जैमिनी सूत्रम


जैमिनी सूत्रम

तुम्ही अस्सल पुणेकर असाल तर तुम्हाला हे नक्की माहित असेल, एखादी लागणारी आवश्यक वा अप्रचलित गोष्ट नेमकी कुठे मिळेल.
मग पूण्याचा जुना बाजार पण तुम्हाला वेळेस साथ देऊन जातो. ज्योतिष प्रेमी व अभ्यासू मंडळींना अभंग, गोडबोले, अक्षरधारा ही नावे मी सांगायला नकोत. असो असेच एक्दा संग्रह असण्यासाठी पुस्तके पहात असता विनय कुर्हेकर यांचे जैमिनी सूत्रम हे पुस्तक हाती लागले. ज्यात जैमिनी ऋषि यांनी सांकेतिक शब्दात व श्लोकात ज्योतिष सूत्रे व माहिती दिलेली आढळून आली व मला ती पद्धत फ़ार रंजक वाटली. ती पद्धत तुमच्यासमोर ठेवावी असे वाटले म्हणून या लेखाचा प्रपंच. ज्यांना यात अजून विस्तृत माहिती घ्यायची असेल त्यांनी मूळ ग्रंथ वा मराठीत अनुवाद असलेले विनय कुर्हेकर यांचे हे पुस्तक जरुर वाचावे. या मूळ ग्रंथावर राघवभट्ट, नरसिंह सुरी व निळकंठ या ३ ग्रंथकारांच्या टीका उपलब्ध आहेत.

या सूत्र रुप ग्रंथात स्थान वा राशी ह्या सांकेतिक “कटपयादी वर्ग” अशा गणितात्मक सूत्राने दर्शवले आहे.तर ग्रह हे सामान्य संस्कृत पदाप्रमाणे लिहिलेले आहेत.
जैमिनींचा वेगळेपणा हा कारकत्वावर आधारित आहे. त्यांचा कारकत्व काढण्याचा प्रकार हा प्रत्येक जातकानुसार बदलत असल्याने त्यांना चरकारक असे संबोधतात. ग्रहांचे बलाबल पाह्ण्याची पद्धत सोपी आहे व राजयोग हे सुद्धा कारक व दृष्टी आधारित असून “कर्ता, केवल, योगद, महायोगद असे बलानुरुप नावे दिली आहेत. फ़ळे पाहण्यासाठी कारकांश, आरुढ, उपपद वरुन ठरवली जातात व फ़ळ, फ़ळ विभाग व आयुर्विभाग असा भेद करुन दशा तपासल्या जातात.

“कटपयादी वर्ग” चा गूढ वापर समजण्यासाठी या लेखाबरोबरच्या चित्राच्या सहाय्याने एक उदाहरण पाहू.
यात स्वरांना शून्य ( ० ) व व्यंजनांना वेगवेगळे अंक दिलेले आहेत. क, ट, प, य आदि अक्षरांना १ अंक दिला आहे त्यावरुन “कटपयादी वर्ग” हे नाव पडले. या मधे श्लोक देवनागरी मधे लिहावा, चित्राप्रमाणे अंक लिहावेत. जे अंक येतील ते उलटे लिहावेत. त्याला १२ ने भाग द्यावा. जी बाकी येईल तो अंक कालपुरुषाच्या कुंडलीतील स्थान किंवा राशी समजावी व त्यानुसार सूत्राचा अर्थ अभ्यासावा.

उदा. दारा = द + र = ८२, याचे उलट लिहिले असता २८ अंक मिळेल. २८ भागिले १२ केले असता २ पूर्ण भाग येऊन बाकी ४ उरेल.
याचाच अर्थ श्लोकात दारा असे लिहिले असेल तर ते सूत्र ४ थे स्थान वा ४ थी राशी म्हणजेच कर्क राशी यांचे संदर्भात असलेले सुत्र अशाच सांकेतिक भाषेत दिलेले असेल.

अशा गणिती व गूढ भाषेत ज्योतिष सूत्रे मांडणारे महर्षी जैमिनी यांना नम्र अभिवादन.

-ज्योतिषमित्रमिलिंद

2 thoughts on “जैमिनी सूत्रम

Leave a comment