
नमस्कार,
आज आपण माया म्हणजे काय हे उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वात प्रथम मला हे स्पष्ट करणे आवश्यक वाटते कि, मी कोणी या क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती नाही तर एक सामान्य सांसारिक माणूस आहे.. परंतु लहानपणापासून प्रचंड वाचन व एक ज्योतिष अभ्यासक म्हणून ज्या गोष्टींचे चिंतन व मनन करत गेलो त्याचा परिपाक म्हणून माया या विषयाला हात घालायचे धाडस करतोय.
जसजसे या विषयांवर वाचन वाढत गेले, तसतसे हे जाणवत गेले कि, या विषयावर लिहिली गेलेली अनेक पुस्तके हा विषय समजून सांगण्यापेक्षा अनेक संतपुरुष, महाराज यांच्या अनुभूती, साक्षात्कार आणि चमत्कारांच्या वर्णनानेच जास्त पाने भरलेली आहेत. त्यातून कुतूहल तर निर्माण व्हायचे पण अज्ञानाचा भोपळा कायम तसाच राहायचा आणि अनेक प्रश्न मनात फेर धरून नाचायचे. उदा. ब्रह्म नि माया म्हणजे काय? माया जर मिथ्या असेल, तर ब्रह्म या सत्यमय ज्ञानाला ती कशी झाकाळू शकते? मायेमुळे सामान्यजनाला ब्रह्माचे ‘सत्य’ दर्शन होऊ शकत नाही, असे म्हटले जाते. तेव्हा माणसाने या मायेच्या तावडीतून आपली मुक्तता तरी कशी करायची? ई.
तर माझ्या अल्पबुद्धीला जे माया या विषयी आकलन झाले ते मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
ब्रह्म आणि माया या गूढांची उकल करण्यापूर्वी आपणाला खरे नि मायावी काय हे प्रथमत: समजून घ्यायला हवे. माया व ब्रह्म ही दोन्हीही तत्त्वतः काल्पनिक व प्रत्यक्षात दिसणारी नसल्याने, त्यांच्या बद्दलचा समज किंवा ज्ञान उपमा नि रूपकांनीच करून घ्यावे लागेल. कारण माया व ब्रह्म यांची सुस्पष्ट जाण येणे हा एक अनुभवच आहे. व्यक्तिपरत्वे, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार. उदा. ऊन तळपत असता मृगजळ दिसते ते सर्वांनीच पाहिलेले असेल. तो भास इतका खरा असतो की, ज्याला त्याबद्दलचे पूर्वज्ञान नाही, त्याला ते पाणीच वाहत आहे असे वाटते. कोणी त्या अज्ञानी माणसाला पाणी नाही म्हणून, कितीही पटविण्याचा प्रयत्न केला तरी, जे डोळ्यांना प्रत्यक्ष दिसतेय तेच नाही म्हणणाऱ्या नि तसे समजावून देणाऱ्या व्यक्तीला बरेच वेळा मूर्ख ठरवले जाते. कारण इथे प्रत्येक जन स्वतःला शहाणा समजत असतो. समाधान व्हायचे म्हणजे स्वत: अनुभव घेऊन खोटेपणा पटणे याशिवाय अन्य मार्ग नाही. फार कशाला, ज्याला जीवनशक्ती किंवा चैतन्य किंवा ब्रह्म म्हणतात त्याच्याचमुळे ही माया उत्पन्न होते असे म्हटले तर ते सहज कोणाला पटेल अगर समजेल असेही नाही.
सारांश काय तर मायेचे खोटेपण हे अनुभवानेच येणारे शहाणपण असल्यामुळे नुसते सांगून समजणारी ती गोष्ट नव्हे. सूर्य जोपर्यंत तळपत आहे तोपर्यंतच मृगजळाचे अस्तित्व असते. सूर्य उगविण्यापूर्वी किंवा सूर्य मावळल्यावर त्याचे अस्तित्वच नाही. माया सुद्धा तेव्हाच अस्तित्वात येते की, जेव्हा ब्रह्म’ किंवा चैतन्य शक्ती जोमात कार्य करत असतात. जेवढे चैतन्याचे स्फुरण जास्त कार्यक्षम, तेवढे मायेचे अस्तित्वही सुस्पष्ट. मृगजळातही झाडेझुडपे दिसतात. प्रतिसृष्टी तिच्यात उत्पन्न होते. मृगजळ संपले की, त्या सृष्टीची नामोनिशाण राहत नसते. सूर्य उगवताना तेवढा तीव्र नसतो, त्या वेळी मृगजळही नाही. पण जेव्हा तो माथ्यावर येऊन भोवतालची सृष्टी तापते तेव्हाच मृगजळही सुस्पष्ट होते आणि आपल्यापुढे झऱ्याप्रमाणे वाहताना दिसते. माया नि ब्रह्माचे परस्परावलंबित्व असेच आहे. ब्रह्माबरोबरच मायेचे अस्तित्व व नसतेपण अवलंबून आहे. हीच उपमा पुढे पुढे नेली, तर सूर्य कधीच उगवत नसतो किंवा मावळत नसतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना त्याच्या सामोरी येते किंवा पाठ फिरवते नि आपण म्हणतो, की सूर्य सकाळी उगवला नि संध्याकाळी मावळला. वस्तुतः सूर्य आहे तिथेच असतो. तो अपरिवर्तनीय, अविनाशी, चैतन्यस्वरूप आहे. आणि आपण मात्र दर दिवशी गोल फिरून त्याचे समोर उगवत असतो, तसेच मृगजळ क्षणजीवी आहे, त्याचा जन्म अगर मृत्यू अगर विनाश सूर्याच्या अस्तित्वावर आणि सूर्याच्या तळपण्यावर अवलंबून आहे. त्याच अनुरोधाने तुमच्या लक्षात आले असेल की, ब्रह्म हे जीवनशक्ती स्त्रोत- चैतन्यस्वरूप आहे. त्याला जन्म नाही नि मृत्यूही नाही. पण मायेच्या बाबतीत मात्र ती गोष्ट खरी नव्हे. ज्याला ज्याला जन्म-मृत्यू आहे, आदि-अंत आहे, जे नाशवंत आहे, नश्वर आहे, अशाश्वत आहे ते सर्व, थोडक्यात म्हणायचे म्हणजे ‘माया’स्वरूप आहे.
ब्रह्मावर मायेचे आवरण कसे?
सूर्यामुळे मृगजळ उत्पन्न होते हे आपण पाहिले. मृगजळाचे अस्तित्व सूर्यावर अधिष्ठित तसाच त्याचा शेवटही. पण तुम्ही जर मृगजळाचे नीट निरीक्षण केले असेल, तर त्या मृगजळात ज्याप्रमाणे झाडेझुडपे दिसतात, त्याप्रमाणे त्याच्या पाण्यात सूर्याचे प्रतिबिंबही उमटलेले दिसते. हा सारा विलोभनीय चमत्कार बघताना क्षणभर स्वतःला त्या मृगजळात स्थापन करून पाहण्याचा प्रयत्न करा. स्वतः सूर्यच ते मृगजळ घडवून आणण्यात मश्गूल झाला आहे व ते घडवून आणण्यात त्यालाच एक विशिष्ट आनंद वाटत आहे, तोच मृगजळात आनंदाने डुंबतो आहे, असे तुम्हाला वाटेल. हे असे वाटणे त्याच्या अनुभवाप्रमाणे बरोबर असेल कदाचित. पण वस्तुतः या म्हणण्यात काहीही सत्यांश नाही. सूर्याला या मृगजळाशी काहीही कर्तव्य नाही; त्याच्या किरणांनी गुंफले गेलेले ते एक फक्त हलते-चालते चित्र आहे. फार काय तर, आपल्यामुळे मृगजळे निर्माण होत आहेत याची जाणीवसुद्धा सूर्याला नसते. मग मृगजळाबाबत त्याला कसला आलाय खेद आणि खंत. मृगजळ उत्पन्न झाले काय, दिसले काय नि नाहीसे झाले काय, सूर्याला त्याबाबत कसलीही फिकीर नसते. त्याचप्रमाणे, ब्रह्म चैतन्य, ‘माया’जालात कधीही गुरफटत नाही वा ‘माया’ त्यावर कसलेही आवरण घालू शकत नाही. तिच्या अस्तित्वाबद्दल ना ब्रह्म-पुरुषाला आनंद किंवा नसण्याबद्दल खेद. मायेच्या अस्तित्वाची त्याला जाणीवच नसते मुळी….
मनुष्य मायेत गुरफटतो म्हणजे काय, नि मायेतून बाहेर कसे पडायचे?
पुन्हा पूर्वीचीच सूर्य व मृगजळाची उपमा डोळयांपुढे ठेवा. सूर्याची उष्णता ही नेहमीच कायम आहे. ऋतुपरत्वे त्या तापमानात आपल्याला फरक वाटतो. त्याच्या उष्णतेने जीवसृष्टी निरनिराळी रूपे घेते. आपण सूर्याची उष्णता ग्रहण करतो, ती बदलत्या कोनांतून कधी तिरकी तर कधी सरळ किरणांतून ग्रहण करीत असतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते नि सूर्याभोवतीही निरनिराळ्या कोनांतून फिरत असते. त्यामुळे कालमानाप्रमाणे सृष्टीतील वातावरणात सारखे बदल होत असतात; आणि त्याला इतरही भौगोलिक किंवा तात्कालिक कारणे असतात. सूर्याच्या उष्णता प्रदान करण्याच्या कार्यावर व शक्तीवर या कारणांचा काहीही परिणाम होत नसतो. चैतन्याबाबतसुद्धा हाच नियम लागू पडतो. जीवसृष्टीत चलनवलन होते ते या जीवनशक्तीमुळेच; शून्याकार अवकाशातूनच ती शक्ती सृष्टीवरील वस्तूंवर संक्रमित होते; नि त्यातूनच ‘माया’ उत्पन्न होते. सूर्याने मृगजळ जन्मते, पण पृथ्वीच्या प्रत्येक पृष्ठभागावर ते निर्माण होत नाही; तर सहारा वाळवंटासारख्या प्रदेशात किंवा माळरानावर ई. ठिकाणी ते दृश्य उमटते. मायेचा जन्म जीवनाच्या पोकळीत उत्पन्न व्हायलाही काही गोष्टींची आवश्यकता आहेच. परंतु, त्यांचा चैतन्याशी काहीही संबंध नाही.
आधी सांगितल्याप्रमाणे मृगजळ खरे त्याला वाटते, ज्याला त्याचा अनुभव नाही, ज्ञान नाही. आपल्या सर्वांच्या ऐकण्यातला, पाहण्यातला हा अनुभव आहे की, पाण्याने भरलेल्या बादलीत जेव्हा सूर्याचे किंवा चंद्राचे प्रतिबिंब पडते, तेव्हा लहान मुलाला वाटते की, सूर्य किंवा चांदोबा पाण्यात पडला आहे. यावरून हेच सिद्ध होते की, ज्ञान व अनुभव यांच्या समन्वयानेच मायेपासून सुटका होत असते. ब्रह्म आणि माया यांचा परस्परसंबंध स्पष्ट व्हावा म्हणून केवळ, वरील सर्व उपमांचा उपयोग केला आहे.
यावरून तुम्हाला लक्षात आले असेल की, मायेला जन्म देणे हा ब्रह्मतत्त्वाचा कधीही हेतू होऊच शकत नाही. ‘ब्रह्म’ हा एक चैतन्य स्त्रोत – शक्ती आहे आणि अखिल विश्वात ती संक्रमित झालेली आहे. म्हणूनच ब्रह्माची शक्ती व प्रभाव विश्वातील सजीव व निर्जीव दोन्ही सृष्टीत दृग्गोचर होतो. म्हणजेच मायेच्या साऱ्या सृष्टीतही तो आढळतो. या विश्वात असंख्य योनी व सृष्ट पदार्थ आहेत. त्यांचा आकार कसाही का असेना, अखिल विश्वाच्या कणाकणांत ब्रह्म व्यापून राहिले आहे. ते चैतन्य प्रत्येक वस्तूं मध्ये, प्राणिसृष्टी मध्ये दिसेल. ती चैतन्य शक्ती कधी दृश्यमान होईल, तर केव्हा सुप्तरूपाने ती वसत असेल, पण तिच्या विरहित असा कुठलाही अवकाशच नाही.
उदा. आपणा सर्वांना वीज ठाऊक आहे. समजा दिवाणखान्यात आपण सर्वजण बसलो आहोत. इथे किती तरी दिवे लागलेले आहेत. विद्युतकेंद्रात किती वीज तयार होते याचे आपल्याला ज्ञान नसते किंवा ते करून घेण्याची दैनंदिन जीवनात आवश्यकताही वाटत नाही. परंतु त्या विजेचा निरनिराळे उपयोग मात्र आपणाला माहीत असतात. बटण दाबले की दिवा लागतो, इस्त्री वगैरे साधने कार्यक्षम होतात, मोठमोठ्या अवाढव्य यंत्रांना गती मिळते. आता कुणी असे म्हणेल की, जिथे दिवा जळत असतो तिथेच फक्त विजेची शक्ती आहे किंवा विजेची उपकरणे अगर यंत्रे जिथे काम करतात तिथेच फक्त विजेचे अस्तित्व आहे; ज्या तारांतून ती वीज दिव्यांपर्यंत किंवा यंत्रांपर्यंत पोचली त्या तारेत तिचे अस्तित्व कोठेही दिसत नाही, तर ते म्हणणे बरोबर होणार नाही. कारण त्या तारांव्दारेच वीज वाहत येते आणि जिथे तिथे त्या तारांना तोंड फुटते, तेथे तेथे तिचा आविष्कार होतो. तीच गोष्ट ब्रह्म, चैतन्य, ईश्वरी सत्ता यांना लागू आहे….
चित्स्वरूप सर्वव्यापक आहे. सर्व विश्वात, अणूरेणूत भरून राहिले आहे. त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येक सृष्ट पदार्थातून होत असते. यावरून हे स्पष्ट होईल की, मायेनेच ब्रह्म प्रकट होत असते. माया ही ब्रह्माची प्रकट दशा आहे. विश्वातील प्रत्येक वस्तूत ब्रह्मत्वाचा, अगर चैतन्याचा आविर्भाव तुम्हाला आढळेलच आढळेल. फरक एवढाच की काहींमध्ये तो चैतन्याचा प्रभाव बराच काळ टिकून राहील, तर काहींमध्ये तो क्षणभरच टिकेल. हा फरक पडण्याचे एकमेव कारण हेच की, प्रत्येक वस्तूचे घटक व गुणवत्ता वेगवेगळे असतात. पण प्रत्येक वस्तू आज ना उद्या नष्ट होणार हे अपरिवर्तनीय तत्त्व मात्र प्रत्येक वस्तूबाबत खरे आहे, मग नष्ट व्हायला कमी अधिक वेळ का लागेना.
जेव्हा विजेच्या दिव्याची झगझगीत तार तुटते तेव्हा, बल्ब काळवंडून पुन्हा प्रकाश देण्याचे त्याचे सामर्थ्य संपते. तेथे पुन्हा उजेड यावा म्हणून आपण विजेचा नवा प्रवाह आणत नाही, तर फक्त बल्ब नवा आणून लावतो. विजेचा प्रवाह अखंड व अव्याहत चालूच असतो नि तो प्रकट होतो, तो फक्त बल्ब बदलल्यामुळे, म्हणजेच नाशवंत गोष्ट बदलल्यामुळे किंवा आयुष्य संपलेला बल्ब फेकून देऊन नवा लावल्याने. म्हणजेच, ज्या माध्यमातून विजेचे प्रकाश-तत्त्व प्रकट होते तो बल्ब ही वस्तू मुख्य नाही. कारण ती नादुरुस्त होते. तिला एक तर दुरुस्ती करावी लागते किंवा तिच्या जागी दुसरी वस्तू आणावी लागते. जे काम देईनासे झाले, मृत झाले ते फेकून द्यावे लागते. मूळ विजेचा प्रवाह व त्याची प्रकाश देण्याची शक्ती कायमच असते. हा न्याय सृष्टीनिर्मितीला लावून पाहिलात, तर सारे विश्व निरनिराळ्या आकाराच्या सजीव किंवा निर्जीव वस्तुरूपाने बनलेले असते; त्यांच्यात जीवचैतन्य, प्रकाश, जोम, उत्साह ज्या शक्तीने उत्पन्न होतात ते अनादी अनंत, सतत स्फुरण पावणारे खरे महत्त्वाचे. ते चैतन्यच त्या वस्तूंच्या माध्यमाने प्रगट होते.
एक बल्ब मंद प्रकाश देईल तर इतर काही त्यापेक्षा अधिकाधिक प्रखरपणे प्रकाश देतील. बल्बच्या प्रकाश देण्याच्या शक्तीवर ते अवलंबून असते. वस्तुवस्तूतील प्रकाशमान होणारे तत्त्व, ती वस्तू ज्या गुणवत्तेची असेल त्यावर अवलंबून असते तसेच मानवी जीवनातही, ज्याच्या चरित्रातून अगर आयुष्यातून ते चैतन्यतत्त्व जास्त प्रगल्भपणे व भोवतालच्या मानवांना प्रकाश देण्याइतके प्रखरपणे प्रकट होते, त्यांना आपण ‘अवतार’ म्हणतो, महान सद्विभुती म्हणतो. वस्तू बनविण्यात उत्तमोत्तम, सूक्ष्म व शुद्ध पदार्थाचा आपण जितका उपयोग करू तेवढी ती वस्तू सतेज, तल्लख व शक्तीचा प्रकाश सहजपणे प्रकट करण्यास अधिक कार्यक्षम होईल तसेच मानवाचे जगणे जेवढे पवित्र, तेवढे त्याचे ज्ञान लखलखीत. सूक्ष्म, विचार, समज व अनुभव जितके विशाल व समृद्ध, तेवढे त्याच्यातील चैतन्य, ब्रह्मतत्त्व किंवा ईश्वरी पुरुषोत्तम तत्त्व जास्त ठळक होत जाते.
सरते शेवटी एवढेच सांगेन कि जेवढे आपण आपले शरीरधर्म, मानसिकता शुद्ध ठेवू. दृष्टी निर्मळ ठेवू तेवढे आपण मायेपासून मुक्त होऊन पुढील पायरीकडे वाटचाल करू. आपल्या अनुभवाचे जेवढे तटस्थ राहून मनन चिंतन करू तेवढे, तेवढे ज्ञान चक्षु शुद्ध होतील व सर्व गोष्टी उलट्या नसून, आपण उलट्या पाहतोय हे समजेल. मग गाडी सुरु झाल्यावर तुम्ही झाडे मागे पळत आहेत असे न म्हणता, हेच मनोमन म्हणाल कि, आपण योग्य मार्गाने पुढे चाललो आहोत.
ज्योतिष मित्र मिलिंद
ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in
Khup chhaan mahiti…
LikeLiked by 1 person