रोहिणी वृषभ रास – रूपगर्विता : रोहिणी नक्षत्र अतिशुभ व सिद्धी देणारे. हे एकच नक्षत्र सर्व प्रकारचे शुभत्व देते. स्त्रियांना हे नक्षत्र वरदान आहे. अंग पुष्ठ, रोहिणी नक्षत्राचा फुललेला टपोरा गुलाबाची उपमा देतात. हस्ताक्षर मोठे. स्थिर नक्षत्र पाया भरणी व कळस चढवण्यासही योग्य.
५) मृगशीर्ष- वृषभ – २ चरण, मिथुन – २ चरण : वात्सल्य व कला – कौशल्याने युक्त नक्षत्र.
हे नक्षत्र मंदलोचनी, तिर्य:मुख व देवगणी आहे. व्यक्ति सुशील, व्यवस्थीत वागणुकीची असते. अंगकाठी, बारीक अशी व्यक्ति फार मोठ्या पदावर पोचत नाही. प्रकृती नाजूक. सर्व शुभ कार्याला नक्षत्र चांगले.
६) आर्द्रा मिथुन : तीक्ष्ण व दारुण नक्षत्र, अविचार पण बुद्धीमान व्यक्ति, बांधा उंच. स्त्रीयांना हे नक्षत्र अनुकूल नाही. व्यक्ति भांडकुदळ व बोलण्यात दोष असतो.
शुभकार्यास वर्ज्य नक्षत्र
७) पुनर्वसू मिथुन – ३, कर्क -१ : माणसांचे पुनर्वसन करणारे नक्षत्र. बांधा उंच, बुद्धिमान. स्त्रियांना हे नक्षत्र उत्तम. शुभकार्यास प्रशस्त नक्षत्र.
८) पुष्य – कर्क : नक्षत्राचा राजा
पुष्य नक्षत्रावर जन्म म्हणजे व्यक्तिस देवांचा पाठींबा आहे, असे समजावे. प्रसिद्धीपासून विन्मुख, देवगणी, आनंदी व उदार व्यक्तिमत्व. उंच व मांसल बांधा. शुभगुणी – परंतु विवाह मुहुर्तास वर्ज्य
९) आश्लेषा – कर्क : पृथ्वीचा भार घेणारे
पं. नेहरू यांचे हे नक्षत्र. त्यांनी भारताच्या अभिवृद्धीचा भार घेतला. बांधा मध्यम, उंच, चालणे तिरपे क्रूर नक्षत्र म्हणून जनन शांती आवश्यक. स्त्रीयांना अनानकुल नक्षत्र, पराक्रमी पण ऐषारामी, अधोमुख नक्षत्र.
१०) मघा – सिंह : ‘पडतील मघा तर पिकतील शेते बघा’
फलदायी नक्षत्र, क्रूर, अधोमुखी व मध्यलोचनी. पुरुषांना योग्य नक्षत्र. विशाल छाती – ऐटबाज चालणे, रागीट स्वभाव, स्त्रिया पुरुषा बांध्याच्या असतात. या नक्षत्रात अधिकारी वर्ग जास्त दिसून येतो. हे नक्षत्र पितराचे दैवत आहे. नक्षत्रात ‘गुरु’ असेल अथवा पंचमेशात हे नक्षत्र दिसून आल्यास, सदर व्यक्तिचा वंश खुंटतो. विवाह कार्यास अनुकूल नक्षत्र. तसेच हे अधोमुखी नक्षत्र असून शस्त्रक्रिया मुहुर्तासही योग्य आहे.
(११) पुर्वाफाल्गुनी– सिंह :
अधोमुखी, क्रूर व सुलोचनी नक्षत्र. व्यक्ति बुद्धीमान, भोगी, पराक्रमी व खेळाडू असते. स्त्रिया पुरुषी बांधाच्या, हस्ताक्षर बारीक व उभट या नक्षत्राच्या व्यक्ति अम्मल बजावणी खात्यात परंतु अधिकारी नसतात.
१२) उत्तरा फाल्गुनी- सिंह- १ चरण, कन्या- ३ चरण ‘मोगऱ्यासारखे दरवळणारे’
ऊर्ध्वमुखी, अंधलोचनी, शुभ नक्षत्र, सात्त्विक प्रवृत्ति, आश्रीत गुणधर्माची, बांधा उंच व सडसडीत, कार्य तत्पर, स्त्रिया खेळकर स्वभावाच्या, नम्र, धैर्याने प्रसंगाला तोंड देणाऱ्या म्हणूनच रखरखीत उन्हाळ्यात, मोगऱ्याप्रमाणे सुवास देणारे नक्षत्र असे या नक्षत्रास म्हटले आहे.
१३) हस्त – कन्या : यौवनाच्या उंबरठ्यावरील लाजाळू देवगणी, सात्विक व निर्व्यसनी. या नक्षत्रातील स्त्रिया प्रौढ वयातही कुमारिका वाटतात. संसाराची आवड असते. बांधा मध्यम व पुष्ट.
१४) चित्रा – कन्या – २, तुळा – २ : तारुण्याने मुसमुसलेली.
राक्षसगणी नक्षत्र पण शुभदायी, लक्ष्मीदायक, सुंदर, धाडसी, बांधा उंच, सडसडीत, स्त्रिया दिसावयास सुंदर, सुखवस्तू, मुहूर्त कार्यास चांगले.
१५) स्वाति – तुळा
अत्यंत ठळक नक्षत्र, व्याधानंतर ठळकपणात याचा दुसरा नंबर लागतो. देवगणी, सात्विक पण व्यवहारी भोगाचे. बांधा उंच व भरदार.
रोहिणी नक्षत्राची स्त्री हा गावठी गुलाब (बागायतदाराची पत्नि) तर स्वाति हा काश्मिरी गुलाब (श्रीमंत व्यापाऱ्याची पत्नी) अशी तुलना केली जाते.
नक्षत्र सुलोचनी असून मुहूर्त शास्त्रात महत्त्वाचे आहे.
१६) विशाखा (राधा) तुला – ३, वृश्चिक – १ पर्णहिन नक्षत्र.
राक्षसगणी व अशुभ नक्षत्र, विद्वान पण आश्रित, तामसी, अविचारी या नक्षत्रात जर गुरु अथवा शनि असलेस अपत्यहिनता दर्शवते.
१७) अनुराधा वृश्चिक: मादक व मोहक
राधा (स्वाति) नक्षत्रानंतरचे नक्षत्र म्हणून अनुराधा असे संबोधिले आहे.
शुभ, देवगणी, कलाकुसर व छानछोकीचे छंद असलेले व्यक्तिमत्त्व. बांधा आडवा व पुष्ठ स्त्रियांना हे नक्षत्र वरदान आहे. या नक्षत्राच्या व्यक्तिचे नेत्र मादक असतात.
१८) ज्येष्ठा वृश्चिक : ज्येष्ठ पदासाठी धडपडणारे
राक्षसगणी. हा प्रखर तारा आहे. अत्यंत लालभडक रंग असून याचा व्यास सूर्याचे २८५ पट आहे. नक्षत्र मध्यलोचनी असून व्यक्ति हट्टी, भांडखोर व विश्वासघातकी, तथापी हे नक्षत्र माणसाला ज्येष्ठ पदापर्यंत पोहचवते. दुर्योधनाचे नक्षत्र ज्येष्ठ होते. बांधा मध्यम व बळकट, स्त्रियांना अशुभ, जनन-शांती आवश्यक. मुहुर्तास वर्ज्य नक्षत्र.
१९) मूळ धनू :
महापराक्रमी नक्षत्र. राक्षस गणी असून देखील हे शुभ व सात्विक नक्षत्रात गणले जाते.
मूळ नक्षत्राच्या व्यक्ति, दुसऱ्याच्या मुळावर येऊन त्याची जागा पटकावते. बांधा मध्यम व सडपातळ काटक. संत ज्ञानेश्वरांचे नक्षत्र मूळ होते. विवाह मुहुर्तास, शस्त्रक्रिया कार्यास योग्य.
२०) पूर्वाषाढा धनू :
अधोमुख, उग्र, अंधलोचनी, न्यायी व उदार, राकट व काटक, खादाड.
२१) उत्तराषाढा – धनु -१, मकर ३ : सेवावृत्तिचे पण आश्रित
उदात्त, न्यायी, चिकाटी, विनयशील आणि आश्रित असे हे नक्षत्र आहे. बांधा उंच मजबूत. मुहूर्तकार्यास (पायाभरणी) शुभ.
२२) श्रवण मकर – सेवावृत्तिचे तेजस्वी पण आश्रित
श्रवणबाळावरून या नक्षत्रास हे नाव पडले आहे. शापित नक्षत्र असलेने वरुन सुखी पण आतुन दुःखी असे व्यक्तिमत्त्व असते. देवगणी, उर्ध्वमुख व सुलोचनी, बेढब बांधा, दिसावयास तेजस्वी, साधु पुरुषासारखे उदार व धार्मिक सर्व शुभ कार्यास योग्य नक्षत्र.
धनिष्ठा मकर – २, कुंभ – २ : भीष्म प्रतिज्ञा करणारे. भीष्माचार्यांचे धनिष्ठा नक्षत्र होते. राक्षसगाणी, अंधलोचनी, निश्चयी व पराक्रमी. बांधा मध्यम, उंच, हाडपेर मोठे व रुंद स्वपराक्रमाने उच्चपद प्राप्त करणारे. हस्ताक्षर बारीक असते.
२४) शततारका कुंभ – ४ : कलाबुद्धी व अधिकार देणारे
अप्रतिम बुद्धी, संशोधक. मंदलोचनी, राक्षसगणी, कल्याणकारक, धुर्त, मनाचा पत्ता न लागू देणारे बांधा उंच व सडपातळ, स्त्रिया मात्र अरसिक असतात. हे एक नक्षत्र सर्व क्षेत्रात उच्च शिक्षण दर्शविते. मुहर्त शास्त्रास अनुकुल नाही.
२५) पुर्वा – भाद्रपदा कुंभ ३ मीन – १ : बुद्धिमान पण आश्रित
पूर्व भाद्रपदा म्हणजे पुर्वायुष्यात व्यक्तिचे भद्र (चांगली) करणारे. अधोमुख, उग्र मनुष्यगणी, चिकाटी, दुरदर्शी, प्रगल्भ बुद्धी, कुटुंबवत्सल, बांधा उंच व भारदस्त. सदाचारी व देवभक्त. मुहुर्तशास्त्रात फारसे महत्त्वाचे नाही.
२६) उत्तराभ्रदपदा मीन : उत्तरायुष्यात व्यक्तिचे कल्याण करणारे चिकाटी व न्यायी. शुभ नक्षत्र, विद्वान व लोकप्रिय. बांधा मध्यम, उंच व आडवा. हस्ताक्षर मोठे व वेडेवाकडे. मुहुर्त कार्यात हे नक्षत्र सर्व कार्यास शुभ.
२७) रेवती मीन : कोमजलेली सुंदर बालिका
अशक्त नक्षत्र, फिकट. (देवयानी, जटायू व आश्विन या प्रखर ताऱ्यांनी वेढल्यामुळे) व्यक्तीमध्ये भूतदया, मनवता व शीतल स्वभाव आढळून येतो.. स्वकर्तृत्व नसते. बांधा मध्यम व ठेंगू, घरकोंबडे, सुस्त, स्त्रिया सुंदर असतात. सुशिक्षित व सुखवस्तु मुहुर्तशास्त्रात शुभ.



ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)